Homeब्रेकिंग न्यूजनागपूरातील पासष्ट टक्के हेरिटेज वास्तू नामशेष!

नागपूरातील पासष्ट टक्के हेरिटेज वास्तू नामशेष!


शहरातील तज्ज्ञ वास्तूविशारदांची खंत

(भाग-१)

गोंड राजा कालीन ‘शिव मंदिर छत्र्या’होणार का इतिहासजमा?

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१३ ऑगस्ट २०२४: नागपूर या शहरालाच सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्टया महत्व असून गोंड राजे व नंतरच्या शतकात भोसले यांच्या राजवटीत अतिशय समृद्ध अशी ऐतिहासिक वारसा स्थळे या शहराला लाभली आहे मात्र, दूर्देवाने त्यातील पासष्ट टक्के वारसास्थळे ही नामशेष झाली असल्याची खंत खास ‘सत्ताधीश’कडे अनेक तज्ज्ञ वास्तूविशारदांनी व्यक्त केली.

या ऐतिहासिक वास्तू आपला समृद्ध वारसा,आपला भूतकाळ,तत्कालीन समाज कसा विकसित झाला यांचे संकेत देत असतात.‘वारसा‘ म्हणजे आपल्याला भूतकाळातून मिळालेले असे वैभव जे अतिशय मौल्यवान असून, त्याचे जतन करुन भविष्यातील पिढ्यांपर्यंत पाहोचवणे,असा त्याचा अर्थ होतो.आपली ऐतिहासिक स्थळे,इमारती, स्मारके,धार्मिक स्थळे यापासून तर अनेक मूर्त आणि अमूर्त गोष्टींचा त्यात अंर्तभाव होतो.वारसा हा आपल्या शहराच्या संस्कृतीचा मैलाचा  दगड असतो जो आपल्या राजकारणात,समाजात,व्यवसायात आणि जागतिक दृष्टिकोनामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो.सर्वात महत्वाचे म्हणजे या वारसास्थळांच्या संरक्षणाशी कोणत्याही शहराची आर्थिक समृद्धी देखील निगडीत असते,त्यामुळेच अश्‍या वारशाचे महत्व सरकारने देखील मान्य केले असून, वारशास्थळांच्या संरक्षण आणि जतनसाठी कायदे तसेच राखीव निधीची तरतूद केली आहे.नागपूरात मात्र गेल्या काही वर्षांपासून ज्या वेगाने वारशास्थळे नष्ट होत आहेत,ते भीतीदायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.असेच धाेरण सुरु राहील्यास या शहराला कोणताही इतिहास राहणार नसल्याची खंत ते व्यक्त करतात.
सध्या श्रावण महिना सुरु असून श्रावणात शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते.असेच एक गोंड कालीन शिव मंदिर इतवारीतील भारत माता चौकात,जागनाथ बुधवारी मंदिरा शेजारी असून,या मंदिरात असलेल्या पाच अतिशय पुरातन छत्र्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.‘सत्ताधीश’ने या मंदिराला भेट दिली असता,मंदिरातील शिवलिंग हे अतिशय प्राचीन असल्याची प्रचिती येते.मंदिरातील काळे दगड,नक्क्षी काम,कोरीव भींती, प्राचीन काळात हे मंदिर किती समृद्ध असेल याची खोलवर जाणीव करुन देतात.
जागनाथ बुधवारी येथील उदासीन मठाच्या राम मंदिरात हे शिव मंदिर असून हे शिव मंदिर ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे.हे शिव मंदिर २५० वर्ष पुरातन असल्याचे सांगितल्या जाते. या मंदिरात एकूण पाच छत्र्या आहेत ज्या आता जीर्ण स्थितीत पोहोचल्या आहेत.या पाच छत्र्यांना ‘पंच कळस’असे संबोधले जाते.
या अतिशय देखण्या मंदिरातील या छत्र्यांमधील जाळ्या(झरोखे )या मध्ये -मध्ये तुटलेले आढळतात.हेमाडपंथीय शिल्पकाराचा उत्कृष्ट नमुना म्हणजे या जाळ्या असून,त्या आता इतक्या जीर्ण झाल्या आहेत की,हात लावल्यानंतर त्याचा भूसाच हाताला लागतो!अनेक ठिकाणचे प्लास्टर उखडले असून एका छत्रीला तर विटांची भींत बांधून आधार देण्यात आला आहे!दगडी जाळ्यांना लोखंडाच्या स्टेपलर पिन आकाराच्या मोठ्या अँगलमध्ये फसवून ठेवण्यात आले आहे,त्याचा आधार नसता तर या छत्र्या कधीच्याच कोसळून पडल्या असत्या.आता तर ते लोखंडी अँगल देखील जंगलेल्या अवस्थेत पोहोचले आहे!

या ऐतिहासिक शिव मंदिराची दुरुस्ती करण्याचा अधिकार उदासीन मठाधिपतींना नाही कारण हे मंदिर ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे.श्रावणात दर सोमवारी भाविक स्त्रियां मोठ्या प्रमाणात शिवपिंडीची पूजा करतात.हे मंदिर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे सतत भाविकांचा राबता येथे असतो मात्र,जीर्ण अवस्थेतील छत्र्यांमुळे कधीही दुघर्टना होण्याची भीती कायम असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.एका छत्रीचे तर खांबच वाकडे झाले असून ते कधीही कोसळू शकतं.
या मंदिरात महंत त्रिवेणीदास महाराज उदासीन पूजापाठ करतात.या मंदिरात शिवरात्री,पोळा,गुरु पोर्णिमा तसेच गुरुपुष्य तिथीला मोठा भंडारा होतो ज्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात.माजी आमदार गिरीश व्यास यांनी २८ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्हाधिकारी तसेच मनपा अायुक्त यांना पत्र देऊन मंदिरातील पंचकळशाचे हेरिटेज समितीद्वारा निरीक्षण करुन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.हेरिटेज समितीतील एका सदस्याने त्यावेळी,हेरिटेज समितीकडे आतापर्यंत या संबंधीची कोणतीही तक्रार आली नसल्याचे नमूद करुन,असे पत्र आले असेल तर आधी आमची समिती त्याचे निरीक्षण करेल यानंतर दुरुस्ती किवा नवीनीकरणासंबधींचा निर्णय घेतला जाईल,असे उत्तर दिले.अशी माहिती ‘सत्ताधीश’ला मिळाली.

यावरुन मनपा प्रशासन,जिल्हा प्रशासन,हेरिटेज समिती यांची शहरातील पुरातन वास्तू बाबतची ‘बांधिलकी‘दिसून पडते.मार्च २०१७ मध्येच येथील भाविकांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे

यांना अपील केली होती की जितक्या वेगाने ते या शहराचा ‘विकास‘करीत आहेत,त्याच धर्तीवर शहरातील ऐतिहासिक वारसास्थळांच्या संरक्षणासाठी देखील धडाडीची पावले उचलावीत मात्र,२०१७ ते आता २०२४ सालाचे मध्य उजाडले,हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत निर्णय घेतले जातात ते ऐतिहासिक कस्तरचंद पार्कची भिंत मेट्रो स्टेशनसाठी तोडण्याची परवानगी देण्यासाठी!हेरिटेज अंबाझरी तलावाच्या धरणाला लागून मेट्राेचे ९ पिल्लर उभारण्याची परवानगी देण्यासाठी!हेरिटेज फूटाला तलावात सिमेंट काँक्रिटचे पक्के बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यासाठी!
 उदासिन मठ ग्रेड-२ हेरिटेज वास्तू असून याच उदासिन मठाच्या शिव मंदिराच्या संरक्षणापासून ,जीर्ण हेरिटेज वास्तूंच्या संरक्षणाच्या कार्याची सुरवात करण्याचा निर्णय हेरिटेज समितीचे अध्यक्ष अशोक मोखा यांनी २० ऑगस्ट २०१९ रोजीच्या बैठकीत घेतला होता.अद्याप ही ही वास्तू संरक्षणाच्या त्या कार्याच्या सुरवातीची वाट बघत आहे!उदासिन मठाचे महंत शिवानंद महाराज यांनी हेरिटेज समितीकडे बराच पाठपुरावा केला.
त्यामुळे शहरातील सुप्रसिद्ध वास्तूविशारद संदीप पथे यांच्याकडे या वास्तूचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याची जबाबदारी २०२१ मध्ये सोपविण्यात आली.संदीप यांनी या शिवमंदिराचा सखोल अभ्यास करुन या पुरातत्व वास्तूच्या जपवणुकीसाठी व पुर्ननिर्माणासाठी किमान ८० लाखांचा खर्च येणार असल्याचा अहवाल दिला.मनपाच्या मूर्तीमंत बुद्धीवंत अधिका-यांनी या पुरात्व वास्तूच्या जीर्णोद्वारासाठी किंमत ठरवली फक्त ३८ लाख रुपये!यासाठी निविदा बोलावण्याची प्रक्रिया ही पार पडली.पहीली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली कारण एका ही कंत्राटदाराने निविदा भरली नाही.दुस-यांदा निविदा काढली असता एका कंत्राटदाराने निविदा भरली २८ लाख रुपयांची!म्हणजे मनपाने ठरवलेल्या किंमतीपेक्षाही १० लाख रुपये कमी!

मूळात हेरिटेजसाठी राज्य सरकार वेगळा निधी राखीव ठेवीत असते तरी देखील एखाद्या इतक्या पुरातन वास्तूच्या जीर्णोद्वारासाठी अवघ्या काही लाखांचा निधी मनपातील बुद्धीवंत अधिकारी मंजूर करतात तेव्हा शहरातील हेरिटेज वास्तूंविषयी त्यांची प्रशासकीय ‘मानसिकता’ काय असते,याचे हे शिवमंदिर एक उदाहरण ठरेल.
शहरातील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसाठी मात्र चार टप्प्यात ३००,३०० कोटी रुपये मंजूर होऊन १२०० कोटींचे सिमेंटचे रस्ते शहरात बांधले जात असताना,तीन शतकांपूर्वीची एखादी पुरातत्व वास्तू जतन करण्यासाठी मात्र एक कोटींचाही निधी मनपा मंजूर करीत नाही.या ही घटनेला आता दोन वर्षांचा काळ लोटून गेला आहे.या वास्तूची फाईल त्या काळी जर कोणी पुढे सरकवली असेल तर ती संतरंजीपुराचे सहायक आयुक्त गेडाम यांनी,असे काही लोक सांगतात.त्यामुळे किमान निविदा प्रक्रिया तरी पार पडली.
नुकतेच नागपूरातील ‘झिरो माईल’ हेरिटेजच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपा प्रशासनाच्या वेळकाढू वृत्तीवर कठोर ताशेरे ओढले.झिरो माईलच्या संवर्धनासाठी उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे.वारसा निधीची तरतूद असतानाही प्रशासन कश्‍याप्रकारे फाईलींवर बसण्याचे कार्य करते,हे न्यायायाच्याही लक्षात आणून देण्यात आले.जगप्रसिद्ध ‘लोणार‘ सरोवराच्या संवर्धनाची देखील हीच गत आहे.आपल्या वारसा स्थळांविषयी राजकीय व प्रशासकीय अनास्था ही येत्या काही वर्षात या शहराचा इतिहासच कायमचा पुसुन काढणार असल्याची खंत शहरातील वास्तूविशारद व्यक्त करतात.सीताबर्डीतील ग्लोकल मॉलच्या निर्मितीमध्ये अशीच पुरात्व बाहूली विहीर नामशेष झाली आहे,हे विशेष्!
शिवलिंगावर मूत्रविसर्जन!
इतवारी रेल्वे स्टेशनजवळील शिवलिंगांच्या पुसट झालेल्या अवशेषावर नागपूरकर नागरिक सरळ मूत्रविसर्जन करतानाचे भयंकर चित्र आढळते,असे वास्तूविशारद निकिता रमाणी सांगतात.मेंदीबाग परिसरात तर अगणिक शिव मंदिर आहे.माझे घर तीन नल चौकात ज्या ठिकाणी आहे तिथून जागनाथ बुधवारी मंदिरातपर्यंत एकूण एकशे आठ शिवलिंग असल्याची माहिती त्या देतात.सोनेगाव तलावाजवळील आमराईतील हेरिटेज मुरलीधर मंदिरावर अतिक्रमण होणार होते मात्र,न्यायालयाने त्यावर स्थगिती दिल्याने अद्याप ते वाचले आहे.लालगंज मधील बावली विहीर ही देखील अदृष्य झाली आहे.मी गेल्या अनेक वर्षांपासून हेरिटेज वॉकचे उपक्रम राबवित असते तसेच वास्तूविशारद असल्यामुळे आपल्या शहरातील किमान ६५ टक्के हेरिटेज वास्तू या नामशेष झाल्या असल्याचे त्या सांगतात!काही ठिकाणे तर इतक्या भग्न अवस्थेत आहेत की एक स्त्री म्हणून मलाच त्या ठिकाणी जाण्याची भीती वाटते असे निकीता रमाणी सांगतात.गरज आहे तातडीने लृप्त होत चालेल्या आपल्या शहरातील पुरातन वास्तू वाचवण्याची,त्यासाठी या शहराच्या धोरणकर्त्यांनी प्रभावीपणे पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्या सांगतात.

वेळ आली हेरिटेज ‘सेल’निर्माण करण्याची:संदीप पथे(सुप्रसिद्ध वास्तूविशारद)

आपल्याकडे हेरिटेज ‘समिती‘ आहे,गेल्या अनेक वर्षांपासून आपण या समितीचे कामकाज बघत आहोत,शहरातील लृप्त होत असलेले जागतिक वारसा स्थळे वाचवायची असेल तर आता तातडीने हेरिटेज ‘सेल’निर्माण करण्याची गरज आहे.अश्‍याप्रकारच्या सेलमध्ये तांत्रिक शाखा असते  जी वारसास्थळांविषयी सखोल व अभ्यासपूर्ण अहवाल तयार करीत असते.याशिवाय सेल साठी एक डेडिकेटेल फंड देखील असतो,तो देखील नागपूरातील वारसास्थळांच्या संवर्धनासाठी मिळेल.या सेलमध्ये नोंदणीकृत कंत्राटदार असल्यामुळे शहरातील वारसास्थळांना जीवनदान मिळेल.यासाठी मनपानेच पुढाकार घ्यावा,अनुभव असा आहे की मनपाला शहरातील चांगल्या,अनुभवी वास्तुविशारदांसोबत काम करायचेच नाही,उदासिन शिवमठाचे दस्ताविजकरण मीच केले आहे.इमारतीचा सखोल अभ्यास करुनच जीर्णोद्वारासाठी ८० लाखांचा खर्च लागणार असल्याचा अहवाल दिला मात्र,मनपाने फक्त ३८ लाखांच्या खर्चाला मंजुरी दिली, कंत्राटदाराने तर २८ लाखात या पुरातत्व वास्तूचे जीर्णोद्वार करणार असल्याची निविदा भरली आहे!

मनपाने उदासिन शिवमंदिरासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवावी,असा सल्ला संदीप देतात.मनपाच्या नव्हे तर शासनाच्या हेरिटेज निधीतून शहरातील पुरातत्व स्थळांचा जीर्णोद्वार केला पाहिजे.मूळात हेरिटेज समितीमध्ये शहरातील वास्तूविशारद तरुणांना संधी दिली गेली पाहिजे,‘हाेयबा’सदस्यांमुळे हेरिटेज वास्तूंना जीवनदान मिळणार नाही,असे माझे स्पष्ट मत आहे.एवढ्या परिश्रमातून पुरातन वास्तूंचा सखोल अभ्यास करुन,किचकट ड्राईंगमध्ये डोके खपवल्यानंतर अहवाल तयार होतो,ते केल्यानंतर ही ३८ हजार रुपयांचे वास्तूविशारदाचे भूगतान मनपा गेल्या दोन वर्षांपासून करु शकली नाही,असा अनुभव एका वास्तूविशारदाला आला.महत्वाचे म्हणजे मनपाने उदासिन शिवमंदिरासाठी जो ३८ लाखांचा निधी निर्धारित केला आहे त्यापेक्षा एक ही रुपयाचे इस्टीमेट वर जाणार नाही,असे लिहून घेतल्या गेले आहे,त्यामुळे उदासिन मठाच्या ऐतिहासिक पाच छत्र्यांचे जिर्णोद्वार कोणत्या दर्जाचे होणार,याकडे नागपूरकरांनीच लक्ष ठेवण्याची गरज ते प्रतिपादीत करतात.
थोडक्यात,एकीकडे कोल्हापूरचा सांस्कृतिक आत्मा असणारा, केशवराव भोसले नाट्यगृहाला  चार दिवसांपूर्वी आग लागली,ज्यात संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले.तेथील नाट्यप्रेमींच्या दबावा पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने २० कोटींचा निधी मंजूर केला तसेच  एका वर्षाच्या आत पुन्हा ते नाट्यमंदिर उभारणार असल्याची ग्वाही दिली.नागपूरात कोणत्याही हेरिटेज वास्तूंच्या जीर्णोद्वार व संरक्षणासाठी असा निधी मायबाप सरकारकडून मिळत नाही उलट सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधणा-या कंत्राटदारांची कोट्यावधीची बिले काढण्यासाठी मनपाचे अधिकारी किती तत्पर असतात?हे नागपूरकरांना सांगायची गरज नाही,विशेष म्हणजे मनपा अधिकारी या कंत्राटदारांनाकडून त्यांचे एस्टीमेट अमूक राशीच्या पलीकडे जाणार नाही,असे लिहून घेण्याची ‘हिंमत‘ देखील करताना दिसत नाही….!
याचाच अर्थ शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळे या, सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांपेक्षाही ‘मूल्यहिन ’असल्याचा प्रत्यय नागपूकरकरांना घडतोय….!
…………………………..

Latest बातम्या