केंद्राचे ३१ ऑगस्टपर्यंत लॉक डाऊन वाढवण्यचे निर्देश: मनपा प्रशासनाचे अपयश जनतेच्या माथ्यावर!
नागपूर,ता.२९ जुलै: पालकमंत्री नितीन राऊत यांनी गरज पडल्यास नागपूरात ’स्मार्ट लॉक डाऊन’लावण्याचे वक्तव्य करताच आज सत्तसधा-यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आपला जनजागृतीचा दौराच रद्द केला!सध्या नागपूरात ’लॉक डाऊन’ला घेऊन राजकारणी,प्रशासन तसेच मंत्री ते मुख्यमंत्री यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.नागपूरकर जनता मात्र या सर्व शाब्दिक ’दंगलीत’चांगलीच ‘हवालदिल’झाली असून व्यापारी वर्गासह आता सामान्य नागरिकांनाही लॉक डाऊन नकोच असल्याचा सूर जमिनीस्तरावर (ग्राऊंड लेवलवर ) ऐकू येत आहे.
३१ जुलै रोजी पुन्हा प्रशासन व राजकारण्यांची संयुक्त बैठक होणार असून या बैठकीत पुन्हा लॉक डाऊनविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या शुक्रवारी अश्याच बैठकीत अचानक महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संयुक्तरित्या नागपूरात दोन दिवसांचा शनिवारी व रविवारी ’जनता कर्फ्यूची’घोषणा केली होती.नागपूर जसेच ग्रामीण भागात दररोज करोना बाधितांचा वाढणारा आकडा,यामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडलेला ताण यामुळे जनता कर्फ्यूचे जोरदार समर्थनही करण्यात आले होते.मात्र दोन दिवसांच्या या जनता कर्फ्यूमुळे बाधितांच्या संख्येत किती टक्के घट झाली?संसर्गाची साखळी तोडण्यात किती टक्के यश मिळाले?याची कोणतीही आकडेवारी प्रशासनाकडून अद्याप तरी प्रसिद्ध करण्यात आली नाही.
विशेष म्हणजे शहरात पुन्हा लॉक डाऊनच्या इशारा मुंढे यांनी देताच शंभर वेळा विचार करा,लॉक डाऊन अथवा संचारबंदीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडेल,असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले होते.
आता पुन्हा ३१ ता.बैठकीत नागपूरात पुन्हा लॉक डाऊनच्या निर्णयावर प्रशासन व सत्ताधारी यांच्यात चर्चेचे गु-हाळ रंगेल,या बैठकीच्या धास्तीचे पडसाद नागपूकर व्यापारी,दूकानदार,सामान्य नागरिक सर्वांच्याच चेह-यावर बघायला मिळत असून,शहरात आता कोणालाही लॉक डाऊन नको असल्याचे नागरिकांची मागणी आहे. तर दूसरीकडे केंद्राच्या गृहमंत्रालयाचे आज २९ जुलै रोजी परिपत्रक काढून कंटेन्टमेंट झोन बाहेरील व्यापार उद्दीम आणखी वाढवण्यात यावे तर कंटेन्टमेंट झोनमध्ये मात्र ३१ ऑगस्टपर्यंत सख्तीने लॉक डाऊनचे पालन करण्यात येण्याचे दिशा-निर्देश जारी केले.अश्या झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत फक्त आवश्यक बाबींची पूर्तता करणा-या बाबींनच परवानगी देण्यात यावी,अशी सूचना करण्यात आली आहे.
थोडक्यात जो-तो आपापल्या अधिकारांचा (गैर)वापर करीत नागरिकांच्या (अ)हिताचे निर्णय घेऊन मोकळा होत असल्याचे नागपूरकर जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे.सामान्य जनतेला ’तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला कसं जगायचं आहे?बाहेर पडून करोनासोबत कि घरात चार भिंतीत उपाशी?असे कोणतेही मत नागरिकांकडून मागिविले जात नसून ’मुकी बिचारी कोणीही हाका’अशी परिस्थिती नागपूरकर जनतेची या करोनाकाळात झाली आहे.
आज नागपूरात एकाच दिवशी ३०५ करोनाबाधितांची नोंद झाली.आधीच शहरातील शासकीय आरोग्य व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडली आहे, या पार्श्वभूमीवर प्रशासन व सत्ताधारी यांच्याकडे मग एकच ‘प्रभावी’उपाययोजना उरते ती म्हणजे ’लॉक डाऊन!’.आयुक्त तुकाराम मुंढे हे तर १५ दिवसांच्या ’कर्फ्यूसह लॉक डाऊनच्या’संपूर्ण समर्थनासह बैठकीत अवतरतात. लोकप्रतिनिधींना मात्र जनतेच्या संतापाचे भक्ष्य व्हायचे नसल्यामुळे ते लॉक डाऊनला विरोध करतात तर महापौर हे ‘मध्यम मार्ग’ स्वीकारीत ’लॉक डाऊन करायचेच असल्यास आम्हाला विचारुन करा’असे मत व्यक्त करतात.परिणामी सामान्य जनतेला प्रश्न पडतो त्यांचा ’खरा’वाली आहे तरी कोण?
नुकतेच नागपूरचे पालकमंत्री यांनी एका बैठकीत ’मी वेडा नाही कधीही लॉक डाऊन करायला’अश्या शब्दात केंद्रातील मोदींसोबतच मनपा सत्ताधारी व आयुक्त मुंढे यांच्यावर निशाना साधला. लॉक डाऊन हा काही करोना संसर्ग थांबविण्याचा पर्याय नसल्याचे सांगणा-या पालकमंत्र्यांनी या पुढचा लॉक डाऊन हा ’स्मार्ट’ असणार असल्याची घोषणा ही करुन टाकली.लॉक डाऊन सुसह्य करण्यासाठी अधिका-यांची एक समिती गठीत करण्यात आली असून, लॉक डाऊन करायचे झाल्यास ते किमान १४ दिवसांचे असेल,जिल्ह्यात एक ही मृत्यू होऊ नये म्हणून हा कटू निर्णय घ्यावा लागेल असा सूतोवाच त्यांनी केला.मात्र करोनाने मृत्यू होणार नाही तरी देखील भूकेचे काय?हा प्रश्न केंद्राप्रमाणेच पालकमंत्र्यांनाही ’छळत’नाही!
राजकारणाची पोळी शेकताना विभागीय आयुक्त,मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,पोलीस अधिक्ष् क व इतर अधिकारी हे जेव्हा एकदिलाने काम करीत होते तेव्हा परिस्थिती आटोक्यात होती मात्र अधिका-यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने परिस्थिती बिघडली आणि रुग्ण वाढले,असे सांगून अनेकांवर निशानाही पालकमंत्र्यांनी साधला.मात्र ‘हवेत’ असणारा करोना आटोक्यात कसा आणणार याची कोणतीही ‘शास्त्रीय’चर्चा बैठकीत घडत नाही! करोनाचा आकडा दररोज वाढण्यापासून रोखण्यासाठी कोणाकडेही ’लॉक डाऊन’शिवाय कोणतीही उपाययोजना नाहीच! आयुक्तांनी दंडाची रक्कम पाच पट करुन देखील दूकानदार ऐकत नाहीत कारण….त्यांच्या व्यवसायावरच त्यांचे कुटुंबिय हे ’जगण्यासाठी’निर्भर आहेत.ही‘ मानवीय’ बाजू मात्र निगरगट्ट प्रशासन किवा दिशाहीन सत्ताधारी अद्यापही समजून घेण्यास तयार नसल्याचे शहरातील बुद्धिजीवी सांगत आहेत.लोकांमध्ये करोनाची भीड चेपली असल्याचे हे दिशादर्शक असल्याचे बुद्धिजीवी सांगत आहेत.
चंद्रपुरात १० दिवसांचा लॉक डाऊन घोषित झाला. याआधी सातारा,सोलापूर,कोल्हापूर आणि नाशिकात देखील करोनाचा उद्रेग झाल्यामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. केंद्राच्या ’प्रदीर्घ’लॉक डाऊन नंतर आता राज्यातील प्रशासनाकडून लादण्यात येणा-या या छोट्या लॉक डाऊनमुळे केंद्र सरकारच्या चिंतेत वाढच झाली आहे.केंद्रातील आर्थिक धोरणकर्ते यामुळे चिंतित झाले आहेत.अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याच्या मार्गात हे छोटे छोटे लॉक डाऊन अडथळा निर्माण करु शकतात अशी भीतीही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली असताना आज पुन्हा २९ जुलै रोजी तेच केंद्र सरकार आणि तेच गृहमंत्रालय कंटेन्टमेंट क्ष्ेत्रात ३१ ऑगस्ट पर्यंत लॉक डाऊन करण्याचे निर्देश देत आहेत,यावरुन स्थानिक मनपा प्रशसनासारखेच केंद्रातील सरकार देखील करोना विषयावर किती गलपटलेली आहे, हे सिद्ध होते.
२५ मार्च पासून देशावर लावण्यात(लादण्यात) आलेल्या लॉक डाऊननंतर संपूर्ण अर्थव्यवस्थाच ठप्प झाली.१ जून पासून ती पूर्व पदावर आणण्यासाठी लॉक डाऊन काही नियम व अटींसह शिथिल करण्यात आले मात्र संसर्गितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत असल्याने महाराष्ट्रातील प्रशासन आपापल्या पातळीवर अनेक शहरात असे लॉक डाऊन राबवित आहे. इतरही राज्यात अशीच स्थिती आहे!
मुख्यमंत्र्यांनी मुंढेंना दिलेल्या नैतिक बळामुळे नागपूरकर धास्तीत!
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच घेतलेली मुलाखत यात चक्क मुख्यमंत्र्यांनी मी मुंढेंच्या म्हणजे शिस्तीच्या पाठीशी असल्याचे ’जाहीर’केले.परिणामी नागपूरकर नागरिकांच्या धास्तीत यामुळे आणखी वाढच झाली असून,या पाठबळावर आयुक्त हे आता शिस्तीच्या नावाखाली ‘कर्फ्यूसह लॉक डाऊन’ नागपूरात राबविण्याची शक्यता वाढली आहे.नुकतेच माजी महापौर प्रवीण दटके यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता.
मूळात नागपूरकर नागरिकांना दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत चालणा-या या कलगीतु-याशी काहीएक घेणे-देणे नाही.प्रशासनाकडून करोना आटोक्यात येत नाही हे सर्वस्वी प्रशासनाचे अपयश असून,मार्च-एप्रिल व मे मध्ये ज्याप्रमाणे मनपा प्रशासनाने यशाचे श्रेय लाटले तसेच आता अपयशाची जवाबदारी देखील स्वीकार करुन, लॉक डाऊन शिवाय इतर उपाययोजना राबवावी, नागरिकांना घरात डांबण्याऐवजी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणखी दुरुस्त करावी,अशी मागणी आता नागरिक व दूकानदार वर्ग करीत आहे.
नागपूरात मनपा प्रशासनाचा सावळा गोंधळच!मुंढेंची कमकुवत चमू-
लोकांपर्यंत करोनापासून घेण्याची काळजी ही जनजागृती पाेहोचविण्या ऐवजी पोहचली ती फक्त ’भीती’ सुरवातीला आयुक्तांनी मास्क वापरण्यची अजिबात गरज नसल्याचे जाहीर केले.सेनिटायझर ऐवजी साबण वापरा असेही आवाहन केले. यानंतर आपल्या चुकीवर पांघरुण घालताना तेव्हा शासनाचे तसे दिशानिर्देश होते म्हणून पत्रकारांच्या प्रश्नाला टोलवले. मूळात शहरातील कोविड-१९ च्या प्रभावी रोकथामसाठी मुंढेंनी जी प्रशासकीय चमू बनवली त्यात एक डॉ.सवाई सोडलेत तर एक ही डॉक्टर हे सार्वजनिक आरोग्याचा अनुभव असणारे नाहीत. नॅचरोपॅथीचे विजय जोशी यांना सहायक आयुक्त पदी विराजमान करण्यात आले तर पॅथोलॉजीच्या दोन खासगी लॅब असणा-या डॉ.बहीरवार हे कोविडची दैनदिन रिर्पोटींग करण्यात व्यग्र आहेत!. उद्यान विभागाचे अधिक्ष् क अनिल चोरपगार हे कोविड चमूचे प्रमुख असून उपायुक्त पदावर विराजमान आहेत. डॉ.गंटावार यांच्या सारख्या ‘कर्तृत्वान’ सहायक वैद्यकीय अधिका-याच्या नावाची ’घंटा’तर अख्ख्या महाराष्ट्रात वाजत आहे.एवढेच नव्हे तर मुंढे यांचे झोनल मेडीकल अधिकारी यांची पात्रता म्हणजे यातील ८० टक्के कंपाऊंडर पदावरुन पदोन्नती घेऊन या पदावर डायरेक्ट पोहोचले आहेत.
‘साथ रोग उद्रेकाची’माहिती ही सर्व मंडळी आपल्या अभ्यासक्रमात शिकलेली नाही मात्र,कर्तृत्वान मुंढेंना नागपूरकर जनतेच्या आरोग्यासाठी यांच्यापेक्ष्ा वेगळी चमू नेमताच आली नाही.याची जेवढी प्रशंसा करता येईल तेवढी करावी! नागपूरात दररोज होणा-या करोनाच्या उद्रेगासाठी फक्त जनताच जवाबदार आहे का?आयुक्त मुंढे यांची धरसोड वृत्ती, गोंधळात टाकणारे एककल्ली निर्णय आणि त्यांच्या या ‘प्रचंड कार्यक्ष् म’आरोग्य चमूच्या ढिसाळ कार्यपद्धतीचा काहीच दोष नाही का?विशेष म्हणजे मुंढे यांचे कितीतरी झोनल अधिकारी हे अद्याप ही ’वर्क एट होम’कार्यभार करीत असताना,शासनाच्या गाड्या मात्र फिरवित असताना आढळतात!

आमचे चॅनल subscribe करा