Homeनागपूर मनपादाेन करोना बाधित झाले स्वत:हून मेयोमध्ये भरती: बाधितांचा आकडा झाला ९८

दाेन करोना बाधित झाले स्वत:हून मेयोमध्ये भरती: बाधितांचा आकडा झाला ९८

आज पडली ८ रुग्णांची भर

नागपूर: करोना बाधितांचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चालला असून बुधवार दि. २२ एप्रिल रोजी यात ८ बाधितांची भर पडली.विशेष म्हणजे दोन करोना बाधित हे करोनाची लक्ष् णे दिसल्यामुळे स्वत:हून मेयोमध्ये भरती झाले.त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून यातील एक टिमकी तर एक मोमिनपूरा निवाासी आहे. हे दोन्ही रुग्ण करोना बाधितांच्या संपर्कात आले होते. आता मेयोमध्ये उपचार घेणा-या बाधितांची संख्या ही ४७ झाली आहे.

याशिवाय सतरंजीपूरा व मोमिनपूरा येथील आणखी ६ बाधितांचा अहवाल हा बुधवारी करोना पॉझिटीव्ह आला असून आता नागपूरात करोना बाधित रुग्णाची संख्या ही ९८ झाली आहे. मेडीकल येथे भरती असलेल्या या ६ बाधितांमध्ये ३ पुरुष व ३ महिला आहेत.यात ८० वर्षाचा पुरुष, ५५ वर्षाची महिला, ३० वर्षाची महिला व ५५ वर्षाचा पुरुष असल्याचे सांगितले जात अाहे. मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी उशिरा रात्री एम्समधील चाचणीत आणखी दोन संशयितांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले होते. यात ५ वर्षाचा मुलगा व २५ वर्षीय तरुणाचा समोवश आहे. आता मेडीकलमध्ये उपचार घेणा-या बाधितांची संख्या ही ४२ झाली आहे.

मंगळवार उशिरा रात्रीपासून तर बुधवारच्या रात्रीपर्यंत एकूण ८ करोना बाधितांची संख्या वाढली असून आता शहरात बाधितांची संख्या ही शंभराला दोन कमी म्हणजे ९८ एवढी झाली आहे.

मेयो,मेडीकल व एम्समध्ये दिवस रात्र करोनाची चाचणी सुरु आहे परिणामी उशिरा रात्रीपर्यंत आकड्यांची संख्या ही सातत्याने बदलत असते. अद्याप विविध ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या व पाठपुरावा सुरु असलेल्या संशयितांचा आकडा हा ५५७ असून भरती असणा-या संशयितांचा आकडा ५३८ आहे.

सध्या देशात करोना बाधितांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात असून या संख्येने ५,२१८ चा टप्पा आता ओलांडला आहे.यातील २७० बाधितांचा मृत्यू झाला असून भारतात बाधितांची संख्या ही २० हजार ८० वर पोहोचली आहे.यातील ६९८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. नागपूरात एका करोना बाधिताचा मृत्यू झाला असून आज आणखी तीन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मार्चच्या दुस-या आठवड्यापर्यंत ४ वर स्थिर राहणारा बाधितांचा आकडा हा एप्रिल महिन्याच्या तिस-या आठवड्यात शंभरीच्या टोकावर पोहोचल्यामुळे नागपूर जिल्हा हा रेड झोनमध्ये आला असून, ३ मे नंतर तरी शहरात नागपूरात लॉक डाऊनपासून दिलासा मिळणार आहे किवा नाही,याला घेऊन आता नागपूरकरांमध्ये बरीच अस्वस्थता वाढली आहे.

नागपूर शहर हे लवकरात लवकर करोनामुक्त शहर म्हणून घोषित व्हावे,अशी अपेक्ष्ा प्रत्येक नागरिक आता व्यक्त करु लागला आहे. मात्र दररोज बाधितांचा वाढणारा आकडा नागपूरकरांच्या या आशेवर पाणी फिरवण्याचे काम करीत आहे.

चंद्रपूरचे दाम्पत्य कोरोनामुक्त-

मेडीकल प्रशासनातर्फे टाळ्या वाजवून अभिनंदन : रुग्णवाहिकेने पोहोचणार स्वगृही

दिल्लीमार्गे इंडोनेशियावरून नागपूरला परत आलेले मुळचे चंद्रपूर येथील कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरलेले दाम्पत्य बुधवारी (ता.२२) पूर्णपणे बरे होउन घरी पोहोचणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडीकल) कोरोना कक्षातून बाहेर पडल्यानंतर दोन्ही रुग्णांचे तेथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले आणि तेथून निरोप दिला. मेडीकलमधून रुग्णवाहिकेने या पती आणि पत्नी दोघांनाही सुरक्षित स्थानी पाठवले आहे.

नागपूर शहरात कोरोनाचा धोका वाढत असतानाच आज काहीशी दिलासादायक घटना घडली. इंडोनेशिया येथून दिल्लीमार्गे नागपूरला आलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ६ एप्रिलला त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोरोना कक्षामध्ये उपचार सुरू करण्यात आले. दुस-या दिवशी ७ एप्रिलला त्यांच्या ३२ वर्षीय पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावरही उपचार सुरू झाले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. त्यांच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर ३९ वर्षीय पतीला सुट्टी देण्यात आली. मात्र पत्नीचा अहवाल अद्यापही निगेटिव्ह न आल्याने त्यांना सुरक्षितरित्या रुग्णालयातच ठेवण्यात आले. अखेर बुधवारी (ता.२२) त्यांच्या पत्नीचाही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली व सुखरूप पाठविण्यात आले.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्यासह डॉ.कांचन वानखेडे, डॉ. फैजल, डॉ. स्नेहल, डॉ.मुरारी सिंग, डॉ.श्याम राठोड, डॉ. चेतन वंजारी, डॉ.विपुल मोदीख डॉ. पटनाईक, मालती डोंगरे, फार्मासिस्ट श्री.चक्रबर्ती यासर्वांसह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे.

मेडीकल प्रशासनातर्फे वेळोवेळी प्रकृतीची विचारपूस करून आवश्यक उपचार करण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या सहकार्यामुळेच आज आम्ही पूर्णपणे बरे होउन घरी जात आहोत. सर्व नागरिकांनीही शासन आणि प्रशासनातर्फे करण्यात येणा-या आवाहनांचे पालन करून घरीच राहावे, असे आवाहन बरे झालेल्या दाम्पत्यातर्फे करण्यात आले आहे.

Latest बातम्या