
नागपूर,ता. २७ जुलै: शिस्तप्रिय आणि कर्तव्यकठोर सनदी अधिकारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची करोनाविषयीची धोरणे ही किती ’दुटप्पी’ आहेत याचे आणखी एक उदहारण नागपूरकर जनतेला बघायला मिळाले. गेल्या आठवड्यात ज्या अग्निशमन विभगातील कळमन्याचे सब स्टेशनचे सहायक अधिकारी यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले ते भरतवाडा निवासी अधिकारी अद्यापही घरातच आहेत! नागपूरात सध्या शासकीय रुग्णालये उपलब्ध नसल्याने त्यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या अधिका-याच्या कुटुंबात ८ ते ९ सदस्य आहेत,अद्याप त्यांचे स्वॅब देखील मनपा प्रशासनातर्फे घेण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. या कुटुंबियांनी आज खाजगी लॅबवाल्यांशी संपर्क साधून स्वॅब घेण्यासाठी बोलावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच शिस्तप्रिय आणि कर्तव्यकठोर तुकाराम मुंढे यांच्या कार्यकर्तृत्वाचे गोडवे गाऊन ठामपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे गीत गायले मात्र दूसरीकडे हेच मुंढे शहरातील इतर नागरिक व आपल्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचा-यांमध्ये कोविडच्या बाबतीत किती पराकोटीचा भेदभाव करतात,याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
शहरातील कोणत्याही भागात करोना बाधित आढळताच,त्याला तातडीने रुग्णालयात हलवले जाते. त्याच्या संपूर्ण कुटुंबियांना विलगीकरण केंद्रात दाखल केले जाते. या केंद्रात १४ दिवस या कुटुंबियांना राहवे लागते. करोना बाधिताचे घर,ईमारत तसेच संपूर्ण गल्लीच सील केली जाते.मात्र मनपाच्या अग्निशमन विभागाचा एक अधिकारी हा करोना बाधित असून देखील त्यांना घरीच आराम करण्यास सांगितले जाणे हे मुंढे यांचा सतंापजनक तसेच दुटप्पी कारभार असल्याचे त्या भागातील नागरिक सांगत आहेत.
या अधिका-याचा भाऊ हा देखील मनपाच्या अग्निशम विभागात कर्मचारी आहे. या दोन्ही भावांना ना तर कोणत्याही रुग्णालयात भरती करण्यात आले ना त्यांच्या कुटुंबियांना विलगीकरणात पाठविण्यात आले.या कुटुंबियांना आता खासगी लॅबचे प्रत्येकी २८०० रुपये भरावे लागणार आहेत. गेल्या चार महिन्यांपासून मनपाच्या एवढ्या महत्वाच्या विभागात करोना याेद्धा म्हणून जे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत त्यांच्याचप्रति आयुक्तांचा हा व्यवहार अनाकलनीय असून सामान्य नागरिकांप्रति आयुक्तांचा बर्ताव कसा आहे याचे हे द्योतक आहे.
गेल्या २१ जुलै रोजी मनपाच्या अग्निशमन विभागातील एक अधिकारी हा करोना बाधित आढळला.विशेष म्हणजे हे अधिकारी महोदय ४ दिवस अग्निशमन विभागात कर्तव्यावर होते. त्यामुळे २२ जुलै रोजी या विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांचे स्वॅब घेण्यात आले होते.करोनाग्रस्त अधिका-याला भेटण्यासाठी कळमना,नरेंद्रनगर व लकडगंज अग्निशमन केंद्रातील अधिका-यांसह सिव्हिल लाईन्स मुख्यालयातील एकूण १५ जण करोनाबाधित आढळून आले होते.
शहरात सध्या सर्व शासकीय रुग्णालये ही हाऊस फूल्ल झाली आहेत. या अग्निशमन अधिका-याला मुंढे यांनी येत्या दोन-तीन दिवसात करोना उपचार केंद्राची व्यवस्था होताच भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले असल्याची माहिती सूत्राने दिली.मात्र मुंढे यांचे हे धोरण दूटप्पीपणाचे असल्याचा संताप आता व्यक्त होत आहे.

आमचे चॅनल subscribe करा