Homeनागपूर न्यूजडॉ.नितीन राऊत लिखित पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी प्रकाशन

डॉ.नितीन राऊत लिखित पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी प्रकाशन

‘आंबेडकर ऑन पाप्युलेशन पॉलिसी, काॅन्टेपररी रिलिवन्स’ प्रेरक ग्रंथ:डॉ.प्रदीप आगलावे

नागपूर,ता.१५ एप्रिल २०२२: महाराष्ट्राचे उर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पाप्युलेशन पॉलिसी,काॅन्टेपररी रिलिवन्स’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता वसंतराव देशपांडे सभागृह,सिव्हिल लाईन्स येथे होणार आहे.याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून राज्यसभेचे खासदार व विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे,इंडियाना विद्यापीटाचे प्राध्यापक डॉ.केविन डी.ब्राऊन, उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ.सुखदेव थोरात हे राहणार आहेत,अशी माहिती आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ.प्रदीप आगलावे यांनी दिली.

उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचा ‘आंबेडकर ऑन पाप्युलेशन पॉलिसी काॅन्टेपररी रिलिवन्स’ हा संशोधनपर ग्रंथ आहे.हा ग्रंथ त्यांच्या पीएच.डी.च्या संशोधनावर आधारित असल्याचे डॉ.आगलावे यांनी सांगितले.आज सर्वत्र लोकसंख्यावाढीची समस्या ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे.चीन,भारत आणि इतर देशांपुढे अधिक लोकसंख्येच्या समस्येने अतिशय भीषण स्वरुप धारण केले आहे.आज सर्वच लोक वाढती लोकसंख्या ही देशापुढील फार गंभीर समस्या मानतात.ही समस्या सोडविण्याच्या दृष्टिने भारत सरकारने २०५२ पासून कुटूंब नियोजनाचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरु केला.१९७० नंतर कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम अधिक सक्तीने राबविण्यात आला.

१९४० च्या दशकात भारतात आजच्यासारखी अधिक लोकसंख्येची समस्या नव्हती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘इनडिपेंडंट लेबर पार्टी’चा जाहीरनामा १५ ऑगस्ट १९३६ रोजी जाहीर केला होता.या जाहीरनाम्यात डॉ.आंबेडकरांनी कृषिवर लोकसंख्येचा प्रचंड ताण आहे,जास्त लोकसंख्या हेच भारतातील दारिद्र्याचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट केले होते.मुंबई विधानसभेत डॉ.आंबेडकर हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी स्वत:जन्म नियंत्रणाच्या(कुटुंब नियोजन)संदर्भात एक बिल तयार केले होते.ते बिल इनडिपेंडंट लेबर पार्टीच्या वतीने १० नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबई विधानसभेत सादर करण्यात आले होते.‘कुटुंब मर्यादित करण्याची निकडीची गरज लक्षात घेता,ह्या(मुंबई)प्रांतातील जनतेमध्ये संतती नियमनाच्या बाबतीत एक प्रभावी प्रचार मोहीम सरकारने हातात घ्यावी आणि प्रत्यक्षात जन्म नियंत्रण करण्याच्या दृष्टिने पुरेशा प्रमाणात सोयी पुरवाव्यात’अशी शिफारस डॉ.आंबेडकरांनी शासनाल केली होती.

बिलाच्या बाजूने आमदार दादासाहेब गायकवाड,आ.जमनादास मेहता,आ.आर.आर.भोळे यांनी आपले विचार मांडले होते.शेवटी ते बिल ११ विरुद्ध ५२ इतक्या मतांनी फेटाळ्या गेले.हे सर्व ११ आमदार डॉ.आंबेडकरांच्या इनडिपेंडंट लेबर पार्टीचे होते.

१९३८ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याच्या उपायाच्या बिलास प्रचंड विरोध झाला होता.परंतु १९५० नंतर भारतात लोकसंख्येची समस्या तीव्रतेने जाणवू लागली.अलीकडे तर लोकसंख्येचा स्फोट होताना दिसून पडतोय.डॉ.आंबेडकरांनी कुटुंब नियंत्रणाच्या संदर्भात जे उपाय सुचवले होते,त्या उपायास विरोध झाला होता.परंतु, नंतर भारताने लोकसंख्या मर्यादित ठेवण्याच्या संदर्भात डॉ.आंबेडकरांच्या लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या धोरणाचा पुरस्कार केला.आज मात्र सर्व भारतीय गर्भ निरोधक उपायांचा अवलंब करतात.डॉ.आंबेडकरांच्या कुटुंब नियंत्रणाच्या संदर्भात जो दृष्टिकोण होता तो आजच्या आधुनिक काळात देखील तितकाच महत्वपूर्ण व प्रासंगिक आहे,डॉ.नितीन राऊत यांनी आपल्या शोध ग्रंथात हेच मांडले आहे.

या ग्रंथ प्रकाशनाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फेसबुक,युट्यूब,ट्वीटर इ.समाजमाध्यमांवर उपलब्ध असणार आहे.याकरिता https://www. facebook. com/Dr NitinRautOfficial.लिंकचा वापर करुन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ.प्रदीप आगलावे यांनी केले.

पत्र परिषदेत डॉ.अनिल हिरेखन,शिवदास वासे,डॉ.शंकर खोब्रागडे यांच्यासह संजय दुबे,ललित खोब्रागडे,डॉ.शकील सत्तार,प्रदिप नगरारे,अमन कांबळे,ॲड.सोनिया गजभिये,डॉ.प्रविण जोशी,सच्चिदानंद दारुंडे,डॉ.जयंत जांभुळकर,सुरेंद्र वानखेडे,विरेंद्र गणवीर आदी उपस्थित होते.

Latest बातम्या