
सोशल मिडीयाची रंगली भिंत
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२२ जून: महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवार दि. २० जून रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेतून रागाने निघून गेले. ‘ज्या ठिकाणी माझा अपमान होतो त्या ठिकाणी मी येणार नाही’असे म्हणत आयुक्तांनी भर सभेतून प्रस्थान केले,मात्र उद्या मंगळवार दि. २२ जून रोजी सकाळी ११ वा.पार पडणा-या सभेत आयुक्त हजर होतील का?महापौरांनी केलेल्या विनंतीला मान देतील का?यावर बरीच चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे. एका उत्साही नेटकरीने तर या संपूर्ण नाट््यावर अतिशय समर्पक असे ‘खुलता कळी खुलेना’शीर्षक पोस्ट केले.
यावर इतर नेटक-यांनी भरभरुन प्रतिसाद देत आपापले ‘मनोगत’व्यक्त केले आहे. एका नेटकरीने यावर ‘अजी रुठकर अब कहां जाईयेगा…’(स्थळ-सुरेश भट सभागृह)असा प्रतिसाद दिला तर एकाने ‘आखिर तुम्हे आना है…जरा देर लगेगी’अशी पुश्ती जोडली. एक नेटकरी ’रुठे रुठे..मनाऊं कैसे’असे हास्य फूलवतो तर एक नेटकरी त्याही पुढे जाऊन ’परवा कट्यार काळजात घूसली’ म्हणून नाट्यछटा पसरवतो.
एक नेटकरी ‘ऐसे भी ना रुठो तूम के जीना मुश्किल हो जाये’एवढा भावूक होतो तर एक नेटकरी यावर ’त्यांचे येणे तरी नक्की आहे का?’असा सवाल टाकून इतर नेटक-यांना खिजवतो. एक नेटकरी हा अतिशय व्यग्र होऊन ’मुंढेंच्या मौनाच्या आत दडले काय, कूणा कळेना?’अशी भावना व्यक्त करतो तर एक नेटकरी मुंढेंना सल्ला देत ’मंगळवारी कानात बोळे टाकूनच बसावं,म्हणजे त्रास होणार नाही’म्हणत मुंढेंची जणू काळजी वाहतो.
एक नेटकरी तर त्याही पुढे जाऊन ’मला माहिती आहे मुंढे उद्याच्या सभेला जाणार आहेत की नाही पण मी सांगणार नाही’असे इतरांना कोड्यात टाकतो. जर कविवर्य नेटकरी ’आमचा तुका का रुसला?आमचा तुका का रुसला?सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला?’अश्या शब्दात मुंढेंना बांधतो.
गमतीचा भाग सोडला तरी,नागपूरकरांसोबतच अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष् आता जणू मुंढे हे महापौर संदीप जोशी यांच्या विनंतीला मान देऊन सभागृहात हजर होतील का,याकडेच लागले आहे.
अनेकांच्या मते ’मुंढेचा एकंदरित स्वभाव बघता…ते नाही येणार’असे ठाम मत प्रदर्शित होतं तर अनेकांच्या मते ’मुंढे यांनी सभागृहात यायलाच हवे…परिस्थितीचा सामना हा करायलाच हवा’असे मत व्यक्त करतात.
महापौरांनी सोमवारी घेतलेल्या पत्र परिषदेचा समारोप करताना देखील आयुक्त तुकाराम मुंढे यांना पुन्हा एकदा विनंती केली आहे,वास्तविक पाहता महापौर या नात्याने मला निर्देश देण्याचा अधिकार आहे मात्र तरीही मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो,त्यांनी झालं-गेलं सगळं विसरुन सभेत यावं.आपलं म्हणनं मांडाव,आपले प्रशासकीय कर्तव्य पार पाडावं,नागपूरच्या जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि शहराच्या विकासकामासाठी,सभेत हजर राहवं,असे आवाहन केले.
आम्ही तर चिल्लर…..
महापौरांनी या प्रसंगी बोलताना आम्ही तर मुंढे यांच्यासमोर चिल्लर आहोत. ते आम्हाला मोजतच नाही. महापौर असून देखील माझा फोन उचलत नाही.माझ्या मॅसेजला उत्तर देत नाही. एका नगरसेवकाने ,एका गडर लाईनसाठी मोजून १०० मॅसेज मुंढेंना केले,मात्र महापौर,जनप्रतिनिधींना मुंढे साहेब हे चिल्लर समजतात,अशी व्यथा आणि कथा महापौरांनी या प्रसंगी व्यक्त केली.
जिवनात असे प्रसंग सभागृहात येतच असतात.मात्र आजपर्यंत इतकी टोकाची भूमिका कधीच कोणीही घेतली नाही. आजपर्यंत जेवढेही आयुक्त नागपूर मनपात होते त्यांना मुद्दे पटले नाही तर ते गप्प बसायचे ,प्रतिक्रियाच द्यायचे नाहीत मात्र सभागृहाचा त्याग करुन कधीच गेले नाही.
मला तर संधीच दिली नाही…
महापौर म्हणाले,सगळं काही इतक्या अचानकपणे घडलं की मलाही विचार करण्याची संधीच मिळाली नाही. हरीश ग्वालबंशी यांनी तुकाराम नावावर वयक्तिक टिका केली जी मुळीच समर्थनीय नाही मात्र ती मी कामकाजातून काढून टाकली असती मात्र मी नगरसेवकाला रोखले नाही हा आरोप असमर्थनीय आहे.
मी सभेविषयी विचारणा करणारे पत्र दिले होते मात्र ७२ तास उलटून देखील त्यांनी उत्तर दिले नाही.पुन्हा पत्र द्यावे लागले तेव्हा त्यांच्याकडून अतिशय चमत्कारीक उत्तर मिळाले ‘सभा घेण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे तेव्हा तुम्हीच काय ते ठरवा,माझ्या कार्यालयाला तुमच्या सभेशी काही एक घेणे-देणे नाही!’
एक तर मुंढे उत्तर देत नाही,ना लिखित ना मौखिक,दिलेच तर…हे असे उत्तर मिळतं. सभागृहात तर ते उठूनच निघून जातील हे थोडं जरी आधी कळले असते मी त्यांना थांबवले असते मात्र ते आपलं मत सभागृहा ऐवजी मिडीयासमोरच मांडण्यात धन्यता मानतात. आजही त्यांनी एका खासगी मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सभागृहात माझं कॅरेक्टर एसेसिएशन होतं’असं किमान आठ वेळा तरी बोललेत,अशी खंत महापौरांनी आत पत्र परिषदेत व्यक्त केली.
एकीकडे अवघ्या महाराष्ट्रच्या जनतेचे लक्ष् मुंढे यांच्या निर्णयाकडे लागले असता,९० टक्के जनतेचे मत हे ’मुंढे सभागृहात येणारच नाही’या मतावर ठाम असल्याचे दिसून पडतंय,तर १० टक्के जनता मात्र मुंढे यांनी प्रशासकीय कर्तव्य पार पाडावे,आपल्या कर्तव्यात कसूर करु नये’सत्ताधा-यांनी देखील त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिका-याला त्रास देऊ नये’अशी अपेक्ष्ा व्यक्त केली आहे.
आज सोमवारी एकीकडे महापौर संदीप जोशी यांनी मुंढे यांच्या कथित घोटाळ्यां विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे,दूसरीकडे त्यांनी मुुंढे यांना सभागृहात उपस्थित राहण्याची विनंती देखील केली आहे. मुंढे त्यांची विनंती कितपत स्वीकारतात,यावर अद्यापतरी कोणतेही उत्तर महापौर,महाराष्ट्राची जनता किवा महाराष्ट्राच्या सरकार वा नेतेमंडळीकडे नसून सर्वतोपरी याचे उत्तर मुंढे यांच्या अंर्तमनातच आहे, उद्याच याचा काय तो उलगडा होईल.

आमचे चॅनल subscribe करा