Homeनागपूर मनपाआयुक्तांनी केले पाच बाजार बंद!शेतकरी हवालदिल

आयुक्तांनी केले पाच बाजार बंद!शेतकरी हवालदिल


भाजीचे दर कवडीमोल,भाजी विक्रेत्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू

डॉ.ममता खांडेकर

(Senior journalist)

नागपूर,११ मार्च: महापालिकेने शुक्रवार दि. १० मार्च रोजी रेशीमबाग मैदान, राजाबक्ष्ा मैदान,गाडीखाना मैदान,यशोधरा नगर येथील कॅन्सर हॉस्पीटल मैदाान व बुधवार बाजार(सोमवारी पेठ) येथील बाजार बंद करण्याचा निर्णय जाहीर केला,यापूर्वीच करोना संसर्गापासून सुरक्ष्तिततेचा उपाय म्हणून नागपूरातील सर्वात मोठे मध्यवर्ती बाजार केंद्र कॉटन मार्केटही बंद करण्यात आले आहे. मात्र ‘रोगापेक्ष्ा औषध जालीम’असा प्रकार घडत असून यामुळे फळे आणि भाजीपाला पिकवणारा शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.

सोसायटीत दारावर आलेल्या भाजी विक्रेतेच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. गेल्या महिन्यात ५० रु.ला एक टरबूज विकणारा फळ विक्रेत्याला आज ५० रु.दोन टरबूज विकावे लागत आहे. ५ रु.ची पत्ताकोबी, २० रु.चे ३ किलो टमाटर,इतर ही भाज्या कवडीमोल विकून पदरातलाच पैसा खर्च करण्याची वेळ आज शेतक-यांवर आली आहे. शासनाकडे मात्र एकमेव ‘संचार बंदी’व ‘लॉक डाऊन’सोडल्यास या गंभीर समस्येवर इतर कोणताही उपाय नाही.

आयुक्त तुकाराम मुंढे हे शेतक-यांसाठी दररोज नवनवीन बाजारपेठ ठरवतात.व्हॉटस ॲप वर शेतक-यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करतात मात्र खरंच शेतक-यांना याचा फायदा झाला आहे का?याचा विचार करण्यास किवा योग्य ते नियोजन करण्यास आयुक्तांकडे वेळच नसल्याचे सांगितले जाते. एकीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे वारंवार सांगतात,शेतक-यांना त्यांचा शेतमाल विकण्याची राज्यात पूर्ण मुभा आहे. दुसरीकडे शहरातील बाजार केंद्रेच बंद आहे. काटोल,नरखेड सारख्या गावातून संत्रा,भाजीपाला ट्रक किवा ट्रॅक्टरने आणने पूर्णपणे बंद झाले आहे.

गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर देखील पोलिसांचे दंडूके शेतक-यांवर चालली.याची तक्रार शेतकरी आंदोलनाचे नेते राम नेवले यांनीच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे फोनवर केली. विदर्भात शेतकरी हा रडकूंडीला आला आहे. शहरातील बाजार केंद्रे बंद झाल्यामुळे विदर्भात शेतक-यांकडे पैसाच येणार नाही व पर्यायाने ग्रामीण भागात पैसाच जाणार नाही.दूसरीकडे शहरातील ग्राहकांची देखील कुचंबना होत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राम नेवले यांना चौकशी करतो,पोलिसांना आदेश देतो,असे आश्‍वासन दिले असले तरी,कवडीमोल भावात ग्रामीण भागातील शेतकरी यांना शहरात बाजार केंद्रेच बंद असल्यामुळे भाजी व फळे आणने परवडणारे नाही.

राज्यात ‘करोना’ने गंभीर संकट निर्माण केले आहे. शेतक-यांच्या प्रश्‍नावर आंदाेलन करता येत नाही फक्त मागणी करु शकतो, आयुक्तांनी शेतक-यांसाठी सुरु करण्यात आलेली बाजार केंद्रे ही बंद करु नये असे ते म्हणतात. अडतिये,फूटकळ विक्रेते व ग्राहक यांची एकाच ठिकाणी गर्दी होते,हे कारण सांगून शुक्रवारी एकसाथ ५ ठिकाणची बाजार केंद्रे ही बंद करण्यात आली. यात प्रशासनाचे अपयश नाही का? दोष गर्दीला देऊन बाजार केंद्रे बंद करणे सोपे होते,ते आयुक्तांनी आदेश देऊन केले.मात्र योग्य ती उपाययोजनाही प्रशासनाला करता आली नसती का?हा राम नेवले यांचा प्रश्‍न निश्‍चितच विचार करण्यासारखा आहे.आणखी मनुष्यबळ लावून,पोलिस यंत्रणा लावून शिस्तीत शेतक-यांना भाजी विकण्याची संधी द्यायला हवी होती. मात्र तसे घडले नाही.

त्या ऐवजी शहरातील प्रमुख बाजार केंद्रेच बंद करण्याचा ‘सोयीस्कर’निर्णय आयुक्तांनी घेतला. शेतक-यांचे फोन नंबर व्हॉटस ॲप ग्रूपवर टाकून देण्यात आले.शेतकरी ते ग्राहक अशी थेट पण ‘असंभव’योजना ३० लाखांच्या लोकसंख्येच्या शहरात आयुक्त राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत.यामुळे चौफेर नुकसान झाले असून एकीकडे शेतकरी हवालदिल झाला आहे दूसरीकडे ग्राहकांची देखील पिळवणूक होत आहे. आयुक्त ठरवतील त्या भागात जाऊन भाजी खरेदी करणे आज नागरिकांना क्रमप्राप्त ठरत आहे.

फक्त काटोल,नरखेडचच सांगावयाचे झाल्यास व्यापारांनी संत्रे घेतलीच नाही. कारण पोलिसांनी शहरात संत्र्यांची ट्रके येऊच दिली नाही.वरुन गाठपिटीने राहीलेली कसर भरुन काढली. ३० ते ४० हजार रु.टन संत्रा हा शेतात अवघा १० ते १२ हजार टन रु .विकल्या गेला. त्यालाही आज कोणताही भाव नाही.शेतक-यांचा आवाजाहीचाही खर्च यातून निघत नाही.संचार बंदीमुळे शेत मजूरांचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. एकटा शेत मालकच शेतात राबताना दिसतोय. १ किलो वांगे तोडण्याचा खर्च २०० रुपये येतो मात्र शेतक-याला याचे १५० रुपयेच मिळत असून ५० रु .चं नुकसान तो स्वत: सोसत आहे. नफा तर राहीला दूसरीकडेच.

असंघठीत शेतक-यांवरच शासनाची कु-हाड-
शेतकरी हा असंघठीत वर्ग आहे. त्याच्या कोणीही वाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांच्यासोबत केलेल्या चर्चेत शेतक-यांचे प्रश्‍न आधी सोडवा अशी विनंती केली आहे. मात्र राज्य असो किवा स्थानिक प्रशासन,शेतक-यांच्या विदारक परिस्थितीवर कोणाकडे ही प्रभावी उत्तरच नाही.कॉटन मार्केट सुरु करण्याची महापौर संदीप जोशी यांचीही विनंती आयुक्तांनी धूडकावून लावली.

कॉटन मार्केट बंद करण्या ऐवजी एक नियमावली सख्तीने राबवली असती तर शेतमालाला योग्य भाव मिळाला असता.शेवटी फळे असो किवा भाजीपाला हे नाशवंत आहेत परिणामी मिळेल त्या भावाने शेतकरी असो अडतिया असो,दलाल असो किवा फूटकळ भाजी विक्रेते असोत यांना विकणे क्रमप्राप्तच आहे. शहरातील सर्व बाजार उघडतील तोपर्यंत शेतकरी हा ‘नागडा-फकीर’झालेला असेल,अशी व्यथा राम नेवले यांनी खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केली. माझेच सांगावयाचे झाल्यास माझा ७० हजारचा संत्रा बगिचा मी १५ हजार रु.बयाणा घेऊन व्यावाराला विकला मात्र,आज गारपिट व करोनाच्या संकटामुळे संपूर्ण संत्रा सडला.

या सर्व बाबींचा विचार राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने नाही केल्यास पुढील काळ हा आणखी खडतर राहणार असून शेतकऱ्यांवर ‘ करोना’ पेक्षाही भयंकर ‘ काळ’ ओढवेल,असा इशारा ही राम येवले देण्यास विसरले नाहीत.

आम्ही प्रशासनाची भूमिका समजू शकतो. गर्दी होणे हे योग्य नाही मात्र यावर प्रशासनाने सगळी बाजार केंद्रेच बंद करावी, हा देखीप उपाय योग्य नसल्याचे ते म्हणाले.

Latest बातम्या