Homeनागपूर न्यूजआणि....सत्ताधारी उतरले स्मार्ट सिटीच्या खड्ड्यात!

आणि….सत्ताधारी उतरले स्मार्ट सिटीच्या खड्ड्यात!


स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याचा मुंढेंचा मानस:महापौरांचा आरोप

नागपूर,ता. २ जुलै: पारडी,पूनापूर,भरतवाडा,मौजा क्षेत्रातील एकूण १७३० एकरचा पूर्व नागपूरातील परिसर हा स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विकसित करण्यात येत होते.या परिसरातील ५०० घरे तुटणार आहेत. या घरमालकांना मोबदला म्हणून आतापर्यंत दोन किस्त देण्यात आली मात्र मुंढे आले आणि…तिसरी किस्त थांबली. परिणामी आता ना घरभाडे मिळत आहे ना हक्काचा जमिनीचा पैसा,येथील नागरिक वारंवार नगरसेवकांना याबाबत विचारणा करुन हैराण करीत आहेत.आ.कृष्णा खोपडे व मी स्मार्ट सिटीचे संचालक या नात्याने म्हणून या ठिकाणची आज पाहणी करण्यास आलो असून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना हा नागपूर शहरासाठी भूषणावह असणारा हा प्रकल्पच गुंडाळायचा आहे,असा आरोप महापौर संदीप जोशी यांनी आज पाहणी दौ-यात केला. विशेष म्हणजे भाजप या सत्ताधारी पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह अनेक नगरसेवक हे भरतवाडा येथील खोदून ठेवलेल्या खोलगट भागातच उरतल्याचे दृष्य आज येथील नागरिकांनी बघितले.

स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडून ही महापौरांनी प्रकल्पासंबधी चालू घडामोडीची माहिती घेतली.मुंढे यांच्या एकंदरित कारभारामुळे या प्रकल्पाची मुदत आणखी लांबणार असून याचा भुर्दंड जनतेलाच बसणार असल्याचे ते म्हणाले.पाण्याच्या टाकीचे काम फक्त ५ टक्के झाले असून ५२ किलोमीटरचा रस्ता नुसता खोदून ठेवण्यात आला आहे.यामुळे या परिसरातील नागरिकांचे जगणे अत्यंत कष्टप्रद झाले असल्याचे ते म्हणाले.सहा महिने झाले एक टक्का ही काम पुढे सरकले नाही,याची जवाबदारी कोण घेणार?संचालक मंडळाने घेतलेले निर्णय मिटींग न घेता मुंढे यांनी बदलले.मोरोणे म्हतात की,आयुक्तांनी तोंडी निर्देश दिले ’काम थांबवावे’.महत्वाचे म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे हे आयुक्त पदी रुजू झाल्यावर एकदाही या भागात फिरकले सुद्धा नाही. एसीच्या खोलीत बसून नागरिकांचे हाल होतील,फक्त असे ‘तोंडी’निर्देश अधिका-यांना देत आहेत.

हा प्रकल्प राज्य शासनाचा नसून केंद्राचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या प्रकल्पालाच मुंढे हे सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत आहे.यासाठीच आधी त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद बळकावले.मग २० कोटी रु. बँकेतून काढून परस्पर कंत्राटदारांना देऊन टाकले.कंपनीला डीपीआरसाठी १७ कोटीपैकी आधीच १० कोटी देण्यात आले आहे. याशिवाय प्रकल्पासाठी हस्तांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांच्या जमीनीचा मोबदला तीन टप्प्यात देण्याचे ठरले असताना संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे कारण दाखवून सीईओंनी प्रकल्पग्रस्तांची तिसरी किस्त थांबविली असल्याची अधिकारी माहिती देत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पच गुंडाळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महापौर तथा स्मार्ट सिटीचे संचालक संदीप जोशी यांनी केला. प्रकल्पग्रस्तांना तीन टप्प्यात पूर्ण रक्कम देण्याचे आदेश स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीणसिंग परदेशी यांनी वेळोवेळी झालेल्या बैठकीत दिले आहेत. चेअरमेनचे स्पष्ट आदेश असतानाही तिस-या टप्प्यातील रक्कम आयुक्तांनी रोखल्याचे स्पष्ट होत आहे, असेही महापौर म्हणाले.

पवनगाव रोडवरील विट्टा भट्टी परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. या परिसराचीही महापौरांनी पाहणी केली. पाण्याच्या टाक्यांसह एकूण ५२किमीच्या रस्त्यांचेही बांधकाम करण्याचे कार्य आहे. मात्र दोन्ही कामे मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याची माहिती यावेळी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी दिली. सदर कामासाठी डीपीआर अंतर्गत १७.५० कोटी चे कार्यादेश करण्यात आले होते. यापैकी संबंधित कंत्राटदार कंपनीला १० कोटी रुपये देण्यात आले आहेत मात्र त्या तुलनेत पाच टक्केही काम पूर्ण झाले नसल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. स्मार्ट प्रकल्पाला दिलेली विहीत मुदत पूर्ण होउनही प्रकल्पाचे काम पाच टक्केही पूर्ण झालेले नाही यावर महापौर संदीप जोशी यांनी नाराजी वर्तविली व लवकरात लवकर काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

स्मार्ट सिटीच्या विकास कामाचा आढावा घेण्यासंदर्भात गुरुवारी (ता.२) महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीचे आमंत्रित संचालक आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास यांच्यासह पारडी, पुनापूर, भरतवाडा भागाचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, लकडगंज झोन सभापती राजकुमार शाहु, माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेवक दिपक वाडिभस्मे, नगरसेविका मनिषा अतकरे, नगरसेविका वैशाली रोहनकर, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे आदी उपस्थित होते.

अधिकारी बदलला की प्रकल्प बदलतो का?आ. कृष्णा खोपडे यांचा सवाल
दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले.छापूजी पालनजी कंपनीला दिलेल्या कामाची मुदत या १ जून २०२० रोजीच संपली.या भागात फक्त ५ टक्के काम झाले.१७३० एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.ज्या कामांचे वर्क ऑर्डर झाले,सर्व्हे,नकाशे मंजूर झाले त्याच कामासाठी पुन्हा त्याच कंपनीला मुंढे यांनी २० कोटी रु.दिले! अधिकारी बदलला की प्रकल्प ही बदलतो का?या कंपनीने रस्ते खोदून ठेवले मात्र बनवून दिले नाहीत, अशी नाराजी आ. कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली. महापौरांना खास या भागाचा दौरा करण्याची विनंती केली होती,असेही त्यांनी सांगितले.

आ.गिरीश व्यास यांनी मुंढे यांनी या प्रकल्पाचा एक ही दौरा न करता कागदांवर निर्णय घेतलयाचे सांगितले.कदाचित त्यांनी १५६ नगरसेवक अधिक ताकदीने निवडून येण्याचा विडा उचलला असल्याची कोटीही व्यास यांनी केली.

आणि महिलेची दुचाकी खड्ड्यातून उसळली!
महापौरांचा हा पाहणी दौरा सुरू असताना या भागातील रस्त्यांची अतिशय भयंकर स्तिथीची अनुभव आज पत्रकारांनीही घेतला. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेची गाडी या अक्षरशः चाळण झालेल्या रस्तारूपी खड्य्यातून उसळली आणि पाठीमागे बसलेली महिला ही उसळून खाली पडली! या रस्त्यांवर दररोज ‘नेमाने’ अपघात होत असल्याचे नगरसेविका मनीषा अतकरे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातील अतिशय महत्त्वाची वास्तू असणाऱ्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असते तर येथील प्रभाग हे टँकरमुक्त झाले असते,घरोघरी नळ लागले असते, पावसाळ्यात तर येथील नागरिक यांना या चिखलयुक्त,फिसलणाऱ्या रस्त्यांनी येता-जातांना अक्षरशः’ स्वर्ग’ आठवतो. ‘स्वर्गवासी’ होण्याची भीती मनात घेऊनच ते घराबाहेर पडतात, अशी व्यथा ही त्यांनी मांडली.

 नवी पिढी स्मार्ट सिटी नावपासून पासून अनोळखी-
भरतवाडा क्षेत्रातील कराडे नगरातील १० वीत शिकणारे विद्यार्थी हे औत्सुक्याने महापौरांचा हा प्रकल्प पाहणी दौरा दुरून न्याहाळत होती,त्यांना स्मार्ट सिटीबाबत काय माहिती आहे? खास ‘सत्ताधीश’ ने याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, फक्त एका विद्यार्थ्यांने हे शब्द घरी ऐकल्याचे सांगितले.तर एका विद्यार्थ्यांनी,आई घरी सांगत होती,आपल्यालाही विटा भट्टी वाले घरे सोडून गेली तसेच आपले घर सोडून जावे लागणार आहे!’ असे सांगितले.

देशाचं भावी भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात होती फक्त उत्सुकता,शंका आणि आपल्याच शहरात सुंदर जगण्याचं स्वप्न.
हे स्वप्न महापौर पूर्ण करतील की आयुक्त मुंढे यात खोडा घालतील,गडकरी,आमदार कृष्णा खोपडे यासाठी कोणते प्रयत्न करीत आहेत, याची कोणतीही माहिती देशाच्या या भावी पिढीला नव्हती.

त्यांना शाळेत जाताना दिसतात ते फक्त खोदलेले,चिखलाने माखलेले भयंकर रस्ते आणि टँकरवर आश्रित जगणे.
मुंढे यांचे तर नाव ही त्यांच्या गावी नाही,मात्र मुंढे यांनी त्यांच्या जन्म गावी केलेल्या खडतर प्रवासापेक्षा नागपूर शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पात प्रशासकीय भांडणात भरडल्या जाणारे हे निरागस जगणे वेगळे नसावे….!

महत्वाचे म्हणजे टेबल वर कागदांवर स्वाक्षरी करून निर्णय राबवणारे मुंढे यांनी एकदा तरी या भागाचा प्रत्यक्ष दौरा करून, येथील माणसांचे  भयंकर कष्टप्रद जगणे डोळ्याने पाहणे नितांत गरजेचे आहे.

Latest बातम्या