Homeनागपूर न्यूजनव्या मतदारांमुळे वाढली प्रस्थापितांची धाकधूक:उमेदवारांचे भाग्य पेटीबंद

नव्या मतदारांमुळे वाढली प्रस्थापितांची धाकधूक:उमेदवारांचे भाग्य पेटीबंद

 

 

 

 

 

उमेदवारांनी केला विजयाचा दावा:विजयाचे अंतर मात्र राहणार कमी

डॉ. ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १ डिसेंबर: नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीच्या व तेवढ्याच प्रतिष्ठेच्या निवडणूकीसाठीचे मतदान आज १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पार पडले.विभागीय कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार सायंकाळी ५ पर्यंत अंदाजे ५५ टक्क्यापर्यंत मतदान झाले.रात्री उशिरापर्यंत निवडणूक विभागातर्फे अंतिम आकडेवारी उपलब्ध होणार आहे.या निवडणूकीत एकूण १९ उमेदवार रिंगणात होते.प्रत्येकाने आपल्या विजयाचा दावा केला आहे,हे विशेष!

आज झालेली लढत ही थेट भारतीय जनता पक्ष्ाचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी तसेच महाविकासआघाडीचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांच्यात झालेली दिसून पडते. विदर्भवादी अपक्ष् उमेदवार नितीन रोंघे यांनी विदर्भाच्या मुद्दावर निवडणूक लढवली असून त्यांचा ही मतदार हा मतदान केंद्रापर्यंत डोक्यात स्पष्ट विचार घेऊन पोहोचला असल्याची माहिती आहे.

भाजपतर्फे गेल्या ५८ वर्षांपासून सर्वस्वी एकतर्फी विजयाची गुरुकिल्ली ठरणारे मतदारच न्यायालयाच्या दणक्यानंतर यावेळी बाद झाले होते.परिणामी भाजपला पुन्हा पक्षाच्या विचारधारेशी जुळलेले पदवीधर मतदार जोडणे क्रमप्राप्त ठरले होते. गेल्या सहा महिन्यांपासून आ.अनिल सोले यांना पक्ष् श्रेष्ठींकडून उमेदवारीचे स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्यामार्फत घरोघरी जाऊन भाजपचे मतदार नोंदवून घेतले, मात्र ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून महापौर संदीप जोशी यांना ९ नोंव्हेंबर रोजी उमेदवारी जाहीर करण्यात आली,१२ नोंव्हेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती.यानंतर केवळ १७ दिवस, संपूर्ण सहा जिल्ह्यात प्रचारासाठी मिळाले.५८ वर्षांपासून हा मतदार संघ भाजपचा परंपरागत गड राहीला आहे,असा दावा यावेळी भाजप नव्या मतदार यादीच्या भरवश्‍यावर करु शकत नाही.हा नवा मतदार सुजाण आहे,विचारी आहे, राजकीय पक्षापेक्षाही, मुद्दांना घेऊन मतदान करणारा आहे,त्यामुळे देखील ही सीट काढताना भरतीय जनता पक्ष्ाला चांगलाच घाम फूटणार आहे,यात दुमत नाही. भाजपची सर्वस्वी दारोमदार बूथपर्यंत संगठीत असलेल्या कार्यकर्त्यांवर राहीली आहे.मात्र या कार्यकर्त्यांनी फक्त उमेदवारचा प्रचार मतदारापर्यंत केला.पदवीधर मतदारांना अमूक उमेदवारालाच मत द्या,असे ते इतर निवडणूकीसारखे बाध्य करु शकले नाही,हे देखील वास्तव दुर्लक्षित करता येणार नाही.परिणामी भाजपला पक्षाच्या विचारधारेशी जुळलेल्या मतदारांवर विजयासाठी अवलंबून रहावे लागणार आहे,हे स्पष्ट आहे. या निवडणूकीत भाजप उमेदवार हा जिंकून जरी आला तरी त्याचे संपूर्ण श्रेय हे प्रा.अनिल सोले यांच्या मतदार बांधणीलाच द्यावा लागणार आहे.

काँग्रेसचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांनी गेल्या विधान सभेत तिकीट नाकारुन पदवीधरसाठीच श्रेष्ठींकडे आग्रह धरला होता.सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष् बाळासाहेब थोरात यांनी त्यांना हिरवी झेंडी दाखवली असल्याने त्यांना मतदारांच्या नोंदणीसाठी व सहाही जिल्ह्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर वेळ मिळाला,याचा त्यांनी चांगलाच सदुपयोग ही करुन घेतला.
विशेष म्हणजे या निवडणूकीत ते काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूकीत उतरले व जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचीच महाविद्यालये ही मोठ्या प्रमाणात आहे.आज झालेल्या मतदानात गोंदिया,भंडारा जिल्ह्यात जे लक्ष् णीय मतदान झाले ते राष्ट्रवादीचे नेते प्रफूल्ल पटेल यांचे यश मानले जात आहे.परिणामी ही लढत आणखी रंगतदार बनली.

तिसरी महत्वाची बाब या निवडणूकीत स्पष्टपणे आढळली ती म्हणजे ब्राम्हण/ओबीसी लढत!प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तर हा मुद्दा एवढ्या टोकाला पोहोचला की भाजपला याची काट म्हणून भट सभागृहात ओबीसींचा मेळावाच दोन दिवसांपूर्वी घ्यावा लागला,अर्थात भाजप हा जातीयवादी विचारांना थारा न देणारा पक्ष् समजला जात असल्याने ऐन वेळी पक्ष् श्रेष्ठींच्या सांगण्यावरुन त्याचे नाव बदलून पूर्व विदर्भ पदवीधर मेळावा असे करण्यात आले.या मेळाव्यात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ जरी एकत्र आले असले तरी गडकरी यांच्या देहबोलीतून तो नेहमीचा उत्साह जाणवलाच नाही,असे अनेकांचे मत होते,मात्र शेवटी पक्ष् आणि विचारधारेशी एकनिष्ठ असणारे गडकरी यांनी वैयक्तिक वेदना बाजून सारुन जोशी यांच्यासाठी,जात-पात पलीकडे यश खेचून आणा असे आवाहन केले.अर्थात संदीप जोशी यांच्या उमेदवारी मुळेच ही निवडणूक ब्राम्हण वर्सेस ओबीसी अश्‍या स्वरुपात लढल्या गेली.सोले हे उमेदवार असते तर हा फॅक्टर अश्‍या पद्धतीने लढतीत नसता,असे सांगितले जात आहे याचे कारण संदीप जोशी हे ‘प्रति फडणवीस’ मानले जातात,परिणामी जाेशी यांचा पराभव म्हणजेच फडणवीस यांचा पराभव मानला जात आहे.

अर्थात गडकरींचे लाडके उमेदवार प्रा.अनिल सोले यांना जरी जोशींऐवजी या निवडणूकीत तिकीट मिळाली असती तरी देखील यावेळी त्यांच्यासाठी देखील ही लढत अजिबात सोपी नसतीच.याला कारण सर्वस्वी बदललेली मतदार यादी,व ॲड.अभिजित वंजारी यांच्यामागे ठामपणे उभे झालेल्या तिन्ही पक्ष्ांची एकजूट. ही सर्वस्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांच्या होम-पीचवर कोंडित पकडण्यासाठी होती,यात दूमत नाही.भाजपचा परंपरागत गड समजला जाणारा हा मतदार संघ या एकजुटीतून काबिज करायचा व फडणवीस यांना त्यांना त्यांच्याच होम-पीचवर परास्त करायचे या एकमेव ईष्येतून आपापसातील सर्व मतभेद विसरुन या तिन्ही पक्षाचे शीर्षस्थ नेते व त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले होते हे वास्तव आहे.

आजच्या निवडणूकीत ग्राऊंड लेवलवर आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे संदीप जोशी यांना ऐनवेळी तिकीट देण्यात आले ते म्हणजे ‘विचारधारेपेक्ष्ा व्यक्ति मोठा झाला’असल्याचे द्योतक मानले गेले..गडकरी यांचा शब्द टाळून फडणवीस यांनी पक्षासाठी गेल्या ४० वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणा-या एका प्राध्यपकाचीच तिकीट कापली व आपल्या अत्यंत निकटवर्तीयाला दिल्याने केंद्रातील पक्ष्ामध्ये ज्याप्रमाणे पक्ष्ापेक्ष्ा पंतप्रधान मोदी हे मोठे झालेेत तेच महाराष्ट्रात देखील घडले,असे बिंदास बोलले जात आहे.परिणामी प्रा.अनिल सोले हे नैराश्‍यात गेले तर गडकरी हे निरुत्साही दिसलेत,अशी चर्चा आहे.या निवडणूकीत मनाने गडकरी कुठेही नव्हते,असे बोलले जात आहे.हा ‘पोलीटिकल मर्डरच’आहे अशी तीव्र भावना देखील भाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या मनात खदखदताना ऐकू आली.यामुळे देखील संदीप जोशी यांच्या अडचणीत वाढच झाल्याचे बोलले जात आहे.

आणखी एका गोष्टीची चर्चा काही पदवीधर मतदारांमध्ये ऐकू आली ती म्हणजे ‘मुंढे फॅक्टर’! माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा स्वत:चा एक चाहता वर्ग नागपूर विभागात आहे.मुंढे यांना ज्या पद्धतीने नागपूरातून घालवण्यात आले त्याबद्दल अनेकांच्या मनात अद्यापजी नाराजी आहे.मुंढे यांना घालवण्यासाठी सर्वस्वी महापौर संदीप जोशी जवाबदार असल्याची भावना अनेक मतदारांच्या मनात होती.परवा गुरुवारी जो काही निकाल लागेल त्यात हा फॅक्टर किती प्रभावी ठरला,यावर हा मुद्दा निर्भर असणार आहे.

एवढेच नव्हे तर मनपाच्या कर्मचा-यांमध्ये जोशी यांच्यामुळेच ७ वा वेतन आयोगाचा लाभ त्यांना मिळू शकला नाही,ही खदखद ऐकू आली.वास्तवतेत जोशी यांचा यात कोणताही दोष नाही.त्यांनी त्यांच्या अख्त्यारित हा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला ही होता,मात्र सध्या पैसे नाहीत या सबबीखाली फडणवीस यांनीच तो प्रस्ताव थंड बसत्यात ठेवला होता.या निवडणूकीत हा मुद्दा देखील कितपत प्रभावी ठरला हे परवाच्या निकालात स्पष्ट होऊ शकेल.

याशिवाय वंचितच्या अस्तितवाकडेही दूर्लक्ष् करुन चालणार नाही,वंचित,रिपाई,अतुल खोब्रागडे यांच्या मतदारांच्या गोळाबेरिजेवर काँग्रेसचे यश अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.शेवटी ही मते काँग्रेसच्याच कोट्यातून कमी झाल्याचे बोलले जात आहे.मात्र काहीही झाले तरी व ‘विजायाश्री’ कोणाच्या गळ्यात पडली तरी या विजयाचे अंतर फार कमी असणार असल्याचे भाकीत जाणकार वर्तवित आहेत.भाजपसाठी यश आणि अपयश या दोन्ही बाबी पुढील निवडणूकीसाठी आत्मचिंतनाचीच बाब असणार आहे,असे म्हटले जात आहे.यशाचे अंतर कमी राखून मिळवलेले यश हे अपयशासमान असणार तर अपयश अाल्यास फडणवीस यांच्या होम-पीचवरील हा पराभव पचवणे अनेकांना जड जाणार हे मात्र निश्‍चित.संदीप जाेशी यांच्यासाठी ते सर्वात मोठे दूर्देव ठरणार आहे.

थोडक्यात ही निवडणूक प्रस्थापित भारतीय जनता पक्षासाठी वाटते तेवढी निश्‍चितच सोपी नव्हती,हे ग्रामीण भागात झालेल्या विक्रमी मतदानावरुन देखील दृष्टिक्ष्ेपात येते.गेल्या निवडणूकीत फक्त ३४ टक्के मतदान झाले असता यावेळी मतदानाचा हा आकडा ५५ टक्क्यांपर्यंत तर ग्रामीण भागात ६० टक्क्यांच्या पलीकडे पोहोचला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.हे मतदार सुशिक्ष्ति असून सारसारविवेकबुद्धिने मतदान करणारे आहेत.त्यामुळेच या संपूर्ण निवडणूकीत,पक्ष्,विचारधारा,जात-पात,राजकीय कुरघोड्या,आरोप-प्रत्यारोप या पलीकडे याचे आकलन करणे क्रमप्राप्त आहे.

परिवर्तनाची नांदी- नितीन रोंघे
एवढ्या प्रदीर्घ काळखंडानंतर आज झालेले लक्ष्णीय मतदान याकडे मी परिवर्तनाची नांदी म्हणूनच बघतो,अशी प्रतिक्रिया खास ‘सत्ताधीश‘कडे विदर्भवादी अपक्ष् उमेदवार नितीन रोंघे यांनी व्यक्त केली.पदवीधरांच्या निवडणूकीत अगदी पहील्यांदा ‘विदर्भ’हा मुद्दा प्रस्थापिंताकडून स्वीकारला गेला,हे मी माझे सर्वात मोठे यश मानतो.या पुढे विदर्भात होणारी कोणतीही निवडणूक मी विदर्भाच्याच मुद्दावर लढत राहणार असल्याचा निश्‍चय त्यांनी व्यक्त केला.भाजप,काँग्रेस यासारख्या प्रस्थापितांच्या विरोधात या पुढे दर वेळी,प्रत्येक निवडणूकीत नितीन रोंघे हा सामान्य माणूस उभा राहणार आहे.या निवडणूकीमुळे तसेच आज झालेल्या मतदानामुळे विदर्भवादी तसेच विदर्भप्रेमींच्या मनात खूप मोठा विश्‍वास निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.
भंडारा,गोंदिया,चंद्रपूर इ.शहरात मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असल्याचे मॅसेज आले आहेत.याकडे मी सकारात्मकरित्या बघतो.नागपूर शहरात देखील मला प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचे ते म्हणाले. एक सामन्य माणूस सत्ताधा-यांना सरळ प्रश्‍न विचारण्याचे धाडस करतो,हे देखील सामान्य माणसाला आवडले असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.२१ पक्ष्ांचे पाठबळही माझ्यामागे भक्कमपणे उभे होते त्यामुळे मला निश्‍चितच विजयाची आशा आहे.

आघाडीचे कार्यकर्ते बूथवर दिसले,एकदिलाने निवडणूक लढली:ॲड.अभिजित वंजारी
मतदानानंतर प्रत्येकच पक्ष्ाचा उमेदवार हा बैठकीत व्यस्त होता.नफा-नुकसानीच्या गोळा-बेरजेतून वेळ काढत आघाडीचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांनी ‘सत्ताधीश’कडे बोलताना शंभर नव्हे तर दोनशे टक्के यशाची खात्री दिली.नागपूर शहरासोबतच ग्रामीण भागात ७३ टक्क्यांपर्यंत मतदान झाले असल्याचे ते म्हणाले.मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातला मतदार हा मतदानासाठी बाहेर पडला असून भाजपाच्या पारंपारिक गडाचा दावा फोल करण्यासाठीच हा मतदार राजा बाहेर पडला असल्याचा टोला त्यांनी हाणला.आम्ही आघाडी म्हणून ही निवडणूक एकदिलाने लढलो.आघाडीचे कार्यकर्ते प्रत्येेक बूथवर दिसले,असे ते म्हणाले.या निवडणूकीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट म्हणजे भाजपचा पारंपारिक मतदार हा यादीतून बाद झाला होता तर नव्या मतदारांनी ही वैचारिक कमान सांभाळली,त्यामुळे विजयाची खात्री आहेसच!

बैठकीत अतिशय व्यस्त असल्याने भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.

Latest बातम्या