
सरकारचा खोटारडेपणा उघडकीस
नागपूर,ता. १७ नोव्हेंबर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारद्वारा दरवेळी राज्यातील जनतेला खोटी आश्वासने वारंवार दिली जात आहेत.यातीलच एक कडी म्हणजे उर्जामंत्री नितीन राऊत यांचे वीज बिलात कोणतीही सवलत देणार नसल्याचे विधान आहे. या सरकारने वीज बिलात सुधारणा केली नाही तर या निर्णया विरोधात आंदोलन करण्याचा इशारा आमदार व भाजपचे शहरायक्ष् प्रवीण दटके यांनी दिला.
लॉक डाऊनच्या काळात जिथे अनेकांचे रोजगार हिरावले गेले,शहरातील लाखो नागरिकांनी केंद्र सरकारतर्फे वाटप करण्यात आलेल्या धान्यावर आपला उदर निर्वाह केला,मात्र एवढ्या गंभीर संकटादरम्यान या राज्यातील उर्जामंत्र्यांनी ग्राहकांवर ८ ते १० टक्के वीज बिल दरवाढीचा बोजा टाकल्याचा आरोप दटके यांनी केला.
आघाडी सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजपने अनेक आंदोलन केले मात्र आपल्याच अंहकारात बुडालेल्या उद्धव सरकारला नागरिकांची कोणतीही काळजी नाही,असा आरोप त्यांनी केला.राज्यातील नागरिकांना करोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटकाळातही कोणतीही सवलत राज्यातील सरकारकडून मिळाली नसल्याचे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच राज्यातील उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलामध्ये सुधारणा करुन ते कमी केले जातील असे आश्वासन जनतेला दिले होते.आता त्यांनी वीज बिलामध्ये ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे विधान केले.वीज बिलामध्ये नागरिकांना सवलत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा त्यांनी दिला.वीज बिलामध्ये त्वरित सुधारणा करुन योग्य बिल नागरिकांना पाठवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

आमचे चॅनल subscribe करा