Homeराजकारणपदवीधर सुशिक्षितांच्या निवडणूकीत ‘जात’फॅक्टर!

पदवीधर सुशिक्षितांच्या निवडणूकीत ‘जात’फॅक्टर!

अनारक्षित वर्गाला थांबवण्यासाठी आरक्षित वर्गांची वज्रमूठ:पत्र परिषदेत केला होता खुलासा

नागपूर,ता. ३ नोव्हेंबर: जवळपास ९ महिन्यांपूर्वी अगदी लॉक डाऊन लागण्यापूर्वी नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये एका संघठनेची पत्र-परिषद पार पडली होती.विषय होता पदवीधर मतदार संघात यंदा सवर्णांची मक्तेदारी मोडणार!या पत्र परिषदेत संघटनेचे पदाधिकारी यांनी अतिशय आत्मविश्‍वासपूर्ण निवेदन केले की त्यांनी जवळपास दीड वर्षांपासूनच सहाही जिल्ह्यात घरोघरी जाऊन अनारक्षित मतदारांशी संपर्क जोडला आहे.

पत्र परिषद आटोपल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्‍न निर्माण झाला,संपूर्णत: संवैधानिक लोकशाही असणा-या देशात ‘सवर्ण मक्तेदारी’म्हणजे काय?संघटना म्हणते तशी सवर्ण मक्तेदारीच्या एकूण टर्म लक्षात घेतल्या तर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या दोन तर प्रा.अनिल सोले यांची एक धरुन फक्त तीनच टर्म होतात,मात्र त्या पूर्वी पूर्वापार चालत आलेल्या निवडणूकीत ज्यांचे प्राबल्यं होतं,त्यांची ‘जात’काय होती?किंबहूना ७० वर्षांत पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हा नेमका कोणत्या जातीचा आहे,त्याने विधान परिषदेतील आपल्या कार्यकाळात आपल्याच जाती-बांधवाचे,विद्यार्थ्यांचे,शिक्ष् कांचे काय व कोणते भले केले?किती प्रश्‍ने विधान परिषदेत उपस्थित केली,किती प्रश्‍नांची सोडवणूक केली?पदवीधर मतदार संघातून निवडून गेल्यानंतर आपल्या सुशिक्षित मतदारांसाठी कोणती कल्पक ध्येय-धोरणे राबवली? फक्त राजकारण करायचं किंबहूना राजकारण ‘तापवायचं’यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु होते!सवर्ण उमेदवाराविरुद्ध एसी,एसटी,ओबीसी व इतर जातींच्या मतदारांना संगठीत केले असल्याचा खुलासा हे एखाद्या संघटनेचे धोरण एखाद्या लोकशाही देशात कसं होऊ शकतं?

ही बातमी प्रसार माध्यमांमध्ये छापून आल्यानंतर शहरातील अनेक बुद्धिजीवींनी यावर बौद्धिक चर्चा देखील केली होती.मूळात सुशिक्ष्तिांची निवडणूक समजली जाणा-या या ‘एकमेव’निवडणूकीत तरी ‘जात’हा फॅक्टर नको आणायला हवा होता,असे त्यांचे मत होते.निश्‍चितीच या मतदार संघातून निवडून गेलेल्या प्रतिनिधीवर प्रश्‍नांचा भडीमार करण्याचा,त्यांचा संपूर्ण कार्यकलाप विद्यार्थ्यांसमोर आणण्याचा व टिका करण्याचा,जाब विचारण्याचा अधिकार लोकशाहीत त्यांना होताच मात्र यावेळी मतदार यादीच बदलल्याने प्रस्थापित पक्षापेक्षा ही बरोबरीचीच नव्हे तर बरोबरीपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी केल्याचे सांगण्यात आले.याचा अर्थ त्यांचा लढा ‘पक्ष्’ हा ‘नसून’ ‘पाडणे’ या विषयीबाबतच असल्याची चर्चा त्यामुळे घडली.

मूळात भारतासारख्या संवेदनशील देशात ‘जात’हा फॅक्टर गेल्या ७० वर्षांपासूनच राजकारणात प्रभावी ठरत आहे.अगदी २१ साव्या शतकाच्या तिस-या दशकात दोन महिन्यांनंतर प्रवेश करणार असलो तरी कोणतीही निवडणूक ही अद्यापही ‘जाती’च्याच आधारावर लढवली जाऊ शकते हा मुद्दाच गैरलागू होत नाही!आज बिहारची निवडणूकीत ही ’विकास’या मुद्दावर लढली जात नसून ’बेरोजगारी’विषयावर लढल्या जात आहे.करोना या महामारीमुळे तर देशातच नव्हे तर संपूर्ण जगातच ‘बेरोजगारी’ने उग्र रुप धारण केले आहे.मग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही देखील ’जात’या निकषा ऐवजी अश्‍या ज्वलंत,धगधगणा-या आणि सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर का लढवली जाऊ शकत नाही?

लोकशाही देशात कोणत्या पक्षाकडून कोणत्या जाती-धर्माच्या उमेदवाराने निवडणूक लढावी हा सर्वस्वी राजकीय पक्षांचा प्रश्‍न असला तरी आजही उमेदवार ठरविताना, उमेदवार हा अमूक एका ‘जातीचा’असेल व ते क्ष्ेत्र त्याच जातीचं प्राबल्य असलेलं असेल तर त्यालाच उमेदवारी दिली जाते,हीच खरी शोकांतिका आहे. मग ताे उमेदवार आमदार झाल्यावर पाच वर्षांत एकदा ही आपल्या मतदारसंघाबाबत प्रश्‍न विचारायला विधीमंडळात तोंड उघडत नसेल तरी चालेल,तो निष्प्रभावी असला तरी चालतो मात्र तो अमूक जातीचा असल्याने त्या जातीच्या मतदारांच्या मतांवर निवडून आला आहे ना?बस्स,एवढंच पुरे. पक्षाचे संख्याबळ वाढले,परफॉरमेन्स गेला खड्डयात,ही मानसिकता कोणत्या शतकात आणि कोणत्या दशकात बदलणार आहे,असा विचार प्रज्ञावंतांना पडतो.प्रश्‍न अनारक्षित-आरक्षित वर्गाचा नसतो प्रश्‍न असतो तो फक्त ‘जातीच्या नावावर वाटेल तसं राजकारण घडवून आणण्याचा….!एवढंच. ७० वर्षानंतर देखील राजकीय पक्षांसाठी उमेदवार व मतदार हे ‘भारतीय’नसून ते अमूक जातीचेच असतात!मग जिथे राजकीय पक्षांचीच विचारसरणी ही आहे तिथे जमिनीस्तरावर काम करणा-या संघटना यांना तरी दोष कसा देता येईल?

प्रश्‍न तरीही उरतोच जातीपातीच्या राजकारणाने किती लोकांचे भले केले?अमूक जातीचा उमेदवार निवडून आल्यानंतर त्याने अमूक जातीच्या भल्यासाठी काय काम केले?म्हणूनच जातीच्या अधारावर मतदारांची वज्रमूठ बांधताना आपल्या जातीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नव्हे तर इतर जातीच्या उमेदवाराला निवडणूकीत पाडण्यासाठी सक्रिय प्रक्रिया राबविताना या ही गोष्टीचा विचार झाला पाहिजे,असेच म्हणावे लागेल.

 

Latest बातम्या