

मुंढेंनी थांबवलेल्या कामाचा दर्जा दोन महिन्यात सुधरला!
नागपूर,ता. २८ ऑक्टाेबर: माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महानगरपालिकेजवळ पैसाच नसल्याचे कारण सांगून अनके कामांना स्थगिती दिली होती.ज्यांचे वर्क ऑर्डर झाले आहेत ती देखिल देयके याच सबबी खाली थांबवली मात्र २७ ऑगस्ट रोजी मुंढे यांची नागपूरातून बदली झाली आणि तेवढ्याच तत्परतेने केवळ दोन महिन्यात म्हणजे ऑक्टोबर-२०२० पर्यंत जवळपास १७-१८ कोटींची बिले मनपाच्या वित्त विभागाकडून कंत्राटदारांना वाटप झाल्याने मनपा कर्मचा-यांमध्ये चांगलाच रोष ऐकू येत आहे.
मुंढे यांनी त्यांच्या काळात ही बिले का संमत नाही केली?ते सनदी अधिकारी होते,त्यांना कामाचा दर्जा कळत होता,ज्यांची देयके पारित झाली त्यातील अनेक कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे करुन देयके काढली असल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे मुंढेंच्या काळात सत्ताधा-यांनी ‘मुंढेंनी विकास कामे थांबवली’अशीच ओरड केली ‘मुंढेनी देयके थांबवली‘अशी ओरड केली असती तर त्या सर्व कामांची ताबडतोब चौकशीच मुंढेंनी लावली असती,म्हणूनच ‘कंत्राटदारांची बिले थकली’ या ऐवजी‘ कामे थांबवली’ या बाबीवर जास्त ओरडा झाला.
नुकतेच ७ वा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी मनपा कर्मचा-यांनी आंदोलन केले. मागच्या वर्षी जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये मनपा कर्मचा-यांचे वेतन ७ व्या वेतन आयोगाप्रमाणेच निर्धारित करुन काढण्यात आले होते,मात्र ऐन वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती थांबवली,मनपाकडे ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यास पैसाच नाही,मनपा अतिशय आर्थिक अडचणीत आहे,असे कारण फडणवीस यांनी सांगितले,अशी माहिती सूत्राने दिली.
मात्र मुंढेंचे नागपूरातून प्रस्थान होताच मनपाची आर्थिक स्थिती इतकी सुधारली का, केवळ दोन महिन्यात कंत्राटदारांची १८ कोटींची थकीत बिले संमत झाली!
याला प्रसिद्धी का नाही?
मनपातील सत्ताधा-यांनी साधे कुठे एखादे झाड लावले,मास्क वाटप केले तरी ५० ठिकाणी फोटो छापून येतात,इथे तर विक्रमी वेळेत १८ कोटींची थकीत बिले कंत्राटदारांची देण्यात आली,गरिबीत आणि रसातळात गेलेल्या कंत्राटदारांना उभारी दिली,यासाठी सत्ताधा-यांनी तर स्वत:ची पाठ थोपटून घेतली पाहीजे मात्र मनपातील कंत्राटदारांची गरीबी हटवण्यासारख्या एवढ्या मोठ्या नोबेल पराक्रमासाठी ‘ना हाक ना बोंब’या महान कामाचा कुठेही गाजावाजा देखील नाही!असे उपहासाने सांगितले जात आहे.
जे काही केले ते सर्व ‘नियमाप्रमाणे’असेच आता सत्ताधारी सांगतील मात्र मुंढेंच्या काळात थांबवण्यात आलेली ही देयके यांची तपासणी झाली आहे का? कोणी केली?या सर्व देयकांना क्लिीनचिट मिळाली आहे का?कोणी दिली?याची देखील माहिती उघड झाली पाहिजे,अशी मागणी मनपाचे कर्मचारी करीत आहे.
पीएफच्या पैश्यांमधून कंत्राटदारांची देणी!
मनपा कर्मचा-यांमध्ये अशी देखील चर्चा ऐकू येतेय, मुंढेनी त्यांच्या कार्यकाळात वित्त विभागात मनपा कर्मचा-यांच्या २०० कोटींचा भविष्य निर्वाह निधीचा पैसा, जो गेल्या अनेक वर्षात जमा करण्यात आला नव्हता, त्यासाठी निधी जमा करण्यास सुरवात केली होती,तोच निधी पदाधिका-यांनी कंत्राटदारांची देयके देण्यासाठी वापरला,असा संशय व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे मुंढे यांच्या कार्यकाळात फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२० दरम्यान मनपा कर्मचा-यांचा पगार हा वेळेवर होत होता,मुंढे जाताच पुन्हा मनपाचा कारभार ‘ये रे माझ्या मागल्या’सारखा झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पगार वेळेवर मिळत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
