
नागपूर,ता. १८ सप्टेंबर:महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्ष् तेखाली पार पडलेल्या बुधवारच्या बैठकीत ३० सप्टेंबरपर्यंत दर शनिवार व रविवार ’जनता कर्फ्यू’ची घोषणा करण्यात आली. मात्र एकीकडे जिवनावश्यक वस्तूंची दूकाने सुरु राहणार असे सांगण्यात आले असता दूसरीकडे जनता कर्फ्यूच्या काळात औषध दूकानाव्यतिरिक्त इतर कोणतीही दूकाने सुरु ठेऊ नये,शहरातील व्यापा-यांनी देखील स्वयंफूर्तीने त्यांची दूकाने व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे यामुळे दूध,भाजी,फळे व किराणा यांची दूकाने सुरु राहणार का?याबाबतीत शहरात आज चांगलाच संभ्रम दिसून आला.
दूध विक्रेते,भाजीची दूकाने व फळ विक्रेत्यांमध्ये आज दिवसभर हीच चर्चा होती उद्या दूकाने सुरु ठेवल्यास प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई होणार आहे का?याचा अदमास त्यांना लागत नसल्याने उद्या सांगू काय ते?असे ते आज दिवसभर गि-हाईंकांना सांगत होते. बुधवारी झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दोन दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय सार्वमताने मान्य करण्यात आला मात्र जनतेनेच जवाबदारीचे पालन करावे,स्वयंफूर्तीने आपापली दूकाने व आस्थापने बंद ठेवावित,शुक्रवारी रात्री ९.३० पासून सोमवारी सकाळी ७.३० पर्यंत काटेकोरपणे जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले असले तरी जिवनावश्यक वस्तूमध्ये दूध,भाजी व फळे अश्या नाशवंत गोष्टींचा समावेश होत असल्याने ही दूकाने कशी बंद ठेवावी?असा प्रश्न व्यापा-यांना पडला आहे.
कॉटन मार्केटमधील आलू-कांद्याची ओळ ही बंद ठेवावी की काही तासांसाठी सुरु ठेवावी व अर्ध्या दिवसाचा लॉक डाऊन पाळावा,यावर बराच संभ्रम होता. मूळात जनता कर्फ्यूने प्रशासनाला साध्य काय होणार ?हा देखील प्रश्न व्यापारी वर्गामध्ये चांगलाच चर्चिला गेला.उद्या शनिवारी जिवनावश्यक वस्तूंची दूकाने सुरु ठेवल्यास प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई होणार आहे का?याबाबत स्पष्टता नसल्याने तसेच प्रशासनातर्फे याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिले नसल्याने आणखी गोंधळ माजला आहे.
हा लॉक डाऊन नसून जनता कर्फ्यू असल्यामुळे व्यापारी व दूकानदारांवर कोणती दंडात्मक कारवाई हाेणार का? याबाबत आज चांगलाच संभ्रम दिसून पडला.
कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा:महापौर संदीप जोशी यांचे नागरिकांना आवाहन
नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने स्वयंस्फूर्तीने ठेवलेला बंद. ह्या शहराचे आरोग्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवस का होईना, आपल्या वागण्याने जर या संक्रमणावर ब्रेक लागत असेल तर आपण ते या शहरासाठी करायलाच हवे. शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या आग्रहाखातर नागपूर महानगरपालिकेने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले. जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंशिस्त पाळणे होय. त्यामुळे हे बंद राहील का, ते बंद राहील का, पोलिसांचे दंडे पडतील का, मनपाकडून दंड ठोठावला जाईल का हे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण स्वत:हून दोन दिवस घराबाहेर पडणार नाही, असा प्रण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता असेल, काळजी असेल तर जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जनता कर्फ्यू’दरम्यान केवळ वैद्यकीय सुविधा आणि औषधींचे दुकाने वगळता काहीही सुरू राहणार नाही, याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यायची आहे. अनेक व्यापारी संघटनांनी आपण जनता कर्फ्यू पाळणार असल्याचे पत्र आपल्याला दिले असल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. जनता कर्फ्यूदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. त्यांनी आपले प्रवेशपत्र सोबत बाळगावे. कोरोनाशी लढा अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने आणि कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने जनता कर्फ्यू यशस्वी करणे आवश्यक आहे. यासाठी जनप्रतिनिधींनीही जनतेला उद्युक्त करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

आमचे चॅनल subscribe करा