
नागपूर,ता. ९ ऑगस्ट: मुंबईत सध्या दोन दिवसीय पावसाळी अधिवशेन सुरु आहे. आजच अधिवेशनाचे सूप वाजले.नागपूरातील पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे हे देखील अधिवेशनानिमित्त मुंबईत आहे.यावेळी त्यांनी नागपूरात कोविड रुग्णांसाठी गंभीर झालेली आरोग्य व्यवस्था,धक्कादायक मृत्यू आणि सपशेल अपयशी ठरलेल्या स्थानित स्वराज्य संस्था इ.बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर केले तसेच महाराष्ट्राच्या उपराजधानीत मुंबईच्या धर्तीवर तातडीने जंबो कोविड उपचाराची व्यवस्था उभारण्याची विनंती केली.
सप्टेंबरच्या पहील्याच आठवड्यात नागपूरात करोना संक्रमण हे बेलगाम झाले असून गेल्या ७ दिवसात ११,४७७ लोकांना करोनाची बाधा झाली आहे. याच काळात ३२० नागरिकांचा मृत्यू झाला.या आकडेवारीवरुन नागपूरात करोनाने उग्र रुप धारण केल्याचे दिसून पडते.सप्टेंबरच्या पहील्याच आठवड्यात गेल्या तीन महिन्याच्या तुलनेत संक्रमित रुग्णांचा आकडा सात पटीने वाढला आहे. ७ सप्टेंबरपर्यंत एकूण ४१,०३२ रुग्णांची नोंद झाली तर १,३६५ नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला. ६ सप्टेंबरला एकाच दिवशी ५४ संक्रमितांनी प्राण सोडले,तर ७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ५० संक्रमितांचा मृत्यू झाला असल्याचे निवेदनात त्यांनी सांगितले.
नागपूर शहरात ही स्थिती अतिशय भयावह असून शासनाने लक्ष् पुरविणे तसेच नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी निधीची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे.नागपूरात मेयो,मेडीकल व एम्स हे तिन्ही शासकीय रुग्णालयातील खाटा या पूर्णपणे भरल्या असून ग्रामीण भागाचा देखील ताण या रुग्णालयांवर आला आहे.शासकीय रुग्णालयांमध्ये भरती होण्यासाठी देखील आता रुग्णांना खाटा मिळत नसल्याचे विदारक वास्तव आहे.खासगी रुग्णालयांची देखील हीच स्थिती असून त्यांच्याकडे देखील मोजक्या खाटा तसेच ऑक्सीजन व वेंटिलेटरची सुविधा आहे. याशिवाय नागपूरातील सर्वसामान्य माणूस हा खासगी रुग्णालयाचे लाखो रुपये बिल भरण्यास सर्वथा असमर्थ आहे.
परिणामी महात्मा फूले जीवनदायी योजनेतून लवकरात लवकर सर्वसामान्य व गरीब कुटुंबियांना आरोग्याची सोय करुन दय्ावी तसेच ज्या रुग्णांनी अारोग्य विमा काढला आहे,तो विमा अनेक खासगी रुग्णालये अमान्य करुन रुग्णांना आधी रुग्णालयाचे पूर्ण बिल भरायला लावित असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.या बाबीकडे कसे लक्ष् देता येईल याविषयी कृपया त्वरीत सूचना काढण्यात यावी,असे त्यांनी निवेदनात नमूद केले.
मुुंबईत ज्याप्रमाणे बांद्रा-कुर्ला कॉम्पेलक्स येथे एमएमआरडीच्या मदतीने सर्व सोयी सुविधांनीयुक्त जंबो रुग्णालय सुरु करण्यात आले त्याच धर्तीवर नागपूरातही तातडीने असे जंबो रुग्णालय सुरु करण्यात यावे.यामुळे अनेकांचे प्राण वाचतील.माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा गाजावाजा करुन राधास्वामी सत्संग मंडळाच्या सहकार्याने ५ हजार खाटांचे कोविड केअर सेंटरची उभारणी केल्याचा दावा केला होता मात्र अद्याप या ठिकाणी एक ही बेड नागपूरातील रुग्णांना उपलब्ध झाला नाही.याशिवाय हे क्ष्ेत्र नागपूरपासून २५ किलोमीटर दूर आहे.या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी,वेंटिलेटर व ऑक्सीजन इ.कोणतीही सुविधा उपलब्धच करण्यात आली नाही.
नागपूरातील जनता ही भयभीत झाली आहे.गंभीर आजारी असणा-या कोविड रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. कोणतेही खासगी रुग्णालये त्यांना भर्ती करुन घेत नाही. एका-एका रुग्णाला ५-५ खासगी रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्थेत भटकंती करावी लागत आहे.नागपूरकर जनतेचे अमाप हाल होत असून याकडे तातडीने लक्ष् देण्याची गरज आहे. नागपूरात ११ मार्च रोजी करोनाचा पहीला रुग्ण आढळला.याशिवाय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद(आयसीएमआर)ने सप्टेंबरमध्ये नागपूरात काेविड रुग्णांची संख्या ही दहा हजारांच्यावर जाण्याची आधीच सूचना दिली असताना गेल्या सहा महिन्यात कोणतीही प्रभावी उपाययोजना स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभारली नाही. नागपूरात शासकीय व खासगी रुग्णालये मिळून फक्त ३,०७८ खाटा उपलब्ध आहेत तर रुग्णांची संख्या ११,४७७ पर्यंत पोहोचली आहे.संकट येणार माहिती असूनही प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना राबविण्यात आली नाही.
स्थानिक प्रशासन तसेच मनपा सत्ताधारी हे फक्त सिमेंट रस्ते,गडरचे चेंबर,शॉपिंग मॉलमध्ये रुग्णालय सुरु करणे इ.नागरिक सुविधांच्या कामात गुंतून राहीले.नागपूरात मनपाचे ५ रुग्णालये मिळून ४५० खाटांची व्यवस्था असुनही या पाचही रुग्णालयात एक ही रुग्ण भरती करण्यात आलेला नाही. या रुग्णालयात डॉक्टर्स,मेडीकल स्टाफ नसल्यामुळे या रुग्णालयांचा नागपूरकर जनतेला कोणताही उपयोग होत नाही जर दुसरीकडे एक-एक खाटेसाठी करोना बाधित रुग्णांचा जीव जात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.परिणामी नागपूरात देखील मुंबईच्या धर्तीवर तातडीने जंबो रुग्णालय उभारण्यास शासनाने त्वरित मदत करण्याचे आवाहन त्यांनी निवेदनाद्वारे केले.

आमचे चॅनल subscribe करा