
शालिनीताई मेघे कोविड रुग्णालयाचा हाच नंबर सेवेबाहेर!
नागपूर,ता. ५ सप्टेंबर: शहरात करोनाच्या प्रादुर्भावाने उच्चाकं गाठला असून आज नागपूरची स्थिती ही पुणे-मुंबईसारखी भयावह झाली आहे. घरोघरी रुग्ण आढळत आहेत.अश्यावेळी कुटुंबिय हे शहराचे पालकत्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे त्या नागपूर महानगरपालिकेकडे मोठ्या आशेने बघत आहेत मात्र त्यांच्या वेबसाईटवर दिलेला ७५१७०४२२७५ हा नंबरच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती एका गंभीर रुग्णाच्या नातेवाईकाने ‘सत्ताधीश’ला दिली.

क्रमांकच बंद असल्याने करोना पॉझिटीव्ह रुग्णासाठी तातडीने उपचारासाठी कोणते रुग्णालय आहेत, रुग्णाला कुठे घेऊन जावे, कोणत्या रुग्णालयात किती खाटा आहेत, त्या रुग्णालयात किती पैसे द्यावे लागणार आहेत इ.कोणतीही माहिती मिळत नाही. मोठा गाजावाजा करुन मनपा मुख्यालयात माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च महिन्यापासून निर्माण केलेल्या करोना कंट्रोल रुममधील नंबर हे देखील नागरिकांना कोणतीही योग्य माहीती उपलब्ध करुन देत नाही.

विशेष म्हणजे हाच नंबर वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्राच्या मोठ्या फलकावर झळकतोय मात्र या रुग्णालयात रुग्णाला भरती करण्यासाठी शहरवासी फोन करीत असता हा नबंरच अस्तित्वात नसल्याचे निराशाजनक सूर नागपूरकरांना ऐकावा लागत आहे.

महत्वाचे म्हणजे महापौर संदीप जोशी यांनी कोव्हिड संबंधी आढावा घेण्यासाठी वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे आणि डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयाला दुपारी भेट दिली. रुग्णालयासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी व रुग्णालय प्रशासनाला येणा-या अडचणी याबाबत चर्चा केली. करोना पॉझिटीव्ह रुग्णांना रुग्णालयात नेण्यापूर्वी नागरिकांनी मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. रुग्णाची ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली असल्यास सदर दोन्ही रुग्णालयात जाणे टाळावे.वेळेवर रुग्णांची भटकंती होऊ नये,यासाठी आधीच मनपाच्या नियंत्रण कक्षाला सविस्तर माहिती द्यावी,असे आवाहन त्यांनी केले.
महापौरांनी मेघे रुग्णालयात लागलेल्या या मोठ्या फलकावरील नंबर फिरवून बघितला असता तरी अधिक वास्तव त्यांना कळले असते अशी संतप्त प्रतिक्रिया ‘राष्ट्र निर्माण’संघटनेचे अध्यक्ष् नीलेश नागोलकर यांनी दिली. हाच नंबर ॲम्ब्यूलेंस सेवेसाठी दिला असून रुग्णांची ही आणखी एक थट्टा असल्याचे ते म्हणाले. महापालिका आपल्या बेवबसाईटवर बंद नंबर झळकवतेय,तोच नंबर मेघे रुग्णालयाच्या फलकावर झळकतोय तोच नंबर ॲम्ब्यूलेंस सेवेसाठी देखील झळकवला जातोय, ही शहातील करोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत केल्या जाणारी क्रूर थट्टाच असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
मनपाच्या ॲम्ब्यूलेंस ‘मला पहा फूले वहा!’
नागपूर महानगरपालिकेच्या अधीन ६ ॲम्ब्यूलेंस आणि ६ शववाहिका आहेत. मात्र शहरात सर्वत्र १०८ क्रमांकाची ॲम्ब्यूलेंस ही रुग्णसेवेत धावताना दिसत आहेत.मनपाच्या ६ ॲम्ब्यूलेंसचा कोणाताही उपयोग नागरिकांना होत नसल्याचे दिसून पडत आहे. शहरात करोनाने मार्चच्या दुस-या आठवड्यात शिरकाव केला होता.यानंतर तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटतोय परंतू मनपाच्या सुस्त प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच्या अधीन असणा-या ६ ॲम्ब्यूलेंस ऑक्सीजन मास्कसह अद्यावत करुन रस्त्यावर उतरवल्या नाहीत,याबाबत देखील रुग्णांच्या कुटुंबियांनी रोष व्यक्त केला आहे. दूसरीकडे खासगी एंबूलेन्स या मनमानी शुल्क वसूल करुन कोरोना संकटाच्या काळात जनतेची लूट करीत असल्याचे वास्तव समाेर येत आहे.
करोनासाठी केंद्राचा अमाप पैसा मनपाला मिळाला असून माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात तो तातडीने वाटून देखील झाला.नुकतेच मनपा मुख्यालयात कंत्राटपद्धतीने वैद्यकीय क्ष्ेत्रातल्या डॉक्टर्स व सहयोगी यांच्या मुलाखती पार पडल्या.एकीकडे मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांना कमी पगार मिळत असताना दूसरीकडे कंत्राटपद्धतीने भरण्यात येणा-या एमबीबीएस डॉक्टरांना मात्र ७५ हजार तर स्टाफला ४० ते ४५ हजार पगार असणार आहे.एवढा पगार घेऊन जनतेची किती सेवा ते करोना काळात करणार आहेत?हा ही प्रश्न अनुत्तरीत राहतो.
सध्या चाचणीसाठी स्वॅब घेण्यासाठी शहरातील डेन्टल रुग्णालयातील बीडीएस डॉक्टर्सची मदत घेतली जात आहे.विशेष म्हणजे प्रत्येक केंद्रावर दोन बीडीएस डॉक्टर्सची नेमणूक केली गेली असून यांना मनपा प्रशासनाकडून एक पैसा ही दिला जात नाही मात्र यांच्यावर सुपरविजन करणारे एमडीएस डॉक्टर्सना मनपा एक लाख रु.पगार देत असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.हे बीडीएस डॉक्टर्स फूकट राबत आहेत.
इंदिरा गांधी रुग्णालयात फक्त १२ रुग्ण!
मोठा गाजावाजा करुन गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात १२५ खाटांचा कोविड वॉर्ड सुरु करण्यात आला मात्र आजच्या तारखेत या रुग्णालयात फक्त १२ रुग्ण भरती आहे.येथील स्टाफ हा सर्रास या रुग्णालयात येणा-या रुग्णांना मेयो-मेडीकलचा रस्ता दाखवून आपली जवाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे शासकीय रुग्णालये ही हाऊस फूल झाली असून खासगी रुग्णालयांनी या महामारीमध्ये जनतेची चांगलीच लृट चालवली असताना मनपाची ही रुग्णालये म्हणजे जनतेच्या कराच्या पैशांतून पोसलेला ‘पांढरा हत्ती’साबित झाली आहे.
मुंबईच्या चमूच्या सूचना आतातरी घेणार का गांर्भीयाने?
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईमधील धारावीत करोना प्रभावीपणे आटोक्यात आणल्यामुळे नागपूरात देखील प्रभावी उपाययोजना सुचवण्यासाठी आज मुंबईहून मनपा आयुक्त आय.एस. चहल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात बैठक घेतली.या बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत,डॉ.हेमंत शहा,डॉ.राहूल पंडीत,डॉ.मुजज्जल लकडावाला, डॉ.गौरव चतुर्वेदी यांचा समावेश होता.या चमुने नागपूरातील करोना आटोक्यात आण्यासाठी अनेक उपाययोजना सूचवल्या.
यात चाचणी,ॲम्बुलन्स,हॉस्पीटल,रुग्णांच्या व्यवस्थापनावर लक्ष् केंद्रित करणे,रुग्णांसाठी खाटा व ॲम्बुलन्स आहेत की नाही हे बघणे,चाचणी अहवाल २४ तासांत येईल यासाठी तत्पर राहणे,चाचण्या वाढवून करोनावर मात करणे,स्वतंत्र स्वच्छतागृहे नसलेल्यांना अलगीकरण कक्ष्ा त ठेवणे,संशयित रुग्णांवर तात्काळ उपचार,त्यांचे अहवाल उपलब्ध होण्यासाठी रात्रीदेखील काम करणे,वॉर रुममधून सूचना जाणे व त्याचे एकत्रित विश्लेषण करणे इ.उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणण्याची सूचना केली. याशिवाय प्रत्येक झोनमध्ये वॉर रुम तयार करुन खाटांची माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड तयार करुन दर अर्ध्या तासांनी माहिती अद्यावत करणे,ऑनलाईन व फोनवरुन रुग्णांना खाटा उपलब्ध करुन देणे,चाचण्यांची संख्या वाढविणे,आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणे,ॲम्बुलन्सी संख्या वाढविणे,सरकारी असो किवा खासगी रुग्णालये यात वॉर रुम सुरु करणे,गंभीर रुग्णांच्या उपचाराची संपूर्ण माहिती सीसीटीव्हीमध्ये ठेवणे,प्रत्येक बाधिताचे विश्लेषण करणे,हॉस्पीटल्समधील कॅटिन्स पूर्ण क्ष् मतेने सुरु करणे,स्वच्छतागृहांचे दर चार-पाच तासांनी निर्जंतुकीकरण करणे इ.सूचना चहल यांनी मांडल्या.अधिवेशन काळात ज्याप्रमाणे इतर शासकीय विभागांकडून गाड्या मागवल्या जातात त्याच धर्तीवर १०० ॲम्बूलेंस नागपूरकरांसाठी उपलब्ध करुन देण्याची सूचना देखील देण्यात आली. जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांकडून कितपत या सूचनांचे पालन हाेईल व शहरातील करोना रुग्णांना दिलासा मिळेल हे येत्या काळातच समजू शकेल,अन्यथा तज्ज्ञांच्या या दौ-याचे कोणतेही फलित होणार नाही.
आणखी काही नाही तर किमान मनपाच्या बेवसाईटवरील तसेच रुग्णालयांच्या फलकांवरील फोन नंबर जरी सुरु ठेवण्यात आले तरी जनतेला थोडासा दिलासा मिळू शकेल,अशी अपेक्षाव्यक्त केली जात आहे.

आमचे चॅनल subscribe करा