Homeनागपूर न्यूजआणि..तलावाची झाली जमीन,बांधली शाळा!ॲड.सतीश उके यांची तक्रार

आणि..तलावाची झाली जमीन,बांधली शाळा!ॲड.सतीश उके यांची तक्रार

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १२ जुलै: नागपूर शहराला पाणी पुरवठा करणा-या पेंज प्रकल्पाचा ११० एकर तलाव त्याच ठिकाणी २००६ पूर्वी अस्तित्वात होता.हा तलाव पाटबंधारे विभागाने कोराडी औष्णविक वीज केंद्राला ‘कोराडी संतुलित केंद्रा’साठी हस्तांतरीत केला होता. पाणी थांबविणयाकरीता हा तलाव क्र.३ पाटबंधारे विभागाने व औष्णविक वीज केंद्राला दिला होता.या तलावाचा खरा मालक हा पाटबंधारे विभाग आहे.

कोराडी महामार्गाच्या अगदीलगतचा हा तलाव मौजा खापरखेडा ,तालुका कामठी,जिल्हा नागपूरा,खसरा क्र. ७७ व ७८ अंतर्गत येतो.मात्र या तलावातील दहा एकरची जागा बुजवुन ती विद्यमान तमिलनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या बनवारीलाल पुरोहित ट्रस्टच्या भारतीय विद्या भवन,भगवानदास पुरोहित विद्यामंदिर,सिविल लाईन्स यांना देण्यात आल्याची तक्रार ॲड.सतीश उके यांनी दोन दिवसांपूर्वी कोराडी पोलीस ठाण्यात केली आणि पर्यावरणवाद्यांना चांगलाच धक्का बसला.

या तलावाचे कश्‍याप्रकारे,कोणकोणत्या वेळी आणि कोणी-कोणी खोटी कागदपत्रे तयार केली, याचे पुराव्यानिशी कागदोपत्रे या तक्रारीसोबत जोडली गेली आहे.या तलावावर अनेक वर्षांपासून पुरोहित यांची नजर होती मात्र राज्यात २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष् -शिवसेना युतीची सरकार आली आणि पुरोहित यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या संगमताने १० एकरचा तलाव बळकावला असल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला.

या तलावात भरण,माती भरुन त्यावर महागडी खासगी शाळा उभारण्यात आली. या षडयंत्रात उर्जा विभागाच्या महानिर्मितीच्या अध्यक्ष्ाला देखील सहभागी करण्यात आले.या तलावाला कागदोपत्री ’जमीन’दाखवण्यात आली! महानिर्मितीच्या अधिका-यातर्फे तलावाला जमीन असल्याचे दाखविण्यासाठी उपअधिक्ष् क,भूमि अधिलेख कामठी यांना पत्र देण्यात आले.या पत्रात १ ऑक्टोबर २०१५ रोजी, ही जमीन भवन्सला देण्यासाठी लवकरात लवकर मोजणी करुन द्यावी,असा उल्लेख होता.हे पत्र रेंट फिक्सीनच्या एका महिना अाधीचे आहे. परणामी जी मोजणी उशिरा होणार होती,ती आधीच करण्यात आली.

सातबारावर स्पष्टपणे नोंद आहे हा तलाव आहे. जमीन नाही. ३ नोव्हेंबर २०१५ रोजी तलावाची ’जमीन’पुरोहित ट्रस्टला लीज-डीड करुन देण्यात आली.सब रजिस्ट्रार समोर २ वाजून ३४ मिनिटांनी ती सुनावणीसाठी आली, २ वाजून ३६ मिनिटांनी त्यावर शिक्का मारण्यात आला. २ वाजून ४८ मिनिटांनी संपूर्ण ‘कायदेशीर प्रक्रिया’पूर्ण करण्यात आली. या सेल-डीडच्या पान क्र.२९ वर ताबा पावतीचा उल्लेख आहे. ३ जानेवरी २०१५ रोजी भाडेपट्टीच्या झालेल्या कराराच्या अनुषंगाने त्या तलावावरच्या जागेवर महाजेनकोचे अधिकारी भवन्स शाळेला कब्जा देत असल्याचे तसेच ३ जानेवरी रोजी दुपारी ३ वाजून ३ मिनिटांनी स्थळ दाखविण्यात आल्याची नोंद आहे. हे स्थळ म्हणजे…हा तलाव होता!

अशी सर्व कागदपत्रे लीज-डीडमध्ये नोंदणीकृत झाली दूपारी अडीच वाजता,यानंतरचे सर्व सोपस्कार पार पाडणा-या कागदांची देखील पूर्तता अर्धा तास आधीच करण्यात आली. दूपारी ४ वाजता जी कागदे करार करताना गरजेची होती, ती अर्धा तास आधीच फाईलबंद करण्यात आली. हे सर्व बनावटी दस्तावेज असल्याची तक्रार या तक्रारीत नमूद आहे.याशिवाय एनएमआरडीएचा झोन प्लॉन रजिस्ट्रारला कळू नये म्हणून ‘झोन प्लॅन’लावलाच नाही! जो सोबत लावणे अति अत्यावश्‍यक बाब होती.

खसरा क्र. ७७,७८ लावला नाही.सातबारा लावला नाही,ही जमीन नसून तलाव आहे याचा कुठेही उल्लेख नाही.पुरोहीत ट्रस्टसोबत हा करार करताना सब-रजिस्ट्रारची दिशाभूल करण्यात आली.अधिका-यांवर राजकीय दवाब टाकून रजिस्ट्री करण्यात आली. शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आला.तलावाचे,पर्यावरणाचे नुकसान करण्यात आले. ही शाळा बांधल्यानंतर पाऊस जास्त पडल्यास येथील जनजीवनाला ही धोका निर्माण झाला आहे.

कर्म पूर्ण झाल्याशिवाय लढतच राहील- ॲड.उके
माणसाचा जन्म हा नश्‍वर आहे. सर्व सुख संपत्ती ही देखील नश्‍वर आहे. सद् गुरु कृपेने आणि आई-वडीलांच्या आर्शिवादाने आजपर्यंत मोठमोठ्या राजकारण्यांविरोधात सत्यासाठी लढलो,पुढे ही लढतच राहील. मी घरचा खूप श्रीमंत नाही,त्यामुळे न्यायालयीन लढाई लढण्यासाठी राजकारण्यांएवढा पैसा माझ्याकडे नाही,मात्र सत्य-असत्याची ही लढाई मी माझ्या जिवनाच्या अंतापर्यंत लढत राहील. अनेक वेळा मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, कोट्यावधी रुपयांची लालूच दाखवण्यात आली मात्र,माझा कर्म सिद्धांतवर प्रगाढ विश्‍वास असल्यामुळे माझी हीच धारणा आहे, मी माझे ‘कर्म’करतोय. जी पूर्ण केल्याशिवाय,पूर्ण झाल्याशिवाय मला सद् गती किवा मोक्ष् मिळणार नाही. म्हणूनच मी मागे हटत नाही.हटणार ही नाही. ९ ता.ला मी कोराडी पोलीस ठाण्यात या संपूर्ण भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदवली.सर्व प्रसार-प्रचार माध्यमांना देखील या तक्रारीची नोंद पाठवली मात्र, वृत्तपत्र जगत किवा प्रचार माध्यमे यांची दखल घेणार नाहीत,याची १०१ टक्के खात्री होती. मूल्याधिष्ठित पत्रकारितेचे हे जग आजही असले तरी माजी मुख्यमंत्री यांना महाविकासआघाडीची सरकारही आजही घाबरते,असे माझे ठाम मत आहे. या व्यवहारात दीड लाख कोटींचा व्यवहार पार पडला आहे,असे माझा दावा आहे आणि दीड लाख कोटी ही काही मामूली रक्कम नाही.

माझा लढा व्यक्तिंविरोधात नसून भ्रष्टाचारविरोधात आहे.किती राजकीय नेत्यांचे सिंगापूर,दुबईत इ.देशात मोठमोठे हॉटेल्स आहेत?हे देखील जनतेसमोर येणे गरजेचे आहे. आपल्या लाडक्या नेत्यांचा ‘खरा’चेहरा हा भ्रष्टाचाराने किती बरबटलेला आहे,जनतेला हे कळण्यासाठीच माझा हा लढा आहे.यात माझा काही वैयक्तिक स्वार्थ नाही. शहराचे पालकमंत्री व उर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संपूर्ण कारभाराची चौकशी लावावी, आ.सुनील केदार,आ.विकाास ठाकरे यांनी देखील या भ्रष्टाचाराला वाचा फोडावी,असे माझे मत आहे. ते वाचा फोडतीलच यात मात्र शंका आहे. सत्य-असत्याच्या या लढ्यात माझे शुभेच्छूक,हितचिंतक, मित्र व नातेवाईक यांचा मोलाचा सहयोग मला मिळत असतो. माझ्यासाठी एवढीच समाधानाची बाब आहे.

उके यांनी सत्य जगासमाेर आणावे-माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे
मी ॲड.उके यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो,त्यांनी आमच्या विरोधात जी तक्रार नोंदवली आहे त्यासाठी. त्यांच्या तक्रारीवर शासनााने लवकरात लवकर चौकशी नेमावी, आणि सत्य समोर आणावे. तो अहवाल ॲड.उके यांनीही जगासमोर आणावा,एवढीच मी मागणी करतो आणि त्यांनी जी तक्रार नोंदवली आहे,त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो.

Latest बातम्या