Homeराजकारणनागपूरसह मुंबई, ठाणे, पुणे रेड झोन वगळता लॉकडाऊनमध्ये शिथिलता: उद्धव ठाकरे

नागपूरसह मुंबई, ठाणे, पुणे रेड झोन वगळता लॉकडाऊनमध्ये शिथिलता: उद्धव ठाकरे

नागपूर: करोनामुळे गेल्या महिना-दीड महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ३ मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह इतर रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक दिली जाईल. लॉकडाऊनमध्ये अधिक शिथिलता दिली जाईल, असं सांगतानाच पण ही शिथिलता देताना कोणतीही घाईगडबड करण्यात येणार नाही. तुम्हीही मोकळीक दिल्यानंतर काळजी घ्यायची आहे. नाही तर आजवर केलेल्या तपश्चर्येवर पाणी फिरेल, राज्यात लागू असलेला लॉकडाऊन  संपण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. यापार्श्वभूमीवर असं  म्हणत मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यामातून राज्यातील जनतेशी संवाद साधत रेड झोनवगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत असल्याचं सांगत राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला.

संभाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी १ मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्यातील लॉकडाऊनची मुदत येत्या ३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे पुढे काय होणार असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर आदी जिल्हे राज्यातील रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे ३ मे नंतर या ठिकाणी शिथिलता देणं योग्य ठरणार नाही. मात्र, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देता येईल. आता जेवढी बंधने आहेत, त्यापेक्षा अधिक मोकळीक देता येईल. पण त्यासाठी कोणतीही घाई करण्यात येणार नाही. नाही तर बंधन उठवल्यानंतर हाच जीवाणू पुन्हा उलटायला नको. त्यासाठी धीराने आणि खंबीरपणे आपल्याला पाऊल टाकायचे आहे. त्यामुळे रेड झोनवगळता इतर ठिकाणी टप्याटप्याने काही गोष्टी सुरू करण्यात येईल. आपलं जीवनमान पुन्हा रुळावर आणता येईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

प्रत्येक देशाचा नागरिक हाच त्या देशाची खरी संपत्ती असतो. तुम्ही सुद्धा आपल्या देशाची संपत्ती आहात. तुम्ही सैनिक आहात. नागरिक वाचले तर हा गाडा चिखलातून पुन्हा बाहेर काढून नेता येईल. त्यामुळे तुम्ही आजपर्यंत जशी साथ दिलीत तशीच या पुढेही साथ द्या, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच लॉकडाऊन लागू केला नसता तर करोनावरचं नियंत्रण सुटलं असतं. आतापर्यंत गुणाकार पद्धतीने करोनाचे रुग्ण वाढले असते म्हणूनच लॉकडाऊन सुरू करण्यात आला होता. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी त्याला सर्किट ब्रेकर हे नाव दिलंय. करोनाचं सर्किट तोडण्यासाठीच लॉकडाऊन आवश्यक होतं, असंही ते म्हणाले.

Latest बातम्या