Homeराजकारणयुती तुटली नाही मात्र आमची खंत दूर झाल्यावरच शिवसेनेशी चर्चा:मुख्यमंत्री

युती तुटली नाही मात्र आमची खंत दूर झाल्यावरच शिवसेनेशी चर्चा:मुख्यमंत्री

मुख्यमंत्री हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून बघणार काम

नागपूर: गेल्या पाच वर्षांच्या सत्ता कारभारात महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे काही काम केले त्याची पावती आम्हाला विधान सभेच्या निकालाद्वारे मिळाली. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष् म्हणून समोर आला. भाजपला १०५ जागा मिळाल्या,२०१४ च्या तुलनेत अपेक्ष्ेपेक्ष्ा काही जागा कमी झाल्या मात्र शिवसेना व मित्रपक्ष् मिळून राज्यात महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला याचा आनंद आहे परंतू निवडणूक निकालानंतर आपल्या पहील्याच पत्र परिषदेत शिवसेना अध्यक्ष् उद्धव ठाकरे यांनी ‘सरकार बनवण्यासाठी आमचे सगळे मार्ग खुले आहे’असे वक्तव्य केले ते आमच्यासाठी धक्कादायक होतं याशिवाय सत्तेच राहून देखील गेली पाच वर्षे व या दहा दिवसात त्यांनी त्यांच्या मुखपत्रात आमचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर जी टिका केली ती मन दुखावणारी होती, फक्त मुखपत्रातच नव्हे तर जाहीररित्या त्यांनी वक्तव्य केली याची खंत वाटते,आमच्यासाठी युती अद्याप तुटली नसली तरी जोपर्यंत ही खंत दूर होत नाही तोपर्यंत आता शिवसेनेशी चर्चा करणार नसल्याचे विधान काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्राच्या जनतेवर पुन्हा निवडणूका लादने हा जनादेशाचा अनादर असल्याचे ते म्हणाले.

शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील सह्याद्री बंगल्यावर घेतलेल्या पत्र परिषदेत राज्यापालांना राजीनामा सोपवल्यानंतर ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले,की उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य हा धक्काच होता कारण महाराष्ट्राच्या जनतेनी महायुतीला मतदान केले होते. ते असे का बोललेत?असा प्रश्‍न आम्हाला पडला.आम्ही पहील्याच पत्र परिषदेत हे स्पष्ट केले होते राज्यात लवकरच महायुतीचेच सरकार स्थापन होईल. याच पत्र परिषदेत आम्ही शिवसेना व उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले होते.

मी नुकताच माननीय राज्यपालांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवून आलो आहे, त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पुढील सरकार स्थापित होईपर्यंत मी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार बघेल. राज्यपालांनी तसे आदेश दिले आहेत. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात चार वर्षे महाराष्ट्राने दुष्काळ बघितला तर या वर्षी अत्यंत चांगले पीक येऊन देखील अतिवृष्टिमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे,जवळपास ९० टक्के पीकांचे नुकसान झाले आहे.या सर्व परिस्थितीत राज्यातील शेतकर्यांसाठी या अडचणीच्या वेळी तातडीने मदत करण्यासाठी सरकार स्थापन झाले असते तर भरीव मदत करता आली असती तरी देखील जेवढे शक्य होते ते निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. पुढे ही शेतकर्यांसाठी जेवढे शक्य होईल शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करु अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाविषयी बोलणीच झाली नाही-
मी अमित शहा तसेच नितीन गडकरी यांच्याशी याबाबत बोललो असता त्यांनी अशी कोणतीही बोलणी शिवसेनेसोबत झाली नसल्याचे सांगितले. लोकसभेत युतीसाठी बोलणीकरीता अमित शहा हे मातोश्रीवर गेले असता उठता उठता अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री व सत्तेत समान वाटा असल्याचा प्रस्ताव शिवसेनेतर्फे ठेवण्यात आला शहा यांनी मात्र कोणताही शब्द दिला नाही. लोकसभेत युतीसाठी एकदा बोलणी होऊन फिस्कटली होती.पुन्हा बोलणी सुरु झाली तेव्हा शहा हे मातोश्रीवर गेले होते. कोणालाही खोटं ठरविण्यासाठी मी ही भूमिका मांडत नाही. समज-गैरसमज हे आपापसातल्या चर्चेद्वारेच सोडविल्या जात असतात मात्र उद्धव ठाकरे यांनी चर्चेची दारेच बंद करुन ठेवली. चर्चा करणारच नाही,अशी भूमिका घेतली.

माझे फोन घेतलेच नाही-
राजकारण आपल्या ठिकाणी असतं. उद्धव ठाकरे हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत,पुढेही राहतील मात्र माझे ही फोन उद्धव ठाकरे यांनी घेतले नाही.चर्चा करणारच नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. चर्चा आम्ही थांबवली नाही तर चर्चा शिवसेनेने थांबवली. दू:खं याचे नाही त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली नाही,दु:खं याचे आहे त्यांनी चर्चा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केली ती ही अगदी दररोज न चूकता, तीन-तीन वेळा चर्चा होत होती मात्र शिवसेनेने आमच्याशी चर्चा करण्याचे टाळले. याचा अर्थ निकाल लागल्यानंतर अगदी पहील्याच दिवशी शिवसेनेची आमच्याशी चर्चा न करण्याची मानसिकता तयार झाली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार यांनी परवा अगदी स्पष्टपणे पत्र परिषदेत सांगितले की त्यांना जनादेश विरोधी पक्ष्ात बसण्यासाठी मिळाला आहे. भाजप-शिवसेनेने सरकार स्थापित केलं पाहीजे. मात्र जे धोरण शिवसेनेने स्वीकारले ते योग्य धोरण नव्हते.आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न सातत्याने केला होता. पाच वर्षे मी शिवसेनेसोबत काम केले आहे त्यामुळे मी कुठलीही टिका करणार नाही.

शिवसेना अध्यक्षांच्या आजूबाजूच्या लोकांमुळेच दरी वाढली-
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना अध्यक्ष्ांच्या आजूबाजूच्या लोकांची वक्तव्ये बघितल्यास अश्‍या वक्तव्यांनी कधीही सरकार बनत नसते. उलट दरी वाढण्याचे कार्य होते.ज्या भाषेत ते बोललेत त्यापेक्ष्ाही जबरदस्त भाषेत आम्ही देखील प्रतिउत्तर देऊ शकतो मात्र आम्ही नाती जोडणारी माणसे आहोत तोडणारी नाही,अश्‍या शब्दात फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला हाणला. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपने नेहमी श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी नितांत आदर बाळगला. बाळासाहेब हे भाजपसाठी देखील तेवढेच पुजनीय आणि श्रद्धेय आहेत. २०१४ मध्ये युती तुटली तरी देखील निवडणूकीत बाळासाहेबच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील प्रचारात कधीही अपशब्द वापरला नाही.खालच्या पातळीवर टिका केली नाही. मात्र गेल्या ५ वर्षात मुख्य म्हणजे गेल्या दहा दिवसात आमचे पुजनीय नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने ज्या पातळीवर जाऊन टिका होतेय याची खंत वाटते. विरोधकांनी अशी टिका केली तर एक वेळ समजून घेता येतं मात्र युतीत राहून,सत्तेत राहूनही मित्र पक्ष्ाकडूनच अशी टिका होत असेल तर ती मनाला लागतेच. आमच्या शीर्षस्थ नेत्यांविरुद्ध अश्‍या प्रकारची टिका ती आम्हाला मान्य नाही. याविषयावर अनेकदा बोलणे झाले मात्र तेव्हाही आमची टिका ही व्यक्तिविरुद्ध नसून धोरणांवर असते अशी बाजू त्यांनी मांडली. ज्या मोदी यांचे नेतृत्व अख्खया जगाने मान्य केले त्यांच्याच विषयी मित्र पक्ष्ाने केलेली टिका ही मनाला लागते.

काँग्रेसचे आमदार फाेडण्याचा आरोप करणाऱ्यांनी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी-
काही लोकं हे भाजप काँग्रेसचे आमदार फाेडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खोटा आरोप करत आहे. भारतीय जनता पक्ष् असता कोणताही प्रयत्न करत नाही. माझं त्यांना खुलं आव्हान आहे त्यांनी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी.भाजप राज्यात सरकार स्थापन करताना कुठलेही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही,आम्हाला त्याची गरजच पडणार नाही. आम्हाला हा विश्‍वास आहे येत्या काळात महाराष्ट्रात जे सरकार बनेल ते भाजपच्या नेतृत्वातच बनेल. महाराष्ट्रात सरकार स्थापनेत जो विलंब झाला त्याला भाजप जबाबदार नाही हे महाराष्ट्राची जनता बघतच आहे. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांचे देखील आभार मानले.पाच वर्षे सरकारवर अंकूश ठेवण्याचे काम विरोधकांनी केले. चांगल्या कामाल प्रतिसादही दिला.सत्ताधारी व विरोधक हे लोकशाहीची दोन चाकेच असल्याचे ते म्हणाले.मित्र पक्ष्ाचेही त्यांनी आभार मानले.

Latest बातम्या