Advertisements

रोजगार आणि शिक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी काँग्रेसला साथ द्या:राऊत यांचे पदवीधरांना आवाहन
नागपूर : संविधान वाचवायचे असेल, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करायचा असेल आणि बेरोजगार हातांना काम द्यायचे असेल, तर काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या नावापुढे १ हा पसंतीक्रम लिहून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ बजाजनगर येथील एनराइज बाय सयाजी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
डॉ. आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉ. आंबेडकर इंजिनिअरिंग असोसिएशन, फागा-फाटा, डॉ. आंबेडकर टीचर्स असोसिएशन, डॉ. आंबेडकर ॲग्रीकोज असोसिएशन, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. राऊत म्हणाले की, शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असून, शिक्षण क्षेत्रातील अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या प्रश्नांना न्याय देणे आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करणे आवश्यक आहे. पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणारा प्रतिनिधी हा केवळ पदवीधरांचा नव्हे, तर शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायाशी संबंधित प्रश्नांचा प्रभावी आवाज असला पाहिजे. त्यामुळे या निवडणुकीत संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि लोकशाही बळकट करण्यासाठी काँग्रेस-महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या सभेला डॉ. त्रिलोक हजारे, अनिल नगराळे, प्रदीप नगरारे, सतीश यादव, दिलीप खोडके, जयंत जांभुळकर, ॲड. स्मिता टाकसांडे, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. पुरण मेश्राम, तक्षशिला वाघधरे, अर्चना खोब्रागडे, अमन कांबळे, प्रीतम बुलकुंदे, संध्या भड, लांजेवार, सच्चिदानंद दरुंडे, सुरेश पाटील आणि रोशन देवतळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेत अभिजित वंजारी यांच्या प्रचाराला गती देण्यासोबतच पदवीधर मतदारांशी संपर्क वाढविणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
…………………………………….