Advertisements

अनेक देशांच्या स्पर्धकांना मागे टाकत जिंकला‘ Mrs.United Nation 2026‘चा पुरस्कार
‘Mrs. United Nations Earth’चा मानाचा मुकुटही डॉ.श्रुती सवालाखेंच्या नावावर
नागपूर,ता.१६ ऑक्टोबर २०२६: नागपूरातील सुप्रसिद्ध डॉक्टर रवी चरडे यांची कन्या डॉ.श्रुती चरडे-सवालाखे यांनी दिल्लीतील रोहिणी परिसरातील क्राऊन प्लाझा येथे आयोजित अांतरराष्ट्रीय स्पर्धेत नुकताच ‘ Mrs.United Nation 2026‘हा मानाचा किताब पटकावला.यासोबतच त्यांना ‘Mrs. United Nations Earth’या प्रतिष्ठित किताबाने देखील सन्मानित करण्यात आले.महत्वाचे म्हणजे स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी केलेले, तिन्ही दलाच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याचे प्रतिबिंबित्व करणारे परिधान परिक्षकांना विशेष प्रभावित करुन गेले.नेपाळ,उझबेकित्सान इत्यादी सारख्या अनेक देशांतून या स्पर्धेसाठी आलेल्या सुंदर,आकर्षक व देखण्या व्यक्तिमत्वाच्या स्पर्धकातून डॉ.श्रृती यांनी बाजी मारली.
डॉ.श्रुती यांचे पती डॉ.नीरज सवालाखे हे नागपूरातील सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आहेत.श्रृती यांचा मोठा मुलगा जय सवालाखे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू म्हणून ओळखला जातो.डॉ.श्रृती डेंटल सर्जन असून कॉसमेटोलॉजिस्ट देखील आहेत.त्यांनी कॉसमेटोलॉजीमध्ये दोन फेलोशिप पूर्ण केल्या असून हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये एमबीएची पदवीही संपादन केली आहे.सध्या त्या नागपूरातील जय इन्सिटट्यूट आणि भानुकृपा हॉस्पिटलमध्ये संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.व्यवसायिक जबाबदा-यांसोबत स्वत:च्या स्वप्नांना देखील त्यांनी अलगद कवेत घेतले व हे यश संपादन केले.हे यश त्यांच्या आत्मविश्वासाचे,अथक परिश्रमाचे व सातत्याने ध्येयाकडे वाटचाल करणा-या जिद्दीचे प्रतीक बनले.
आज पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की,‘मिसेस इंडिया’स्पर्धेत यश मिळाल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याकडे आपले लक्ष वळवले.वेळेचे अचूक नियोजन करीत वैद्यकीय क्षेत्र,रुग्णालय व्यवस्थापन आणि आपल्या वैयक्तिक आकांक्षा यांचे वेळापत्रक त्यांनी अलगत साधल्या.या मागे पती डॉ.नीरज,सासरकडील तसेच माहेरकडील कुटूंबियांचे मोलाचे प्रोत्साहन मिळाले असल्याचे त्या सांगतात.महिलांनी कुटूंब व व्यवसायिक जबाबदा-या सांभाळत असताना स्वत:चीही स्वप्ने पूर्ण करावीत कारण,निसर्गानेच त्यांना ती अनमोल क्षमता दिली असल्याचे त्या सांगतात.प्रत्येक जबाबदारीला समान वेळ देण्याची क्षमता महिलांमध्ये उपजतच असते.योग्य नियोजन,शिस्त,आत्मविश्वास व कुटूंबियांच्या प्रोत्साहाने महिला या खासगी व सार्वजनिक अश्या दोन्ही क्षेत्रात नेत्रदिपक यश संपादन करताना दिसून पडतात,असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेदरम्यान भारत देशासाठी प्रतिनिधित्व करताना फार मोठे दडपण होते हे त्यांनी मान्य केले.त्यांनी आपल्या सादरीकरणात ‘ऑपरेशन सिंदूर’आणि भारतीय तिरंग्यापासून प्रेरित देशभक्तीपर संकल्पनेला विशेष महत्व दिले.या माध्यमातून त्यांना आपल्या सैन्याचे साहस,देशप्रेम व भारतीय अस्मितेचा संदेश द्यायचा होता.वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायिक म्हणून स्पर्धेत मिळवलेल्या यशासोबतच, माणुसकी,संवेदनशीलता आणि इतरांप्रती करुणा जपणेही तितकेच महत्वाचे असल्याचे त्या मानतात.स्पर्धेदरम्यान नेपाळमधील महिला स्पर्धकाची तब्येत अचानक बिघडली.डॉ.श्रृती यांनी स्पर्धेच्या भावने पलीकडे जाऊन तिची घेतलेली काळजी हे देखील परिक्षकांना प्रभावित करुन गेले.माणुसकी हे कोणत्याही स्पर्धेतील यश-अपयशापेक्षा अधिक मोलाची आहे,असे त्यांचे मत आहे.
त्यांच्यासाठी यश म्हणजे केवळ पुरस्कार आणि सन्मान मिळवणे नव्हे,तर आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग इतरांच्या मदतीसाठी करणे होय.डोक्यावरील मुकुट जरी प्रकाशमान भासतो तरी मनातील माणुसकीचा प्रकाश हेच मानवी जगण्यातील प्रेरणा आहे,असे त्या सांगतात.
महिलांना संदेश देताना त्या सांगतात,लग्नं म्हणजे पायातील पारतंत्र्याची बेडी नव्हे तर स्वत:चं व्यक्तिमत्व फूलण्यासाठीची सुंदर बाग आहे.महिलांनी वय,परिस्थिती किंवा कौटूंबिक जबाबदा-यांना स्वत:च्या क्षमतेची मर्यादा मानू नये.एखादी महिला स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढे येते, तेव्हा ती केवळ स्वत:चे आयुष्य बदलत नाही,तर पुढील पिढीसाठीही प्रेरणादायी ठरते.
पुढे ही त्यांना महिला सक्षमीकरण आणि समाजात महिलांना प्रतिष्ठा प्राप्त करुन देणा-या उपक्रमात सहभागी होऊन महत्वाचे योगदान द्यायचे असल्याचे त्या सांगतात.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………………