भीतीमुळे समुहाने घेतो आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन!
पत्रकार परिषदेत योगी शंकरनाथ जाधव यांचा आरोप
नागपूर,ता.१३ ऑक्टोबर २०२६: जागनाथ बुधवारी येथे १९०९ पासून ऐतिहासिक वारसा लाभलेले महायोगी गोरखनाथ यांचे मंदिर असून,हिंदू धर्म रक्षणकर्ते असल्याचा दावा करणारे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी अमोल ठाकरे यांनी अवैध कब्जा केला असून मंदिराच्या जागेवरील पुरातन तळघर आणि जुने बांधकाम पाडून मंदिराचे मूळ स्वरुपच बदलून टाकले.महायोगी गोरखनाथ,साईबाबा व भगवान दत्तात्रेय यांच्या मूळ मूर्तींची विटंबना करुन त्या मूळ स्थानावरुन हटविण्यात आल्या.नाथजोगी समाजाने याला विरोध केल्यानंतर दुस-या मूर्ती आणून मंदिरातील महंतांच्या समाधीवरच प्रतिष्ठापित करण्यात आल्या.याच मूर्तींचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नागपूरात आले असता हिंदू धर्म रक्षकांनी बडेजाव मिरवित त्यांना दर्शन घडवले मात्र,त्या मूर्तींच्या खाली त्यांच्याच आराध्याची समाधी आहे हे त्यांना कळले असते तर?किमान त्यांना फोन करुन हे अघटित तरी कळवण्याचे आव्हान आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्रीय संपूर्ण नाग जोगी समाज सुधार संस्थेचे सल्लागार योगी शंकरनाथ जाधव यांनी केले.
याप्रसंगी मंचावर गोरखनाथ मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष मनीष पुंड,सचिव पुरुषोत्तम कोकाटे,कोषाध्यक्ष साहिल जाधव आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना जाधव यांनी सांगितले की,नागपूर जिल्ह्यातील शेकडो वर्षांचा धार्मिक वारसा लाभलेली महायोगी गाेरखनाथ यांची तीन पुरातन मंदिरे आज अतिक्रमण,अनास्था आणि वादाच्या विळख्यात अडकली आहेत.यातील रामटेक येथील आदिनाथ गाेरखनाथ मंदिराची देखील अशीच अवस्था असून, लकडगंजच्या दाणागंज चौकातील एनआयटी लीजच्या जागेवरील मंदिरात तर बांबू-बल्ल्यांच्या दूकानांचा विळखा पडला आहे.जागनाथ बुधवारी येथील मंदिरात तर बेकायदेशीर टिनशेड उभारण्यात आले असून,मंदिरात जाण्याचा रस्ताच लोखंडी फाटक बसवून बंद करण्यात आला आहे.
या प्राचीन मंदिरावर विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी अमोल ठाकरे यांनी अवैध कब्जा केल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत जाधव यांनी केला.मंदिराची जमीन हडपण्यासाठी ठाकरे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार केली.या जागेवर मोठे गोडाऊन बनवण्याचा त्यांचा घाट होता.यासाठीच मंदिरातील प्राचीन मूर्त्या अवैधरित्या मौदा येथे नेऊन टाकण्यात आल्या व आमच्या आराध्य दैवतांची विटंबना केली.मंदिराचे मूळ स्वरुप ठाकरे यांनी बदलले.महत्वाचे म्हणजे जागनाथ बुधवारी भागातील नाथ संप्रदायातील भाविकांनाच मंदिरात येण्यापासून मज्जाव करण्यात आला.अमोल ठाकरे यांचा नाथ संप्रदायाशी कोणताही संबंध नसताना आणि नाथ संप्रदायांच्या धार्मिक परंपरेविषयी कोणतीही माहिती नसताना मंदिर व्यवस्थापनावरच त्यांनी ताबा मिळवला, नाथ संप्रदायाच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणली.त्यांच्या या प्रकाराला विरोध करणा-या समाजबांधवांना धमक्या,दमदाटी व गुंडगिरीचा सामना करावा लागत असल्याच आरोप याप्रसंगी त्यांनी केला.
जागनाथ बुधवारी परिसरातील सुमारे २,७०० चौरस फूट जमीन माधवराव हरबाजी वैश्य यांनी १९०९ साली नाथ संप्रदायाचे महंत जानकीनाथ गुरु तीरकनाथ यांना नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे दान केली होती.ही जमीन केवळ गोरखनाथ मंदिरासाठी वापरण्यात यावी आणि तिची खरेदी-विक्री अथवा हस्तांतरण होऊ नये,अशा स्पष्ट अटी बक्षीसपत्रात आहेत.मात्र,कालांतराने धीरजनाथ महंतांच्या माध्यमातून मंदिराच्या जमिनीवर वैयक्तिक मालकी प्रस्थापित करण्यासाठी संशयास्पद कागदपत्रे तयार करण्यात आली.यात अमोल ठाकरे व त्यांच्या सहकां-यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला.
२००२ मध्ये मंदिराच्या जमिनीच्या अभिलेखांमध्ये नाव नोंदविण्यात आले,तर २००६ मध्ये संबंधित जागेवर बांधकाम सुरु करण्यात आले.धार्मिक कार्यासाठी दान करण्यात आलेल्या जमिनीचा व्यवसायिक वापर करुन मूळ दानपत्रातील अटींचे उल्लंघन करण्यात आले.मंदिराच्या जागेवरील पुरातन तळघर आणि जुने बांधकाम पाडून मंदिराचे मूळ स्वरुप बदलण्यात आले.महायोगी गाेरखनाथ,साईबाबा व भगवान दत्तात्रेय यांच्या मूळ मूर्तींची विटंबना करुन त्या मूळ स्थानावरुन हटवण्यात आल्या.नाथजोगी समाजाने विरोध केल्यानंतर दुस-या मूर्ती आणून त्या महंतांच्या समाधींवर प्रतिष्ठापित करण्यात आल्या.नाथ संप्रदायात महंतांच्या समाधीचे स्वतंत्र धार्मिक महत्व असून,अशा प्रकारे मूर्तींची स्थापना करणे नाथ संप्रदायांच्या धार्मिक परंपरेच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.
महत्वाचे म्हणजे या मंदिराचे मूळ पूर्वमुखी होते.हे पूर्वमुखी स्वरुप बदलण्यात आले व मुख्य प्रवेशद्वारावर वाहनतळ उभारण्यासाठी टिनाचे शेड उभारुन मंदिरात जाण्याचा रस्ताच बंद करण्यात आला!सार्वजनिक धार्मिक स्थळ म्हणून मंदिराची ओळख दर्शवणारा फलक ही काढून टाकण्यात आला.ज्या नाथजोगी समाजासाठी जमीन दान करण्यात आली,त्याच समाजाला मंदिरात प्रवेश आणि पारंपरिक पद्धतीने पुजा-अर्चना करण्यास मज्जाव करण्यात आला.आमच्याच मंदिरात आम्ही त्यांच्या भीतीमुळे,समुहाने पूजा करण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अमोल ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ आणि त्यांच्याशी संबंधित अखिल भारतवर्षीय अवधूत भेष बारह पंथ योगी महासभेच्या नावाचाही गैरवापर करुन लोकांची दिशाभूल केली.योगी आदित्यनाथ व त्यांच्या धार्मिक संस्थेशी आपला संबंध असल्याचे भासवून मंदिराच्या व्यवस्थापनावर प्रभाव निर्माण करणे आणि त्या माध्यमातून मंदिराची मौल्यवान जागा हडपणे असा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी जाधव यांनी केला.या संपूर्ण गैरप्रकाराची माहिती योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या संस्थेच्या वरिष्ठ पदाधिका-यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या नावाच्या गैरवापराला आळा घालण्याची मागणी ही त्यांनी केली.
हिंदू धर्म आणि मंदिरांच्या संरक्षणाचा दावा करणा-या विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिका-याकडूनच हिंदू धर्मातील प्राचीन नाथ संप्रदायाच्या मंदिरांची जमीन बळकावणे,मूर्तींची विटंबना करने आणि भाविकांना पूजा-अर्चना करण्यापासून रोखणे,हिच हिंदू धर्माची शिकवण आहे का?असा सवाल त्यांनी केला.अश्या या तथाकथित हिंदू धर्मरक्षकाची विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ पदाधिका-यांनी तातडीने संघटनेतून हकालपट्टी करण्याची मागणी नाथजोगी संघटनेच्या पदाधिका-यांनी याप्रसंगी केली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहनजी भागवत यांनी देखील या प्रकरणात हस्तक्षेप करुन नाथजोगी समाजाला न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.
लकडगंज विमलेश्वर गोरखनाथ मंदिराच्या सुमारे १५ हजार चौ.फूट जागेवरही गंभीर गैरप्रकार झाले.या मंदिराच्या व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या सहका-यांनी योगी महासभा संस्थेच्या नावाचा आधार घेत मंदिराच्या मालमत्तेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.मंदिराच्या मूळ जागेवर ट्रस्टच्या नावाखाली बांधकाम करुन दूकाने उभारण्यात आली.धार्मिक जागेचा वापर सर्रास व्यवसायिक उपयोगासाठी केला जात आहे.मंदिराचे संस्थापक महंत पित्तरनाथजी यांच्या मूर्तीचीही अवहेलना करण्यात आली असून मंदिराच्या मूळ धार्मिक स्वरुपात बदल करुन जमिनीवरची मालकी आणि व्यवस्थापनाचे अधिकार स्वत:कडे ठेवण्याचे प्रकार सुरु आहेत.या मंदिराच्या मालमत्तेची कागदपत्रे,ट्रस्टच्या नोंदी,बांधकामांना दिलेल्या परवानग्या आणि व्यवसायिक वापराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
रामटेक येथील आदिनाथ गोरखनाथ मंदिराच्या सुमारे ५५ एकर जमिनीच्या संरक्षणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.या मंदिराच्या संबंधित शेतीच्या जमिनीचा काही भाग हॉटेल व इतर व्यवसायिक वापरासाठी देण्याचे प्रकार घडले.मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्या ऐवजी काही ठिकाणी व्यवसायिक बांधकामांना प्राधान्य देण्यात आले.मंदिराचा मूळ विकास आराखडा बाजूला ठेवून ,धार्मिक स्थळाच्या जागेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप त्यांनी केला.रामटेक येथील मंदिराच्या मूळ जमिनीचे अभिलेख.प्रत्यक्ष ताबा,सीमांकन,अतिक्रमणे,व्यवस्थापन आणि रखडलेल्या विकासकामांची चौकशी करुन नाथ संप्रदायाच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठीच या मंदिरांचे संरक्षण करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या जवळपास वीस वर्षांपासून नाथजोगी समाज मंदिरांच्या संरक्षणासाठी संघर्ष करीत आहे.येत्या २२ ऑक्टोबर रोजी गोरखनाथ प्रकट दिवस आहे,शासनाने तातडीने याची दखल न घेतल्यास नाथजोगी समाजाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारावे लागेल,असा इशारा त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत जागनाथ बुधवारी भागातील नाथजोगी का नाहीत?असा सवाल केला असता आता त्या भागात फार कमी नाथजोगी वास्तव्यास असल्याचे उत्तर जाधव यांनी दिले.
विश्व हिंदू परिषदेचे अमोल ठाकरे यांनी नुकतेच राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यावर काही गंभीर आरोप पत्रकार परिषद घेऊन केले होते,त्यामुळे तुमच्या माध्यमातून प्यारे खान अमोल ठाकरेंवर शरसंधान साधत आहेत का?असा प्रश्न केला असता,प्यारे खान यांचा या वादाशी काही एक संबंध नसल्याचे जाधव यांनी सांगितले.हा वाद फार जुना असून आम्ही आमच्या न्यायासाठी फार पूर्वी पासून धर्मादाय आयुक्तांकडे लढा देत आहोत मात्र,दोन दशके उलटली तरी आम्हाला न्याय मिळाला नाही,ना कोणतीही सुनावणी झाली. अमोल ठाकरे आम्हाला चक्क धमकी देतात,तुम्ही काय बिघडवू शकता? मी पोलिस विभागात कार्यरत होतो त्यामुळे मी आक्रमकपणे आतापर्यंत आमची मंदिरे वाचवण्यासाठी कायदेशीर लढा दिला,आता मी निवृत्त झालो आहे व आता नाथजोगी समाज आक्रमकपणे सामुहिकरित्या न्याय मिळवण्यासाठी व लढा देण्यासाठी सज्ज झाला असल्याचे सांगत, यासाठीच ही पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाथजोगी समाज हा त्यागी आहे.आम्ही इतका त्याग केला की आता आमच्यावर अन्याय होऊ लागला आहे,अशी पुश्ती त्यांनी जोडली.हिवाळी अधिवेशनात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले मात्र त्याचा पाठपुरावा केला नाही,अशी कबुलीही त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत दयालनाथ नानवटकर,सारंग सारखे,स्वप्नील शिंदे,अजय तिहिले,प्रशांत चतुर्भूज,गोपालनाथ राऊत,सौरभ खुजनारे,वैद्य सुरेश इंगळे,ईशांत वताखरे,भरत विजयकर,आंनदराव जाधव,महेंद्र राऊत,दिनेश नानवटकर,विजय पुंडेकर,मंजुषा जाेगी,शालिनी जाधव आदि उपस्थित होते.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)