Homeराजकारणनागपुरातून संघावर हल्लाबोल; सामाजिक न्यायाच्या भूमीतून संविधानाचा लढा तीव्र करण्याचे आवाहन

नागपुरातून संघावर हल्लाबोल; सामाजिक न्यायाच्या भूमीतून संविधानाचा लढा तीव्र करण्याचे आवाहन

Advertisements
संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसला बळ द्या : सिरिवेल्ला प्रसाद
अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन

नागपूर : नागपूरच्या भूमीतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्याय दिला आहे. मात्र, आज संविधान आणि लोकशाहीसमोर आव्हाने उभी केली जात आहेत. स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतेही योगदान नव्हते. त्यामुळे संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना पराभूत करा, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरिवेल्ला प्रसाद यांनी केला. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित गोविंदराव वंजारी यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दत्तात्रय नगर येथील महाकालकर सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सिरिवेल्ला प्रसाद बोलत होते. या वेळी माजी मंत्री सुनील केदार, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार विकास ठाकरे,  आमदार संजय मेश्राम, उमेदवार अभिजित वंजारी, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे, मनपातील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, नागपूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण आश्विन बैस, प्रवक्ते अतुल लोंढे,  प्रदेश काँग्रेसचे महासचिव गिरीश पांडव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, नाना गावंडे, ज्येष्ठ नेते गेव्ह आवारी, अशोक धवड, कुंदा राऊत, किशोर कन्हेरे,  याज्ञवल्क्य जिचकार, अँड. आसिफ कुरेशी, अवंतिका लेकुरवाळे, योगिता इटनकर आदी मंचावर उपस्थित होते.
सिरिवेल्ला प्रसाद पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हा देशाचा आत्मा असून त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. संविधानामुळे वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळाला. मात्र, संविधानाने दिलेले अधिकार आणि लोकशाही मूल्ये कमकुवत करण्याचे प्रयत्न होत असतील, तर त्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. सामाजिक न्यायाची परंपरा असलेल्या नागपूरच्या भूमीतून संविधानाच्या संरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे. पदवीधर मतदारसंघ हा सुशिक्षित वर्गाच्या प्रश्नांना न्याय देणारा महत्त्वाचा मंच आहे. या निवडणुकीत अभिजित वंजारी यांना विजयी करून संविधानवादी विचारांना बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सज्ज व्हा : नाना पटोले
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. देशातील लोकशाही व्यवस्था आणि संविधानाने दिलेले अधिकार टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे. पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही केवळ एका उमेदवाराची निवड नसून सुशिक्षित मतदारांचे प्रश्न आणि त्यांचे प्रतिनिधित्व यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने मतदारांपर्यंत पोहोचून अभिजित वंजारी यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
वंजारी यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करा : सुनील केदार
माजी मंत्री सुनील केदार यांनी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी अभिजित वंजारी यांच्यासारखा अनुभवी लोकप्रतिनिधी आवश्यक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या भागातील पदवीधर मतदारांशी संपर्क साधून काँग्रेस व महाविकास आघाडीची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. संघटित प्रयत्नांतून वंजारी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिजित वंजारी
काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी पदवीधरांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडण्याचा निर्धार व्यक्त केला. सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, बेरोजगारीचा प्रश्न सोडविणे तसेच शिक्षक, कर्मचारी आणि पदवीधरांच्या विविध समस्यांचा पाठपुरावा करणे यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधर मतदारांनी दिलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी नमूद केले. या निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून विजय मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार विकास ठाकरे यांच्यासह उपस्थित सर्व नेत्यांनी मार्गदर्शन केले. संचलन नागपूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष ग्रामीण आश्विन बैस यांनी मानले.  मेळाव्याला काँग्रेसचे विविध सेल व आघाड्यांचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे समर्थक उपस्थित होते. या मेळाव्याच्या माध्यमातून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने संघटनात्मक ताकद दाखवून देत प्रचाराला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
……………………………………………………..

Latest बातम्या