Homeराजकारणकोहळेंचा जाहीरनामा की दटकेंचा पीएच.डी चा शोधप्रबंध!

कोहळेंचा जाहीरनामा की दटकेंचा पीएच.डी चा शोधप्रबंध!

Advertisements
आठ पानी जाहीरनाम्यात अफलातून आश्‍वासने:महत्वाचे मुद्दे गायब
दर्शनी पानावर एआयनिर्मित छायाचित्र देखील बनली उपहासाची बाब

नागपूर,ता.१९ ऑक्टोबर २०२६: कोणत्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा म्हणजे निवडणूकी पूर्वी उमेदवाराने मतदारांसमोर मांडलेला लिखित कार्यक्रम,धोरणे आणि वचनांचा जाहीर दस्तावेज असतो.विजयी झाल्यावर पुढील काही वर्षात कोणती कामे करणार,याचे एक अधिकृत प्रतिज्ञापत्र म्हणजे ‘जाहीरनामा’आहे.आज नागपूरात भारतीय जनता पक्षाचे घोषित उमेदवार सुधाकर कोहळे यांचा जाहीरनामा रामदास पेठेतील एका तारांकित हॉटेलमध्ये राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जाहीर झाला.मात्र,मतदानाच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या या आठ पानी जाहीरनाम्यात शिक्षक,प्राध्यापक,विविध शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक संस्थांमधील पदवीधरांना ज्या प्रकारे अफलातून आश्‍वासाने देण्यात आली ते पहाता,निवडणूक प्रमुख भाजप आमदार प्रवीण दटके यांच्या ‘कल्पक’ पुढाकारातून साकारलेला हा निवडणूकीचा ‘जाहीरनामा‘आहे की दटके यांचा पीएच.डी चा शोधप्रबंध?अशी चर्चा रंगली.निवडणूक प्रमुख म्हणून दटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोहळेंचा जाहीरनामा तयार झाला आहे.

(छायाचित्र : शिक्षक मतदारांसाठी देण्यात आलेली पानभर आश्‍वासने!)

काँग्रेसचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांनी निवडणूक घोषित होताच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.त्यात त्यांनी ‘मिशन जॉब्स’ व ’मिशन एक्झाम’चा उल्लेख केला.JOBS याचा अर्थ J for justice,O for Oppoortunities,B for Business, S for Skills असे सांगून Mission E.X.A.M अंतर्गत Exam Reforms म्हणजे परिक्षा पद्धतीत सुधारणा,A म्हणजे Anti-Leak Safeguards  पेपर फुटीविरुद्ध कडक संरक्षण तसेच M म्हणजे Mentorship $ Guidance मार्गदर्शन व पाठबळ असा उल्लेख ठलकपणे केला,पदवीधरांसाठी,जेन-झी च्या न्याय हक्कांसाठी आणि त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी नेमके काय काम करणार हे त्यांनी त्यांच्या सुटसुटीत जाहीरनाम्यात प्रसिद्ध केले.आपल्या चार पानी जाहीरनाम्यात वंजारी यांनी पदवीधरांचा आमदार म्हणून ६ वर्षांत केलेली कामे अगदी एका पानावर सांगितली तर एका पानावर आगामी ६ वर्षात काय करणार हा संकल्प मतदारां पुढे मांडला.एका पानावर मतदारांसाठी निवेदन आहे तर अखेरच्या पानावर मतदारांना आवाहन केले आहे.याचा अर्थ आतील अवघ्या दोनच पानात त्यांनी आपले व्हिजन मतदारांसमोर यशस्वीरित्या ठेवले.

केवळ वंजारीच नव्हे तर भाजपमध्ये बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरणारे प्रा.अनिल सोले यांनी अवघ्या तीन पानांमध्ये पदवीधरांचा आमदार असताना काय केले व भविष्यात  पदवीधरांसाठी काय करणार असे फक्त १० ठोस मुद्दे आपल्या जाहीरनाम्यात मांडले होते.वंजारी असो किंवा सोले यांचे जाहीरनामे अगदी सुस्पष्ट,सुटसुटीत व प्रभावी आहेत मात्र,भाजपचे घोषित उमेदवार यांचा आज प्रसिद्ध झालेला जाहीरनामा फक्त ‘प्रयत्न करणार’या ‘चुनावी जुमल्यांवर’ आधारलेला दिसून पडतो.

महत्वाचे म्हणजे यात मराठी माध्यमांच्या शाळा वाचवण्यासाठी स्वतंत्र नवीन धोरण करण्यासाठी प्रयत्न करणार,असे एक ‘सुभाषित वचन’ कोहळेंच्या आज प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात आहे जी वास्तवतेशी फार क्रूर अशी थट्टा आहे.ते स्वत: मराठी शाळेतील शिक्षक होते,मात्र,मुख्यमंत्र्यांच्याच नागपूर शहरात गेल्या दहा ते बारा वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या सुमारे ४५ ते ५७ शाळा बंद झाल्या असल्याचे दाहक वास्तव माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे.याशिवाय शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्यासाठी सरकारला आग्रह करणार असे एक अभिवचन ते पदवीधर मतदारांना देतात,याहून दुसरा मोठा विनोद जगात नसावा.केवळ शिक्षकांना घेऊन अगदी पानभर अशी २४ वचने कोहळेंच्या जाहीरनाम्यात आहेत तर पदवीधरांना घेऊन चक्क दोन पानांवर भरीव व भरभराटपूर्ण माहिती छापण्यात आली आहे.यात गुणवत्तापूर्ण व कौशल्य विकास,रोजगार,करिअर आणि उद्योगाच्या संधी,नवोन्मेष,तंत्रज्ञान आणि डिजिटल सक्षमता,महिला पदवीधरांसाठी विशेष उपक्रम,संपूर्ण विदर्भातील पदवीधरांना न्याय,पदवीधरांचा सशक्त संवाद व सहभाग,पारदर्शक,जनाभिमुख आणि उत्तरदायी व्यवस्था यासह पहिले ३० दिवस संवाद आणि सर्वेक्षण यासारखे ‘हवेतील’मुद्दे यांनी कोहळे यांचा जाहीरनामा सजवण्यात आला आहे.

(छायाचित्र : सोले यांच्या दोन पानी जाहीरनाम्यात पदवीधरांचे संपूर्ण मुद्दे अश्‍यारितीने समाविष्ट झाले होते)

कोहळे हे २०१४ ते २०१९ दरम्यान भाजपचे दक्षिण नागपूरचे आमदार असताना गरजू विद्यार्थ्यांचा एक गट त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या उदयनगर येथील घरातील कार्यालयात गेला होता.मुंबईत परिक्षेसाठी जाणा-या या गटाला आमदारांचे फक्त एक पत्र हवे होते. मुंबईतील आमदार निवासात तात्पुरत्या सोयीसाठी मात्र,सशक्त संवाद,पारदर्शक व जनाभिमुख कारभाराचे वचन देणारे कोहळे यांनी विद्यार्थ्यांना पत्र देण्यास नकार दिला,अशी माहिती समोर आली आहे.आमदार असताना कोहळे हे जनसामान्यांसाठी दूर्लभ झाले होते व फक्त आपल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात फिरत होते,असा देखील आरोप त्यांच्यावर झाला होता.
कोहळे हे पदवीधरांचे उमेदवार नसून सत्ताधारी बलाढ्य‘भाजपाचे’ उमेदवार असल्याने त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.२०२० मध्ये संदीप जोशी यांचे नाव वेळेवर घोषित केले असतानाही भाजपच्या परंपरागत पदवीधर मतदारांनी जोशी यांच्या पारड्यात तब्बल ४२ हजार मतांचे दान टाकले होते.मात्र,त्यावेळी ‘ब्राम्हण विरुद्ध ओबीसी’असा जातीयवादाचा मुलामा, पदवीधर निवडणूकीला विरोधकांकडून चढवण्यात आल्यामुळे ५२ वर्षांनंतर भाजपकडून ही जागा हिसकावून घेण्यात काँग्रेस व महाविकासआघाडी यशस्वी झाली होती.
यंदा वंजारी यांचा आत्मविश्‍वास हरवल्यासारखा भासतो.२०२० मध्ये राज्यात महाविकासआघाडीची सत्ता होती.त्यावेळी भाजपच्या मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याची खूप ओरड झाली होती.पहील्या पसंदीच्या क्रमांकाची तब्बल ११ हजार मते त्या निवडणूकीत बाद ठरवण्यात आली होती जी भाजपची होती,असा दावा भाजपचे नेते करतात.यंदा राज्यात भाजपची सत्ता आहे व काँग्रेसमधील सुनील केदार,राजेंद्र मुळक,विकास ठाकरे,उमरेडचे काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम,वर्धाचे काँग्रेसचे खासदार अमर काळे,भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह आघाडीतील शरद पवार गटातील अनिल देशमुख व सलील देशमुख यांचीच नावे मतदार यादीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
त्यात वर्ध्याचे क-हाळे मास्तरांनी भाजपच्या कोहळे यांना जिंकवण्याचा ‘ध्यास‘घेतला असल्याची टिका होत आहे.सहा ही जिल्ह्यातून महाविकासआघाडीतील बंडखोर मास्तर जितकी मते ओढतील तितका काँग्रेसच्या उमेदवाराचा धोका वाढत जाणार आहे.तर कोहळे यांच्या विजयासाठी स्वत:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळेंनी कंबर कसली असून ही जागा काँग्रेसच्या तावडीतून पुन्हा भाजपाकडे ओढून आणण्यासाठी सभा आणि बैठकांचा त्यांचा जोर सुरुच आहे.
थोडक्यात,कोहळे यांचा आज प्रसिद्ध झालेला ‘जाहीरनामा’ही फक्त निवडणूकीची ‘औपचारिकता’होती हे सिद्ध झाले.या जाहीरनाम्यात काँग्रेसचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात काय केले?किती अभिवचने पूर्ण केली?पदवीधरांची किती व कशी फसवणूक केली हे मुद्दांच्या आधारे खोडून काढण्याची सुवर्ण संधी भाजपने गमावली.२०२६ मध्ये वंजारी यांनी  प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात काय त्रुटी आहेत?कोणती खोटी आश्‍वासने आहेत याचा देखील उल्लेख कोहळेंच्या जाहीरनाम्यात नाही.त्यामुळेच पाने भरुन असलेल्या या जाहीरनाम्यातील शब्दे एखाद्या शाेध प्रबंधाचा भाग वाटतो.कोहळे यांचा जाहीरनामा भाजपसाठी व पर्यायाने निवडणूक प्रमुख प्रवीण दटकेंसाठी केवळ ‘खानापूर्ती’ठरली असून त्यात मतदारांविषयी कोणतेही गांर्भीय दिसून पडले नाही.
कोहळे यांचा वावर मात्र आज ‘विजयी’ आमदारांच्या थाटातलाच होता,यात शंका नाही.सोले यांच्या माघारीनंतर काेहळे हे अगदी निश्‍चिंत झाले असून आतात ‘पदवीधरांचे आमदार’झाले असल्याच्या अति आत्मविश्‍वासात ते वावरताना दिसून पडले.जिथे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच ही निवडणूक त्यांच्या प्रतिष्ठेची केली व नेते,आमदार,कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला तिथेच कोहळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे,हेच खरे.
……………………………………………………………………..

Latest बातम्या