Advertisements

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा प्रहार
मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष व मंत्र्यांना करावे निलंबित: लोंढे यांची मागणी
नागपूर,ता.१७ ऑक्टोबर २०२६: मुंबईच्या कल्याण-डोंबिवलीत ‘नमो रमो रमजत‘गरबा’चे भव्य- दिव्य आयोजन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,मंत्री आशिष शेलार,आमदार अतुल भातकळकर,आ.संजय उपाध्याय,माजी खासदार विनोद शेट्टी व इतर मोठ्या नेत्यांनी केले असून, या रास गरबावर दररोज किमान दीड कोटींचा खर्च होत असून एकीकडे राज्यातील शेतकरी हा दुष्काळात होरपळत असताना सत्ताधारी भाजपचे नेते हे गरबासारख्या आयोजनावर शंभर कोटींचा खर्च करीत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
भाजपच्या या अश्या धार्मिक कृत्यामुळे आपण उपासना करीत असलेली देवीच नाराज असेल.एकीकडे राज्यात जनावरांना चारा नाही,पाणी नाही,उभी पिके करपली,यावर मुख्यमंत्र्यांनी फक्त पाच हजार रुपयांची मदत जाहीर करुन शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली.नवरात्रीत देवीची आराधाना ही अंर्तमनातून करावी लागते मात्र,प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हान ज्या भव्य दिव्य व नेत्रदिपक पॅण्डॉलमध्ये गरबा नृत्य व जेवणावळीवर खर्च करीत आहे त्याचा खर्चच दीड ते दोन कोटी रोजचा असल्याचा आरोप लोंढे यांनी केला.यालाच ‘मृताच्या टाळूवरचे लोणी खाणे‘म्हणतात आणि भाजप राज्यात सध्या हेच करीत असल्याची टिका त्यांनी केली.
३० कोटी रुपये तर गरबा नृत्यावर खर्च होत असून भाजपकडे पैशांचा महापूर वाहत आहे.विद्युत कमानी,एलईडी स्क्रीन्स,गुजरातमधील सुप्रसिद्ध गायक ज्यांचे मानधन दोन कोटी रुपये एका शो चे आहे,त्यांना आमंत्रित केले जात असून इतर गुजराती गायकांवर पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च केले जात आहेत.भाजपची भक्ती म्हणजे पैशांची भक्ती असल्याचा आरोप त्यांनी केला.इतकंच नव्हे तर दहा दिवसांचा गरबा २० ऑक्टोबर रोजी दस-याच्या दिवशी आटोपल्यानंतर २५-२६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी आहे,कोजागिरी देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री व नेतेगण भव्यदिव्य सोहळ्यातून साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जवळपास बारा दिवसात ३ लाखांपेक्षा अधिक लोकं भाजपच्या नमो-रमो रास गरब्यात सहभागी होत आहेत.यासाठी ७ हजार फूटांचा भव्य मंच साकारण्यात आला आहे.२० हजार फूटांचा आऊटडोर प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे.मंडपामध्ये दोन हजार टनचे वातानुकुलीन यंत्रे बसवले असून याचा दररोजचा खर्च ६० लाख रुपये आहेत.ध्वनिक्षेपक व प्रकाश योजनेवर दररोज पंचवीस लाखांचा खर्च होत आहे.मंडपामध्ये पंचवीस जनरेटर्स असून त्याचे भाडे साडे सहा लाख रुपये रोज आहेत.सिम्फनी बॅण्ड आहे.दररोजच्या फूलांच्या आरासवर तीन ते पाच लाख रुपये खर्च होत आहे.
अश्या प्रकारचे गरबाचे आयोजन करुन शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम भाजप करीत असल्याचा अारोप अतुल लोंढे यांनी केला.कांदिवलीमध्ये अतुल भातकळकर तर अशिष शेलार सांताक्रूजमध्ये गरबाच्या आयोजनात दंग आहेत.भाजपवर देवी माता प्रसन्न होईल का?असा सवाल त्यांनी केला.सोयाबिन,तुर,कापूस शेतकरी उधवस्त आहे.दूसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष,मंत्री आशिष शेलार,भातकळकर आदी हे गरबामध्ये दंग आहेत.मुख्यमंत्री भाजप प्रदेशाध्यक्ष व इतर मंत्र्यांना अश्या या उधळपट्टीसाठी जाब विचारणार आहेत का?त्यांची पदावरुन हकालपट्टी करणार आहेत का?असा सवाल त्यांनी केला.
आज देवेंद्र फडणवीस,बावणकुळे,आशिष शेलार यांना शेतक-यांच्या बांद्यावर असायला हवे ते विधान परिषदेच्या लहानश्या निवडणूकीत व्यस्त दिसतात. शेतकरी मेला तरी चालेल पण त्यांना निवडणूक महत्वाची असल्याचा आरोप त्यांनी केला.
देवाभाऊ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर नतमस्तक होतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतक-यांच्या पिकांच्या प्रत्येक देठाचेही संरक्षण करण्याचे धोरण राबविले होते,दुसरीकडे महाराजांसमोर नतमस्तक होणारेच शेतक-यांची थट्टा चालवित असल्याची टिका त्यांनी केली.पूजा अर्चना सगळेच करतात मात्र,शेतक-यांची थट्टा चालविणा-या भाजप नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
सीजेपीचे संस्थापक दिपके यांच्या अटकेविषयी छेडले असता,भाजप घाबरलेली असल्याचे ते म्हणाले.२०१९ मध्ये फडणवीसांनी ‘महाजनादेश’यात्रा काढली होती त्यावेळी मी दहा प्रश्ने त्यांना विचारणार होतो मात्र,जोपर्यंत त्यांची महाजनादेश यात्रा समाप्त होत नाही,मला घरातच नजरकैद करुन ठेवण्यात आले असल्याचे लोंढे यांनी सांगितले.ते आता ब्रिटीश झाले आहेत आणि आपण गुलाम.या देशात आता तिरंगा फडकवणे हा देखील गुन्हा झाला आहे.संघाने तर त्यांच्या ऑर्गनायझर मासिकेत भारत या देशासाठी तिरंगा स्वीकृत झाल्यावर नाराजी व्यक्त केली होती.संघाच्या मुख्यालयात ५२ वर्षे तिरंगा फडकलाच नाही,अशी टिका त्यांनी केली.
भ्रष्टाचारात संघ बरोबरीचा सहभागी!
काल राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमीच्या सोहळ्यात समितीच्या प्रमुख संचालिका शांतक्का यांनी महिलांवर सतत अन्याय होत असल्याचे चित्र सतत रंगवून त्यांना भडकवण्याचे प्रकार घडत असल्याचे विधान केले.महिलांनी कर्तव्याचा विसर पाडून केवळ अधिकारांसाठी लढत राहावे,अशी संकुचित मानसिकता काही घटकांकडून रुजवली जात आहे.देशात काही प्रमाणावर महिलांवर अत्याचार होत असल्याचे वास्तव असले ,तरी या मुद्याचा अतिरेक करुन संपूर्ण समाजाला भडकवणे योग्य नसून या समस्येवर सकारात्मक उपाय शोधण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.शांतक्का असो किंवा सरसंघचालक माेहन भागवत हे कधीही देशात केंद्रीय व राज्यस्तरावर बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर बोलत नाही,याकडे लोंढे यांचे लक्ष वेधले असता,भ्रष्टाचारात ते बरोबरीचे सहभागी असल्याची जहाल टिका लोंढे यांनी केली.मूळात आरएसएस नावाखी संघटना ही कुठेही नोंदणीकृत नाहीच आहे,मात्र तिचे मोठमोठे कार्यालय अगदी तालुकास्तरावर देखील आहेत.मूळात कुलदिप सेंगरपासून दुष्यंतपर्यंत भाजपने महिलांवरील अत्याचाराच्या आरोपींनाच फक्त पाठीशी घातले नाही तर त्यांना मोठमोठ्या,महत्वाच्या पदांवर बसवले,अंकिता भंडारी प्रकरण हे त्याचे आताचे उदाहरण आहे.मुलींचे संरक्षण करने हे सरकारचे काम आहे.शांताक्का स्वत: एक महिला आहेत त्यांनी मुलींच्या संरक्षणाविषयीचा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवा,असे लोंढे म्हणाले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)