Advertisements

(पदवीधर निवडणूक-२०२६)
महाज्योती, सारथी, बार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मदत
चंद्रपूर : पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शैक्षणिक संस्थांचे सक्षमीकरण करणे आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधनासाठी आवश्यक सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने गेल्या सहा वर्षांत विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित गोविंदराव वंजारी यांनी दिली.
चंद्रपूर शहरात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामांची माहिती देताना या उपक्रमांचा आढावा मांडला.
रोजगार, शिक्षण आणि संशोधनाला प्राधान्य–
विधान परिषदेतील आपल्या कार्यकाळात पदवीधरांच्या रोजगाराचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून विविध प्रयत्न केल्याचे वंजारी यांनी सांगितले. गोंदिया, भंडारा यांसह नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये दरवर्षी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि नोकरी देणाऱ्या संस्था व रोजगाराच्या शोधात असलेले तरुण यांच्यात समन्वय साधणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रंथालयांचे डिजिटल सक्षमीकरण-
विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधनसुविधा उपलब्ध व्हाव्यात, स्पर्धा परीक्षांची तयारी सुलभ व्हावी आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी ग्रंथालये तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये डिजिटल साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सार्वजनिक ग्रंथालये आणि शैक्षणिक संस्थांचे डिजिटल सक्षमीकरण हा या कामातील महत्त्वाचा भाग असल्याचे वंजारी यांनी सांगितले.
संशोधनासाठी आर्थिक मदत आणि शैक्षणिक सुविधा-
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महाज्योती, सारथी आणि बार्टी या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. संशोधनासाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. संशोधक विद्यार्थ्यांना आवश्यक मदत मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांचे संशोधन थांबू नये, यासाठी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक उपकरणे मिळवून देणे आणि शिक्षणाच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करणे, या बाबींनाही प्राधान्य देण्यात आल्याचे वंजारी यांनी सांगितले.
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा-
रोजगार, शिक्षण, ग्रंथालयांचे आधुनिकीकरण, संशोधनासाठी आर्थिक सहाय्य आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा या विषयांवर केलेल्या कामांची माहिती अभिजित वंजारी यांनी यावेळी दिली. पदवीधर मतदारसंघातील नागरिक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी प्रचारसभेत मांडली.
…………………………………………………….