नागपूर, दि. २२ जून २०२६: विधानसभेच्या स्थानिक मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची मतमोजणी आज सोमवार दिनांक २२ जून २०२६ रोजी पार पडली.१८ जून रोजी मतदान झाले होते मात्र,भाजपचे विजयी उमेदवार डॉ.राजीव पोतदार यांना ६८२ ममे मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना १३० मते मिळाली.याचा अर्थ महाविकासआघाडीची जवळपास ९९ मते फूटल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात आला.एकूण ८१२ मते वैध ठरली तर ११ मते अवैध ठरली. भाजपाचे राजीव पोतदार ५५२ मतांनी विजयी झाले.
विरोधी पक्षातील जी अंदाजे ९९ मते फूटली याविषयी माध्यमांसोबत बोलताना डॉ.पोतदार म्हणाले की,महायुती म्हणून आमच्या जवळ ५८२ मते होती मात्र,भाजपला ६८२ मते मिळाली आहे म्हणजे १०० मत अधिकची मला मिळाली असून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा या निवडणूकीत अतिशय दारुण पराभव झाला असल्याचे विजयी उमेदवार राजीव पोतदार म्हणाले.
काँग्रेस जवळ स्वत:ची १७० मते होती व महाविकास आघाडी म्हणून २०० मते होती तरी देखील ते १३० वर आले.याचा अर्थ महाविकास आघाडीची ७० व काँग्रेसची ४० मत ही फूटली असल्याचे सिद्ध झाले.यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पोतदार म्हणाले.
या निवडणूकीची संपूर्ण धुरा पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती व त्यांच्या अतिशय सूक्ष्म व चांगल्या नियोजनाचे फळ पुन्हा एकदा मिळाले.ते पूर्णपणे माझ्या पाठीशी उभे होते.नगर पालिकांमधील एकेका नगरसेवकाचे मत माझ्या पारड्यात पडले.या शिवाय आमचे निवडणूक प्रभारी प्रवीण दटके यांच्यासह संपूर्ण पदाधिका-यांनी या निवडणूकीत सुनियोजितपणे परिश्रम घेऊन हे यश संपादन केले आहे.हा केवळ डॉ.राजीव पोतदार यांचा विजय नसून महायुतीचा विजय असल्याचे ते म्हणाले.याशिवाय राज्यमंत्री ॲड.आशिष जयसवाल,शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या सर्व पदाधिका-यांचा देखील मोलाचा सहयोग लाभला असल्याचे पोतदार यांनी सांगितले.आपल्या या यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सर्व आमदारांना त्यांनी दिले.
जे विरोधक आरोप करायचे की भाजपची ताकद फक्त नागपूरपुरती असून जिल्ह्यात नाही,त्यांना देखील उत्तर मिळाले असल्याचा टोला डॉ.पोतदार यांनी हाणला.जिल्ह्यांमध्ये भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे.एकूण २९ पैकी २४ नगरपालिका व नगर परिषदेत महायुतीचे नगराध्यक्ष आहेत.मोठी संख्या नगरसेवकांची महायुतीकडे आहे.एक जबरदस्त ताकत ग्रामीणमध्ये महायुतीची आणि भाजपची निर्माण झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावरच फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.आज १७ पैकी १६ जागांवर विक्रमी मताधिक्याने महायुतीचे सर्व आमदार निवडून आले आहेत.हा सपकाळ यांचाही दारुण पराभव असल्याचा टोला त्यांनी हाणला.
आमदार म्हणून नागपूर महानगरपलिका,जिल्हा परिषद,नगर पंचायत,नगर परिषदांमधील प्रश्ने पोटतिडकीने आता सभागृहात मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी आपल्या विजयानंतर माध्यमांशी बोलताना दिले.मंत्रालये,सचिवालयासह सर्व ठिकाणी जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आता ट्वेंटी-ट्वेंटीची मॅच संपली असल्याची कोपरखळी देखील त्यांनी मांडली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात सकाळी आठ वाजता निवडणूक निरिक्षक संजय यादव आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या निरीक्षणाखाली मतमोजणीला सुरुवात झाली.
मतमोजणीसाठी एकूण चार टेबल ठेवण्यात आले. अतुल लोंढे यांना एकूण १३० मते मिळाली. भाजपाचे डॉ. राजीव पोतदार यांना ६८२ मते मिळाली.
दि. १८ जून रोजी झालेल्या मतदानात १४ मतदान केंद्रांवर ८३६ पैकी ८२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपूर शहर ११ व उमरेड, कामठी प्रती एक अशा १३ सदस्यांनी मतदान केले नव्हते. या निवडणुकीत एकूण सुमारे ९८.४४ टक्के मतदान झाले होते.
उद्या मंगळवार दिनांक २३ जून रोजी सायंकाळी ५ वा.काँग्रेसचे शहराध्यक्ष व राष्ट्रीय सरचिटणीस प्रफूल्ल गुडधे पाटील पत्रकार परिषद घेणार असून मतांच्या फूटीबाबत ते काय भूमिका जाहीर करतात,याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनरवर उपलब्ध)
…………………….