‘पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा’व्हिडीयो क्लिपची घेतली धास्ती
नागपूर,ता.१६ डिसेंबर २०२३: भारतीय जनता पक्षाची प्रदेश पदाधिका-यांची बैठक आज कोराडी येथील नैवद्यममध्ये आयोजित करण्यात आली होती.या बैठकीचे वैशिष्ठ ठरले ते म्हणजे सर्वदूर महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोबाईल फोन हे सभागृहाच्या बाहरेच ‘जप्त’करण्यात आले.बाकायदा ,यासाठी मोठा टेबल लावण्यात आला.त्यावर नागपूर, पूर्व विदर्भ,कोकण,मराठवाडा इत्यादीचे लेबल लावलेले काचेचे बॉक्स ठेवण्यात आले व सभागृहात आत जाण्यापूर्वी प्रत्येक पदाधिका-याकडून मोबाईल घेऊन संबंधित बॉक्समध्ये चिठ्ठी चिपकून ठेवण्याची नवीनच प्रथा बघून,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी त्यांच्या ‘पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा’या वक्तव्याची व्हायरल झालेल्या व्हिडीयो क्लिपची चांगलीच धास्ती घेतलेली जाणवते.परिणामी,बावणकुळे सुधरले…कार्यकर्त्यांचे मोबाईल सभागृहा बाहेरच ठेवले’म्हणायची वेळ भाजपच्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर आज आली.
पत्रकारांनी २०२४ च्या निवडणूकीपर्यंत आपल्या विरोधात एक ही नकारात्मक बातमी छापू नये,यासाठी स्थानिक स्तरावरील पत्रकार,मग ते प्रिंटचे असो,इलेक्ट्रोनिक वाहीन्यांचे असो किवा टिल्लू पंप सारख्या पोर्टलचे पत्रकार असो,त्यांची एक यादी तयार करा आणि त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला किवा ढाब्यावर जेवायला घेऊन जा,असे वादग्रस्त विधान त्यांनी २४ सप्टेंबर रोज अहमदनगर येथील सावेडी येथील माऊली सभागृहात ‘महाविजय २०२४’ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीत केले होते.
त्यांच्या या वक्तव्याच्या किंबहूना अतिशय मोलाच्या ‘मार्गदर्शनाचा’ व्हीडीयो अख्ख्या महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला होता आणि बावणकुळे हे चांगलेच अडचणीत आले होते.
चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल,त्यात कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच…!महाविजय २०२४ पर्यंत बूथ संदर्भात एक ही बातमी ‘विरोधात’येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते,सर्वच्या सर्व बातम्या या सकारात्मक(पॉझिटिव्ह)आल्या पाहिजे,अशी सूचना त्यांनी केली होती.

(छायाचित्र : सभागृहाबाहेर बाकायदा मोबाईल साठी ठेवण्यात आलेल्या अश्या नव्या को-या अलमा-यांनी येणा-या आगंतुकांचे चांगलेच लक्ष वेधले)
हातचं राखून बोलण्याची सवय नसलेल्या बावणकुळेंच्या या मार्गदर्शनाची व्हिडीयो क्लिप कोण्या तरी महाभाग कार्यकर्त्यांने काढली होती,ती व्हायरल होताच राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.विधान सभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,काँग्रसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलेच तोंडसुख बावणकुळेंच्या या विधानावर घेतले होते.
बावणकुळेंनी हे विधान व्यंगातून केले,अशी पाठराखण करण्याची वेळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली होती.आज फडणवीस यांनी प्रदेश पदाधिका-यांना संबोधित केले.तत्पूर्वी बावणकुळे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला संबोधित केले मात्र,यावेळी सभागृहाच्या आत एक ही मोबाईल येणार नाही,याची आधीच खबरदारी घेतली.
मोबाईल ही आजच्या काळात अन्न,वस्त्र,निवारा यापेक्षाही जास्त गरजेची वस्तू बनली असताना, संबंध दिवसभर सर्व पदाधिका-यांचा जीव आपापल्या मोबाईलमध्ये अडकला होता,फडणवीसांचे संबोधन संपल्याबरोबर पाच मिनिटांच्या ब्रेकमध्ये त्यामुळेच मोबाईल ‘जप्ती’च्या टेबलवर एकच झुंबड उडाली होती.
मोबाईलचा वापर राजकारणात कोण,केव्हा, कशासाठी करेल याचा काही धरबंधच नसल्याने बावणकुळे यांनी आजच्या बैठकीत उचललेली ही सावधगिरी म्हणूच चर्चेचा विषय ठरली.विशेष म्हणजे पहील्या रांगेत बसलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंढे यांनी मात्र सभागृहाच्या आत आपला मोबाईल आणला असल्याकडे एका पदाधिका-याने लक्ष वेधले असता,निवेदन करणा-या निवेदिकेने पंकजा मुंढे हे आपल्या ज्येष्ठ नेत्या आहेत,त्यांच्या मोबाईलविषयीचा निर्णय अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळेच करतील,असा विनोद केला आणि सभागृहात हास्याचे कारंजे उडाले.
………………

आमचे चॅनल subscribe करा