Homeनागपूर न्यूजमहाराष्ट्रात ‘महायुतीचा’ मुख्यमंत्री:विनोद तावडे

महाराष्ट्रात ‘महायुतीचा’ मुख्यमंत्री:विनोद तावडे

तिन्ही राज्यातील निवडणूकीत मोदी ‘गॅरेंटी’ला लोकांचे मत

महाराष्ट्रात स्थानिक नेतृत्वाला डावलण्याचा प्रश्‍नच नाही:उत्तीर्ण होताे त्यात सगळ्या विषयाचे गुण गृहीत धरल्या जातात

नागपूर,ता.१६ डिसेंबर २०२३: येत्या निवडणूकीत महाराष्ट्रात ‘महायुती’ म्हणून लढाल व ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री राहील का?यावर बोलताना राज्यात ‘महायुतीचा’मुख्यमंत्री होईल असे उत्तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले.याप्रसंगी मंचावर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुधाकर कोहळे,शहराध्यक्ष बंटी कुकडे,आमदार कृष्णा खोपडे,मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय,माजी आमदार अनिल सोले,प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे,अरविंद गजभिये,भाजपचे प्रदेश महासचिव धर्मपाल मेश्राम,माजी नगरसेवक संजय बंगाले,चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की राजस्थान,मध्यप्रदेश व छत्तीसगड या तिन्ही राज्यात नेत्रदिपक यश मिळण्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘गॅरेंटी’ मतदारांना इतर राजकीय पक्षांपेक्षा खरी वाटली व या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता आली,मोदींनी करुन दाखवलं,मी ज्या ज्या मतदार संघात फिरलो तेथील मतदारांनी निवडणूकीत कोणत्या पक्षांनी काय घोषणा केल्या यापेक्षा पाच वर्षात काय केले यावर मतदान केल्याचे तावडे यांनी सांगितले.

राजस्थानमध्ये जिहादींनी एका शिंपीची क्रूरपणे हत्या केली.त्यावर ना राहूल गांधी ना प्रियंका गांधींनी काही प्रतिक्रिया दिली.निवडणूकीच्या काळात ते मंदिरात गेले मात्र मात्र त्याचा त्यांना कोणताही फायदा झाला नाही.राजस्थान,छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशात मतदारांनी घोषणांवर न जाता सत्तारुढ पक्षाच्या पाच वर्षातील कारर्कीदीवर मतदान केले. छत्तीसगढमध्ये आम्ही असे राजकीय धोरण आखले की त्यामुळे भाजपला १० ते १२ जागा जास्त मिळाल्या,असे ते म्हणाले.छत्तीसगढमध्ये भाजप येणार नाही,पुन्हा काँग्रेस येईल अशी भाकीते वर्तवली जात होती,हा विजय भाजपच्या संघटनात्मक कौशल्याचा असून हा अनुभव प्रत्यक्षात दिसतो,असे तावडे म्हणाले.

भाजप फक्त २०२४ च्या निवडणूकीपुरती नव्हे तर २०४७ मध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला लागला असल्याचे त्यांनी सांगितले.

या तिन्ही राज्यात नवीन मुख्यमंत्री आले याची जनतेमध्ये मोठी चर्चा झाली.मात्र,ते संघटनेत गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय होते.राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी तर १८ वर्ष महामंत्री म्हणून जवाबदारी पार पाडली आहे.त्यामुळे त्या त्या राज्यात निवडणूकीनंतर प्रस्थापितांना डावलून नवीन चेहरे देण्या मागे पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची प्रक्रिया होय,असे ते म्हणाले.

मला देखील पक्षाने राष्ट्रीयस्तरावर जे काम दिले ते मी करायचा प्रयत्न केला.पक्षाचे कार्य सर्वांनी करायचे असते,माझ्यासारख्या कार्यकर्त्याने प्रदेशस्तरावरुन राष्ट्रीयस्तरावर जाऊन ते केले.

भाजपचा दक्ष्णेत हवा तसा करिष्मा दिसत नसल्याकडे लक्ष वेधले असता, कर्नाटकात आम्ही सत्ता स्थापन केली होती,असे ते म्हणाले.आंध्र प्रदेशमध्ये युती होण्याची शक्यता आहे,गेल्या वेळी प.बंगाल,बिहारमध्येही भाजपने चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले.

या तिन्ही राज्यात मोदींच्या गॅरेंटीवर विश्‍वास ठेऊन मतदारांनी मत दिले,असे तुम्ही म्हणता मात्र, या तिन्ही राज्यात मोदींनी स्थानिक प्रस्थापित नेत्यांना हेतुपुरस्सर डावलले मग यात राजस्थानमधील वसुंधरा राजे सिंधिया असो किवा मध्यप्रदेशमधील शिवराज चौहान,या दोन्ही राज्यातील विजयात या दोन्ही नेत्यांचा मोलाचा वाटा होता,महाराष्ट्रात देखील मोदींचीच गॅरंटी चालणार का?केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या निवडणूकीत डावलले जाऊन मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मत मागितले जाईल का?असा प्रश्‍न विचारला असता,जेव्हा उत्तीर्ण होतो तेव्हा सगळ्या विषयाचे गुण गृहीत धरले जातात,शिष्यवृत्ती असलेल्याचे जरा जास्तच गुण धरले जातात असे बोलून त्यांनी प्रश्‍न टोलवला.महाराष्ट्रात जी मते मिळतील ती शेवटी भाजपला मिळतील,असे ते म्हणाले.

विजयी झालेल्या तिन्ही राज्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनाच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली,याचा अर्थ एबीवीपीला ‘अच्छे दिन ’आले,असे समजायचे का?असा प्रश्‍न केला असता,गेल्या २० वर्षात संघाचे काम खूप वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.वनवासी आश्रम,सहकार भारती इत्यादी विविध उपक्रम संघातर्फे राबविले जातात,टिम म्हणून हे कार्य केले जाते.एबीवीपी त्यातील एक उपक्रम असल्याचे ते म्हणाले.

या निवडणूकीत मागील मतदानावर आत्मचिंतन केले का? यावर बोलताना,आम्ही पूर्ण लोकसभेच्या जागांचे सर्वेक्षण केले असून ज्या मतदारसंघात आम्हाला कमी मत पडले,तिथे पक्ष म्हणून आम्ही का कमी पडलो,याचे आत्मचिंतन केले.तिथे पक्षाची संघटना कमकुवत होती का?जातीचा मुद्दा नडला का?इत्यादी मुद्दांवर सखोल चिंतन गेल्या आठ-नऊ महिन्यात केले असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मित्र पक्षात तिकीट वाटपाचा फॉमूला काय असणार?यावर बोलताना,जो जिंकून येऊ शकेल त्याला तिकीट मिळेल,असे उत्तर त्यांनी दिले.बिहारमध्ये आम्हाला लोकसभेच्या १७ जागा मिळाल्या होत्या.नितीशकुमार लालूप्रसाद सोबत गेले तरी मतदार त्यांच्यासोबत गेले नाही.बिहारमध्ये या ही वेळी १७ ते २४ किंबहूना २७-२८ जागा भाजपला मिळणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले.बिहारमध्ये आम्हाला ‘यादव’ मत मिळणार असून बिहारमध्ये यंदा तुम्हाला चमत्कार झालेला बघायला मिळेल,असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या परतण्याविषयी छेडले असता,माझी राष्ट्रीयस्तरावर प्रगती झाली ती खाली का अाणता?अशी मिश्‍किली त्यांनी केली.
पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार?ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल का?या विषयी छेडले असता,आम्ही आता मुख्यमंत्री पदाचा नव्हे तर युतीचा विचार करतो,असे उत्तर त्यांनी दिले.बिहारमध्ये आमची नितीश कुमार यांच्यासोबत युती होती मात्र त्यांच्या आमदारांची संख्या कमी असताना आम्ही त्यांना मुख्यमंत्री पद त्यांना दिले.२००४ मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे जास्त आमदार असताना त्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिले होते.थोडक्यात महायुतीचा मुख्यमंत्री होईल,हे मात्र निश्‍चित,असे ते म्हणाले.

पंकजा मुंढे यांना राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात पाठविण्यात आले,त्या अद्यापही त्या राष्ट्रीयस्तरावर स्थिरावल्या असल्याचे दिसून पडत नाही,याविषयी छेडले असता,पंकजा मुंढे यांच्यावर मध्यप्रदेश निवडणूकीत सहप्रभारीची जवाबदारी देण्यात आली होती व मध्यप्रदेशात भाजपने भरघोस यश मिळवले,असे ते म्हणाले.यावर,शिवराज चौहान बाजूला झाले याला तुम्ही भरघोस यश म्हणता का?असा प्रश्‍न केला त्यांनी हसून हा प्रश्‍न टोलवला.

यावर, पंकजा मुंढेंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार का?कारण महाराष्ट्रात एक ही महिला मुख्यमंत्री झाली नाही,असे विचारले असता,तुम्ही मी मुख्यमंत्री झालेले बघायला मिळेल का?असे का नाही विचारत?असे सांगून मोकळे हास्य त्यांनी फूलवले.

विरोधक म्हणून ‘इंडिया’कडे कसे बघता?असे विचारले असता,इंडिया आघाडीतील काँग्रेसचा अंहकार कर्नाटकातील विजयानंतर वाढला होता,अशी टिका त्यांनी केली.मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांनी ज्या भाषेत अखिलेश यादव यांच्याविषयी टिपण्णी केली ती सर्वांनाच माहिती आहे.अंहकार हा काँग्रेसी नेत्यांचा मूळ स्वभाव असल्याची टिका त्यांनी केली.इंडिया आघाडी एकत्रित येऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.

भाजपला मोदींची इतकी गॅरंटी वाटत असते तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज का पडली?असा सवाल केला असता, २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली नसती तर ही वेळ आली नसती,असे उत्तर त्यांनी दिले.

जनतेच्या विश्‍वाहर्तेसाठी बॅलेट पेपर कि ईव्हीएम?यावर प्रश्‍न केला असता,हे निवडणूक आयोग ठरवेल,असे ते म्हणाले.
……………………….

Latest बातम्या