Homeनागपूर न्यूजफडणवीसांच्या ‘राजकीय’पत्राचे ‘पुरातन’कवित्व

फडणवीसांच्या ‘राजकीय’पत्राचे ‘पुरातन’कवित्व

(भाग-२)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१२ डिसेंबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहील्याच दिवशी लक्ष्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ‘मलिक वर्सेस फडणवीस’ यांच्या भूमिकेकडे जाणे स्वाभाविक होते.फडणवीसांनी अजित दादांना लिहलेले व जगजाहीर केलेल्या पत्राच्या मसुदात बरेच काही दडले आहे.या मागे आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या २०२१ मधील अनेक घटनांची पार्श्वभूमी आहे. त्यातीलच एक सर्वात महत्वाची घटना म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो(एनसीबी)मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडेंसोबतचा रंगलेला पराकोटीचा वाद व फडणवीस यांनी या वादात घेतलेली समीर वानखेडे यांची बाजू,ही आहे.

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुझ वरील एका रेव्ह पार्टीत अटक करण्यात आली होती.या प्रकरणात वानखेडे यांच्यावरच लाचखोरीचा आरोप झाला व वानखेडे यांची एनसीबीच्या अंतर्गत दक्षता विभागाकडून चौकशी देखील झाली.दिल्लीवरुन विशेष पथक मुंबईत दाखल झाले होते.
आर्यन खान प्रकरणात पंचनाम्यावर स्वाक्षरी करणारे पहिले साक्षीदार साईल याने वानखेडे यांच्यावरच लाचखोरीचा गंभीर आरोप केला होता.प्रभाकर साईल यांनी समाजमाध्यमांवर केलेले आरोप व वानखेडे यांच्या विरोधात केलेले शपथपत्र एनसीबीच्या पश्‍चिम क्षेत्र संचालक मुथा अशोक जैन यांनी दिल्ली मुख्यालयाकडे पाठवले होते.

समीर वानखेडे यांच्या वडीलांचे नाव दाऊद,आईचे नाव झाहिदा असून त्यांचा धर्म मुस्लिम असल्याचा अारोप २५ ऑक्टोबर २०२१ रोजी नवाब मलिक यांनी केला होता.वानखेडे यांनी खोटे कागदपत्रे सादर करुन नोकरी मिळवली,असा आरोप करीत त्यांनी वानखेडे यांचा जन्मदाखलाच ट्टिटरवर पोस्ट केला होता.मात्र,मलिक यांनी माझी व कुटूंबियांची बदनामी केल्याचे सांगत माझ्या वडीलांचे नाव ज्ञानदेव कचरुची वानखेडे असून ते उत्पादन शुल्क विभागात वरिष्ठ निरीक्षक होते,असा दावा वानखेडे यांनी केला.

या प्रकरणात आर्यन खान खटल्यातील साक्षीदार पंच किरण गोसावी याने अभिनेता शाहरुख खान यांच्याकडे २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने केल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते.‘सत्य ही जितेगा,सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया देत या गंभीर प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे(एसआयटी)चौकशीची मागणी नवाब मलिक यांनी केली होती.या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी दखल घ्यावी,असे मलिक यांनी सांगितले.वानखेडे हे खोटी प्रकरणे रचून लोकांना अडकवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.दहशत निर्माण करुन वसुली सुरु असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता.मुंबईत संघटित गुन्हेगारी सुरु असून या लोकांनी कोट्यावधी रुपये वसूल केले असा आराप मलिक यांनी केला.

तर,प्रभाकर साईलचा व्हिडीयो हे एक षडयंत्र असल्याचे भाजपने म्हटले होते.यावर मलिक यांनी आपण गोसावी,भानुशालीचा व्हिडीयो काढल्यावर एनसीबी अधिका-यांनी पत्र परिषद घेतली असल्याचे सांगितले.त्यावेळी त्यांनी ९ लोकांची नावे घेतली.त्यातील गोसावी हे पहिल्या क्रमाकांचे पंच आहेत.एनसीबीनेच पंच आणले होते,तो गोसावीचा बॉडीगार्ड असून,त्यानेच गोप्यस्फोट केल्यावर हे षडयंत्र कसे असू शकते?असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला होता.बनवाट प्रकरणे रचून चित्रपटक्षेत्र,श्रीमंतांमध्ये भीती निर्माण करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा हा धंदा सुरु असल्याचा मलिक यांनी आरोप केला होता.

साईल याने क्रुझ पार्टी प्रकरणात आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काढला होता.क्रुझ पार्टी प्रकरणात साक्षीदार म्हणून समीर वानखेडे यांनी ९ ते १० को-या कागदांवर साईल याची स्वाक्षरी घेतली होती असे सांगत,किरण गोसावी हा फरार झाल्यानंतर माझ्या पत्नीला पोलिसांकडून धमकावल्याने माझ्यासोबतच कुटूंबियांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी व्हिडीयो व प्रतिज्ञापत्र तयार केल्याचा दावा साईल याने केला होता.

या व्हिडीयोमध्ये समीर वानखेडे व किरण गोसावीने कशाप्रकारे कारवाई केली याचे इत्यंभूत कथन साईलने केले आहे.साईल याने व्हिडीयोमध्ये म्हटले की,लोअर परळच्या ब्रीज खाली पहाटे साढे तीन ते पावणे चारच्या सुमारास सॅम,किरण गोसावी व शाहरुख खानची मॅनेजर पूजा यांच्यात मिटिंग झाली.यानंतर कारमधूनच त्यांनी फोन केला आणि ‘२५ कोटींचा बॉण्ड’करायला सांगितले.तडजोड १८ वर कर कारण ८ कोटी समीर वानखेडेंना द्यायचे आहे आणि १० आपल्याला वाटून घ्यायचे आहेत,असे तो म्हणाला.पैशांसाठी आम्ही पहाटे पाच, साडे पाचपर्यंत मंत्रालयासमोर रस्त्यावर थांबलो,पण पैसे न मिळाल्याने वाशीला घरी निघून आलो,असा दावा साईल याने व्हिडीयोमध्ये केला.

संपूर्ण महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठीच षडयंत्र केले जात असल्याचा आरोप त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,संजय राऊत आदी यांनी या प्रकरणाबाबत केला होता.

साईलच्या प्रतिज्ञापत्राची कोणत्याही न्यायालयाने दखल घेऊ नये,असा आदेश काढण्याची विनंती एनसीबीने तातडीच्या अर्जाद्वारे २५ ऑक्टोबर २०२१ रोजी विशेष एनडीपीएस न्यायालयाला केली होती मात्र,असा सरसकट आदेश काढू शकत नसल्याचे सांगून ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली होती.

याशिवाय वानखेडे यांच्यावर आरोप करण्यापासून नवाब मलिकांना रोखण्यात यावे अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती मात्र,मलिकांवरील याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता.

वानखेडे यांच्या विरोधात मलिक दररोज आरोप करीत होते,या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेत मलिक रोज वानखेडेंवर बिनबुडाचे आरोप करीत असून त्यांना धमक्या देत असल्याची तक्रार भाजपने राज्यपालांकडे केली.मलिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रसाद लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतली.मलिक सरकारी अधिका-यांना धमक्या देत असून, ही महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट असून यावर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली होती.मलिक यांचे आरोपांचे सत्र थांबले नाही तर या संदर्भात राष्ट्रपती व केंद्रिय गृहमंत्र्यांची भेट घेऊ,वेळ पडली तर न्यायालयात जाऊ,असा इशारा लोढा यांनी दिला होता.

समीर वानखेडेंची ड्रग्ज माफियाशी मैत्री असल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिक यांनी केला होता.आंतरराष्ट्रीया ड्रग्ज माफिया(दाढीवाला)समीर वानखेडे यांचा मित्र असून,ते आपण पुराव्यानिशी जाहीर करणार असल्याचा दावा मलिक यांनी केला होता.समीर वानखेडे,के.पी.गोसावी,प्रभाकर साईल व वानखेडेचा चालक माने यांचा सीडीआर(कॉल डिटेल रेकॉर्ड) चौकशी समितीने मिळवावा,त्यातून कटू सत्य समोर येईल असा दावा मलिक यांनी केला होता.वानखेडे व क्रुझवरील रेव्ह पार्टीतील दाढीवाला ड्रग्ज माफिया यांची मैत्री असून त्यामुळेच त्याला कारवाईतून वगळण्यात आल्याचा आरोप मलिकांनी केला.याबाबत सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करावी,त्यात त्यांना काही आढळले नाही तर वरीष्ठ अधिकारी ज्ञानेश्‍वर सिंग यांना पुरावे देण्यास मी तयार आहे,असे मलिक यांनी सांगितले.

ज्या गाडीचा उपयोग ५० लाख रुपये नेण्यासाठी करण्यात आला ती गाडी आणि ज्या पद्धतीने सॅम डिसूझा यांच्याकडे पैसे देण्यात आले ते बघता त्यांचा जवाब घेण्याची गरज नसून एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे चौकशी करते,त्यामुळे सीडीआर मिळवल्यास सर्व सत्य समोर येईल,असे मलिक म्हणाले.समीर वानखेडेंनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला तयार करुन नोकरी मिळवली व एका दलित मुलाचा अधिकार हिरावला,असा देखील आरोप मलिक यांनी केला होता.

यावर वानखेडेंच्या पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर -वानखेडे यांनी पुरावे असतील तर न्यायालयात जाण्याचे आव्हान मलिक यांना केले होते.मलिक यांनी ‘स्पेशल २६’नावाने ट्टिट करीत वानखेडेंच्या विरुद्ध २६ प्रकरणांच्या चौकशीची मागणी केली होती.

हॉटेल द ललित’मध्ये अनेक गुपिते दडली असल्याचे सांगत समीर वानखेडे व देेवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध दिवाळीपुरती शस्त्रसंधी करीत असल्याचे जाहीर केले होते.आर्यन खान याचे क्रुझवरुन कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळण्यासाठी अपहरण करण्यात आल्याचा आरोप करीत वाखेडे यांचा मित्र मोहित कंबोज हे अपहरणाचे खरे सूत्रधार असल्याचा खळबळजनक आरोप ७ नोव्हेंबर २०२१ रोजी मलिक यांनी केला.कंबोज यांच्या मेहूण्याने सापळा रचून आर्यन खानला अडकविण्याचा प्रयत्न केला मात्र,एका सेल्फीमुळे त्यांचा डाव फसला.मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख आणि राजकीय नेत्यांच्या मुलांनाही या ड्रग्ज पाटर्ीत ओढण्याचा संबंधितांचा डाव होता,असा अारोप मलिक यांनी केला होता.

क्रुझ कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमधून ३ लोकांना सोडण्यात आले.या तीन लोकांमध्येच मोठा खेळ झाला असल्याचा आरोप मलिक यांनी केला.हॉटेल ललितमध्ये समीर वानखेडे यांच्या खासगी पथकाकडून गैरव्यवहार सुरु आहे हे समारे आल्याचा दावा ही मलिक यांनी केला.सुनील पाटील नावाची व्यक्ती वानखेडेंच्या खासगी पथकाचाच भाग असल्याचा आरोप मलिक यांनी केला.

मोहित कंबोज हे ११०० कोटींच्या बँक घोटाळ्यातील आरोपी असल्याचे सांगून मोहित पूर्वी काँग्रेस नेत्यांच्या मागे-पुढे फिरत असत.सत्तांतर झाल्यावर ते भाजपमध्ये सामील झाले.पैसे देऊन दिंडोशीमधून त्यांनी निवडणूक लढवली होती.भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्याविरुद्ध चौकशीचे प्रकरण थांबले,असा दावा मलिक यांनी केला.आपले हॉटेल चालवण्यासाठी वानखेंडेंमार्फत इतर हॉटेलवर कारवाई करायला कंबोज भाग पाडतात,असा आरोपही मलिक यांनी केला.
यावर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमच्या हस्तकासोबत सह्ाद्री अतिथीगृहात भेट झाल्याचा आरोप करीत कंबोज यांनी मुंबईचे पालकमंत्री व काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांचे काशिफ खानसोबत संबंध असल्याचा गोप्यस्फोट केला.

असलम शेख यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी कंबोज यांनी केली.मलिक यांच्याकडे ३ हजार कोटींची संपत्ती असून एकूण २२ मालमत्ता असल्याचा आरोप कंबोज यांनी केला.एक भंगारवाला कोट्याधीश कसा झाला?असा सवाल त्यांनी केला.राज्यात सलीम-जोवदने चित्रपट सुरु केला होता.त्याचा ‘द एन्ड’मीच करणार असा इशारा कंबोज यांनी दिला होता.मलिक यांनी भाजपवर १०० आरोप केले मात्र एकाही आरोपावर पुरावा दिला नाही,त्यांच्या खासगी त्रासाचा सूड ते उगवत तर नाहीत ना?असा सवाल कंबोज यांनी केला.

करोनाची साथ तीव्र असतानाच्या काळात संपूर्ण चित्रपटसृष्टि दुबई व मालदीवमध्ये होती,त्यावेळी समीर वानखेडे यांच्या कुटूंबातील सदस्य देखील तिथे उपस्थित होते,असा ही आरोप नवाब मलिक यांनी वानखेडेंवर केला व मालदीवमधील वानखेडेंच्या कुटूंबियांचे फोटो पुरावा म्हणून दाखवले.अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडेंची बदली एनसीबीमध्ये करण्यात आली .त्यानंतर लगेच रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली.४ हजार रुपयांच्या पैश्‍यांच्या व्यवहाराच्या आधारावर गुन्हा नोंदविण्यात आला.

यावर दुबई नव्हे मालदीवमध्ये सुट्टी घालविली असल्याचे उत्तर समीर वानखेडेंनी दिले.

वानखेडे यांचा फ्लेचअर पटेलशी संबंध काय?तीन खटल्यात पटेल हे पंच आहेत.कौटूंबिक मित्रालाच वानखेडे पंच कसे करतात?असा सवाल मलिक यांनी केला होता.२५ नोव्हेंबर २०२० सीआर नंबर ३८/२० झडतीची कारवाई,९ डिसेंबर २०२० रोजी सीआर नंबर १६/२० तसेच २ जानेवरी २०२१ रोजी सीआर नंबर २/२१ रोजी जे छापे टाकण्यात आले त्यात फ्लेचर पटेल पंच आहेत अशी माहिती पत्र परिषद घेऊन नवाब मलिक यांनी दिली होती.

मलिक हे दररोज नवीन माहिती देऊन राज्यात खळबळ उडवून देत असताना ते राष्ट्रवादीचे पोपट असल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली.मुंबई भाजप ही पूर्णपणे समीर वानखेडे यांच्या पाठीशी उभी होती.मुंबई प्रदेश कार्यालयासमोर ओबीसी मोर्च्याच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यात किरीट सोमेय्या,आमदार तमिळ सेल्वन,मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा,माजी आमदार राज पुरोहित आदी यांचा समावेश होता.यातच प्रसाद लाड यांनी उडी घेत जावई तसेच स्टारपुत्राचा बचाव करुन हौस फिटली असेल तर मलिक यांनी आता राज्यकारभाराकडे लक्ष देण्याची टिपण्णी केली.त्यांच्या सरकारी कार्यालयातील फायलींवर धूळ साचली आहे,अशी टिका लाड यांनी केली.महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात जावई बचाव मंत्री हे नवे पद निर्माण झाल्याची शंका लोकांना येत असल्याचा टोला त्यांनी हाणला.

थोडक्यात,या सर्व पार्श्वभूमीवर या वर्षी २ जुलै रोजी राष्ट्रवादी पक्ष फूटून अजित पवार यांच्यासह आमदारांनी भाजप-शिंदे सरकारमध्ये सहभागी होत नवी युती साकारली व अजित पवार यांनी पुन्हा एकदा अर्थ खात्यासह उपमुख्यमंत्री पद पटकावले.अशात नवाब मलिक हे पार बदललेल्या परिस्थितीत पक्षाचे आमदार म्हणून जामीनावर सुटल्यावर पहिल्यांदाच विधानसभेच्या सभागृहात आले व त्यांच्या सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे ‘मांडीला मांडी ’लावून बसणार नसल्याचे बरेच वादळ उठले.

आघाडीच्या काळात मलिक-भाजप,मलिक-फडणवीस वाद इतका पराकोटीला गेल्यानंतर मलिक यांना पदरात पाडून पुण्य संचित करण्याचे अर्थातच धाडस भाजपला जड गेले असते,याच पार्श्वभूमीवर फडणवीसांचे ‘पत्र नाट्य’रंगले असल्याची चर्चा आता सुरु आहे.

(समाप्त)

Latest बातम्या