Homeनागपूर न्यूजशिवसेनेत फूट हा मानसिक धक्काच होता:डॉ.नीलम गो-हे

शिवसेनेत फूट हा मानसिक धक्काच होता:डॉ.नीलम गो-हे

‘मिट द प्रेस’मध्ये उपसभापतींनी साधला पत्रकारांसोबत दिलखुलास संवाद

संजय राऊतांना बळीचा बकरा बनवलं असा माझा वैयक्तीक विचार

विदर्भाचा पायाभूत विकास झाला हे मान्य करावेच लागेल

नागपूर,ता.७ डिसेंबर २०२३: गेल्या वर्षी २१ जून रोजी शिवेसेनेत जी उभी फूट पडली,शिवसेनेच्या आमदारांचे आधी सूरत, नंतर असाम राज्यातील निसर्गरम्य गुहावटीचे पर्यटनस्थळ गाठणे याविषयी कळताच अगदी पहीली प्रतिक्रिया मनात काय उमटली?असा प्रश्‍न विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांना केला असता,सुरवातीला शिवसेनेतील फूट हा मानसिक धक्काच असल्याचे त्या म्हणाल्या.प्रेस क्लब येथे आयोजित ‘मिट द प्रेस’ उपक्रमात बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर प्रेस क्लबचे अध्यक्ष व पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांची उपस्थिती होती.

दोन महिने तर काय सुरु आहे,याचा थांगपत्ताच लागत नव्हता.नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना काम करु दिले जात नव्हते हे वास्तव आहे.सिडकोची धोरणेही मातोश्रीला न विचारता मंजूर होत नव्हती.आमची एकदा भेट झाली असता त्यांनी, उद्धव ठाकरे माझ्यावर विश्‍वास टाकत नाहीत मी काय करु?अशी खंत व्यक्त केली होती,यावर उद्धव ठाकरेंसोबत योग्य वेळी नक्की संवाद साधेल असे मी शिंदे यांना म्हणाले होते मात्र, त्या काळात मातोश्रीसोबत अनेक आमदारांचा संवाद थांबला होता,हे वास्तव आहे.महाविकासआघाडीच्या काळात शिवसेनेच्या अनेक आमदारांना विकासकामांसाठी निधी दिला जात नव्हता,त्यांच्याही मनात नाराजी होतीच.पुण्यात एकदा परिषदेच्या संदर्भात उद्वव ठाकरे व प्रताप सरनाईकांना निमंत्रित केले होते त्यावेळी एकनाथ शिंदेने मनातली खदखद व्यक्त केली होती.

संजय राऊत हे जेव्हा ईडीच्या अटकेनंतर कारागृहातून बाहेर आलेत तेव्हा मी त्यांना जाऊन भेटले व ज्या जहाल भाषेत ते विरोधकांवर तुटून पडतात,ती शब्दप्रणाली सुधारण्याविषयी मत मांडले,आज ही संजय राऊतांविषयी माझ्या मनात आदर आहे,आमचे वैचारिक मतभेद असतील ही मात्र,ते जे काही बोलतात,पक्षश्रेष्ठींच्या मनातलंही बोलतात,त्यांच्याकडून बोलवून घेतले जात असावे,संजय राऊत यांना बळीचा बकरा करुन घेण्यात आले,असे माझे वैयक्तीक मत आहे,असे नीलम गो-हे म्हणाल्या.

शिवसेनेच्या आमदारांच्या मनातील नाराजीविषयी छेडले असता,जनाधार असणा-या नेत्यांपेक्षा आदित्य ठाकरे यांनाच निमंत्रणे जात होती.‘होयबा’वृत्ती शिवसेनेत स्थिरावली होती,सुरवातीला ते फार काही चुकीचे आम्हाला वाटत ही नव्हते,ते नेते असले तरी आदित्य हे लहान मुलासारखेच आम्हाला वाटत होते,आज ही तसेच वाटतात,मात्र जनाधार असलेल्या नेत्यांना आदित्य ठाकरेंना प्रस्थापित करीत असताना डावलले जाऊ लागले,हे वास्वत आहे,असे नीलम गो-हे यांनी सांगितले.

हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयातीत असते तर स्वत :कार घेऊन नाराज आमदारांना घेण्यासाठी निघाले असते,बाळासाहेब स्वत: येत असल्याचे समजताच शिवसैनिक हे परत आले असते,त्यांच्या या विधानाकडे लक्ष वेधले असता,बाळासाहेबांची कठोर शिस्त,बारीक-सारीक माहिती याचा दरारा होता

मात्र २०१५ नंतर शिवसेनेची कार्यपद्धती बदलली.मला मातोश्रीवर जाण्याची सूट होती मात्र मोठे नेते हे अपमानित होत होते,हे वास्तव आहे,मनोहर जोशी यांचे उदाहरण देता येईल,त्यामुळे अनेक नेते हे निष्क्रिय झालेत,प्रतिपक्षाशी मतभेद मान्य केले तरी कार्यपद्धती योग्य नव्हती,को-या कागदांवर सह्या घेतल्या जाऊ लागल्या,कशासाठी निवडल्या जात आहे,याचीही माहिती नसे,शिवेसनेत पारदर्शीपणा जो संपुष्टात आला होता तोच पारदर्शीपणा आता परत येत असल्याचे त्या म्हणाल्या.

मला आपल्या सहका-यांवर टिका करने आवडत नाही,याशिवाय सध्या विधान सभेचे अध्यक्ष यांच्या समोर शिवसेना गटांची सुनावणी सुरु असल्याने मी यावर बोलणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले.

विदर्भाच्या विकासाबाबत प्रश्‍न केला असता,विदर्भाचा पायाभूत विकास झाला हे मान्य करावेच लागेल असे त्या म्हणाल्या.नागपूर तसेच विदर्भाचे अनेक तरुण मला विदेशात भेटलेत,एवढी प्रगती निश्‍चितच गेल्या काही काळात विदर्भाने केली आहे.सर्विस सेक्टर वाढल्यामुळे हे घडले याशिवाय जो सोशल मिडीया आधी ‘साईड हिरो’ होता ते माध्यम आता ‘मेन हिरो’ म्हणून मिरवित आहे.मुंबईत सोशल मिडीयाच्या माध्यमातून बचत गटाच्या १५ हजार महिला परस्परांशी जुळल्या आहेत.कोविडच्या काळातही सोशल मिडीयाचे महत्व अधोरेखित झाले.

नागपूरचा चेहरा गेल्या चार-पाच वर्षात खूप बदलला आहे.माजी मनपा आयुक्त टी.चंद्रशेखर राव,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपूर हे राज्याचं एक महत्वाचं शहर झालं आहे.हे उपराजधानीचं शहर असल्यामुळे नागपूरच्या संदर्भात कुठल्या प्रश्‍नाला किती महत्व द्यायचं हे उपसभापती म्हणून जबाबदारी पार पाडत असल्याचे त्या म्हणाल्या.

उपसभापती म्हणून त्यांच्या कार्यकाळाविषयी प्रश्‍न केला असता,शेतक-यांचे,कास्तकरांचे,विदर्भातील विविध तीर्थस्थळे,मिहान इत्यादीबाबत अनेक प्रश्‍नांकडे लक्ष वेधल्या गेले आहेत.२०१२ ते २०१७ दरम्यान मिहानसाठी विशेषत्वाने लक्षवेधी लावली,किती उद्योग मिहानमध्ये उभे राहीलेत,पश्‍चिम व पूर्व विदर्भातील विविध जिल्ह्यांच्या मी सातत्याने संपर्कात असते.ब-याच घटनांविषयी पोलिस विभागासोबत समन्वय साधून पाठपुरावा करीत असते,असे त्यांनी सांगितले.

याशिवाय अधिकारी व आमदार यांच्यातील वादविवादाचा विषय समजून घेतला.विशेष करुन शिक्षण क्षेत्रातील शिक्षक हे आमदारांचेही फोन उचलत नसल्याची तक्रार कायम असते.या विषयी बैठका घेतल्या असता,शिक्षण क्षेत्रात बरीच पदे ही रिक्त आहे,त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला असल्याचे लक्षात आले,त्यामुळे आमदारांचे मोबाईल फोन उचलले जात नाहीत.माजी शिक्षक आमदार नागो गाणार हे तर सायंकाळी ६ नंतर कार्यालयात जाऊन बसायचे व लोकांचे प्रश्‍न समजून घ्यायचे.

नागपूरातील हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याचे हे २१ सावे वर्ष असून अगदी एक दोन वेळेचा अपवाद सोडल्यास मी दरवर्षी हिवाळी अधिवेशनात उपराजधानीत उपस्थित राहीले आहे.दोन आठवडे तर मी राज्य महिला आयोगाचा कायद्या पारित व्हावा यासाठी संघर्ष केला.मात्र ‘आयोगा’ ऐवजी मला भेटणारे ’आरोग्याचा’ कायद्या पारित झाल्याचे सांगून अभिनंदन करीत होते.त्यावेळी दिवंगत प्रभा राव या लढाईत सोबत होत्या,अशी आठवण त्यांनी विशद केली.
शहरात येणारे लोंढे व भिक्षेकरी याविषयी छेडले असता,शहरात वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध असल्याने असे स्थलांतरण होत असल्याचे त्या म्हणाल्या.शहरातील करदात्यांच्या पैशांतून या सुविधा उभ्या रहात असतात,त्यांना त्या सुविधा किती उपयोगी पडतात?याचाही काही हिशेब असणे गरजेचे आहे.मोठ्या शहरात हाताला काम आणि पोटाल जेवण उपलब्ध होत असतं,खेड्यात दुष्काळ पडतो तेव्हा मोठ्या प्रमाणात स्थलांतरण घडतं.एकमेव कोविडचा अपवाद वगळल्यास,कोविड काळात शहरी भागातून खेड्यांकडे स्थलांतरण झाले.त्याकाळात रोजगार हमी योजनेने ग्रामीण भागातील लोकांना तारले.मात्र,शेतीतील अशाश्‍वता,शिक्षणाच्या अपु-या सोयी आणि जातीयता इत्यादी कारणांमुळे ग्रामीण भागातील कष्टमय जीवन लोकांना नको असल्यानेच, शहरावर याचा ताण पडतो.ग्रामीण भागातील मुलींवर देखील सामाजिक दबाव असतो.त्यामुळेच आर्थिक,सामाजिक आणि सांस्कृतिक मुक्ततेचे ठिकाण ही शहरे झाली आहेत.भिक्षेकरींबाबत बोलताना,दलालांमार्फत याचे रॅकेट असून पोलिस विभागाकडून हे रॅकेट तोडण्याची मी अपेक्षा करते,कोणाला मानवी संवेदनशीलतेबाबत अनास्था आढळली तर त्यांनी नक्कीच माझ्याशी संपर्क साधावा,असे आवाहन नीलम गो-हे यांनी याप्रसंगी केले.

आघाडी सरकारच्या काळात विधी मंडळात मांडलेल्या शक्ती कायद्याविषयी प्रश्‍न केला असता,केंद्रिय गृह विभागाने या कायद्याबाबत राज्य सरकारकडे काही प्रश्‍ने उपस्थित केली आहे,ज्याची उत्तरे पाठविण्यात आली असून काही तांत्रिक बाबींमुळे हा कायदा अद्याप पारित होऊ शकला नाही मात्र,केंद्र सरकारनेच आता एविडन्स कायदा,बाल लैंगिक गुन्हेगारीमध्ये सुधारणा करणारे काही कायदे पारित केले असल्यामुळे देशातील कायदा हा अधिक मजबूत झाला असल्याचे त्या म्हणाल्या.

आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधित्व हे राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात दिसून पडत नाही,यामागील कारण विचारले असता,त्यांनी योग्य मार्ग निवडावा असे नीलम गो-हे यांनी सूचित केले.

पोलिस विभागाकडून महिलांविषयीच्या अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद घेण्यास होणारी टाळाटाळ,या विषयी विचारले असता,हा प्रश्‍न संपूर्ण राज्यातच असल्याचे त्यांनी सांगितले.पोलिस ठाण्यात योग्य दखल घेतली जात नसल्यास तातडीने भरोसा सेलमध्ये तक्रार नोंदवावी किवा ११२ क्रमांकावर कॉल करावा,यातून ही महिलांना मोठ्या प्रमाणात मदत मिळू शकते.पुण्यात एका तरुणीला मारहाण होत असल्याचे मला कळताच मी स्वत:११२ क्रमांकावर कॉल केला,तातडीने मार्शल बिट घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या मुलीची त्या प्रसंगातून सुटका केली.मी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले.मूळात अश्‍या घटना घडतात तेव्हा समाज काय करीत असतो?असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला.

अश्‍याच मानसिकतेतून नागपूरात अक्कू यादव घडतो.स्वत:बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांच्या त्या कृतीचे समर्थन केले होते,अशी आठवण नीलम गो-हे यांनीसांगितली.एखादी मोहिम राबविली गेली पाहीजे,ज्याप्रमाणे अनेक सदनिकांमध्ये तेथील रहीवाश्‍यांनी ‘बेल बजाव’ही मोहिम राबविण्यास सुरु केली आहे,यामुळे अडचणीच्या काळात संपूर्ण सोसायटी धाव घेऊ शकते.२०१६ मध्ये नागपूरात इमामवाड्यात देखील एका तरुणीला मारहाण झाली,मी त्याचा पाठपुरावा केला,त्या तरुणाला ६ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

नोकरीच्या ठिकाणी महिलांसोबत छेडछााडीच्या प्रकरणात यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांनी सक्षम राहीले पाहिजे,असे त्या म्हणाल्या.यंत्रणाच दुर्बळ असल्याने ,एका अधिका-याने महिला कर्मचारीला कक्षात बोलवून गाणं म्हणून दाखविण्याची फरमाईश केली,त्या विरोधात तिने योग्य फोरमवर आक्षेप नोंदवले मात्र त्या अधिका-याला बडतर्फ न करता बदली करण्यात आल्याचे नीलम गो-हे यांनी सांगितले.यंत्रणेचा हा कुचकामीपणा असला तरी,महिला ही आता सजग होत असल्याचे त्या म्हणाल्या.काही सूड म्हणूनही कायदा हातात घेताना दिसून पडतात.काही जण हनीट्रॅपमध्येही अडकतात,ही देखील एक मानसिकताच असते मात्र त्या ‘हनी’खायला जायचेच कशाला?असा प्रश्‍न करुन त्यांनी एकच हास्य फूलवले.

भारतात दर ३ मिनिटाला १ महिलेवर बलात्कार होतो अशी आकडेवारी सांगते,याकडे लक्ष वेधले असता ‘जब तक सुरज चांद रहेगा,असे अत्याचार घडत राहतील’असे सांगत, यामागे पुरुषसत्ताक मानसिकता कारणीभूत असल्याचे त्या म्हणाल्या.या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे,फक्त कठोर कायदे करुन बदल होणार नाही,पाश्‍चात्य देशात तर पुरुषांनाही महिलांसोबत ‘पॅटर्निटी लिव्ह’मिळत असते,याचा अर्थ बाळाचा जन्म आणि संगाेपन ही स्त्री आणि पुरुष दोघांचीही सारखीच जबाबदारी समजली जात असून, महिलांसोबत पुरुषांनाही बाळंतपणाची सुटी मिळत असते.आपल्याकडे तर सिनेमात नट,नटीला थोबाडीत मारतो तर शिट्या आणि टाळ्या पडतात,‘देवदास’चित्रपटात नायक हा त्याची कायमची आठवण राहावी म्हणून नायिकेच्या चेह-यावर घाव घालून व्रण उमटवतो,हे चित्र बदलले पाहिजे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ताईंची नाराजी-

महिलांवरील अत्याचार,पुरुषी मानसिकता अश्‍या अतिशय संवेदनशील विषयावर नीलम गो-हे बोलत असताना प्रेस क्लबमध्ये समोरच बसलेली एक तरुणी(पत्रकार?)व दोघे तरुण यांनी आपापसात काहीतरी टिपण्णी करुन मोठ्याने हसलेत,नेमके हेच नीलम ताईंनी हेरले व मंचावरुनच त्यांनी,हा हसण्यावर नेण्याचा विषय नसल्याची टिका केली.पत्रकारांशी वार्तालाप संपल्यानंतर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्याकडे देखील त्या तिघां(पत्रकार?)विषयी त्यांनी जाता-जाता तीव्र नाराजी व्यक्त केली.

डॉ.नीलम गो-हे या उच्च विद्याभूषित असून विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.हे संवैधानिक पद असून या पदाची आपली एक गरिमा असते.अशी विभूती प्रेस क्लबतर्फे निमंत्रणावरुन ,पत्रकारांसोबत वार्तालापसाठी पाहूणी म्हणून बोलविली जाते तेव्हा अश्‍या पाहूण्यांविषयी योग्य सन्मान ठेवणे ही पत्रकारांची ‘नैतिक’ जबाबदारी असते,मात्र सध्या नागपूर शहरात सर्वदूर पत्रकारितेच्या नावावर जो सावळा गोंधळ माजला आहे त्याची झळ अश्‍या सन्मानीय विभूतींनाही बसत असल्यानेच आता प्रेस क्लब,पत्रकार भवन तसेच विधान भवनात पत्रकारितेचे बेसिक ज्ञानही नसणा-यांची उपस्थिती ही इतरही पत्रकारांसाठी किती लज्जास्पद ठरतेय,याचेच आजची घटना उदाहरण म्हणून सांगता येईल.

‘सत्ताधीश’ने याविषयी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांचे, प्रेस क्लबमध्ये पत्रकार म्हणून वावरणा-या असंख्य व दररोजच्या नव्या चेह-यांकडे लक्ष वेधले असता,त्यासाठीच धोरण ठरविले असून पत्रकार भवनात नोंदणीचे अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या यूट्यूब न्यूज चॅनल्सचा सर्वदूर धुमाकूळ सुरु आहे,यूट्यूब चॅनल्सला अद्याप तरी पत्रकारितेचा दर्जा प्राप्त झाला नसून तीच गत न्यूज वेबसाईट्सची देखील आहे मात्र, नागपूरात न्यूज वेबसाईट्सची संख्या मर्यादित असून, यूट्यूब चॅनल्सला काहीही धरबंधच राहीला नसून,गळ्यात रंगबिरंगी पट्टयात ओळखपत्र घालून दररोज नवीनच चेहरे प्रेस क्लब व पत्रकार भवनात वावरताना दिसून पडतात.पत्रकारितेचा गंधही नसणा-यांना प्रेस क्लब किवा पत्रकार भवनात ‘मुक्त’ प्रवेश देण्यात येत असल्यामुळे पत्रकारितेच्या मूल्यावरच घाला घातला जात असून,याविषयी आता मायबाप सरकारने तसेच प्रेस क्लब व पत्रकार भवन संघाने कठोर नियमावली करने गरजेचे झाले आहे.

 

Latest बातम्या