Homeनागपूर न्यूजविधीमंडळ अधिवेशन आणि उपराजधानीतील फुकटे पत्रकार!

विधीमंडळ अधिवेशन आणि उपराजधानीतील फुकटे पत्रकार!

प्रवेश पत्रिकेसाठी अरेरावीने गाठला कळस:कर्मचारी त्रस्त

फूकटच्या जेवणासाठी पत्रकार नसणा-या नातेवाईकांचाही भरणा!

हेचि का फळ मम्‌ तपाला!संवैधानिक लोकशाहीला फूकट्या ‘लोकांची’ कीड

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.६ डिसेंबर २०२३: खरे तर उपराजधानीतील ‘फुकटे’पत्रकार हा विषय बातमीचा होऊ शकत नाही,याची पुरेपूर जाणीव असतानाही हस विषय बातमीचा यासाठी झाला, कारण महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या पासून सुरु होत आहे,त्यासाठी विधान भवनात प्रवेश करण्यासाठी पत्रकारांना प्रवेश पत्र बाळगणे गरजेचे असल्यामुळे, अधिवेशना पूर्वी सचिवालयाचे कार्य विधान भवनात सुरु झाल्याबरोबर पत्रकारांची धाव असते ती प्रवेश पत्र मिळण्यासाठी मात्र,मंगळवार दिनांक ५ डिसेंबर रोजी प्रवेश पत्र वाटप होणा-या अरुंद कक्षात ज्याप्रकारे शहरभरातील पत्रकार तसेच ‘तथाकथित’पत्रकारांनी एकच गर्दी केली व प्रवेश पत्र वाटप करणा-या विधी मंडळाच्या कर्मचा-यांसोबत ज्याप्रकारचा व्यवहार झाला ते बघता,उपराजधानीच्या नावलौकिकाला धक्का लागणे अपरिह्यार्य होते.

प्रवेश पत्र मिळवण्यासाठी काल चक्क विधी मंडळ कर्मचा-यांना दमदाटीचा जो प्रकार त्यांच्या कक्षात घडला तो नागपूकरांची मान शरमेने खाली घालणाराच होता.अनेक अक्लपित,अवास्तविक नावाचे साप्ताहिक,डिजिटल फोरमचे हजारो पत्रकार अचानक शहरात उगवले,ज्यांचे चेहरे कधीही प्रेस क्लब किवा पत्रकार भवनात तसेच कोणत्याही राजकीय पक्षांच्या प्रेस वार्तामध्ये कोणीही बघितले नाही असे अनेक निरनिराळ्या रंगाचे,ढंगांचे हजारो लोक,पत्रकार म्हणून प्रवेश पत्र वाटप होणा-या कक्षात उगवले होते!

एकेका साप्ताहिकासाठी दहा-दहा पत्रकारांच्या नावांची यादी देण्यात आली होती!यू-ट्यूब डिजिटल माध्यमांतील लोकांच्या संख्येने तर जणू आंतरराष्ट्रीय माध्यमांचे स्तर गाठले होते,जवळपास १५०० डिजिटल माध्यमकर्मींनी प्रवेश पत्रासाठी अर्ज सादर केले होते!

मुंबईत डिजिटल माध्यकर्मींची ही संख्या फक्त १५ आहे,ती देखील वार्ताहर संघामध्ये सदस्य म्हणून त्या पत्रकारांची नोंदणी आहे.उपराजधानीचा कारभार मात्र ‘अफलातून’ असल्याचाच प्रत्यय विधी मंडळातील कर्मचा-यांना दरवर्षीच येतो,यावेळी प्रवेश पत्र मागणा-या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढत,सभ्यतेची मर्यादा ही आेलांडली एवढंच.

काल मंगळवारी प्रवेश पत्र मिळविण्यासाठी एक मुस्लिम धर्मीय आगंतुक देखील आले होते,त्यांनी तर चक्क विधी मंडळ कर्मचा-यांना धमकी देण्याची बहादुरी दाखवली.अाम्हाला प्रवेश पत्र देणार नसाल तर लिखित मध्ये द्या,मग बघा मी काय करतो,मला प्रवेश पत्र मिळणार नसेल तर मी इतर कोणालाही प्रवेश पत्र मिळू देणार नाही…!विधी मंडळाचे कर्मचारी त्यांच्या या अतिशय असभ्य वर्तवणूकीमुळे अचंभित झाले,वादावादी झाली,नियमांचा कीस पडला,एकेका साप्ताहिकासाठी दहा-दहा,पाच-पाच पत्रकारांना प्रवेश पत्र देण्यासाठी या कर्मचा-यांच्या मागे चांगलाच तगादा लावण्यात आला.कर्मचा-यांनी वरिष्ठांपर्यंत तक्रार पोहोचवली.

डिजिटल फोरमच्या पत्रकारांना प्रत्येकी एकच प्रवेश पत्र देण्याचे तर साप्ताहिकासाठी फक्त दोन प्रवेश पत्र देण्याचा मध्यम मार्ग वरिष्ठांनी काढला.ते देखील फक्त विधी मंडळ परिसरात प्रवेशासाठी उपलब्ध करुन देण्यात आले.विधान सभा किवा विधान परिषदेच्या गॅलरीत अश्‍या पत्रकारांना बसता येणार नाही.या निर्णयामुळे डिजिटल माध्यमात प्रिंट मधून जे अनुभवी पत्रकार आले त्यांची ही चांगलीच गोची झाली.‘गेहू के साथ धून भी पिसता है‘ही म्हण ख-या अर्थाने सार्थ झाली.

कहर तर तेव्हा झाला जेव्हा हे पत्रकार म्हणून प्रवेश पत्र मिळविणारे काही नागपूरकर महाभाग प्रवेश पत्र वाटप करणा-या कर्मचा-यांना ‘जेवणा’चा देखील पास मागत होते…!विधीमंडळ परिसरात कोणता राजकीय पक्ष किवा नेता पत्रकारांसाठी फूकटची जेवणावळी ठेवतात याच्याशी विधी मंडळ कर्मचा-यांचा काय संबंध?अक्षरश:फोन करुन देखील जेवणावळीच्या ‘पास ’साठी या कर्मचा-यांना अनेक फूकट्या लोकांनी भांबावून सोडले.हातातील काम सोडूूूून हे कर्मचारी जेवणावळीचा पास त्यांच्याकडे उपलब्ध नसतो हा फोनवर खुलासा करावा लागत होता….!

एका तथाकथित डिजिटल माध्यमातील भगिनीने तर विधान भवन परिसरातील या फूकटच्या जेवणावळीसाठीच पत्रकार म्हणून तिच्या चार नातेवाईकांसाठीही प्रवेश पत्र मिळवले असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.फक्त विधीमंडळ परिसरात फूकटचे जेवण,मंत्र्या-संत्र्यांशी भेट,आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्या कक्षात खेटे घालण्याचा,त्यांच्या स्वीय सहायकांशी सलगी वाढविण्याचा उद्योग करण्यासाठी अनेक फूकटे पत्रकार हे प्रवेश पत्र मिळवते होतात,यात तिळमात्र शंका नाही,महत्वाचे म्हणजे यावेळी डिजिटल माध्यमकर्मींना प्रवेश मिळण्याची शक्यता धुसर असल्यानेच एक महिन्या पूर्वीच अनेकांनी काही साप्ताहिक व वर्षातून फक्त एक किवा दोनवेळा प्रसिद्ध होणा-या दैनिकांच्या संपादकांशी संपर्क साधून तीन-तीन हजार रुपये देऊन प्रवेश पत्र मिळविण्याची तजवीज केल्याची देखील चर्चा विधान भवनात ऐकू आली!

मूळात अधिवेशन,विधी मंडळ,विधान भवन,विधान परिषद,जनतेचे प्रश्‍न,मंत्री,आमदार,सचिव,विधी मंडळ अधिकारी,कर्मचारी हे सर्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला बहाल केलेल्या संवैधानिक लोकशाहीचा आत्मा असून याचे गांर्भीय,महत्व आणि उद्देश्‍य,पत्रकार म्हणून मिरविणा-या फूकट्या लोकांना माहिती असने अशक्य आहे त्यामुळेच, आता डिजिटल माध्यम व साप्ताहिकांसाठीचे नियम मायबाप सरकारने लवकरात लवकर निश्‍चित करने अतिशय गरजेचे झाले आहे.

नागपूरात नुकतेच एका खंडणीबाज बहाद्दर तोतया पत्रकाराने,पत्रकारितेच्या नावाने जो धुमाकूळ घातला,ते एक उत्तम उदाहरण म्हणून मायबाप सरकारला धोरण ठरविताना लक्षात घेता येईल.तोतया पत्रकार मुन्ना उर्फ मुस्ताक अहमद खान पटेल(वय ४६) याने एका कॅफे चालकाकडे एक लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी या आरोपीला अंबाझरी पोलिसांकडून अटक झाली आहे.त्याची पोलिस कोठडी घेतली.मेडिकलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने पोलिसावरच हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.अजनी पोलिसांनी या संदर्भात आरोपीवर दुसरा गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल माध्यमात देखील अनेक पत्रकार हे खंडणी बहाद्दर असून त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तरी देखील ते उजळ माथ्याने प्रेस क्लब,पत्रकार भवन किवा विधान भवनात पत्रकार म्हणून प्रवेश पत्र मिळवून फिरताना आढळतात.शासनाने आता पत्रकारितेतील हा धुमाकूळ, नियमांच्या चौकटीत बसवणे नितांत गरजेचे झाले असून,विधी मंडळ कर्मचा-यांची सुटका त्यांच्या जाचातून करनेही त्यासाठीच महत्वाचे ठरते.गेल्या आठवड्यात पार पडलेल्या विविध विभागाच्या बैठकीत त्यामुळेच यंदापासून डिजिटल माध्यकर्मींना प्रवेश पत्र न देण्यासंबधीच्या निर्णयावर चर्चा झडली मात्र यावर यंदा ही अंमलबजावणी होऊ शकली नाही.या बैठकीत नागपूर प्रेस क्लबच्या पदाधिका-यांनी देखील सहभाग नोंदवला मात्र,यावर कोणताही प्रभावी तोडगा ते देखील सूचवू शकले नाहीत.

ते शासकीय कर्मचारी असून उपराजधानीत काही काळासाठी कर्तव्यावर येत असतात,त्यांच्यासोबत ज्या पद्धतीची अरेरावी आपापल्या क्षुल्लक स्वार्थासाठी केली जाते,ती असमर्थनीय असून यामुळे नागपूर,विदर्भ जो आपल्या आदरातिथ्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे त्या नागपूर शहराचा व विदर्भाचा नावलौकिक रसातळात जात असल्याचे भान देखील प्रवेशपत्रासाठी हपापलेल्या काही नागपूरकरांना नाही,ही खेदाचीच बाब आहे.

विधान भवनाची जागा ही मुळातच अपुरी आहे.मुंबईत विधी मंडळ कर्मचा-यांना अश्‍या समस्येला सामोरे जावे लागत नाही,त्यामुळेच एवढ्या अरुंद कक्षामध्ये प्रवेश पत्राचे वाटप करण्या ऐवजी विधान भवनात सर्वात खालच्या मजल्यावरच स्वतंत्र कक्ष त्यांना उपलब्ध करुन दिल्यास,जागेची समस्या उद् भवणार नाही व कक्षा बाहेर मोकळ्या जागेत रांगेत उभे राहून देखील सावकाश प्रत्येकाला आपापले प्रवेश पत्र मिळविता येऊ शकतील.गेल्या अनेक वर्षांपासून पहील्या माळ्यावरील ज्या अतिशय अरुंद कक्षात प्रवेश पत्रांचे वाटप होते त्या कक्षात १० जण जरी एकसाथ आले की भरपूर गर्दी दाटून जात असते.

याशिवाय विधान भवन मंडळातील कर्मचा-यांची अपुरी संख्या,याचा देखील विचार करने क्रमप्राप्त आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या इतर अनेक विभागाप्रमाणेच विधी मंडळात देखील अधिकारी,कर्मचा-यांच्या नियुक्तीची बोंब आहे.परिणामी,एकेका कर्मचा-यावर कामाचा अतिरिक्त ताण येणे स्वाभाविक आहे.याचाही विचार शासनाने आणि नागपूरकर पत्रकारांनी करने गरजेचे आहे.

या कर्मचा-यांना आपापल्या वरिष्ठांप्रतीही जबाबदेही असल्याने त्यांची ही मानसिक परिस्थिती समजून घेणे आणि त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवणे गरजेचे ठरते.

या कर्मचा-यांसोबत अरेरावी,दमदाटीच्या भाषेत बोलणे यात बहादूरी नसून,फक्त काही आठवड्यासांठी पाहूणे म्हणून आपल्या शहरात येणा-या या शासकीय कर्मचा-यांनी नागपूरकर पत्रकारांच्या चांगल्या आठवणी मनात घेऊन जाण्याचा प्रयत्न होणे या पुढे गरजेचे आहे.

अवकाळी पावसामुळे सध्या विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे.हातातोंडाशी आलेला कापूस,तूर,सोयाबिन ,धान,पालेभाज्या या अवकाळी पावसाने पार धूऊन काढला आहे.शेतकरी सरकारकडे डोळे लाऊन बसला आहे.बिमा कंपन्या या कश्‍याप्रकारे शेतक-यांना नुकसान भरपाईसाठी २ रुपयांचा धनादेश पाठऊन क्रूर थट्टा करीत आहेत,या बिमा कंपन्या नेमक्या आहेत तरी कोणाच्या?शिक्षकांच्या १८ हजार जागा रिक्त आहेत,बंदी उठून ५ वर्ष लोटली तरी शिक्षण क्षेत्रात सगळं आलबेल सुरु आहे,माहिती अधिकारी साठी १५ वर्षात भरतीच नाही,आठ महिन्यांपासून परीक्षेची प्रतिक्षाच सुरु आहे,गडचिरोली जिल्ह्यात गुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुंुडेनूर या अतिदुर्गम भागात खाटे वरुन मृतदेह नेऊन आज ही नाला पार करावा लागतो,राज्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच आजारी आहे,रिक्त पदे,औषधांचा तुटवडा,शासकीय रुग्णालयात होरपळून रुग्णांचा,बालकांचा होणारा मृत्यू,कंत्राटी पोलिस भरती,अवैध वाळूचा उपसा आणि शासकीय महसूलातील कीड,अमली पदार्थांच्या नशेखोरीत उडता पंजाब सारखाच झालेला उडता महाराष्ट्र,पुण्यातील ससून येथील घटना,येरवडा येथील पोलिसांच्या जागेचा लिलाव करण्याचा दादांनी दिलेल्या आदेशाचा माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात केलेला उल्लेख,गोंड-गोवारी उल्लेखामधील एका स्वल्पविरामचा प्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी शेकडो गोवारी बांधवांचा हूतात्मा दिन साजरा करण्याची दर वर्षी नागपूरात नोव्हेंबरमध्ये येणारी वेळ,समृद्धीचा मृत्यूमार्ग असे कितीतरी प्रश्‍न मायबाप सरकारला विचारणे पत्रकारांचे आद्य कर्तव्य आहे,फक्त प्रवेशपत्रासाठी आलेल्या लोकांना त्यामुळेच ‘पत्रकाराच्या‘श्रेणीत बसवणे हा ख-या पत्रकारांची मान शरमेने खाली घालणाराच प्रकार त्यामुळेच ठरतो….!

 

Latest बातम्या