Homeनागपूर न्यूजउके बंधूंना मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागले वीस तास!

उके बंधूंना मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागले वीस तास!

चाळीस तास जन्मदात्याच्या पार्थिवाला अंत्यसंस्कारची वाट

पीएमएल कोर्टाने तातडीच्या प्रवासाची परवानगी देऊनसुद्धा डग्गा पोलिस गाडीनेच उके बंधूंचा प्रवास!

नातेवाईकांमध्ये कमालीचा राेष:सरकारच्या दडपशाहीतून कुटुंबात शांतता

वकील समुदायामध्येही चर्चेला उधाण

फडणवीसांनी माणुसकीची संधी गमावली:ज्वाला धोटे यांची टिका

नागपूर,ता.१५ नोव्हेंबर २०२३: लोकशाहीच्या वेष्टनाखाली अमर्याद अधिकार प्राप्त करुन त्याचा वापर आपल्या विरोधकांच्या विरोधात करण्याची व त्यांना नामशेष करण्याची ‘परंपरा’ ही सर्वच राजकीय पक्षांच्या सत्ता काळात भारतीय नागरिकांनी पुरेपुर अनुभवली असून, अलीकडच्या दशकात तर आधुनिक हूकूमशाहीचे नवे रुपच भारतीय नागरिक अनुभवत आहेत.लोकांचा विरोध किवा सरकार विरोधात कोणत्याही प्रकारची संवैधानिक व कायदेशीर आयुधे वापरणा-यांच्या विरोधात ,पराकोटीची असहिष्णु झालेली संवैधानिक लोकशाही व काही सत्ताधारी नेते कशाप्रकारचे राजकारण करतात, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे राज्याच्या उपराजधानीत उके बंधूंवर झालेली केंद्रिय सक्त वसुली संचालनालय(ईडी)च्या कारवाईचे दिले जात आहे.३१ मार्च २०२१ रोजी पहाटे रामेश्‍वरी येथील अतिशय सर्वसामान्य घरात राहणा-या बहूचर्चित ॲड.सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड पडली,त्यांना चौकशीसाठी सेमीनरी हिल्सवरील ईडीच्या कार्यालयात घेऊन जाण्यात आले,यानंतर रात्रीच्या विमानाने ॲड.सतीश उके व त्यांचे मोठे बंधू प्रदीप उके यांना मुंबईत नेण्यात आले,पीएमएल कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात आले,तेव्हापासून उके बंधूंचा मुक्काम मुंबईच्या कारागृहातच असून, जामीनासाठी सर्वप्रकारची कायदेशीर लढाई लढत असतानाच नुकतेच १० नोव्हेंबर रोजी उके बंधू यांचे वडील श्री महादेवराव उके यांचे निधन झाले.

वडीलांच्या अंत्यसंस्कारासाठी उके बंधू यांची बाजू मुंबईतील पीएमएल कोर्टात लढणारे ॲड.रवी जाधव यांनी त्यांच्या पॅरोलसाठी धाव घेतली.कोर्टाने त्यांना पॅरोल मंजूर करतानाच स्कॉड घेऊन जाण्याची परवानगी दिली मात्र,उके बंधूंना मुंबईवरुन नागपूरला पोहोचण्यासाठी तब्बल वीस तास लागले….!महत्वाचे म्हणजे त्यांच्या जन्मदात्याचे पार्थिव हे तब्बल चाळीस तास आपल्या लाडक्या पुत्रांसाठी अंत्यसंस्कारासाठी प्रतिक्षेत होते,आठ तासांच्या प्रवासासाठी राज्य शासनाच्या अमानवीय धोरणातून उके बंधूंना वीस तास नागपूरात पोहोचण्यास लागल्याने नातेवाईक,वकील मंडळी यांच्या संयमाचा बांध चांगलाच फूटला आणि विविध चर्चांना चांगलेच उधाण आले.

(छायाचित्र: उके बंधूंचे दिवंगत वडील महादेवराव उके)

बनावट दस्तावेजाच्या आधारे भूखंडाची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात तसेच अजनी पोलिस ठाण्यात उके बंधूंविरोधात गुन्ह्ये दाखल आहेत.याच भूखंडांशी संबंधित गुन्हात ३१ मार्च २०२१ रोजी ईडीने उके बंधूंना अटक केली.याच गुन्ह्यासंबधी नुकतेच उके बंधूंवर मोक्का देखील लावण्यात आला.ही सर्व राजकीय आणि कायदेशीर लढाई सुरु असतानाच उके बंधूंच्या वडीलांचे दुखद निधन झाले.ॲड.सतीश उके हे चार ही भावंडांमध्ये अविवाहित असल्याने व भारतीय जनता पक्षाच्या तीन कद्दावर राजकीय नेत्यांच्या विरोधात निर्भिडपणे कायद्याचा आधार घेऊन त्यांना अडचणीत आणत असल्याने, त्यांचे वडील महादेवराव यांना.ॲड.उके या आपल्या होतकरु मुलावर नितांत अभिमान होता.मात्र,या सर्व राजकीय लढाईत गेल्या दोन वर्षांपासून त्यांची दोन्ही तरुण मुले हे मुंबई कारागृहात बंदिस्त झाल्याने त्यांनी चांगलीच हाय खालली होती.महत्वाचे म्हणजे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवरच भूखंडाच्या संदर्भात गुन्हे दाखल झाल्याने हे कुटूंब अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत जगत असल्याचे,ज्या माध्यमकर्मींनी त्यांच्या घरी भेट दिली त्यांना देखील जाणवले.

(छायाचित्र: उके बंधूंचे पॅरोलसाठी ग्राह्य झालेले कोर्टाचे अनुमती पत्र)

उके कुटूंबिय हे कश्‍याप्रकारे सत्ताधारी राजकीय नेत्याच्या दहशतीत जगत आहेत हे त्यांच्या घरात व जीवनात डोकावल्यानंतर सहज लक्षात येत होते.उके यांचे वडील यांना उके बंधूंना ईडीची अटक झाल्यानंतर रात्रीची झोप लागत नसे.ते रात्रभर बसूनच राहत होते.उके यांच्या आईला देखील तीन महिन्यांपूर्वी ह्दयघात झाल्याचे नातेवाईक यांनी सांगितले.दोन तरुण होतकरु मुले ईडीच्या अटकेत असून ते कधी घरी परततील?याची कोणतीही शाश्‍वती नसल्याने तसेच संपूर्ण कुटूंबियांवरच आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याने उके यांच्या रामेश्‍वरी येथील घरात सतत श्‍मशान शांतता नांदत होती.

सततचा हा तनाव सहन न झाल्यानेच उके यांच्या वडीलांचे निधन झाले.शेवटपर्यंत त्यांचे डोळे मुलांच्या वाटेकडे लागले होते मात्र,त्यांची ही ईच्छा अपूर्ण राहीली.मृत्यूने गाठले तेव्हा देखील आपल्या मुलांसाठी त्यांचे पार्थिव तब्बल चाळीस तास प्रतिक्षेत राहीले.एकाच मुंबई शहरातून,एकाच आर्थिक गुन्ह्यासाठी अटकेत असणारे,एकाच ठिकाणाहून दोन्ही भावांना मात्र नागपूरात वेगवेगळ्या मार्गाने आणण्यात आल्याची माहिती उके यांचे वकील मित्र सांगतात.

महत्वाचे म्हणजे या दोन्ही भावांना वेगवेगळ्या पोलिसांच्या डग्गा गाडीतून वेगवेगळ्या पोलिस संरक्षणात नागपूरात आणण्यात आले.या दोन्ही भावांच्या संरक्षणासाठी आठ-आठ पोलिसांचा स्टाफ होता.वडीलांचे पार्थिव घरी इतक्या तासांपासून अंत्यसंस्कारासाठी प्रतिक्षेत असताना देखील या दोन्ही भावांना विमान किवा रेल्वेच्या प्रवास नाकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.हा खर्च उके बंधू स्टाफसह उचलण्यास तयार असताना देखील त्यांना विमान प्रवास नाकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

डग्गा गाडीने आणले जात असताना देखील अनेक ठिकाणी थांबवत-थांबवत आणण्यात आले!रात्री १० वाजता मुंबई कारागृहातून निघालेले उके बंधूंना शासनाच्या अधिका-यांनी दुस-या दिवशी सायंकाळी ७ वाजता नागपूरला वडीलांच्या अंत्यसंस्काराठी घरी पोहोचवले!वीस तासांचा हा प्रवास उके बंधूंनी कसा केला असावा?कोणत्या मानसिक उद्गवीग्नेतून ते गेले असावेत?याचा अंदाज ही घेता येणार नाही.

रामेश्‍वरी येथील घरी येताच वडीलांचे पार्थिव मानेवाडा श्‍मशान घाटावर नेण्यात आले.चार ही भावडांनी वडीलांना अग्नि दिला.घरी येऊन आंघोळ केली,अंत्यविधीचे संस्कार आटोपले व लगेच पुन्हा त्यांना त्याच डग्गा गाडीतून रात्रीच मुंबईकडे प्रयाण करावे लागले!विवाहित असणारे प्रदीप उके यांच्या पत्नीला दोन वर्षांनंतर आपल्या पतीसोबत सुखदु:खाचे,तान तनावाचे,अडी अडचणीचे दोन शब्द देखील बोलता आले नाही.प्रदीप यांच्या मुलांना पिताचा सहवास क्षणभरही घडला नाही.आरोपी असले तरी उके बंधू हे सत्ताधारी नेत्यांचे आरोपी असल्यानेच असा अमानवीय व्यवहार त्यांच्या वाटेला असल्याचे बोल आता लावले जात आहे.इतर कोणी सामान्य आरोपी असते तर कोर्टाचे शासनाला जे आदेश मिळाले त्याचे पुरेपूर पालन झाले असते,अशी टिका देखील केली जात आहे.

२०१४ च्या निवडणुकीतील शपथपत्रात दोन गुन्हे लपविल्याचे व खोटे शपथपत्र सादर केल्याचे आरोपपत्र ॲड.सतीश उके यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दाखल केली होती.याच प्रकरणात नुकतेच प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी संग्राम.एस.जाधव यांनी फडणवीस यांची ८ सप्टेंबर २०२३ रोजी निर्दोष मुक्तता केली,हे विशेष.

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी  यांच्या नागपूर मतदासंघ तसेच शिवसनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या रामटेक मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान देणा-या दोन स्वतंत्र याचिका काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले व किशोर गजभिये यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केल्या होत्या.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मतदासंघातील विजयावर आक्षेप घेताना नाना पटोले यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता.त्यासोबतच गडकरी यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींचे पालन केले नसल्याचे याचिकेत नमूद केले होते.

गडकरींनी निवडणूक प्रचारावर केलेल्या खर्चाचा हिशेब सादर केलेला नाही.इतर उमेदवारांच्या प्रत्येक टप्प्यातील खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिका-यांनी सादर केला परंतु,गडकरी यांच्या खर्चाचा एकच आकडा दिला.त्यामुळे ही बाब बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा पटोले यांनी केला होता.यासोबतच गडकरी हे निवडणूक आचारसंहितेच्या काळात ‘रोकडे ज्वेलर्स’च्या नव्या शोरुमच्या उद् घाटनाला गेले होते.त्या शोरुमच्या अनेक जाहीराती प्रकाशित झाल्या परंतु,गडकरी यांच्या निवडणूक खर्चात त्याबाबत कोणताही उल्लेख नाही,अथवा याबाबत निवडणूक निर्णय अधिका-यांनी त्याबाबत विचारणा देखील केली नाही,असा दावा करण्यात आला होता.

अनेक मतदान केंद्रावर प्रत्यक्षात झालेले मतदान आणि ईव्हीएमच्या मोजणीत मतदान याच्या आकडेवारीत तफावत असल्याचाही आक्षेप पटोले यांच्यातर्फे घेण्यात आला होता.यामुळे ही निवडणूक बेकायदा ठरविण्याची विनंती त्यांनी न्यायालयात केली होती.ॲड.सतीश उके यांनीच नाना पटोले यांची बाजू न्यायालयात मांडली होती.पुढे गडकरी यांना देखील न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता.

याशिवाय भाजपचे तत्कालीन उर्जामंत्री तसेच विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या विरोधात देखील ॲड.सतीश उके यांनी गंभीर आरोप करीत अनेक पत्रकार परिषदा गाजवल्या होत्या.काेराडी येथील जगदंबा ट्रस्टचे अध्यक्ष पद बळकावणे,विद्यमान पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोराडी जगदंबा संस्थेतील भगवान श्रीरामाच्या जीवनावर आधारिकत सांस्कृतिक केंद्रासाठी तब्बल पाच एकर जागा बेकायदेशीररित्या देणे,उर्जामंत्री असताना उर्जा खात्यातील प्रचंड भ्रष्टाचार,जमीन तसेच नोकरीचे घोटाळे,बावणकुळे यांच्या पत्नीचा पुतण्या असलेले सूरज ताताडे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप प्रेस क्लब येथे ॲड.सतीश उके यांनी महाविकासआघाडीच्या सत्ताकाळात केले होते.याच पत्रकार परिषदेनंतर प्रेस क्लब समोरुनच दोन्ही उके बंधूंना पोलिस विभागाने भूखंडाच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले होते,हे विशेष.

नागपूरातील रवि भवनात रहस्यमयरित्या झालेला न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूच्या तपासाची मागणी देखील नव्याने हाती आलेल्या पुराव्याचा आधारे ॲड.उके हे सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचारासाठी याचिकेद्वारे करणार होते.थोडक्यात,भाजपच्या तिन्ही र्शीषस्थ नेत्यांच्या विरोधात ॲड.उके यांनी चांगलीच जंग छेडली होती मात्र,महाविकासआघाडीच्या काळातच केंद्रिय संस्था असणा-या ईडीने त्यांना अटक केली.तेव्हापासून जामीनासाठी उके बंधूंचा कायदेशीर संघर्ष सुरु असतानाच उके यांचे वडील महादेवराव यांचा मृत्यू झाला व पुन्हा एकदा उके,ईडी,राज्याचे गृहखाते,अमानवीय शासकीय धोरण व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीच्या चर्चेला पुन्हा एकदा पेव फूटले.

फडणवीस यांनी माणुसकीची संधी गमावली:ज्वाला धोटे
राजकीय वैमनस्य किमान मृत्युसारख्या घटनेत हे अलिप्त ठेवणे ही भारतीय संस्कृती असताना उके बंधू यांच्यासोबत जे घडले ते निंदनीय असेच आहे.त्यांच्या वडीलांच्या पार्थिवाला अंत्यसंस्कारासाठी वीस तासांचा अवधी लागणे हे महाराष्ट्रसारख्या पुढारलेल्या राज्याला तरी शोभनीय बाब नाही.माझे वडील विदर्भवीर जांबुवंतराव धोटे ंयांनी देखील एकेकाळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुरजोर राजकीय विरोध केला होता.त्यांची वैचारिक लढाई इतक्या टोकाला गेली की विदर्भात मुख्यमंत्र्यांना पाय ठेऊ देणार नसल्याचा निर्धार जांबुवंतराव धोटे यांनी व्यक्त केला होता.मात्र,जांबुवंतराव धोटे यांच्या आईचे निधन ते येरवडाच्या कारागृहात बंदिस्त असताना झाले,ही बाब मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना कळतातच त्यांनी जेट विमानाची व्यस्था केली व जांबुवंतराव यांची येरवडाच्या कारागृहातून नागपूरला तातडीने पोहोचण्याची व्यवस्था करुन माणूसकीचे दर्शन घडवले होते.विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहे,पोलिस विभाग तसेच विविध प्रशासकीय विभाग ज्यांच्या अधिकाराखाली येतात,त्यांच्या एका सूचनेवर उके बंधूंना तातडीने विमान किवा रेल्वेमार्गाने नागपूर गाठता आले असते मात्र,असे घडले नाही.फडणवीस यांनी माणुसकीची एक नामी संधी गमावली,असेच आता म्हणावे लागेल.

…………………………

 

Latest बातम्या