Homeनागपूर न्यूजगो-रक्षणमध्ये क्रॉक्रिटीकरण!पर्यावरणवाद्यांची नाराजी

गो-रक्षणमध्ये क्रॉक्रिटीकरण!पर्यावरणवाद्यांची नाराजी

Advertisements
Advertisements

हिरवीगार झाडे झाली भुईसपाट!५०० झाडे लावणार:सचिवांचे पर्यावरणवाद्यांना आश्‍वासन

गणेश टेकडी मंदिराचा मलबा गो-रक्षण मंदिरात!तो ही विनामुल्य!

दुपारच्या चटके देणा-या उन्हात गोमातांची सावलीसाठी भटकंती!

बांधकामाचा नकाशा नाही तरीही बांधकाम!

बांधकामासाठी पैसा आला कुठून?पर्यावरणवाद्यांचा प्रश्‍न

नागपूर,ता.७ नोव्हेंबर २०२३: वर्धा रोड येथील गो-रक्षण मंदिराच्या एकूण साढे सात एकर जागेचा वाद न्यायालयात सुरु होता.न्यायालयाने गो-रक्षण संस्थेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर या ठिकाणचे भाडेकरु,गॅस गोडाऊन,पेट्रोल पंप,कारपेटचे दूकान इत्यादी संपूर्ण जागा रिकामी करण्यात आली.मात्र,ही जागा गो-पालनासाठी न्यायालयाने मान्य केली असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरणचे बांधकाम होत असून,टेकडी उड्डाण पूलाचा संपूर्ण मलबा या ठिकाणी आणून टाकण्यात आला आहे.यामुळे येथील शेकडो गोवंश हे दुपारच्या उन्हात सावलीच्या आश्रयासाठी भटकंती करीत असल्याचे दिसून पडतं.इतकंच नव्हे तर इतक्या मोठ्या परिसरातील हिरवाई,ही देखील नष्ट केली जात असून,मोठ्या प्रमाणात अतिशय जुने वृक्षे नामशेष करण्यात आली असल्याने शहरातील काही पर्यावरणवाद्यांनी याबाबत मंदिराच्या सचिवांना विचारणा केली असता,५०० झाडे लावणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

टेकडी मंदिराचा मलबा या ठिकाणी का आणण्यात आला?नागपूर महानगरपालिका जिथे एक घमेले देखील मलबा विनामुल्य,नागरिकांना देत नाही तिथे गो-रक्षण मंदिराला इतके टन मलबा हा विनामुल्य कसा मिळाला?असा प्रश्‍न त्यांनी सचिव प्रसन्ना पातुरकर यांना विचारला असता,ही संपूर्ण जागा समतोल करण्यासाठी मलबा टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या ठिकाणी संपूर्णत:सिमेंट क्राँक्रिटीकरणाचे बांधकाम का केले जात आहे?नेमके काय उभारले जात आहे?या बांधकामाचा नकाशा दाखविण्याची मागणी केली असता,असा कोणताही नकाशा नसल्याचे सांगण्यात आले!!सामान्य माणसाला एखाद्या घराचे बांधकाम करताना प्रशासन नावाच्या ज्या दिव्यातून जावे लागते त्यात सर्वात पहीली पायरी असते ती नकाशा मंजूर करुन घेणे,येथे मात्र,नकाशा शिवाय सिमेंट काँक्रिटीकरणाचे बांधकाम होत असल्याने,आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

गो-रक्षण संस्था देणगीवर चालत असल्याचे सांगितले जाते,असे असताना आता जेसीबीचा खर्च ही संस्था कुठून करतेय?भाडेकरुंना जागा रिकामी करुन देण्यासाठी पैसा कुठून आला?शेकडो टन मलबाची वाहतूक करण्यासाठी पैसा कोणी पुरवला?असा प्रश्‍न त्यांनी केला.१९०६ मध्ये ही जागा गो-रक्षणासाठी दिवाडकर नामक व्यक्तीने संस्थेला दिली होती.आता शंभर वर्षांचा काळखंड लोटला तरी या जागेचे सपाटीकरण करण्याचा विचार संस्थेच्या पदाधिका-यांना आला नाही,किंवा २०१४ पासून या शहरात मेट्रो,उड्डाण पुलांचे काम सुरु आहे,तो मलबा आणून टाकण्यात आला नाही,आता अचानक टेकडी पुलाचा मलबा आणून टाकण्यात आल्याने,शंका उपस्थित केली जात आहे.

याशिवाय संस्थेच्या पदाधिका-यांना झाडे कापण्यासाठी मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी लागत असते,हे देखील माहिती नसल्याचा दावा,पर्यावरणवाद्यांनी केला.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे सुपुत्र सारंग गडकरी हे संस्थेचे अध्यक्ष बनले असून प्रसन्ना पातुरकर सचिव आहेत.सुप्रसिद्ध अधिवक्ते शंशाक मनोहर यांनी ही जागा रिकामी करुन दिली असल्याचे संस्थेचे पदाधिकारी सांगतात मात्र,न्यायालयाने गो-वंशासाठी आश्रय स्थान म्हणून ही जागा दिली असताना आता सिमेंट काँक्रिटचे बांधकाम का केले जात आहे?या काँक्रिटीच्या इमारतीत गोवंश राहणार आहे का?अश्‍या काेणत्याही प्रश्‍नाला उत्तर मिळाले नसल्याचे स्वच्छ असोशिएशनच्या अनुराधा काळे-छाबराणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

(छायाचित्र: गुगल मॅपवरील छायाचित्रात नोव्हेंबर २०१८ साली गोरक्षण मंदिरातील हिरवळ)

शेकडो टन मलबा टाकल्यावर यावर माती टाकण्यात येणार असल्याचे सचिव सांगतात,मात्र यामुळे उन्हाची काहीली अधिक वाढेल व त्याचा मुक्या जनावरांना त्रास होईल,असे पर्यावरणवाद्यांचे म्हणने आहे.

या ठिकाणची सुभाबूळची झाडे कापण्यात येत असल्याचे येथील पदाधिकारी सांगतात मात्र,आमच्याकडे उपलब्ध गुगल मॅपवरील झाडे हे वेगळेच चित्र दाखवित आहेत,असा दावा पर्यावरणवादी करतात.संस्थेच्या पदाधिका-यांना साधे ‘एअर क्वालिटी इंडेक्स’(एक्यूआय)चा अर्थ ही समजला नाही.नुकतेच वायु प्रदुषणाच्या बाबतीत अकोला व नागपूरसाठी आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केली.मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल,बांधकाम,खराब रस्ते,गाड्यांचे प्रदुषण इत्यादी कारणांमुळे नागपूरसह राज्यातील १५ शहरात विकासकामांमुळे धुळीचे लोट वाहत आहे.हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली असताना,शहराच्या मध्यभागी मलबा आणून टाकण्यात आला,त्यावर सिमेंट काँक्रिटचे बांधकाम सुरु आहे,अतिशय जुनी हिरवीगार झाडे सर्रास कापण्यात आली,आरोग्य विभागाने आता नागपूरकरांना मास्क लाऊन घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.लहान मुले,ज्येष्ठ नागरिक यात भरडले जात आहेत मात्र,गो-रक्षण सारखी प्रतिष्ठित संस्था सर्रास या प्रदुषणात वाढ करीत आहे,असा आमचा आरोप आहे.

वर्धा रोडच्या बाजूने असणारी संपूर्ण हिरवीगार झाडे कंत्राटदाराद्वारे कापताना दिसल्याने आश्‍चर्य वाटले व याची चौकशी करण्यास मंदिरात गेले असता,संस्थेच्या पदाधिका-यांनी एका ही प्रश्‍नाचे कायदेशीर उत्तर दिले नाही.गोरक्षक,हिंदूत्वाचा ठेका घेणारे मुका जनावरांना भर उन्हात सावलीसाठी वणवण भटकत ठेऊन,स्वत:मात्र सावलीत छान खुर्च्यांवर विसावले होते.त्यांच्याकडे बांधकामाचा नकाशा तसेच झाडे कापण्याची परवानगी पत्र मागितले असता,कोणताही नकाशा नाही व मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी देखील घेतली नसल्याचे त्यांनी सर्रास सांगितले.

(छायाचित्र: गुगल मॅपवरील छायाचित्रात २०२१ साली गोरक्षण मंदिरातील हिरवळ)

कदाचित मंत्री पुत्रच संस्थेचे अध्यक्ष असल्याने अशी कोणती प्रशासकीय परवानगी घ्यायची गरज संस्थेच्या पदाधिका-यांना वाटली नाही.ही जागा कोणत्याही मंत्री पुत्राची नसून एका धर्मादाय संस्थेची जागा आहे जी न्यायालयाने फक्त गो पालनासाठी ताब्यात दिली आहे.पर्यावरण तसेच पराकोटीचे प्रदुषणासंबंधी आमच्या प्रश्‍नांना सुरवातीला सचिव पातुरकर तसेच बुटी नामक पदाधिका-यांनी अतिशय उद्धटपणे उत्तरे दिली.जागरुक नागरिक म्हणून आमच्या नजरेत गोवंशाची भर उन्हात भटकंती दिसली,पर्यावरणाचा -हास दिसला,यावर प्रश्‍न विचारण्याचा आमचा संवैधानिक हक्क आहे.आम्ही केंद्राच्या ‘एनिमल वेलफेअर बोर्ड’च्या वेबसाईटवर याविषयी माहिती टाकणार आहोत तसेच मनेका गांधी यांच्या संस्थेला देखील गो-रक्षणाच्या नावाखाली त्यांची होणारी पिळवणूक,छळ याची तक्रार दाखल करणार आहोत.

(छायाचित्र: गुगल मॅपवरील छायाचित्रात २०२३ साली गोरक्षण मंदिरातील गायब झालेली हिरवळ!)

अलीकडे बर्डीभागातील अतिशय मोक्याच्या जागेवरील विविध शैक्षणिक,सांस्कृतिक संस्थांवर एखाद्या मंत्र्यांचीच पत्नी,मुले,मुलाचे सासरे आदी अध्यक्ष कसे बनतात आहे?या संस्थेत या पदावर बसण्यासाठी नागपूर शहरात पात्र लोकंच मिळत नाही का?आमचा आरोप आहे,आधी संस्थांवर यानंतर लाख मोलाच्या जागेवर ताबा मिळवण्यासाठीच हा सर्व खटाटोप चालू असून,पर्यावरणाचा -हास आम्ही कोण्याही रितीने खपवून घेणार नाही,गरज पडली तर या मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात दाद मागू,असे अनुसूया काळे-छाबराणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुक्त गोठे बांधतोय-प्रसन्ना पातुरकर(सचिव,गोरक्षण)
गोरक्षण परिसरात मुक्त गोठे बांधली जात आहे.ही नवीन प्रकारची संकल्पना आहे,त्यासाठी बांधकाम सुरु आहे.टेकडी मंदिराचा मलबा हे जागेच्या सपाटीकरणासाठी आणून टाकण्यात आला आहे.त्यावर माती भरली जाईल.जुनी झाडे कापण्यात आली असली तरी ५०० झाडे लावण्यात येतील.याठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी बांधकाम होत असल्याची चर्चा ही निव्वळ अफवाह आहे,संघाकडे रेशिम बाग व महालात स्वत:च्या जागा आहेत.

……………………………………………………..

 

Latest बातम्या