
गडकरी,फडणवीसांच्या उपाययोजनांना लागणार विलंब
नाग नदी सौंदर्यीकरण..जायका अन् अंबाझरी प्रलयावरील उपाययोजनांच्या टायमिंगवर संशयाचे धुके
विवेकानंद स्मारकाची भिंत चुकीचीच:गडकरी यांची कबुली
अंबाझरी पासून नाग नदी मार्गावरील सर्वच अतिक्रमण हटवणार:सेंट्रल मॉलचेही अतिक्रमण तोडणार:गडकरींचे आश्वासन
स्केटिंग रिंकवरील पार्किंग तोडणार:तत्कालीन नासुप्र अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करणार का?पिडीतांचा राजकीय नेत्यांना प्रश्न
अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी ३२.४२ कोटी मंजूर
क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल, रस्त्यांसाठी २३४.२१ कोटी
२६६.६३ कोटी रुपयांत पूर्ण करणार सर्व कामे: नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
नागपूर,ता.४ नोव्हेंबर २०२३: २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या महाप्रलयानंतर अंबाझरी ते पंचशील चौकापर्यंत जी ‘न भूतो ना भविष्यती’त्राही-त्राही माजली,त्यावर राजकीय तसेच प्रशासकीयस्तरावर प्रभावी उपाययोजनांची विधिवत घोषणा आज सायंकाळी गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत झाली असली तरी, या संपूर्ण उपाययोजनांच्या अंमलबजावणीत किमान दीड वर्षांचा कालावधी लागणार असल्याने,पुढील पावसाळ्याची चांगलीच धास्ती पूर पिडीतांनी घेतली असून,स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जागतिक तापमानामुळे बिघडलेले निसर्गचक्र यांचा उल्लेख करीत,आता अश्या आपदा वारंवार येण्याची शक्यता वर्तवल्याने, अंबाझरी पूर पिडीतांची धास्ती वाढली तसेस, पूर्वीपासून उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्याने संताप वाढला असल्याचा सूर पूर पिडीतांच्या बैठकीत उमटल्याची माहिती समोर आली आहे.
२२ सप्टेंबर २०२३ रोजी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत चार तासांमध्ये ढगफुटीसदृश ११२ मिमी पाऊस झाला. त्यामुळे नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या भिंती तसेच नाल्यांच्या भिंती क्षतीग्रस्त होऊन, लगतच्या परिसरात पाणी शिरले. यामुळे नाग नदी भागातील अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले.या अनुषंगाने नागपुर महानगर पालिकेने काही उपाययोजना यापूर्वीच केल्या असून, याशिवाय अन्य कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यात अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणावर जोर देण्यात आला असून अंबाझरी धरण हे भोसलेकालीन असून, अंदाजे दीडशे वर्षे जुने असल्याचे त्यांनी सांगितले.या धरणाची लांबी ९४२ मीटर असून, या धरणाला लागून १४० मीटर लांबीचा दगडी सांडवा बनवण्यात आलेला आहे.प्राधान्यक्रमाने सांडव्याच्या जीर्ण भिंतीला कॉक्रिट जॅकेटिंग केले जाणार आहे.सांडव्याच्या खालील बाजूला आरसीसी रिटेनिंग वॉल बनविली जाणार आहे.
अंबाझरी धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून २१.०७ कोटी रकमेच्या प्रस्तावास पाटबंधारे विभागातर्फे मान्यता देण्यात आली आहे. पाटबंधारे विभागातर्फे हे काम केले जाईल,अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय माती धरणाचे क्रॉस सेक्शन दुरुस्ती व दगडी पिचिंगची कामे धरणाच्या खालील बाजूस टो ड्रेन याकरिता पाटबंधारे विभाग अंदाजे ११.३५ कोटी रुपये खर्च करेल.धरणाच्या पातळीपासून पुढील १०० मीटर पर्यंत कोणताही अडथळा निर्माण न होता प्रवाह सुरळीत होण्याच्या दृष्टीने पाण्याच्या विसर्गाबाबत हायड्रोलिक कॅल्कुलेशन करून, आवश्यक बदल करून ही कामे केली जातील.
नागपूर सुधार प्रन्यासद्वारे नाग नदीवर उभारण्यात आलेल्या स्केटिंगरिंकचे पार्किंग बांधकामाबाबत नागपूर सुधार प्रन्यासला पाण्याचा निचरा योग्यरीत्या होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याचे फडणवीस म्हणाले.स्केटिंग रिंकसाठी नाग नदीच्या पुलावर बांधण्यात आलेली पार्किंग तोडणयात येईल,असे आश्वासन त्यांनी दिले.पूर पिडीत नागरिकांनी स्केटिंक रिंकसाठी बांधण्यात आलेल्या या बेकायदेशीर पार्किंगवर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवला आहे,हे विशेष.
याशिवाय नाग नदीच्या अंबाझरी ओव्हरफलो ते पंचशील सिनेमापर्यंतच्या क्षतिग्रस्त संरक्षण भिंतीचे बांधकाम व खोलीकरण करण्यात येईल.अंबाझरी ओव्हरफ्लो ते पंचशील टॉकीजपर्यंतच्या नाल्याची एकूण लांबी ४.८० किमी आहे. यापैकी २.३७ किमी लांबीच्या दोन्ही बाजूच्या सुरक्षा भिंती अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या आहेत.
या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेतर्फे २३४.२१ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल जिल्हाधिका-यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये,क्षतिग्रस्त नदी-नाल्याच्या भिंतीचे बांधकाम,क्षतिग्रस्त रस्त्याचे डांबरीकरण पुलाचे पुनर्बांधकाम इत्यादी कामे केली जातील.
नाग नदीचा प्रवाह सुरळीत होण्याच्या दृष्टीने नदीची वहन क्षमता वाढवण्यासाठी अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंट ते पंचशील सिनेमापर्यंतच्या ४.८० किमीच्या नदीच्या पात्राचे एक ते दीड मीटर खोलीकरण करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.
याशिवाय, शहरातील सर्व नदी-नाल्यांविषयी आपत्ती निवारणासाठी पूर्वतयारीचा (डिझास्टर मिटिगेशन मेजर्स) भाग म्हणून, नागपूर शहरातील सर्व नदी-नाले यांचा एकत्रित विचार करून त्यांच्यावर रिटेनिंग वॉल्स, पूल आणि अन्य बांधकामे तसेच व्यवस्था करण्यासंबंधी ८४८.७२ कोटी रुपयांचा प्रस्ताव नागपूर महापालिकेने जिल्हाधिका-यांमार्फत राज्य शासनाला पाठविलेला आहे,तो मंजुर करण्यात आला असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले,की नाग नदीमध्ये पिल्लर हे मधोमध आहेत,पाण्याच्या प्रवाहात ते आडवे येणार नाहीत या अनुषंगाने गांधी नगर ते पंचशील चौकापर्यंत नाग नदीमधील सर्व पिल्लर दुरुस्त केले जातील.अंबाझरी ओवर फ्लो पॉईंटवर ४ कोटी रुपये खर्च करुन ॲटोमॅटिक गेट बसविण्यात येईल,यामुळे अचानक संकट आले तर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यावर मात करता येईल.याशिवाय अंबाझरी तलावातील पाणी हे जयताळा मधील एसआरपी कॅम्पपर्यत शुद्ध करुन वापरता येईल का?यावर उपाययोजना शोधली जात आहे.
अंबाझरी ते एम्प्रेस मिलपर्यत पाईप लाईन जात असून त्याद्वारे शुक्रवारी तलाव भरला जात असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाही.नाग नदीचे खोलीकरण करण्यात येईल.एक मीटरपर्यंत नाग नदीत गाळ भरला आहे,तो सगळा बाहेर काढला जाईल.जापानच्या जायका कंपनीसोबत नाग नदीच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प मंजुर झाला आहे.परिणामी २४ कोटींच्या या प्रकल्पात,राज्य शासानाच्या उपाययोजनांचे ओव्हर लॅपिंग होणार नाही,तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही हे तपासल्या जाईल.
या प्रलयामुळे लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अंबाझरी ओव्हर फ्लोवरील स्वामी विवेकानंद स्मारकचे बांधकाम याविषयी प्रश्न केला असता,पाटबंधारे विभागाकडून तांत्रिक बाबीविषयी मत घेतले असून या ठिकाणावरील पुलाची उंची वाढवली जाईल,हा पूल उंच असता तर पाणी साचून चोकअप झाले नसते,अशी कबुली गडकरी यांनी दिली.स्वामी विवेकानंद स्मारकाचा पूल हा खाली गेला आहे.एक,दोन ती कॉलम झाले आहेत.बाहेर जे गेलं जे पाणी,हल्दीरामच्या मागे,वर्मा ले आऊटमध्ये,तो पूल जर मोठा असता तर पूर आला नसता.याचा ही अभ्यास करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.नाग नदीसोबतच पिवळी नदी,पोरा नदीविषयी देखील धोरण राबविले जाईल,असे त्यांनी सांगितले.
नाग नदीच्या आत मध्ये व बाजूला अतिक्रमण असेल तर ते काढले जातील असे गडकरी म्हणाले.अंलकार टॉकिजसमोरील सेंट्रल मॉलच्या मालकाने चक्क लोखंडी बांधकाम करुन नाग नदीचा प्रवाह अवरुद्ध करुन रॅम बांधला आहे,तो देखील काढण्यात येईल का?असा प्रश्न विचारला असता,नाग नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करण्यात जे जे अडथळे आहेत ते सर्व काढले जातील,असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
मात्र,क्रेसी कॅसलचा उल्लेख टाळण्यात आला.हल्दीराम यांच्याकडून ही जागा परत घेण्यात आली असून महामेट्रोतर्फे आता याच ठिकाणी ‘सेव्हन वंडर्स’हा प्रकल्प उभारला जात आहे,हे विशेष!
जलसंपदा विभागातर्फे मार्च २०२१ मध्ये अंबाझरीवर ४.१४ कोटींचा खर्च करण्यात आला,यात काँक्रिट रिपेरिंग,काँक्रिट रिफिलिंग इत्यादीवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले,आता फेज-२ अंतर्गत याच विभागातर्फे १४.६ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.२०२१ मध्येच या विभागातर्फे पूरप्रलयासंबंधी प्रभावी उपाययोजना फेज-१ च्या कार्यातच आखल्या असत्या तर आज हजारो लोकांची आयुष्याची जमा पुंजी वाचली असती,असा संताप पूरग्रस्त पिडीत त्यांच्या दररोजच्या बैठकीत व्यक्त करतात,यावर प्रश्न केला असता,आता हे जे काही काम करतोय,परवा जो महाप्रलय झाला त्याच्याशी थेट संबंध याचा येत नाही,आता आपण मजबुतीकरण करतोय,कारण दीडशे वर्ष जुने हे धरण आहे,२२ सप्टेंबर रोजी जो महाप्रलय आला,त्याच्यापेक्षा अधिक प्रलय येऊ शकतो.एक अफवाह उठली होती की धरणाची भिंतीला तडे गेले,त्याला तडे गेले नव्हते मात्र,दीडशे वर्ष जुने हे धरण असून वेगवेगळ्या वेळी त्याला पिचिंग केली,इतर कामे केली मात्र,आपल्याला एक होलिस्टिक व्यूह घेतला पाहीजे,म्हणून पूर्वतयारी केली जात असल्याचे उत्तर फडणवीस यांनी दिले.
तर ,जलसंपदा विभागाचा यात काही दोष नसल्याचे गडकरी म्हणाले.पहीली गोष्ट अंबाझरी तलावाचा मालक कोण?हे कोणाचं बाळ आहे?असा मिश्किल प्रश्न करीत,मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे पण याचा मालक कोण?हेच अद्याप निश्चित झाले नाही.मेट्रोवाले बसले आहेत,त्यांना माहिती आहे,फूटाळा आणि अंबाझरी तलाव हे कोणाचं बाळ आहे?याची निश्चिती झाली नव्हती.पहील्यांदा या बैठकीत मनपा आयुक्तांनी सांगितलं की अंबाझरी ही मनपाची जबाबदारी आहे,याची ओनरशिप आता ठरली आहे.मधल्या काळात जे काम पाटबंधारे विभागाला मिळालं होतं,ते नॉमिनेशन बेसिसवर मिळालं होतं.यामुळे आता जलसंपदा विभागाने जो मातीचा बंधारा आहे,त्याच्या संदर्भात सर्व तांत्रिक उपाययोजना केल्या गेल्या आहेत.हा बंधारा जर फूटला असता तर वेगळ्या समस्या उद भवल्या असत्या,हे गडकरी उत्तरले.
नाग नदीचा प्रपोजल तो तयार झाला आहे,तो हायड्रोलॉजिकल अभ्यास करुनच तयार झाला असल्याचे फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.‘जायका’ या संस्थेचा हा अप्रोचच आहे की होलिस्टिक अप्रोच असायला हवा,स्पेशलाईज्ड तसेच जनरल कंन्सलटंट असे दोन्ही सल्लागार ठेऊन संपूर्ण प्रकल्प राबविला जाईल.हा प्रकल्प कंन्सट्रक्शनचा नसून एका नदीच्या रिक्लेम करण्याचा,त्यांची पूर्णत:हायड्रोलॉजी पूर्ण प्रवाह रिक्लेम करण्याचा प्रकल्प आहे.
छत्रपती चौकातील पूलाखाली सातत्याने पाणी साचण्याविषयी छेडले असता,तेथील नदीचे देखील एक मीटरपर्यंत खोलीकरण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे गडकरी म्हणाले.
पंचनामे आणि तोकडी आर्थिक मदत याविषयी विचारले असता,आपल्याकडे एनडीआरएफने प्रत्येक प्रकारचे मदतीचे नियम तयार केले आहे.त्या मदतीने लोकांचं नुकसान भागल्या जाणार नाही,लोकांचं नुकसान मोठं आहे.,पण शेवटी कुठल्या तरी नियमांतर्गच सरकार मदत करु शकते,नियमापलीकडे सरकार मदत करु शकत नाही.त्या नियमांमध्ये जी मदत बसते ती सरकारतर्फे केली जात आहे,अर्थातच यामुळे लोकांचं झालेलं नुकसान हे भरुन निघू शकत नाही,याची आम्हाला कल्पना असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सिमेंट काँक्रिट रस्त्यांमुळे देखील लोकांच्या घरात पाणी शिरले,असा प्रश्न केला असता,अश्या फालतू प्रश्नाला कोणतेही उत्तर नसल्याचे गडकरी म्हणाले.११२ मीमी पाणी काय सिमेंट काँक्रिट रस्तयांनी वरुन बोलावले का?अशी मिश्किली त्यांनी केली.तांत्रिक अभ्यास केला आहे त्यात धरणाची पाणी साठवण्याची क्षमता किती?पाण्याचा प्रवाह किती?पाण्याचा प्रवाह कुठे अडतो,पुलाच्या भिंतींवर कुठे अतिक्रमण झालं आहे?भिंती कुठे कोसळल्या आहेत?कोणाच्या घरात पाणी शिरले?सगळ्या प्रकारचा तांत्रिक अभ्यास केला,अभियंते तिथपर्यंत गेले,सिमेंट काँक्रिट रस्त्यांचा आलेल्या पुराशी काहीही संबंध नसल्याचे उत्तर गडकरी यांनी दिले.
विमानातून अंबाझरी परिसर बघितला असता फक्त २० ते २५ टक्के क्षेत्रात पाणी आहे,७५ टक्के रिकाम्या आहेत.त्यावेळी मी सूचवलं होतं.आपण त्याचा मुरुम काढायचा आणि पाण्याची साठवणूक क्षमता वाढवली तर पाणी ओव्हर फ्लो जमा राहील आणि ते पाणी आपण सीआरएफ कॅम्पपर्यत जयताळाच्या भागात वापरण्यासाठी द्यायचं.मात्र सर्वात आधी मातीच्या बांधाला मजबुत करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.हिंगणा,एमआयडीसीने अंबाझरीचे पाणी वापरणे सुरु केलं तर अंबाझरी तलावाच्या पाण्याचा विनियोग होईल,असे फडणवीस म्हणाले.
वाडीमध्ये ड्रेनेज लाईन नसल्यामुळे तेथील संपूर्ण ड्रेनेज अंबाझरी तलावात येत असल्याबद्दल प्रश्न विचारला असता,यावर वाडीची योजना तयार झाली असून ,वाडी आणि तेथीली खेडे गावामधून येणारे पाणी हळूहळू बंद करण्यात येईल, लवकरच इटीपी बनेल व तेथील ड्रेनेज अंबाझरीत येण्याचे थांबेल असे गडकरी म्हणाले.
एका प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणाले की जे पाणी अंबाझरीचे वाहून नेण्याचे काम आहे ते येत्या पावसाळ्यापर्यंत होऊ शकतं मात्र अंबाझरीच्या बंधा-याच्या मजबुतीकरणाच्या कामाला दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो,असे फडणवीस म्हणाले.
शहराच्या जीर्ण ड्रेनेज लाईन्ससाठी काय योजना आहेत?असा प्रश्न केला असता,‘जायका’मध्ये २४०० कोटींचा प्रकल्प हा मंजूर झाला आहे,त्यात नागपूरातील तीन विधानसभेतील ड्रेनेजच काम त्यात आलं.तीन विधानसभा सुटल्या, त्यात नासुप्रचा भाग आला आणि मनपाचा भाग आला.जो सल्लागार पक्का होईल त्याच्याकडून इंटीग्रेटेड ड्रेनेज प्लान तयार करण्यात येईल,या तीन क्षेत्रात जे लागेल त्याचा खर्च मनपा आणि नासुप्र वाटून घेतील.तीन मधला जायकाकडून करुन घेऊन पूर्ण नागपूर शहराचा इंटिग्रेटेड ड्रेनेजचा प्लान होईल.
दुसरे जिल्हाधिकारी यांनी अन्य पोरा,पिवळी नदीविषयी जो प्रस्ताव पाठवला आहे,तो देखील २८० कोटींचा प्रस्ताव मंजूर करुन,त्या नद्यांचे देखील खोलीकरण करुन दोन्ही बाजूने बांधू,एकंदरित पहील्यायंदा या विषयावर एवढ्या खोलात लक्ष दिल्या गेल आहे,अशी कबुली देत ही समस्या जी झाली ती पुन्हा उद् भवू नये,पाणी एकाच्याही घरात शिरणार नाही,अंबाझरीचं,बाकीच्या दृष्टिनेही आपण काम करतोय,यासाठीच योजनांची माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद असल्याचे गडकरी म्हणाले.
थोडक्यात,नाग नदीच्या सौंदर्यीकरणरासाठी जपानच्या ‘जायकाचे’ २४०० कोटी आणि राज्य शासनातर्फे अंबाझरी,नाग नदीवरील उपायोजना यांच्यात गडकरी म्हणाले तसे
दोन्ही कामात ओव्हर लॅपिंग होऊ नये म्हणून गडकरी व फडणवीस यांच्या समन्वयातून आता अंबाझरी महाप्रलयावरील उपाययोजना राबविल्या जात आहे .त्याच्या टायमिंगबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहे.स्वप्नी पडलेल्या नाग नदीच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प रेटण्यात, राज्य शासनाच्या उपाययोजनांचे अडथळे येऊ नये यासाठी हा ‘समन्वय’साधण्यात आला आहे का?अशी शंका उपस्थित केली जात आहे.या मागे खरंच पिडीत पूरग्रस्तांच्या हिताचा विचार आहे की कोट्यावधींचा प्रकल्प नाग नदीत वाहून जाऊ नये,हा विचार आहे?अशी शंका घेण्यात येत आहे.

(छायाचित्र: गडकरी,फडणवीस यांची पत्रकार परिषद लाईव्ह बघताना अंबाझरीचे पूरग्रस्त नागरिक)
महत्वाचे म्हणजे नासुप्रच्या ‘चिकाटे’नामक ज्या दिवंगत अधिका-यांनी अट्टहासाने कार्पोरेशन कॉलनीतील आपल्या वास्तव्याचा दुरुपयोग करुन स्केटिंग संस्थेनी नासुप्रला ९९ वर्षांसाठी एक रुपया लीजने दिलेल्या निर्धारित जागेवर, आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंक न बांधता मैदानात इतरत्र जागेवर बांधली,नाग नदीच्या पुलावर अनाधिकृत पार्किंक बांधली,त्याला ज्या अधिका-यांनी सहमती दर्शवली,नियमात बसवले,अश्या अधिका-यांवर गडकरी,फडणवीस कारवाई करतील का?पिडीत पूरग्रस्तांच्या उधवस्तेसाठी दोषी धरतील का?असा प्रश्न विचारला जात आहे.केवळ निसर्गावर दोष टोलवून बेमुरव्वत प्रशासकीय अधिका-यांची बेपवाई झाकता येत नाही.ती खपवून देखील घेतली जाणार नसल्याचा निर्धार ही पिडीतांच्या बैठकीत व्यक्त झाला.
सर्वात महत्वाचे म्हणजे,येणारे वर्ष हे लोकसभा व विधान सभा निवडणूकीचे असल्याने मतदार नागरिकांची नाराजी कोणत्याही राजकीय नेत्याला परवडणारी नसल्यानेच शहरातील दोन्ही शीर्षस्थ नेत्यांनी, नागरिकांनी भोगलेल्या संकटावर आता गांर्भीयाने उपाययोजना राबविण्याची तयारी दर्शवली आहे.हे निवडणूकीचे वर्ष नसते तर नेते व मुर्दाड प्रशासन यांनी एवढीच तत्परता दाखवली असती का?असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे,आज गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडलेली पत्र परिषद, पूर पडीतांनी लाईव्ह मोठ्या पडद्यावर बघितली.या नेत्यांच्या आश्वासनांवर अनेकांना अद्याप ही विश्वास नसल्याचे वास्तव समोर आले.

आमचे चॅनल subscribe करा