Homeनागपूर न्यूजमेडीकलमधील मृत्यूचे प्रसिद्ध केलेले आकडे चुकीचे :जिल्हाधिकारी

मेडीकलमधील मृत्यूचे प्रसिद्ध केलेले आकडे चुकीचे :जिल्हाधिकारी


नागपूरातील तिन्ही शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा नाही

१९०० बेड,२०० बेड आयसीयूचे,भर्ती होणारे रुग्ण मात्र साढे चार हजारच्या वर!

लवकरच रिक्त पदे भरणार:औषधांची टंचाई हे मिथ

नांदेड रुग्णालयातील अधिष्ठातासोबतचा व्यवहार निंदनीयच:डॉ.राज गजभिये

नागपूर,ता.५ नोव्हेंबर २०२३: नांदेड येथील विष्णुपुरीतील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी घडली यात १२ नवजात बालकांचा समावेश होता.या घटनेमुळे अवघे महाराष्ट्र हळहळले.या पाशर्श्वभूमीवर नागपूरातील मेडीकल व मेयाे या दोन्ही शासकीय रुग्णालयात मागील दोन-तीन दिवसात मृत्यू पावलेल्या रुग्णांचा आकडा सातत्याने विविध माध्यमे प्रसिद्ध करीत आहेत,परिणामी जिल्हाकारी व स्वत: मेडीकलचे एकेकाळी विद्यार्थी असणारे डॉ.विपीन इटनकर तसेच मेडीकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांनी आज गुरुवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणा-या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा चुकीचा असल्याचे सांगितले तसेच एकूण रुग्ण भर्ती बघितल्यास हा आकडा फक्त ८.८ टक्क्यांच्या जवळपास असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी बोलताना डॉ.विपीन इटनकर म्हणाले,की रुग्णांच्या मृत्यूंचं आम्ही विश्‍लेषण केले असता काल दिवसभरामध्ये जवळपास १२ रुग्णांचा मृत्यू झाला.यातील ११ मृत्यू हे आयसीयूमधील रुग्णांचा झाला असून एक मृत्यू हा वॉर्डमध्ये झाला.यामध्ये काही रुग्णांना ब्रेन स्ट्रोक आला होता.काहींनी विष प्राशन केले होते.काहींना ह्दयासंबंधीचे गंभीर आजार होते.काहींना मधुमेहमुळे संपूर्ण शरीरात संक्रमण पसरले होते.काहींना अर्धा लकवा होता ज्यामुळे त्यांची श्‍वास नलिका अवरुद्ध झाली होती.

याचा अर्थ ज्या रुग्णांचा मृत्यू झाला ते अति गंभीर आजाराचे रुग्ण होते.रुग्ण चालत आले व नंतर त्यांचा मृत्यू झाला असे घडले नाही.ज्या रुग्णांचा मृत्यू होतो ते अति गंभीर आजारांचे रुग्ण असतात,असा खुलासा डॉ.इटनकर यांनी केला.कोणत्याही मेडीकल रुग्णालयातील अति दक्षता विभागात दाखल होणारा रुग्ण हा अति गंभीर असतो.वार्डात आणि अति दक्षता विभागात दाखल होणा-या रुग्णामध्ये फरक असतो,असे ते म्हणाले.

दर महिन्याला मृत्यूचे प्रमाण सांगताना, मेडीकलमध्ये मागील महिन्यात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत जवळपास ४४० मृत्यू झाले.याचा अर्थ दिवसाला दहा ते बारा मृत्यू झाले.यातील सर्वाधिक मृत्यू हे आयसीयूमधील आहेत.महत्वाचे म्हणजे सर्वाधिक रुग्ण हे खासगी रुग्णालयातून रेफर झालेले असतात.आर्थिक कुवत संपल्याने रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये भर्ती होताना दिसतात.शंभर रुग्ण भर्ती होत असतील तर त्यातील मृत्यू दर हा फक्त ८.८ टक्के असल्याचे यावेळी डॉ.इटनकर यांनी सांगितले.

जानेवरी महिन्यात साढे चार हजार रुग्ण भर्ती झाले त्यातील ३९५ रुग्ण मृत्यू पावले.फेब्रुवरीत ४,१०९ रुग्ण भर्ती झाले त्यातील ३९० रुग्णांचा मृत्यू झाला.थोडक्यात, जानेवरी ते सप्टेंबर पर्यंत दर महिन्यात साढे चार हजार ते पाच हजार रुग्ण मेडीकलमध्ये भर्ती झाले.सप्टेंबरमध्ये तर ५,८०६ रुग्ण मेडीकलमध्ये भर्ती झाले,मूळात मेडीकल हे १९०० बेडचेच रुग्णालय आहे.याशिवाय ज्या रुग्णांचा मृत्यू होतो त्याची ऑडीट रिपोर्ट तयार केली जात असते.यात मृत्यूचे नेमके कारण विशद केलेली असतात.यात डॉक्टर्सने कर्तव्यात कसूर केली आहे का?याचाही उहापोह केलेला असताे.याचाच अर्थ मेयो रुग्णालयात ५ ते ७ रुग्णांचा तर मेडीकल हे मेयोपेक्षा मोठे रुग्णालय असल्याने दररोज ७ ते १४ रुग्णांचा मृत्यू होत असतो,असे डॉ.इटनकर यांनी स्पष्ट केले.ही सर्व खुली कागदपत्रे असून कोणालाही उपलब्ध होऊ शकते.याचा अहवाल शासनाला देखील पाठवला जात असतो.

याशिवाय माध्यमांमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले मात्र या वृत्तामध्येही तथ्य नसल्याचे डॉ.इटनकर म्हणाले.स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच निर्देश आहेत की कुठल्याही प्रकारे औषधांचा पुरवठा शासकीय रुग्णालयांमध्ये कमी नाही झाला पाहिजे.तांत्रिक बाबींचीही पूर्तता असली पाहिजे.मेडीकलमध्ये पुढील ३ महिन्यांसाठी औषधे आज ही उपलब्ध आहेत.महत्वाचे म्हणजे मागील आठवड्यातच मेडीकलला १३ कोटी,सुपर स्पेशलिटीला १३ कोटी आणि मेयोला ८ कोटी रुपयांचे असे ३४ कोटींचे अनुदान मंजूर झाले असून खरेदी प्रक्रिया देखील सुरु आहे.त्यामुळे औषधांचा तुटवडा असल्याचे वृत्त हे चुकीचे असल्याचे डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले.

तिसरे वृत्त सातत्याने शासकीय रुग्णालयांमध्ये कर्मचा-यांच्या कमतरतेविषयी प्रसिद्ध होत आहे.यात मात्र तथ्य असल्याचे डॉ.इटनकर म्हणाले.पण त्यावर देखील उपाय आहे.शासनातर्फे नर्सिंग स्टाफची परिक्षा पार पडली असून कागदपत्रांची छाननी प्रक्रिया सुरु आहे.२३३ परिचारिका पुढील १५ दिवस ते एका महिन्यात रुजू होणार आहेत. चतुर्थ श्रेणीतील ५११ रिक्त पदांसाठी स्वच्छता कर्मचा-यांसाठी जाहिरात काढली असून ‘आयवीपीएस’ नावाच्या कंपनीसोबत सामंजस्य करार झालेला आहे,पुढील एक ते दीड महिन्यात त्यांचे अर्ज स्वीकारुन स्वच्छता कर्मचा-यांची रिक्त पदे देखील भरली जाणार असल्याचे डॉ.इटनकर यांनी स्पष्ट केलेे.महाराष्ट्रातील पहीला नागपूर जिल्हा असा आहे जिथे चतुर्थ श्रेणीतील भर्ती सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राहीला प्रश्‍न मूलभूत संसाधनांचा तर मागील अधिवेशनात नागपूरचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० कोटी मेडीकल व ५०० कोटी मेयोला मंजूर केले असून,निविदा पार पडल्या असून वर्क ऑर्डर देखील निघाल्या अाहेत. काही ठिकाणी .कामे देखील सुरु झाली असल्याची माहिती डॉ.इटनकर यांनी दिली.

महत्वाचे म्हणजे जितके पण शासकीय रुग्णालये आहेत तिथे वैद्यकीय क्षेत्रातले सर्वात गुणी डॉक्टर्स रुजू होत असतात.श्रेणी-१,श्रेणी २,श्रेणी ३ मधील डॉक्टर्स,परिचारिका या सर्वांना शासकीय रुग्णालये हवी असतात.या रुग्णालयांमध्ये श्रीमंत उपचार घेत नाहीत,ही रुग्णालये गोर गरीबांवर उपचार करीत असते.त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मृत्यूला घेऊन प्रसिद्ध होणारे वृत्त हे चुकीचे असल्याचे डॉ.इटनकर म्हणाले.

अति दक्षता विभागात सर्वाधिक अपघातात गंभीर जखमी झालेले रुग्ण येत असतात.त्यात कोणाचा मेंदू बाहेर निघाला आहे,कोणाच्या आतड्या फाटलेल्या अवस्थेत आढळतात.कोणाला गंभीर न्यूमोनिया झालेला असतो.प्रत्येक रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असतो तरी देखील सात टक्के मृत्यू होत असतो,जे स्वीकार्य अाहे.मेडीकलच्या संशोधनामध्ये,आकडेवारीमध्ये त्याचा उल्लेख असून तो मान्य केला जाऊ शकतो.थोडक्यात ,नागपूरातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत आहेत,औषधसाठा ही पुरेसा आहे.डॉक्टर्स उपलब्ध आहेत.रिक्त पदे देखील लवकरच भरली जातील.याबाबतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने फॉलोअप घेत असल्याचे याप्रसंगी डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले.

गोर गरीब रुग्णांना चांगल्यात चांगली सुविधा देण्यासाठी शासकीय रुग्णालये तत्पर आहेत, त्यामुळे कसलीच भीती न बाळगता नागरिकांनी व रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे,असे आवाहन करीत,त्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यात शासकीय रुग्णालये सक्षम असल्याचे डॉ.इटनकर म्हणाले.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अधिष्ठातांचा घेराव आंदोलना विषयी छेडले असता,लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य असल्याचे मेडीकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये म्हणाले.चुकीचे वृत्त जे पसरले आहे ते बरोबर करण्याची जबाबदारी माध्यमांवरच असल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये पळवून नेणारे एजेंट याबाबत विचारले असता,अशा घटना घडल्या असल्याचे त्यांनी कबूल केले मात्र,अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी देखील चर्चा झाली असून, त्यांनी झोन ४ चे डीएसपी सागर यांना मेडीकलचा सर्व्हे करण्याचे निर्देश दिले असल्याचे डॉ.गजभिये यांनी सांगितले.या पूर्वी देखील असे दलाल पकडून देण्यात आले आहेत.जे दलाल किवा खासगी रुग्णवाहिका ,मेडीकल मधील रुग्ण ज्या खासगी रुग्णालयांमध्ये किवा खासगी पॅथोलॉजी लॅब्समध्ये घेऊन जातात,त्या खासगी रुग्णालये तसेच पॅथोलॉजी लॅब्सवर देखील कारवाई करण्याची मागणी याप्रसंगी डॉ.गजभिये यांनी केली.

यावर लवकरच ४० लाखांच्या बजेटमधून सीसीटीव्ही मेडीकल परिसरात लागणार असून प्रत्येक हालचाल आता अधिष्ठाता त्यांच्या कक्षामध्ये बसून टिपणार असल्याचे डॉ.इटनकर म्हणाले.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑगस्टमधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याला मंजुरी दिली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी याप्रसंगी सांगितले.

नांदेड मध्ये शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना खराट्याने शौचालय स्वच्छ करण्यास सांगितले व त्याचा व्हिडीयो व्हायरल केला या घटनेकडे लक्ष वेधले असता,ही अतिशय निषेधार्ह्य घटना असल्याचे डॉ.राज गजभिये म्हणाले.मी अधिष्ठाता म्हणून या घटनेचा निषेध करतो.डॉक्टर्स,मार्ड तसेच नर्सिंगच्या संघटनांनी देखील याचा निषेध केला आहे.अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नये याची राजकीय पक्षांनी काळजी घ्यावी अशी अपेक्षा डॉ.गजभिये यांनी व्यक्त केली.

रुग्णांना मिळणारी वागणूक,हेलसांड,कर्तव्य त्रृटी इत्यादी अनेक प्रश्‍नांवर डॉ.इटनकर यांनी मनमोकळी उत्तरे दिली.१९०० खाटा असलेल्या रुग्णालयात साढे चार हजारच्या वर रुग्ण दाखल होतात.फक्त नागपूर किवा विदर्भातून नव्हे तर आजूबाजूच्या अनेक राज्यातून रुग्ण नागपूरातील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होत असतात.प्रत्येक १०० खाटां मागे फक्त २ डॉक्टर्स असल्याचे ते म्हणाले.याचा देखील विचार व्हायला हवा.

एकाच पदावर मागील अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसणा-या अधिकारी,कर्मचारी वर्गावर विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी याची देखील दखल घेतली जाईल,असे सांगितले.

मेडीकल परिसरातील नव्या इमारतीसाठी मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी मिळाली असून लवकरच काम सुरु होणार असल्याचे ते म्हणाले.यावर २५० झाडांचे पुर्नरोपण करण्यात येणार का?असा प्रश्‍न विचारला असता आम्ही साढे सात हजार झाडांचे रोपण केले असून उरलेल्या १३५० झाडांचे देखील रोपण करणार असल्याचे उत्तर डॉ.राज गजभिये यांनी दिले.

नागपूरात शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचा आकडा प्रसिद्ध करण्याचा अधिकार माध्यमांना निश्‍चितच आहे मात्र अधिष्ठाता यांच्यासोबत चर्चा करुन प्रसिद्ध करण्याचे आवाहन याप्रसंगी डॉ.इटनकर यांनी माध्यमकर्मींना केले.माध्यमांपासून काहीही लपत नाही मात्र एका वृत्त वाहीनीने नागपूरात शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात ६३ मृत्यू झाल्याचे चुकीचे वृत्त प्रसारित केले,हे बरोबर नाही,अशा शब्दात डॉ.इटनकर यांनी खंत व्यक्त केली.
……………..

 

 

Latest बातम्या