केंद्रिय मंत्र्यांच्या भाषेत कंत्राटदारांची अरेरावी!
कोणाच्या आर्शिवादाने कंत्राटदारांना आली मगरुरी?पर्यावरणवाद्यांचा सवाल
राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागातर्फे बांधकामांसाठी तोडल्या जाणा-या झाडांबाबत बैठकीचे होते आयोजन
लोकसंख्या कमी करा उड्डाण पूल,मोठे रस्ते बांधण्याची गरज उरणार नाही!कार्यकारी अभियंते नरेश बोरकर यांचा पर्यावरणवाद्यांना अजब सल्ला
झाडांच्या डी चोकिंगचे गाईड लाईन्सचे ज्ञान देखील गडकरींच्या विभागाच्या अभियंते-कंत्राटदारांना नाही!पर्यावरणवाद्यांचा आरोप
गडकरींच्या विभागाने शहर व शहरालगत २ लाख झाडे कापली लावली फक्त १५०० झाडे ! माहितीच्या अधिकाराअंतर्गत पर्यावरणवाद्यांनी केला दावा
झाडे तोडण्यासाठी विभाग एकटाच कसा जबाबदार?विज वितरण,मेट्रोला दोषी का धरत नाही?विभागाच्या अधिक-यांचा प्रश्न
अमरावती रोड उड्डाणपुलाला पर्यावरणवाद्यांचा विरोध:त्याच पैशात गोरेवाडा उड्डाण पूल का बांधत नाही?
अमरावती उड्डाण पूलासाठी तोडल्या जाणा-या ३७६ पैकी १२७ झाडे डीपीआरमध्ये कमी केली:विभागाचा दावा
मंत्र्यांच्या नागपूरकरांसाठी ‘गुळगुळीत’रस्त्यांच्या अभिवचनात झाडेच झाली नामशेष:एकाच पावसात शेकडो झाडे कोसळली:नागपूरकरांचा जीव धोक्यात:पर्यावरणवाद्यांचा आरोप
हजारो झाडांची मूळे नष्ट केली कोणाला तर जबाबदार धरा: पर्यावरणवाद्यांची कार्यकारी अभियंतांकडे मागणी
फूटाळा प्रकल्पात ट्रॅफिकचे कारण सांगून रस्ते बांधणीचा उद्योग:डीआरएसकडून पैसे उकळण्याचे विविध मार्ग शोधले:पर्यावरणवाद्यांचा अारोप
मनपा उद्यान अधिक्षकांची बैठकीला दांडी!
नागपूर,ता.७ सप्टेंबर २०२३: १९९७ साली वर्धा रोड झाला त्यावेळी देखील नागपूरकर नागरिकांनी रस्त्यांच्या बांधकामासाठी निसर्गाने या रसत्यावर मुक्त हस्ताने केलेली हिरवाईची उधळण फक्त रस्त्याच्या बांधकामासाठी समूळ नष्ट करणा-या कृतीला विरोध केला होता.आम्हाला ही विकास हवा, लोकसंख्येच्या अनुपातामध्ये मोठे रस्ते देखील हवे मात्र त्यासाठी राजकीय नेते,प्रशासकीय अधिकारी,प्रत्यक्ष कामाचा ठेका घेणारे कंत्राटदार,मजूर वर्ग यांच्यामध्ये निसर्गाप्रति संवेदनशीलता व शाश्वत विकासाची दृरदृष्टि हवी,असा सूर बुधवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सिव्हिल लाईन्स येथील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागात पार पडलेल्या बैठकीत, शहरातील पर्यावरणवाद्यांनी आवळला तर बैठकीत उपस्थित काही कंत्राटदारांनी पर्यावरणवाद्यांना अतिशय मुजोर भाषेत खडे बोल सुनावले,परिणामी चर्चेसाठी नियोजित बैठकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फे-या झडल्या.
अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंप ते वाडीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या उड्डाण पूलाचे व सिमेंट रस्त्यांचे काम सुरु आहे.या संपूर्ण महामार्गावरील शेकडो झाडांच्या बुंध्यांमध्येच सिमेंट काँक्रिटचे मिक्सर कंत्राटदारांनी टाकून ती झाडे कमकुवत केली असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी बैठकीत करताच कंत्राटदार जे.पी.इंटरप्रायझेसचे कंत्राटदार सचिन हांडे यांनी तुमची विकासाची परिभाषा काय?असा सवाल करत, तुच्यासाठी झाडे असली तरी काँक्रिट आमच्यासाठी प्राण असल्याचे ओरडून सांगितले.यावर पर्यावरणवादी व कंत्राटदारांमध्येच शाब्दिक चकमक रंगली.कार्यकारी अभियंते नरेश बोरकर यांच्यासमोर कंत्राटदार हे जर अशी भाषा वापरत असतील तर आम्ही जेव्हा रस्त्यांवर यांना झाडांचा श्वास मोकळा करा सांगायला जातो तेव्हा हेच आम्हाला,तुम्हाला जे करायचं ते करा माझं कोणीही काहीही वाकडं करु शकत नाही,अशी मुजोरीची भाषा किती सहज उच्चारतात,अशी तक्रार बोरकरांना याप्रसंगी पर्यावरणवाद्यांनी केली.
अमरावती उड्डाण पूल व सिमेंट रस्ता हे आमच्या विभागाचे कार्य असल्याचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी सांगितले.या रस्त्याबाबत व उड्डाण पुलाबाबत शहरातील पर्यावरणवाद्यांच्या सातत्याने तक्रारी येत असल्याने पुढाकार घेऊन,आजची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.पर्यावरणवाद्यांनी त्यांच्या काही सुचना व उपाय असल्यास सांगावे,असे बोरकर यांनी स्पष्ट केले.अमरावती रस्त्यावरील बांधकामात जे काही वृक्ष मध्ये येत होते त्यातील अधिकाधिक वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले.विविध विकासकामात वृक्षांचे संरक्षण झाले पाहिजे या विचाराशी आम्ही देखील सहमत आहोत मात्र,शहरातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे,त्या अनुषंगाने सार्वजनिक सुविधा वाढणे गरजेचे आहे.शासन लोकसंख्येच्या अनुषंगाने त्यासाठी धोरणे ठरवितात.त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे काम आमच्या विभागामार्फत होत असल्याचे बोरकर यांनी सांगितले.आमचा विभाग शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी बाध्य असल्याचे ते म्हणाले.पर्यावरणवादी तसेच सामन्य नागरिकांकडून ज्या काही सूचना येतील त्या आम्ही आमच्या धोरणांमध्ये समाविष्ट करुन शासन निर्णयासाठी पाठवू,असे बोरकर यांनी स्पष्ट केले.
यावर अनुसूया काळे-छाबराणी यांनी वृक्षांच्या बाबतीत शासनाचे नेमके काय नियम आहेत?हे आधी स्पष्ट करा,अशी मागणी केली.संपूर्ण शहर झोपलं असताना रात्रीच्या अंधारात कंत्राटदारांकडून सर्रास झाडांची कत्तल केली जात आहे,यासाठी कंत्राटदारांवर एफआयआर का दाखल केली नाही?असा सवाल त्यांनी केला.तुमच्या विभागाने शहर व शहराच्या आजूबाजूच्या महामार्गांसाठी लाखो झाडे कापली व फक्त १५०० झाडे लावली,असे त्या म्हणाल्या.
यावर बोरकर यांनी आमच्या विभागाच्या मर्यादा या फक्त आमच्या प्रकल्पापुरतीच असल्याचे सांगितले.यावर, तुमचे प्रकल्प हे वर्तमान,भूतकाळ आणि भविष्याशी निगडीत असल्याचे अनुसूया म्हणाल्या.तुमच्या विभागाच्या कोणत्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले,याची तरी यादी द्या,अशी मागणी त्यांनी केली.
अमरावती रोडवरील बॉम्बेवाला या ठिकाणी ९० वर्ष जुनी झाडे तुमच्या या प्रकल्पामुळे धोक्यात आली असल्याचे पर्यावरणवादी जयदीप दास म्हणाले.तुमच्या विभागाच्या चुकीच्या मोजमापामुळे ही झाडे रस्त्याच्या मध्ये आली तेव्हाच का नाही डिपीआरमध्ये बदल केला?आता या संपूर्ण झाडांच्या बुंध्यांमध्ये सिमेंट काँक्रिटचे थर जमले असून ते चोक झाले आहेत.फक्त पाच दिवसात या इतक्या पुरातन झाडांचा रंग बदलला.ते वाळत चालले आहेत.कंत्राटदारांच्या असंवेदनशील वृत्तीच्या कामांमुळे या मार्गावरील संपूर्ण झाडे मरत चालली असल्याचा आरोप जयदीप दास यांनी केला.तुमच्या लेखी उड्डाण पूल व सिमेंट रस्ते म्हणजे विकास,झाडे वाचविण्यासाठी बोलल्यास तो विकास नसतो का?असा प्रश्न त्यांनी केला.
२०१४ मध्ये मंत्री महोदयांनी कॅम्पस ते वाडीपर्यंत एक ही झाड कापण्यात येणार नसल्याचे अाश्वासन दिले होते मात्र त्यावेळी दोन पदरीचा हा रस्ता आता अचानक ‘चार’ पदरी करण्यात आला.यामुळे या रस्त्यावरील शेकडो झाडे तुमच्या विकासाच्या परिभाषेत,रस्त्याच्या मध्ये आली व दोन्ही कडची मिळून अमरावती रोडवरील मारुती मोटर्स जवळील ६२ हिरवीगार व अनेक दशके जुनी झाडे मूळासकट मशीनने कापण्यात आली.न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमोर खटला चालला असताना त्यांनी एकाच्या बदल्याच ५ झाडे लावण्याचे आदेश तुमच्या राष्टीय महामार्ग बांधकाम विभागाला दिले होते त्या पार्श्वभूमीवर ३०० झाडे आतापर्यंत लागायला हवी होती.कोर्टाच्या आदेशान्वये कुठे आहेत ती ३०० झाडे तुमच्या विभागाने लावलेली?असा प्रश्न पर्यावरणवादी श्रीकांत देशपांडे यांनी कार्यकारी अभियंते बोरकर यांना केला.
तुमच्या याच अमरावती रोड महामार्गाच्या डिपीआरमध्ये या प्रकल्पासाठी एक ही झाड कापण्यात येणार नसल्याचे नमूद आहे.आता तुम्ही तुमचे रस्ते उड्डाणपूलासोबत जोडत आहात.यासाठी मानव, माती आणि पक्ष्यांचं अस्तित्व धरुन ठेवलेल्या झाडांची कत्तल करत आहात.रस्ताच मोठा करायचा आहे तर बॉम्बेवाला जवळ फूटपाथ अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढून त्या ठिकाणी रस्ता का मोकळा आणि मोठा केला जात नाही?अतिक्रमण तसेच ठेऊन,रस्ते वळवून झाडे कापत का सूटला आहात?असा प्रश्न श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थित केला.
येत्या काळात तुम्ही कपाटे उघडाल तेव्हा पैसे अंगावर पडतील मात्र श्वास घ्यायाला तुम्हाला प्राणवायू देणारी झाडेच उपयोगी पडतील.झाडांना कोणतीही जात नसते,धर्म नसतो.ते फक्त मानव आणि पशुपक्ष्यांना देण्याचे काम करतात.नामशेष झाल्यावरही ते माणसाच्या सरणासाठी उपयोगी पडतात.तुमचा विभाग का सूड उगवतोय झाडांवर?७ मीटरचा रस्ता कशाला १० मीटरचा करण्यात आला?मोठाच करायचा असेल तर मधले दूभाजक हटवून द्या,ती जागा वापरा.आज ३०० फूट खोदल्यानंतरही भू-गर्भात पाणी लागत नाही,ही अवस्था नागपूर शहराची झाली असल्याची उद्वीग्नता त्यांनी मांडली.
यावर वीज कंपनी,गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी,विविध कंपन्यांचे केबल टाकण्यासाठी,पंतप्रधानांच्या अमृत जल योजनेसाठी रस्ते वारंवार खोदले जात असल्याचे बोरकर म्हणाले. ‘ Right to Way’हे शासनाचे धोरणच आहे.एवढंच की या धोरणात वृक्षे तोडली जात असल्यास त्याचे पुर्नराेपण करण्याची सूचना करण्यात आली आहे.आमच्या विभागाने या सूचनांचे पालन करुन शंभर टक्के प्रयत्न केले आहे व जवळपास ३ हजार झाडांचे यशस्वी पुर्नरोपण केले असल्याचे बोरकर यांनी सांगितले.ही ३ हजार झाडे यांचा क्रमांक देखील आम्ही सांगू शकतो.अमरावती महामार्गावरील प्रकल्पात आमच्या डीपीआरमध्ये एकूण ३५६ झाडे कापण्यात येणार होती आम्ही त्यात बदल करुन त्यातील १२७ झाडे वाचवली.मनपाच्या उद्यान विभागाकडून आम्हाला ६० झाडे कापण्याची परवानगी मिळाली त्यातील आम्ही ३६ झाडे कापली असल्याची माहिती बोरकर यांनी याप्रसंगी दिली.अमरावती महामार्गावर आम्ही जितकी झाडे कापण्यासाठी कमी करु शकत होतो,तितकी केली असल्याचे बोरकर यांनी सांगितले.
यावर, बोले पेट्रोल पंपपासून डीपीआर करीत असताना स्टॅण्ड प्रोसेस असायला हवी होती,असे श्रीकांत देशपांडे म्हणाले.ही प्रोसेस या प्रकल्पात नाही अंवलंबिण्यात आली.आम्हाला नेहमीसारखंच सुंदर ‘स्वप्न’ दाखवण्यात आलं.राष्ट्रीय व राज्यस्तरीय डांबरी रस्ते हे वाईट असतात.डांबरी रस्त्यांवर अपघात जास्त होतात,पेट्रोल,डिजेल जास्त जळतं,सिमेंट काँक्रिटचे रस्ते हे ‘गुळगुळीत’असतात.त्यांच्या याच ‘गुळगुळीत ’ रस्त्यांच्या व्याखेत अमरावती,मोर्शी,काटोल, वरुड महामार्गावरील डीपआरमध्ये ७ ते ८ हजार झाडे कापली जाणार होती.मात्र सेंट्रल लाईन बदलून रस्ता तयार करण्याचा आग्रह मी धरला त्यामुळे एका बाजूची पूर्ण झाले कापली गेली मात्र दूस-या बाजूची निदान २ हजार ६५० झाडे वाचली.त्याच पद्धतीने अमरावती महामार्गाचा डीपीआर तयार केला असता तर निदान एका बाजूची तरी हिरवळ वाचली असती.
मात्र,असं घडलं नाही.मंत्र्यांना अचानक रात्री ‘स्वप्न’पडतं.मग ते सकाळी निवासस्थानावर अधिका-यांची बैठक घेतात.अधिकारीच मंत्र्यांच्या सूचनेवरुन जागेचे सर्वेक्षण न करताच तातडीने डीपीआर तयार करतात.२०१६ मध्ये ही हेच घडलं.तुमच्या विभागाने असा डिपीआर तयार केला ज्यात अक्षरश: ६०-६० इंच घेर असणा-या ७० ते ८० वर्ष जुन्या वडाची झाडे कापली गेली.ही झाडे तुमचा विभाग वाचवू शकला असता.ज्या झाडांनी या रस्त्यावरुन जाणा-यांना ७०-८० वर्ष सावली दिली,प्राणवायू दिला त्यांना मशीनने कापण्यासाठी ६० सेकंदाची वेळ लागला नाही.
विशेष म्हणजे निवृत्त झालेल्या अधिका-यांचा भरणा मंत्री महोदयाच्या मांदियाळीत असल्याने, ते कोणताही अभ्यास न करता मंत्र्यांचे कान भरतात.परिणामी,डीपीआरमध्ये एकदा सूटलेला तीर पुन्हा मागे घेण्याची अधिका-यांकडे सोय नसते.सामान्य माणूस घराला रंगरंगोटी करताना चार-चार वेळा विचार करतो.येथे तर एकाच बैठकीत कागदांवर सिमेंट रस्ते,उड्डाण पूलांचे इमले रेखाटले जातात,त्यात झाडांचा व झाडे वाचविण्याचा कोणताही शाश्वत विचार नसतो,असा त्रागा श्रीकांत देशपांडे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.तुमच्या विभागाकडे इतका जास्त पैसा आहे तर अन्नदाता शेतक-यांना पांदण रस्ते का करुन देत नाही?अमरावती रोडवर उड्डाण पूल मागितला कोणी होता?नागपूरकरांनी मागणी केली होती का?की आंदोलन केले होते?याच पैशात गोरेवाडाचा उड्डाण पूल का नाही बांधत?असा सवाल त्यांनी केला.
बोरकर यांनी आम्ही अधिकाधिक झाडे या प्रकल्पात वाचवली असल्याचा दावा केला. मग, या महामार्गावरील शेकडो झाडे तुमच्या कंत्राटदारांनी कापली का?बोरकर आपली जबाबदारी झटकत आहेत.शेकडो झाडे कापली गेली,यासाठी एक अधिकारी म्हणून कोणाला तरी जबाबदार धराल की नाही?असा सवाल जयदीप दास यांनी केला.
आज एवढासा पाऊस आला,वादळ आले तरी नागपूरात शेकडो ठिकाणी मोठमोठी डोलदार झाडे अक्षरश: उन्मळून पडलेली दिसत आहेत.प्राणहानि झाली नसली तरी सर्वसामान्यांच्या दूचाकी,चारचाक्यांचे नुकसान झाले.तुमच्या प्रकल्पामुळे अमरावती रोडवरील सोलारच्या कार्यालयाजवळ लोकांच्या गाड्यांवर झाडे कोसळली.हा त्या झाडांचा दोष होता का?ती तर ७० वर्षांपासून ऊन,वादळ,वारा सहन करुनही उभी होती.याचा अर्थ तुमच्या कंत्राटदारांनी त्या सर्व झाडांच्या बुंध्यांमध्ये सिमेंट काँक्रीटचे सारण भरले.त्यांचा श्वास कोंडला.ती कमकुवत झाली.कंत्राटदारांना जाणीवच नाही ते काय करत आहेत?पर्यावरणाचा श्वास कोंडत आहेत.तुमच्या कंत्राटदारांना सांगा तरी जी झाडे या प्रकल्पासाठी तोडली जात नसेल त्यांच्या दीड मीटर परिघात फक्त माती राहू द्या.त्यात सिमेंट पडू देऊ नका.
यावर कंत्राटदारांनी चिडून आम्ही झांडांच्या बुंध्यांमध्ये सिमेंट नाही टाकले,अशी अरेरावी केली यावर मग आम्ही टाकली का?असा सवाल पर्यावरणवाद्यांनी केला.झाडांचा जीव अश्यारितीने घेण्या ऐवजी या महामार्गावरील अतिक्रमण काढा ना?असा सवाल करता,त्याला अजून वेळ असल्याचे बोरकर यांनी सांगितले.दहा मिटरचा रस्ता झाल्यानंतर सार्वजनिक उपयोगासाठी आम्ही फूटपाथ रिकामे करणार असल्याचे ते म्हणाले.एनएचएआय या महामार्गावर आदर्श प्लेटफॉर्म तयार करुन देणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले.
यावर,तुमच्या या १० मीटर महामार्गावरील उर्वरित आदर्श प्लॅटर्फामवर भाजीवाले,फर्निचरवाले,मटण चिकनची दूकाने राहणार नाहीत का?असा सवाल करता नॉन मोटारामेट ट्रॅफिक राहणार असून फूटपाथ दिसणारच नसल्याचा दावा बोरकर यांनी केला.यावर छत्रपती चौक,वर्धा रोडवर तुमच्या विभागाने आधी १० मीटर तर कुठे १२ ते १३ मीटरचे रस्ते केले.या ठिकाणी वृक्षवल्ली लावण्या ऐवजी लहान लहान रोपांचे रोपण करण्यात आले.आधीच्या झाडांच्या जागा लहान रोपांना का देण्यात आल्या?असा सवाल वनस्पती तज्ज्ञ प्राची माहूरकर यांनी केला.यावर बोलताना,नियमानुसार शहरी भागात मोठे वृक्ष रस्त्यांच्या कडेला लावता येत नसल्याचे बोरकर म्हणाले.यामुळे रस्त्यांना तडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर नीरीच्या समोरील सर्व झाडांचे बुंधे हे चोक झाले असल्याचे सांगण्यात आले.अभिजित बांगर हे जेव्हा मनपा आयुक्त होते तेव्हा आमच्या तक्रारीवर त्यांनी एक सर्वेक्षण केले त्यात हिरव्यागार झाडांना विषारी द्रव्याचे इंजेक्शन लाऊन ते हेतुपुरस्कर वाळविण्याची एकूण साढे पाच हजार प्रकरणे उघडकीस आली होती.तुम्ही देखील शहरातील सिमेंट काँक्रिटने चोक करण्यात आलेल्या झाडांचा श्वास कधी मोकळा करणार आहात?असा सवाल पर्यावरणवाद्यांनी केला.
यावर एका कंत्राटदाराने,शहरातील सगळी झाडे फक्त हाच विभाग कापत नसल्याचे सांगितले.वीज वितरण कंपनी ही कोणत्याही परवानगीशिवाय झाडे कापत असते.महामेट्राने देखील त्यांच्या अनेक पूलांसाठी व स्टेशन्ससाठी हजारो झाडे कापली,मात्र,एकमेव आरोप एनएचएआयवर केला जात असल्याची तक्रार कंत्रादाराने केली.मनपाचा उद्यान विभाग हा देखील दोषी असल्याचे कंत्राटदाराने सांगितले.यावर,मेजर स्टेक होल्डर तुमचा विभाग असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या नोव्हेंबरमध्ये एका प्रकल्पाच्या उद् घाटनासाठी मेडीकलमध्ये येत असल्याने या ठिकाणची २५० झाडे कापण्याची परवानगी मेडीकलतर्फे मनपाच्या उद्यान विभागाला मागण्यात आली आहे.याचा अर्थ या शहरातील झाडे ही बेवारस आहेत का?अनाथ आहे का?विकास किवा विशिष्ट पाहूण्यांसाठी शेकडो झाडे नागरिकांची मते न घेता कापून टाकली जातात.आम्हाला पंतप्रधानांपेक्षा ती २५० झाडे महत्वाची वाटतात,असा सूर जयदीप दास यांनी आवळला.राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या एका दिवसाच्या दौ-यासाठी विमानतळावरील अनेक झाडे भूईसपाट करण्यात आली.एका दिवसात एक झाड ७५ हजार रुपयांचा प्राणवायू माणसाला अगदी फूकट देत असल्याचे ते म्हणाले.
यावर बोरकर यांनी एका कंत्राटदाराचे कौतूक करीत,अमरावती महामार्गावरील दोन जुन्या पिंपळाच्या झाडांना वाचविण्यासाठी रस्ता वळवल्याने त्याला १ कोटीचा खर्च जास्तीचा आला,अजून तो खर्च शासनातर्फे मंजूर झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.यावर पर्यावरणवाद्यांनी त्या दोन पिंपळ्याच्या झाडांसाठी टाळ्या वाजवल्या.
झाडांच्या डी-चोकिंगमध्ये कंत्राटदारांना नेमके काय करायचं आहे?असं बोरकर यांनी विचारले असता,सरकारी अधिकारी आहात सरकारच्या गाईड लाईन्स तुम्हाला वाचता येत नाही का?असा सवाल ज्येष्ठ पर्यावरणवादी शरद पालीवाल यांनी केला.व्हेरायटी चौकापासून संपूर्ण अमरावती रोडवर ज्या कंत्राटदाराने केबलसाठी एका बाजूचा रस्ता खोदला त्याने शेकडो झाडांची मूळे कापत नेली.यावर कहर म्हणजे अर्धवट मूळे जी उरली त्यावरच केबल टाकण्यासाठी सिमेंटची नाली बांधली.येणा-या काळात या रस्त्यावरुन नागपूरकरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार असून,वादळ वा-यात या संपूर्ण महामार्गावरील झाड कधीही दूचाकी,चारचाकी वाहनधारकांच्या अंगावर काेसळून फार मोठे अपघात होऊ शकतात.शासनाच्या चुकीच्या धोरणांना व नोकरशाही व कंत्राटदारांच्या असंवेदनशील मानसिकतेला बळी हा सर्वसामान्य नागरिक पडत असतो.दूर्घटना त्याच्यासोबत घडत असतात.शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन जाणा-यांचा नाही,असा संताप व्यक्त करण्यात आला.
यावर कंत्राटदाराला सांगून त्या कमकुवत झालेल्या झाडांमध्ये विशिष्ट प्रकारचं रसायन टाकण्यासाठी सांगितले असल्याची माहिती एका अधिका-याने दिली!नैसर्गिकरितीने मूळ धरुन असलेल्या झाडांच्या मूळांना अाधी मशीनने कापत न्यायचे यानंतर रसायन टाकून त्यांना कृत्रिम मजबुती देण्याचा अजब प्रकार नागपूरातील या विभागातर्फे करण्यात येत असल्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
यावर,बाेरकर यांनी मानकापूर उड्डानपुलाखालील रस्त्याच्या मधोमध येणा-या अपघातप्रवण झाडांचा विषय छेडला,यावर २०१४ साली मानकापूर उड्डाणपूलासाठी देखील पागलखाना चौकाजवळील एक बाजूची १८ व दूस-या बाजूची ९ झाडे कापण्यात येणार होती मात्र चंद्रशेखर राव यांनी आमचा आक्षेप सकारात्मक घेऊन यात बदल करण्याची सूचना एनएचएआयला दिल्याने आज त्या ठिकाणी १८ झाडे वाचलेली आढळतात,१४ कापण्यात आल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.मानकापूर उड्डाणपूलाचा जन्म नंतर झाला यात मानकापूरमधील झाडांचा काय दोष आहे?असा सवाल बोरकरांना केला.
बीओटी,हेम्प,एपीसी,हूंडा पद्धती सर्व मला माहिती असल्याचे श्रीकांत म्हणाले.इतर सर्व पद्धतीमध्ये कंत्राटदारांनी अटी शर्थींचे पालन न केल्यास त्याची रक्कम थकीत करण्याची सुविधा होती मात्र हुंडा पद्धतीत रस्त्यात किती ही दोष निर्माण झालेले असले तरी कंत्राटदारांची रक्कम अडवली जात नसल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.आता एपीसी ॲक्ट शेड्यूल-एच नुसार कंत्राटदारांनी कोणत्याही प्रकल्पासाठी जेवढी झाडे कापली तेवढी झाडे इतरत्र लावणे त्यांच्यावर बंधनकारक आहे,त्यामुळे बोरकर यांनी त्यांच्या विभागाच्या कंत्राटदारांवर ही जबाबदारी निश्चित करावी,अशी मागणी त्यांनी केली.
कंत्रादटारांना व त्यांच्या मजूरांना झाडांप्रतिची संवेदनशीलता समजून घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यास पर्यावरणवादी तयार झाले.रात्रीच्या अंधारात झाडे कापण्यावर बंदी घालावी.ट्री कॅरिडोरची मागणी करत शासनाच्या कोणत्याही प्रकल्पात भविष्यात अश्यारितीने झाडांची कत्तल करणारे डीपीआर मंजूर करु नये,आता कोटोल नाका ते रिंगरोडपर्यंत एनएचएआय करणार असणा-या उड्डाण पूलाची गरज नाही,तो बांधू नये इत्यादी अनेक मागण्या या बैठकीत पर्यावरणवाद्यांनी केल्या.पर्यावरणवादी अभिजित झा यांनी देखील विविध सूचना केल्या.
बोरकर यांनी बैठकीत उपस्थित असणा-या वनस्पतीतज्ज्ञ प्राची माहूरकर यांना अमरावती महामार्गाच्या रस्त्यालगत सौंदर्यीकरणासाठी लावण्यात येणा-या वृक्षांची यादी मागितली.अधिक्षक अभियंता संगीता जयसवाल यांनी पर्यावरणवाद्यांनी केलेल्या विविध सूचनांचे स्वागत केले. एलटीटीएएचे अध्यक्ष माधव लाभे यांनी १५०० झाडांचे रोपण केल्याची माहिती दिली.
माझा डीपी वापरुन सोशल मिडीयावरील बदनामी थांबवा:बोरकर
बैठकी नंतर नरेश बोरकर यांनी पर्यावरणवाद्यांकडे माझा डीपीवरचा फोटो वापरुन मला विलेनच्या रुपात सादर करुन माझी बदनामी केली जात असल्याची तक्रार केली.हे योग्य नसून मी मानहानिचा दावा ही दाखल करु शकतो,असे ते म्हणाले.यावर पर्यावरणवाद्यांनी,आम्हाला तर अर्बन नक्सलवादी ठरविण्यात आले असून सोशल मिडीयावर आमच्यासाठी ‘पर्यावरण माफिया’सारखा शब्दप्रयोग केला जातो,अब्रू नुकसालीचा दावा तर आम्ही करायला हवा मात्र आम्ही दूर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
………………………

आमचे चॅनल subscribe करा