(रविवार विशेष)
पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या अडीचशे हेक्टर जागेवर हे चाललंय काय?
दोन नेत्यांच्या ‘दूरदृष्टितून’या ही जागेचा होतोय अभूतपूर्व ‘विकास’
पर्यावरणप्रेमींना पर्यावरण ‘माफिया’म्हणनारे नेत्याला म्हणतील का ’जमीन’ माफिया?
पंकृविच्या वनस्पती उद्यानाची कमर्शियल वाटचाल: शेकडो एकरवरील हिरवळ नष्ट करुन सुरु आहे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम!
फूटाळाच्या कॅचमेेंटमध्येच भिंतींचे बांधकाम:येत्या दोन वर्षात फूटाळा आटणार:पर्यावरणवाद्यांचा दावा
कृषि विद्यापीठाच्या पदवीधर व पदव्यूत्तरच्या आठशे विद्यार्थ्यांची संशोधनाची जागा दोन नेत्यांच्या घश्यात:संशोधनासाठी उरली फक्त महाराज बाग व व्हीएनआयटी समोरील जागा!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ३ सप्टेंबर २०२३: फूटाळाच्या वरच्या भागात पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या अंदाजे अडीचशे एकर जागेवर वनस्पती उद्यान साकारले आहे.१९९५ मध्ये पंजाबराव कृषि विद्यापीठाने शासनाकडून ४ कोटी रुपये घेऊन ते खर्च करुन ओसाड पडलेल्या या जागेवर वनस्पती उद्यान साकारले यालाच इंग्रजीत ‘बॉटनिकल गार्डन’म्हणतात.यात काही भाग वनस्पती उद्यान तर काही भाग ॲग्रो फॉरेस्ट ॲण्ड रिसर्च सेंटर म्हणून सात-बारावर नमूद आहे.कृषि विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात चार ही वर्षाचे मिळून एकूण ८०० विद्यार्थी तर पदव्यूत्तर विभागाचे २५० विद्यार्थी असल्याची माहिती या विद्यापीठाचे अधिकारी सांगतात.वनस्पती उद्यानात हे विद्यार्थी फळ,फूले,भाज्या यांच्यावर संशोधन करतात तर महाराज बागेतील २० हेक्टर जागेवर तसेच व्हीएनआयटी समोरील १० हेक्टर जागेवर पेरु,संत्र्यांचा बागा,फळे,भाजीपाला,कपाशी,सोयाबिन इतर बी-बियाणेचं पीक इत्यादीवर संशोधन करीत असतात.याचाच अर्थ कृषि विद्यापीठातील एका सत्राचे एकूण ९५० विद्यार्थी हे २५० एकर वनस्पती उद्यानातील विस्तीर्ण जागेवर तसेच इतर ३० हेक्टर जागेवर आपले संशोधन कार्य करीत असतात मात्र,मागील काही काळापासून सेमिनरी हिल्सवरील बॉटनिकल गार्डनच्या फाटकांवर कूलूपे लागली असून बाकायदा चौकीदार ठेवण्यात आले आहेत कारण….दोन नेत्यांनी या विस्तीर्ण वनराईने समृद्ध असणा-या जागेचा ‘व्यवसायिक’विकास करण्याचे धोरण अवलंबिले आहे!
सध्या इथे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम सुरु असून कोणालाही आत येण्याची परवानगी नाही.एकेकाळी हा भाग पर्यटनासाठी समस्त नागपूरकरांना नाममात्र शुल्क देऊन प्रवेशासाठी मुक्त होता.या ॲग्रो फॉरेस्ट संशोधन केंद्रात अनेक पक्षी,प्राण्यांचाही मुक्त विहार असून निसर्गाने समृद्ध अशी उधळण या अडीचशे एकर जागेवर केलेली आढळते.आजच्या पिढीला कदाचित नागपूरात अगदी प्राईम लोकेशनमध्ये जंगलाचा फिल अनुभवण्यासाठी असे ठिकाण आहे हे देखील माहिती नसावे मात्र मागच्या पिढीने नक्कीच निसर्गाच्या सानिध्याची ही लयलृट अनुभवली आहे.आता या ठिकाणचे अक्षरश:विद्रुपीकरण केले जात असून ,जागतिक दर्जाचे लोटस गार्डन निर्माणाच्या नावावर येथेही पंचतारांकित हॉटेल्स,माॅल,दूकाने,चौपाटी इत्यादी तद्दन व्यवसायिक बांधकाम करण्याचे योजिले आहे.येथील हॉटेलमधून फूटाळ्याचे सौंदर्यीकरण(कि विद्रुपीकरण?)दिसायला हवे अशी त्या नेत्याची कल्पना आहे.यासाठीच रेस्टॉरेंटच्या वर पर्यंत लिफ्टची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती खास ‘सत्ताधीश’ला सूत्राने दिली.याशिवाय याच जंगलामधून अमरावती रोडला जोडणारा रस्ता बांधण्यात येणार आहे.विदेशात बघून आलेले ‘बूचड’गार्डन या ठिकाणच्या ‘एका भागात ’विकसित करण्यात येणार आहे.यात देश विदेशातली फूले नागपूरकरांना बघायला मिळतील असा त्यांचा दावा आहे!ज्याप्रमाणे भारतासारख्या उष्ण कटिबंध प्रदेशाचा विचार न करता अट्टहासाने ‘चिते’आणण्यात आले व यानंतर ते एकानंतर एक मृत्यूच्या तावडीत सापडले तसेच गेल्या २३ वर्षात नैसर्गिकरित्या अथक परिश्रमातून एका ओसाड जमीनीवर साकारलेल्या अतिशय निसर्गरम्य जंगल सदृष्य उद्यानाला कायमचं नष्ट करुन ‘बुचड’ गार्डनमध्ये जगभरातून आणण्यात आलेली विविध प्रजातीची फूले ही कितपत तग धरु शकणार?असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
एका नेत्याची ‘नजर’ या जागेवर पडल्याने आधी त्यांनी ही जागा व्यवसायिकरित्या ‘विकसित’करण्यासाठी हाती घेतली.त्यांच्या वाट्याला २६ एकर जागा आली.या ठिकाणी खासगी विकासकाच्या माध्यमातून कमर्शियल लॉन विकसित करण्याचे काम सध्या सुरु आहे.येथे आता मजूरांचा राबता आहे,विद्यृतीकरणाच्या कामात अभियंते दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.लवकरच एवढा भाग नागपूरकरांसाठी वाढदिवस,लग्न समारंभ इत्यादीसाठी उपलब्ध होऊ शकेल,हे विशेष!

मात्र,एक ’मोठ्या’नेत्याची नजर मात्र संपूर्ण वनस्पती जगंलावरच असून त्यांना ही संपूर्ण जागाच ‘विकसित’करायची आहे.यासाठी त्यांनी शहरातील आयएएस अधिका-यांना फायली घेऊन आपल्या निवासस्थानांवर उठबस करण्याची मोहिमच आखली होती. नागपूरच्या पर्यावरणाचे संतुलन बिघडवणारे सर्व काम ’नियमात’बसविल्या गेलेच पाहिजे,सगळी कामे ’नियमांच्या चौकटीतच’झाली पाहिजे,यासाठी आयएएस अधिका-यांसोबतच नासुप्र,महानगरपालिका,एनएमआरडीएचे झाडून पुसून सर्व निवृत्त अधिका-यांचा भरणा देखील या मोठ्या नेत्याच्या दिमतीला असलेला आढळतो.त्यामुळेच कृषि विद्यापीठाच्या नियमात बसत नसतानाही व तसा ठराव त्यांच्या काऊंसिलमध्ये २०१८ साली झाला असतानाही की,त्यांच्या मालकी हक्काच्या जमीनी फक्त अाणि फक्त कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठीच राखीव असतील,कोणत्याही व्यवसायिक कामासाठी त्या दिल्या जाणार नाहीत,तरी देखील नागपूर शहरात फूटाळ्याची जागा असो किवा आता हे बॉटनिकल गार्डन व ॲग्रो फॉरेस्ट रिसर्च सेंटर, सर्व काही तद्दन व्यवसायिक बांधकाम व वापरा करीता कशी दिली जात आहे?कोणत्या नियमात बसवून?हे कंत्राट सुप्रसिद्ध ’केसीसी’कंपनीला मिळाले असल्याचे माहिती तेथील बांधकामावर देखरेख करणा-या एका सुपरवायजरने ‘सत्ताधीश’ला दिली!
विशेष म्हणजे हा भाग फूटाळा तलावाचा कॅचमेंट भाग असून स्टारकी पॉईंट जवळ फूटाळा तलावातील मूळ पाण्याचा स्त्रोत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ सांगतात.वनस्पती उद्यानात हे संपूर्ण बांधकाम झाले,दोन दोन भिंती उभारण्यात आल्यास फूटाळ्याच्या पाण्याच्या मूळ स्त्रोतच आटणार आहे व येत्या दोनच वर्षात फूटाळा ठणठण कोरडा होणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.मग,हजारो कोटी रुपये खर्च करुन रंगीत कारंजे कशावर चालणार?मूळात ते आता ही का सुरु नाहीत?वायरिंग का दुरुस्त होत नाही?पाणी कुठं मुरतंय….?

(छायाचित्र :अश्या तीन कुलूपांतून ‘सत्ताधीश’ने प्रवेश केला!)
या ठिकाणी आता कृषि विद्यापीठाने बांधलेले पांदण रस्ते आहेत.ती सर्व सिमेंट काँक्रिटची होणार.अमरावती रस्त्यापासून या वनस्पती उद्यानापर्यंत भिंत बांधण्याचे काम ही सुरु आहे.या भिंतीमुळे फूटाळ्याचे पाणी आटणार.शेत जमीनीवर डायरेक्ट सिमेंटचे रस्ते…!कॅफे,लिफ्ट,पुलांचे निर्माण,सिमेंट काँक्रिटचे रस्ते,फूटाळ्याच्या पार्किंग पासून तर वनस्पती उद्यानापर्यंत तलावाच्या वरुन पूलाची निर्मिती गुजरातच्या मोरबी दूर्घटनेची आठवण अजून ही अंगावर शहारा आणते)आणि हे सर्व काही कश्याकरिता?नागपूरच्या विकासाकारीता?ते ही कोणतीही निविदा न काढता….!

(छायाचित्र : परवानगीशिवाय आत येऊ नये..नो एन्ट्री!)
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कोणतीही निविदा न काढता मेट्रो रेल्वेला या ठिकाणचे काम देखील सोपविण्यात आले आहे.
ज्या मेट्रोने शहरात रेल्वे चालविण्यासाठी केलेल्या बांधकामात, पाच वर्षात दोन ठिकाणी भगदाडे पडली आणि नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली त्याच मेट्रोवर त्या मोठ्या नेत्याचा विश्वास कायम आहे…!

विशेष म्हणजे कॅगच्या अहवालात हजार कोटींच्या जवळपास अनियमिततेचा ठपका ज्या मेट्रोवर ठेवण्यात आला,त्यांच्याचकडून हे देखील काम करुन घेण्या मागे नेमकं काय दडलंय आहे?जागतिक दर्जाच्या बांधकामाच्या वलग्ना करणा-या महामेट्रोच्या ट्रॅकखाली आठ एमएमचे भगदाड अवघ्या ५ वर्षात पडले ते ही एक नव्हे तर दोन दोन ठिकाणी,कंत्राटदारांना दोष देण्यापेक्षा लाखो रुपये पगार घेणारे मेट्रोचे अधिकारी नेमके काय करीत होते?देखरेख ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती?पिल्लर्सच्या खालची जमीन धसत चालली आहे.तीन स्टेशन्सवर मेट्रोचा वेग कमी करण्यात आला आहे,प्रवाश्यांना चढता-उतरताना एकाच बाजूने कसरत करावी लागत आहे.तरीही इतक्या काबिल अधिका-यांना वनस्पती उद्यान विकसित करण्यासाठी दिल्या जात आहे?

(छायाचित्र : जाळ्या लाऊन असा प्रवेश बंद करण्यात आला आहे)
मेट्रोची स्थापना मेट्रो रेल्वेसाठी झाली असताना मेट्रो नागपूरात बांधकामाच्या क्षेत्रात मुसंडी मारतानाच नागपूरकरांना का आढळत आहे?मूळात वनस्पती उद्यान महामेट्रो व राष्ट्रीय महामार्ग विभाग मिळून विकसित करत आहे मूळात राष्ट्रीय महामार्गाचा पैसा तरी अश्या बांधकामात खर्च करता येतो का?एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाला घेऊन राज्यातील झाडून पुसून सगळे राजकीय नेते हे अपघात व मृत्यूचा महामार्ग म्हणून संबोधित करत असताना, नागपूरात २५० एकरात वसलेली हिरवळ नष्ट करुन व्यवसायिक बांधकामासाठी या मंत्रालयाच्या अधिका-यांना सवड तरी कशी मिळते? विक्रम लॅण्डर चंद्रावर सुरक्ष्तरित्या पोहोचला, नागपूरात मात्र जीवघेण्या खड्ड्यांमध्ये ‘सिमेंटचे’ रस्ते आढळतात…!यालाच म्हणावे का ड्रीम प्रोजेक्ट?

फूटाळ्याला लागून असलेली वनस्पती उद्यानातील २६ एकर जागा दूसरा विकासक विकसित करीत असताना उर्वरित २२४ एकर जागा केसीसी कंपनीला विकसित करण्यासाठी देण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली मात्र नेमकं कशाचं कंत्राट दिलं आहे?हे नागपूरकरांना कळेल का?पैसा कोण देतोय?मुली कशासाठी ठेवण्यात आल्या आहे?नागपूरकरांना सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे?संवैधानिक उत्तरदायित्व आहे की नाही?

मेट्रोच का?
नागपूर महानगरपालिका,नागपूर सुधार प्रन्यास , एमएमआरडीए,नझूल,पंजाबराव कृषि विद्यापीठ या सर्व संस्था शासकीय आहेत.सरकारतर्फे या संस्थेच्या अधिकारी,कर्मचा-यांना पगार व पेंशन मिळत असतात.मेट्रो ही प्रा.लि.कंपनी आहे.कंत्राटी तत्वावर मेट्रोमध्ये नियुक्त्या होत असतात त्यामुळे प्रत्यक्ष कामावर असताना किवा अगदी निवृत्त झाल्यावर देखील मेट्रोच्या अधिकारी,कर्मचा-यांवर जबाबदेही नसते.ना त्यांची पेंशन थांबते.त्यामुळेच नागपूरात मोक्याच्या सर्व ठिकाणचे ‘बेकायदेशीर’बांधकाम ‘नियमात’बसवून मेट्रोकडूनच बांधकाम करण्याचा सपाटा सुरु असल्याची चर्चा कानावर पडत असते.

वनस्पती उद्यानाची हिरवळ नष्ट करुन त्या ठिकाणी कमर्शियल बांधकाम करण्यासाठी जरी सरकारने नियमात बदल केले असतील, तरी नियमात बदल करण्याची ती प्रक्रिया तरी नियमानुसार झाली का?असा प्रश्न आता विचारला जात आहे.
ॲग्रो कन्वेन्शन सेंटर नेमके कोणासाठी?
शेतक-यांसाठी शहरात वायुसेनानगर भागातील मोकळ्या जागेवर ॲग्रो कन्हेन्शन सेंटर उभारले जात असून यासाठी २३० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.या केंद्रामध्ये विविध फळे-फुलझाडे यांच्या प्रजातींचे उत्पादन कसे घ्यायचे,याचे प्रयोग करण्यात येणार असून शेतक-यांना ते पाहण्याची सोय असेल.त्यासोबतच संबंधित बी-बियाणे याच ठिकाणाहून खरेदी करता येणार आहे.त्यामुळे शेतक-यांसाठी हे केंद्र‘वरदान’ ठरणार असल्याचा दावा त्या मोठ्या नेत्यांनी अनेकदा केला.माहितीच्या अधिकारात कळले की,हे केंद्र कृषि विद्यापीठाला वर्षातून फक्त पाच दिवस वापरता येणार आहे!ते ही बुकींग नसेल व उपलब्ध असेल तरच…!वर्षभर या २५० कोटींच्या केंद्रामध्ये व्यवसायिक कार्यक्रम होतील ज्याचा काहीही संबंध शेतक-यांच्या हिताशी नसणार…!

महत्वाचे म्हणजे हा २५० कोटींचे केंद्र श्मशान भूमिच्या अगदी समोर आहे!एकीकडे रंगारंग कार्यक्रम आणि दूसरीकड मयतीची श्मशान शांतता….यालाच म्हणतात कल्पक बुद्धी!या केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय कृषि अधिवेशन होणार?श्मशान घाटाच्या अगदी समोर लोक तरी लग्नसराईसाठी हॉल बुक करतील का?रेस्टारेंटमध्ये जेवायला येतील का?मूळात हे चालवणार कोण?तर रामदासपेठमधील एक सुप्रद्धि हॉटल संचालकाचे नाव समोर आले आहे.
वनस्पती उद्यान प्रकल्पाचा डीपीआर जेव्हा लहान नेत्याला दाखविण्यात आला होता,मंजुरी नंतर त्यात अनेक बदल करण्यात आले!

आता तर त्या मोठ्या नेत्याला खासगी विकासक विकसित करीत असलेली ती २६ एकर जागा देखील हवी असल्याची खात्रीलायक माहिती आहे.‘चल निकल यहा से’‘मुझे वो भी जगह चाहीये’अश्या शब्दात त्या लहान विकासकाला दम दिल्या जात असल्याचे सूत्राने नमूद केले परिणामी तो खासगी विकासक . लीज वर घेण्यात आलेल्या जागेवर आपला कोट्यावधी पैसा लाऊन स्वत:च दहशतीत जगत आहे…!
डेंगीचे काय?
एकीकडे शहरात घराघरात मनपाचे अधिकारी सर्व्हे करीत असून डेंगीचा उद्रेग थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे.डेंगीची २२४ लोकांना लागण झाली असल्याची आकडेवारी मनपाच सांगत आहे.एक लहान मुलगी व एका गृहस्थाचा मृत्यू डेंगीमुळे झाला असल्याचीही चर्चा आहे मात्र मनपा हे मान्य करीत नाही.अश्यावेळी वनस्पती उद्यानात हजारो ड्रम्समध्ये पाणी भरुन ठेवण्यात आले आहे.त्यात विविध वनस्पतींचा भरणा करण्यात आला आहे.कदाचित बुचड गार्डनसाठी ते ड्रम्स भरुन ठेवण्यात आले असावेत मात्र,गेल्या अनेक महिन्यांपासून त्यात पाणी साचून ठेवण्यात आल्याची माहिती तेथील एका कर्मचा-याने दिली!मनपा त्या हजारो ड्रम्समध्ये डोकावून बघण्याचे धाडस करेल का?असा सवाल आता विचारला जात आहे.

६० एकर जागेवरील वनस्पती उद्यान असून एकूण २५० एकर जागेपैकी १८० एकर जागेवर फूटाळ्याचे कॅचमेेट आहे.परिणामी,या जागेवर सिमेंट काँक्रिटचे बांधकाम करणे,पुलांची निर्मिती,पार्किंग,लिफ्ट,भिंती इत्यादी बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाची तरी परवानगी ‘नियमानुसार’घेतली आहे का?असा प्रश्न उपस्थित करुन,परवानग्या नसेल तर या बांधकामावर प्रदुषण मंडळाचे काय कारवाई करतील?

(छायाचित्र : नागपूरकरांना हवं आहे पुन्हा हे जुनं वैभव)
विद्यार्थ्यांचे संशोधन बंद करुन बुचड गार्डन विकसित केल्या जात आहे.थोडक्यात आज हे संपूर्ण वैभव कुलूपबंद झालं आहे.या उद्यानात सर्वसामान्य नागपूरकराला येण्याची परवानगी नाही. निसर्गाचं हे मूळ वैभव अबाधित राखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे?नेत्यांची की नागपूरकरांची?नागपूरकरांचं हक्काचं हे जुनं वैभव कुलपबंद झालं आहे,ती कुलपे नागपूरकर उघडू शकणार का?हा प्रश्न लाख मोलाचा आहे.
………………

आमचे चॅनल subscribe करा