Homeनागपूर न्यूज‘कौमार्य’विषयाचं गांर्भीय घालवणारा चित्रपट!

‘कौमार्य’विषयाचं गांर्भीय घालवणारा चित्रपट!

(रविवार विशेष)

घराणेशाहीतून’ प्रेक्षकांवर लादला थोराड नायक!

‘जब-या’च्या भूमिकेत नीरज जामगडेने ओतले प्राण

चित्रपटगृहातून प्रेक्षक घेऊन बाहेर पडतो धक्कादायक ‘संताप’

तरीही नागपूरकर कलाकरांसाठी बघावा एकदा चित्रपट

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.३० जुलै: नुकताच नागपूरकर प्रेक्षकांनी ’बाईपण भारी देवा’हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात बघितला व प्रत्येकाच्या तोंडी या चित्रपटाचे भरभरुन कौतूक होते.मराठी रसिक प्रेक्षक हा नेहमीच उत्तम कलाकृतींना मनापासून दाद देत असतो.कथानकापासून तर अभियनयापर्यंत सहज,सुंदर अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाने मराठी मने अलगद जिंकली.यानंतर ‘कौमार्य’हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आला.कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर वसणा-या कंजारभाट या आदिवसी जमातीमध्ये आढळणारी ‘कौमार्य चाचणी’ची प्रथा ही आजच्या २१ साव्या शतकात देखील आढळते,अवघ्या स्त्री जातीच्या पावित्र्यावर कुठाराघात करणारा हा एक संवेदनशील व सामाजिक विषय घेऊन निर्माते नरेंद्र जिचकार व चारुदत्त जिचकार यांनी हा चित्रपट, मायबाप प्रेक्षकांच्या भेटीस आणला.चित्रपटाचा टीझर बघून प्रेक्षकांच्या देखील अपेक्षा ब-याच उंचावल्या मात्र,प्रत्यक्ष चित्रपटगृहात हा चित्रपट बघताना नागपूरकर म्हणून अनेक बाबींच्या उणिवा प्रकर्षाने जाणवतात व संपूर्णत: नागपूरकरांचा असलेला ‘कौमार्य’हा चित्रपट केदार शिंदेच्या ‘बाईपण भारी देवा’समोर का इतका माघार घेतो?याची उत्तर ही अलगद गवसतात.

मूळात दिग्दर्शक सलीम शेख व निर्माते हे ‘कौमार्य’ची मूळ कथा २०१६ मध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगतात मात्र चित्रपट सुरु होण्यापूर्वी असे कोणतेही ‘डिसक्लेमर’पडद्यावर झळकत नाही.

या चित्रपटात मुख्य भूमिका ही शादाब नावाच्या नायकाने केली आहे जो वास्तवतेत दिग्दर्शक सलीम शेख यांचा पुतण्या आहे.यामुळे राजकारणासारखीच ‘किड‘ मराठी चित्रपटनगरीला ही लागली असल्याची टिका अलगद कानावर पडते,याचे कारण पडद्यावर मुख्य नायक हा अतिशय थोराड दिसला असून, अभिनयाच्या बाबातीत ही सगळंच आलबेल आहे.

ज्याप्रमाणे मुंबईचे दोन अतिशय मुरलेले कलावंत नागेश भोसले व मिलिंद शिंदे यांनी नायिकेच्या वडीलांच्या तसेच जात सरपंचचाच्या भूमिकेत जीव ओतला त्याचप्रमाणे एवढा संवेदशनशील विषय पडद्यावर साकारण्यासाठीही, मुंबईतीलच एखादा तरुण कलावंताची निवड दिग्दर्शकाला करता आली असती किंवा नागपूरातही रंगभूमीवरील अनेक उत्तम अभिनय करणारे व दिसणारे तरुण कलावंत आहे ज्यांना संधी मिळाली असती तर, चित्रपटाला गरजेची असणारी वेगळी उंची प्रदान करता आली असती मात्र,पुतण्याला नायक बनविण्याचा मोह,संपूर्ण चित्रपटालाच ‘सुमार’ दर्जावर घेऊन आल्याचे वास्तव प्रेक्षकांच्या पदरी पडतं!

शादाब याने या पूर्वी ‘अघोर’चित्रपटात एका मित्राची भूमिका निभावली होती मात्र मुख्य भूमिकेचे दडपण तो या चित्रपटात पेलू शकला नाही,याचे कारण या चित्रपटाचे कथानकच ‘लग्नानंतरची पहीली रात्र’व ‘पांढ-या शुभ्र चादरीवर पडणारा रक्ताचा डाग’यावर आधारित असल्याने, एखादा तरुण नायकाने ही भूमिका साकारली असती तर निश्‍चितच नागपूरकर कलाकारांच्या परिश्रमाचेही सार्थक झाले असते.विशेष म्हणजे शादाब याने पडद्यावर साकालेल्या सुमार दर्जाच्या अभिनयापेक्षा जिममध्ये कमावलेले शरीर षौष्ठव हेच, दिग्दर्शकाच्या कॅम-याने अचूक टिपलेले मायबाप प्रेक्षकांनी वारंवार अनुभवले.

सामाजिक संदेश देण्यातही हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला.चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकाला निश्‍चितच मानसिक धक्का बसतो मात्र तो धक्का ‘संतापाचा ’असतो.याचे कारण चित्रपटातील नायिकेची लहान बहीण चमकी, ही जात पंचायतीच्या आदेशाने तिच्या बहीणीच्या सामुदायिक हत्येनंतर बेभान होऊन मोठ्याने किंचाळत पाड्यातील सर्व घरांसमोर वाळत असलेले पांढरे वस्त्र गोळा करुन त्यांना आग लावते व नायकाची ‘सायकल’घेऊन शहराच्या दिशेने निघते,हे दृष्य पडद्यावर संपताच एक अतिशय थिल्लर व तितकंच फूहड असे नृत्य पडद्यावर उमटतं ‘आवाज कर… हूंकार भर’अश्‍या या अतिशय क्रांतीकारी गाण्यात, चमकीचा किरदार निभावणा-या आयशा शेखचे समूह नृत्य पडद्यावर उमटताच, चित्रपटातील कथानकाचं संपूर्ण गांर्भीर्यच नष्ट होतं आणि प्रेक्षक संताप मनात घेऊनच चित्रपटगृहाबाहेर पडताना आढळतो!

चमकीची भूमिका साकारणारी आयशा शेख ही दिग्दर्शक सलीम शेख यांचीच कन्या असून तिने जमेल तसा चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न चित्रपटात केला आहे.तिच्या वाटेला आलेल्या भूमिकेला ती न्याय देऊ शकली,असे म्हणने धाडसाचे ठरेल तरी तिचे वय व अनुभव बघता फारफार तर तिने चांगला अभिनय केला,असे म्हणता येईल.योग्य दिग्दर्शन लाभल्यास पुढे तिच्यामधील कलावंताला भरपूर वाव अाहे.

मात्र,ज्याप्रमाणे ‘सैराट’मधील शेवटचे दृष्य हे प्रेक्षकांना वेगळा धक्का देऊन चित्रपटगृहाबाहेर पाडतात,दिग्दर्शक सलीम शेखच्या ‘कौमार्य’ने शेवटच्या दृष्यानंतर एका क्रांतीकारी गाण्यावर फूहड नृत्य सादर करुन प्रेक्षकांना संतापाचा धक्का दिला,हे मात्र निश्‍चित.

हा चित्रपट प्रेक्षकांच्या ह्दयाला हात घालू शकला नाही मात्र,असे घडण्यास दिग्दर्शकाच्या हाती बराच स्कोप होता.ज्याप्रमाणे या चित्रपटात ड्रोनचा वापर करुन दहा ते पंधरावेळा समुद्रपूर येथील २०-२२ घरांचा पाडा,ओढा,मैदान इत्यादी दाखविण्यात आले त्याच ड्रोनचा वापर करुन चमकी सायकल घेऊन शहराकडे जात असताना दूरवरचे शहर ही दाखवता आले असते व चमकी त्या शहराकडे बदल घडविण्याच्या ध्येयाने, बघत असल्याचे दृष्य चित्रित झाले असते तर फूहड नृत्यापेक्षा निश्‍चितच ते जास्त प्रभावी झाले असते,असे देखील काही टिकाकारांनी मत व्यक्त केले.

एक अतिशय संवेदशनशील विषयावर आधारित ‘कौमाय‘चित्रटात नागेश भोसले व मिलिंद शिंदे हे दाेन मुंबईचे कसलेले अभिनेते सोडल्यास संपूर्ण चमू ही मूळ राज्याच्या उपराजधानीची होती मात्र,हा चित्रपट नागपूरच्या कलावंतांना देखील न्याय देण्यास अपयशी ठरतो.अनेक मुरलेल्या कलावंतांच्या तोंडी एक दोन संवाद दिले आहेत तसेच अनेक कलावंत हे एक दोन दृष्यापूरतेच पडद्यावर झळकतात.

सचिन गिरी या मुरलेल्या अभिनेत्याने नायकाच्या मोठ्या भावाची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत डॉ.संयुक्ता थारोत यांनी ही आपल्या भूमिकेला न्याय दिला.

या चित्रपटात सर्वात जास्त भाव खाऊन गेला तो ‘जबरी’ची भूमिका साकारणारा नीरज जामगडे.जबरी याने नायकाच्या जिगरी दोस्ताची भूमिका पार पाडली.जामगडे यांनी यापूर्वी देखील अनेक मराठी चित्रपटात काम केले असून, नागराज मंजुळे यांच्या ‘झूंड’मध्ये त्याने शतकाचा महानायक अमिताभ बच्चनसोबत काम केले आहे.त्यामुळे अभिनयाची चांगली जाण त्याची विकसित झाली असून, या चित्रपटाची सर्वाधिक सकारात्मक बाजू म्हणून सांगावयाची झाल्यास, जामगडे याचा सहज अभिनय हाच सांगावा लागेल.कर्ज फेडले नाही म्हणून त्याच्या आईच्या देहाला परंपरेप्रमाणे सावकाराच्या वासने पुढे जामीन राहवे लागले व त्यातून जबरीचा जन्म होतो.आपल्या पाड्यातील अशाच एका सावकाराच्या पाशातून दूसरा जबरी जन्माला येऊ नये म्हणून तो एका भेदरलेल्या शाळकरी मुलीला सावकाराच्या पाशातून वाचविण्यासाठी त्या सावकारालाच यमसदनी पाठवतो व पाडा सोडून अज्ञातात निघून जातो.

या संपूर्ण चित्रपटात आणखी एक सुहह्य बाब असेल तर चित्रपटातली चार ही गाणी व काही प्रमाणात संवाद.लग्नापूर्वी आयुष्यभर प्रेम करण्याचे वचन देणारा नायक हा,लग्नानंतरच्या पहील्या रात्रीत रक्ताचा एक डाग पांढ-या शुभ्र चादरीवर न दिसल्याने कायमचं नातं तोडतो.इतकंच नव्हे तर जात पंचायत बोलवतो.यावर नायिका पूजा शाहू ही ‘पाढ्यातला पुरुष प्रेमात आंधळा जरी झाला तरी रक्ताच्या एका थेंबासाठी नातं तोडतो,तो पांढरा कपडा सतत डोळ्यात खूपतो’’कुठल्या मातीचे बनले आहे,लूहूलूहान होतील पर परंपरा सोडणार नाही’इथे तर समदी औरत जातच गोली(जामीन) आहे रिती पुढे’चो-या चपाट्या तुम्ही करणार आणि गोली बायांना करणार’असे काही संवाद भाव खाऊन जातात.असे असले तरी मध्येच पाड्यातली भाषा तर मध्येच नायिकेच्या तोंडी उत्तम मराठी भाषा ही खटकून जाते.

चित्रपटात आदित्य देशमुख यानेही सुरेख भूमिका साकारली आहे.याच पाड्यावरचा असला तरी शिकल्या सवरल्यामुळे त्याचे विचार पुढारलेले असतात.आपल्या पाड्यातील लोकांनी विचाराने बदलावे,वाईट परंपरेचा त्याग करावा,यासाठी तो वारंवार शहरातून पाड्यावर येतो आणि सर्वाच्या तिरस्काराला वारंवार बळी पडतो.सायकल चालविल्याने,नदीवर जाऊन कपडे धूतल्याने इत्यादी अश्‍या अनेक कारणांनी स्त्रीच्या योनी मार्गातील सुक्ष्म असा पडदा हा फाटू शकतो व याचा पता देखील स्त्रियांना लागत नाही,त्यामुळे कौमार्य चाचणीसारखी अघोरी रिती बंद करा,अशी विनवणी करतो मात्र,जात बाहेर केलेल्या आदित्यला ’तुझ्या सायंसपेक्षा पांढ-या कपड्यात या लोकांसाठी अधिक पावित्र्य असल्याचे’नायिका श्रद्धा ही सांगते.

शहरातील आदित्यचे शिक्षक त्याला समजावताना ‘तुझ्या पाड्यातील स्त्रियांचे हात दगडाखाली दबले आहेत,त्या हातांना तू शक्ती दे,असे सांगून प्रेरित करतात.मात्र,कट्टर परंपरे पुढे आदित्यलाही हार मानावी लागते.आदित्य देशमुख याच्या वाट्याला धीर गंभीर भूमिका आली असून, त्याने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला.शादाब याच्यापेक्षा आदित्य किवा तत्सम वयाचा नायक मुख्य भूमिकेत असता तर चित्रपट काही प्रमाणात प्रेक्षकांसाठी ’सुसह्य’झााल असता,हे मात्र निश्‍चित!

नवोदित पूजा शाहू या नायिकेचा अभिनय ठिक हाेता,इतक्या संवेदशनशील व तितक्याच आव्हात्मक विषयाच्या भूमिकेला तिला आणखी चांगला न्याय देता आला असता.

याशिवाय नायिकेच्या आईची भूमिका साकारणा-या मंजुश्री डोंगरे यांच्याही अभिनयाच्या मर्यादा प्रकर्षाने जावणल्या.डोळ्यात अश्रू आणण्याचा अभिनय हा रडण्यापेक्षा किंचाळून बोलण्याने साधत नसतो. वास्तवतेत उधवस्त झालेल्या नायिकेच्या अंर्तमनातील मर्म समजून घेण्याचे तसेच तरी देखील रितीरिवाजालाच बांधिल राहण्यातील द्विधावस्था साकारण्याची सुवर्ण संधी ,त्यांच्या वाट्याला आली असताना देखील अभिनयाच्या पातळीवर त्यांना ती त्यांना साकारता आली नाही.

या चित्रपटातील आणखी एक सर्वात मोठा ड्रा बॅक म्हणजे पाड्यावरील स्त्री जिवनातील हाल अपेष्टा,वेदनामयी जीवन,आरोग्याच्या अपु-या सोयी,स्त्रीया देखील अवैध दारु गाळण्यात सहभागी असणारे वास्तव इत्यादी अनेक बाबींना दिग्दर्शकाने स्पर्श देखील केला नाही, या उलट मध्यांतरपर्यंत शादाब व पूजा शाहू यांचे प्रेम प्रकरण फूलविण्यात व ‘सिलसिला’फेम रेखा-अमिताभ पठडीतील गाणी साकारण्यात दिग्दर्शकाने आपले संपूर्ण कसब घालवलेले असल्याने, अतिशय विजोड जोडीचे प्रेमचाळे अगदी मध्यांतरापर्यंत प्रेक्षकांना झेलावे लागतात.

कथानक आणि कास्टींग या दोन्ही बाजूत हा चित्रपट सपशेल मार खातो.अतिशय चांगले कलावंत दिग्दर्शकांनी गर्दीत उभे केले किवा अतिशय तुरळक संवाद दिले.पाडयातील एका माणसाच्या पायावर वैर धरुन कु-हाडीने घाव घालण्याचे दृष्य साकारले गेले आहे.प्रथेप्रमाणे आपापसातील वैर पाड्यावरच पंचायत न्याय निवाडा करुन मिटवतात मात्र,पाड्यावर पोलिसांची वर्दी येऊ देत नाहीत किवा शहरात नेऊन त्याच्या जखमेवर उपचार करीत नाही परिणामी त्याची जखम शेवटच्या दृष्यापर्यंत तशीच हळूहळू सडत चाललेली,किळसवाणी दाखविण्यात येते.मात्र,त्यावर साधा पाला पाचोळा किवा फडके बांधून ठेवण्याचीही मुभा दिग्दर्शकाची पटकथा देत नाही!हे अतिरंजित वाटतं.

कथानकामध्ये सातत्य नसणे ही देखील उणीव प्रकर्षाने जाणवत रहाते.मूळात आदित्य देशमुख हा जात पंचायतीमध्ये येऊन स्त्रीच्या योनि मार्गातील नाजूक पडदा अनेक कारणांमुळे फाटू शकतो हे तळमळीने सांगतो,दिग्दर्शकाने मात्र इतक्या महत्वाच्या संदेशाला ‘फक्त’ एकाच वाक्यात ‘उरकून’घेतले!दूसरीकडे अगदी मध्यांतरा पर्यंत नायक व नायिकेचे प्रेम प्रसंग फूलविण्यात आपले परिश्रम ओतले!कसा मिळणार सामाजिक संदेश प्रेक्षकांना?निर्मात्यांनी दावा केल्याप्रमाणे?

चार दशकांपूर्वी संपूर्णत: नागपूरकर कलावंतांचाच असणारा ‘माणूसकी’हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.यानंतर दोन मुंबईकर कलावंतांचा अपवाद वगळता आता ‘कौमार्य’आला मात्र,इतक्या दशकात आम्ही हीच अशी प्रगती गाठली आहे का?हा विचार प्रेक्षकांना छळून जातो.‘माणूसकी’हा तूफान गाजला होता.अगदी पश्‍चिम महाराष्ट्रातही तो चित्रपट डोक्यावर घेण्यात आला होता.झी सिनेमाव ‘माणूसकी’ हा चारशे वेळा तरी दाखवून झाला असेल,‘कौमार्य’च्या बाबतीत असे घडू शकेल का?

कथानक,अभिनय व योग्य कास्टींग हे कोणत्याही चित्रपट किवा नाटकाच्या यशाचे गमक असतात.सलीम शेख सारखे नागपूरच्या रंगभूमीवर एवढी दशके वावरणा-या धडाडीच्या कलावंतांच्या मात्र भव्य पडद्यावरील मर्यादा या चित्रपटाने प्रकर्षाने स्पष्ट झाल्या.

आज ओटीटी व बेवसिरीजच्या काळात मराठी चित्रपटांपुढे फार मोठे आव्हान उभे ठाकले असताना अश्‍या दर्जाचे चित्रपट प्रेक्षकांच्या गळी उतरविता येत नाही.प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट बघावा अशी अपेक्षा जर निर्माते व दिग्दर्शक करीत असतील तर त्या दर्जाचे चित्रपट देणे गरजेचे आहे.हे नागपूरातच चित्रित झालेल्या ‘तानी’ किवा केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी’ने सिद्ध केलं आहे.‘कौमार्य’चित्रपट सामाजिक संदेश देणारा असल्याची मखलाशी किती ही केली गेली असली तरी या ही कसौटीवर तो पूर्ण उतरत नाही.

कौमार्य चाचणीत रक्ताचा डाग पडला नसल्याने व जात पंचायती समोर न्याय मागताना,काहीही झाले तरी नव-यासोबतच नांदायचा अट्टहास धरल्याने शेवटी नायिकेसोबत काय घडतं?हे प्रेक्षकांनी पडद्यावर बघणे अपरिहार्य आहे.

चित्रपट निर्मिती म्हटली की अनेक बंधणे व मर्यादा येतात.सर्वात मोठी बाब असते ती बजेट ची.अमूक बजेटमध्येच चित्रपट पूर्ण करण्याचं कसब दिग्दर्शकाला दाखवावं लागतं.या ही चित्रपटात मुंबईतील दोन मोठे कलाकार होते.त्यांचे मानधन,एका दिवसाचे शुटींग लांबल्यास,निर्मात्यांवर येणारा भार,नागपूरचे किवा झाडीपट्टीतले असले तरी अभिनयाच्या बाबतीत काही कलावंतानीही दिग्दर्शकाला न दिलेली साथ इत्यादी अनेक बाबी या चित्रपटाच्या यश-अपयशाची जुळल्या आहेत.

असे असले तरी जहाजाच्या कप्तानावरच नौका यशस्वीरित्या पार करण्याची जबाबदारी असते,हे विसरता येत नाही.‘कौमाय‘चित्रपट हा प्रेक्षकांच्या पंसदीस उतरला असता तर यश हे सर्वांचे असते मात्र असे घडले नाही त्यामुळे अपयशाचे संपूर्ण श्रेय जहाजाचे कप्तान असणारे दिग्दर्शक सलीम शेख यांनाच घ्यावे लागणार आहे.

मात्र,तरीहीमराठी प्रेक्षकांनी किमान नागपूरकर प्रेक्षकांनी, हा चित्रपट कोणतीही अपेक्षा न ठेवता व आपली सारासार विवेकबुद्धी बाजूला सारुन, चित्रपटगृहात जाऊन आपल्या नागपूरकर कलावंतांसाठी एकदा तरी चित्रपट बघावा,असेच ‘सत्ताधीश’चे तरी देखील आवाहन आहे.

कथा,पटकथा,संवाद लेखन व दिग्दर्शन सलीम शेख यांचे असून चित्रपटाचे संगीतकार विरेंद्र लोटणकर आणि पुष्कर देशमुख आहेत.गीतकार संजय बंसल,डॉ. विनोद राऊत,डॉ.विनोद देवरकर हे असून श्रुती चौधरी,कैवल्य केजकर,गौरव चाटी,मनीष मोहरिल यांचे पार्श्वगायन आहे.

छायाचित्रकार हर्षद जाधव हे आहेत तर चित्रपटात नागेश भोसले,मिलिंद शिंदे यांच्याशिवाय मूळ नागपूरकर कलाकार शादाब,पूजा शाहू,देवेंद्र दोडके,देवेंद्र लृटे,राजेश चिटणीस,सचिन गिरी,आदित्य देशमुख,नीरज जामगडे,मंजूश्री डोंगरे,आयशा शेख तसेच अन्य यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

…………………..

 

Latest बातम्या