कुकडेंचा शहराध्यक्ष पदी पदग्रहण सोहळा
सहज खांदेपलट करणारा भाजप एकमेव राजकीय पक्ष:प्रवीण दटके
कुकडेंच्या नेतृत्वात मनपात १२० पेक्षा अधिक जागा जिंकणार
नागपूर,ता.२३ जुलै २०२३: भारतीय जनता पक्ष म्हणजे एक कुटूंबच आहे.मी युवा मोर्चामध्ये प्रवीण दटकेंच्या मार्गदर्शनाखाली काम केलं.आमदार मोहन मतेंसोबत काम केले.माझे गुरु येथे आहेत,सुबाेध आचार्य,श्रीकांत आगलावे त्यांच्यासोबत बजरंग दलात काम केलं.बापू मास्तर चिटणीस तेच सर्वांना पहील्यांदा शाखेत घेऊन गेलेत.आपला परिवार खूप मोठा आहे त्यामुळेच मी आपल्या परिवारामध्येच वावरतोय अशी भावना होते.भाजपचा हा परिवार रक्ताच्या नात्याच्या संबंधापेक्षाही मोठा आहे,असे विधान आज भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांनी केले.ते भाजपच्या गणेशपेठ येथे मंगलम कार्यालयात पदग्रहण सोहळ्यात बोलत होते.
याप्रसंगी ‘राष्ट्रभक्ती ले ह्दय में हो खडा यदि देश सारा..संकटो पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा’अशा शब्दात त्यांनी भाषणात स्फूरण भरलं व सभागृहात ‘भारत माता की जय’चे नारे गुंजले.तुम्हाला वाटत असेल बंटीला इतका घाम का आला आले?याचे कारण सांगताना,रस्ता कठीणच आहे हे आज पदग्रहण सोहळ्यात येताना याचा अनुभव आला असे सांगून, लिफ्ट मधला किस्सा त्यांनी सांगितला.आता वर येताना लिफ्ट ओव्हर लोड झाल्यामुळे वर सरकरतच नव्हती,आधी तीन कार्यकर्ते बाहेर पडले,यानंतर हेव्हीवेट नेते किशोरभाऊ वानखेडे लिफ्ट मध्ये आहे म्हणून लिफ्ट वर जात नाही,असे काही जण बोलले,ते ही बाहेर निघाले तरी लिफ्ट जागेवरची हलली नाही,शेवटी मी लिफ्टच्या बाहेर पडलो आणि लगेच लिफ्ट वरती गेली,त्यामुळेच मला कळलं माझा रस्ता कठीण आहे,अशी मिश्किली त्यांनी केली आणि संपूर्ण सभागृह हास्य कल्लोळात बुडाला.
मोहन मते,कृष्णा खोपडे यांचा माझ्यावर आर्शिवाद आहे असे सांगताना ज्याप्रमाणे कृष्णा खोपडे यांनी त्यांच्या भाषणात पहाटे उठण्याचा किस्सा सांगितला,मी तर दोन महिन्या पूर्वीपासूनच अचानक सकाळी ६ वाजतापासून उठत असल्याचे कुकडे म्हणाले आणि पुन्हा एकदा भरगच्च भरलेले सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.६ वाजता मी उठतो आणि ७ वाजता प्रमोद पेंडकेंना फोन करुन ‘जय श्री राम’म्हणतो.घरी जायला रात्रीचे १२ वाजतात.कार्यकर्ता म्हणून राष्ट्रनिर्माणासाठी युवा मोर्चामध्ये असतानापासूनच उशिरा घरी जाण्याची सवय असल्याचे ते म्हणाले.
कुंभारे यांनी त्यांच्या भाषणात एक सूचना केली की कार्यकर्त्यांना समजाविण्याचे कार्य करावे,मी म्हणतो,‘समजावण्याचे विश्वसनीय एकमात्र केंद्र,कुकडे जितेंद्र’असे सांगून पुन्हा एकदा कुकडे यांनी हास्य फूलवले.
महाभारताचा दाखल देत कुकडे म्हणाले,की महाभारताच्या युद्धात अर्जून पितामह भिष्माचार्याला बघून अवसान गाळतो आणि भगवान श्रीकृष्ण त्याला गीतेचा उपदेश देतात.अर्जून म्हणतो हे माझे आजोबा आहेत मी यांना बाण कसा मारु?हे माझ्या रक्तासंबंधातले आहेत.भगवान श्रीकृष्ण सांगतात भले ही ते तुझे आजोबा असतील तरी ते धर्मासोबत नाही आहेत.त्यामुळेच सिंहासन जर पाहीजे असेल तर न्यायासन पाहीजे आणि न्यायासनाला ताकद द्यायची असेल तर धर्मासनाचं अधिष्ठान आवश्यक आहे.
आता मला जी जबाबदारी देण्यात आली आहे तितक्या बूथचा मला अभ्यास करावा लागेल.२४०० बूथ आणि १५८ वार्डाचे अध्यक्ष आहेत ते प्रत्येक निवडणूकीत भगवान श्रीकृष्णाची भूमिका निभवतील आणि त्यांच्यासोबतचे बूथ प्रमुख हे पार्थ अर्जूनाची भूमिका निभवतील आणि गडकरीं यांना पाच लाखांच्या वर मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
मी युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो तेव्हा दटके यांनी सांभाळून घेतलं.कृष्णा खोपडे,मोहन मते,कुंभारे यांनी सांभाळून घेतलं.आपला पक्ष सर्वांना सांभाळून घेतो.‘सर्वत्र भवन्तु सुखिन:सर्वे सन्तु निरामया:’सर्वांना सांभाळून घेणारा आणि सामावुन घेणारा असा आपला पक्ष आहे आणि मला ही ते सांभाळून घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.भाजपचा विजयाचा झेंडा हा येणा-या तिन्ही निवडणूकांमध्ये आपण फडकवू असा विश्वास व्यक्त करीत, माझ्याकडून काही चूक झाल्यास लहान भाऊ समजून अधिकारवाणीने मला माझी चूक सांगा,मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेल,अशी विनंती बंटी कुकडेंनी याप्रसंगी ज्येष्ठ पदाधिका-यांना केली.
याप्रसंगी बोलताना भाजपचे आमदार व माजी शहराध्यक्ष प्रवीण दटके म्हणाले,की भाजपच एक असा राजकीय पक्ष आहे ज्या पक्षात सहज खांदेपाटल होत असतं.मागील साढे चार वर्षातील माझ्या कार्यकाळात अनेक अडचणी आल्या.त्यात करोना महामारीचाही काळ होता.२०१९ मध्ये आपली सत्ता ही गेली मात्र,परत एकदा चांगल्या मार्गाने आपली सत्ता परत आली.अनेक अडचणींवर मात करत आपण सत्ता परत मिळवली.आपल्याला गडकरी,देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावणकुळे,आमदार कृष्णा खोपडे,मोहन मते यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन मिळतं हे आपलं भाग्य आहे.आता जितेंद्र कुकडे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत भाजप १२० जागांच्या वर जागा मिळवणार असून लोकसभेत यावेळी आठ लाख मतांच्या मताधिक्या राहील व शहरातील सहाही विधान सभा मतदारसंघात भाजपचा विजय, जितेंद्र कुकडे यांच्या नेतृत्वात साकार हाेणार असल्याचे दटके म्हणाले.माझ्या कार्यकाळात अनेकदा कार्यसिद्धीसाठी कठोर व्हावं लागलं,अनेकदा कार्यकर्त्यांची मने दुखावल्या गेली त्यासाठी आज मी तुमची माफी मागतो,या नंतर बंटीला बंटी संबोधन न करता, जितेंद्र म्हणावे लागेल कारण पद मोठे आहे,अशी मिश्किीली करीत, जितेंद्रच्या ना मागे उभे राहू ना पुढे, तर एकदिलाने काम करु व सोबत उभे राहू,असे ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना आमदार मोहन मते म्हणाले की,दटके यांच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले,शहर प्रमुख म्हणून ज्या प्रमाणे दटके यांनी आपली जबाबदारी पार पाडली,आता कुकडे यांच्या नेतृत्वात पक्ष आणखी मोठी होईल याची काळजी घ्या असे सांगून कुकडे यांना शुभेच्छा प्रदान केल्या.
याप्रसंगी बोलताना आमदार कृष्णा खोपडे यांनी आज ज्यांनी एकमेकांना पदभार सोपवला ते गहीरे मित्र असल्याची मिश्किली केली.आपल्या जुन्या मित्राला दटके यांनी पदभार सोपवला असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी त्यांनी संघाच्या शिकवणीची आठवण विशद केली.भाजप हा पक्ष सायकलप्रमाणे आहे.सायकलचं चाक सतत फिरत असतं,ठरलेल्या वेळी कोणीही पदाधिकारी होतो.विशेष म्हणजे जो जो युवा मोर्चाचा अध्यक्ष राहीला आहे पुढे त्याला भाजपचे शहराध्यक्ष पद मिळाले,याचा अर्थ पुढे कोण असणार हे समजून घ्या,अशी कोपरखळी ही त्यांनी मारली.मी पण युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो,अनिल सोले,कोहळे,दटके हे आमदार झाले तर गडकरी हे तर सरळ अगदी ‘वरच’गेलेत,अशी मिश्किली त्यांनी केली.आता बंटी कुकडे शहराध्यक्ष झाला.
भाजपमध्ये जो संघटनात्मक ढाचा आहे त्यात जो जो कार्यकर्ता काम करतो त्याला योग्य पद मिळतं.दुस-या पक्षात असं घडत नाही.काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष सहा-सात वर्षांपासून पदाला चिपकून असल्याचा टोला त्यांनी हाणला व काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.मी २०१२ ते २०१६ दरम्यान शहराध्यक्ष होतो.यानंतर सुधाकर कोहळे,मग प्रवीण दटके व आता बंटी शहराध्यक्ष झाला.हे सगळं पक्षाच्या संघटनात्मक दृष्टिकोणामुळे घडलं.वरिष्ठांचे उपदेश आम्ही पाळले.पक्ष गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत गेला.गल्लीतल्या बूथ पर्यंत कार्यकर्त्यांनी पक्ष पोहोचवला,असे ते म्हणाले.
दटके यांच्याकडून कामाची पद्धत शिकण्यासारखी आहे.त्यांच्या वडीलांच्या मार्गदर्शनात आम्ही ट्रेंड झालो होतो.कार्यकर्ता कितीही हवालदिल झाला तरी प्रवीण दटके यांनी कार्यकर्त्याला बूथपर्यंत पोहोवले.आता बंटीला हे साधावे लागेल.बंटी बजरंग दल,विश्व हिंदू परिषद ते युवा मोर्चाचा मेहनती व कर्मठ कार्यकर्ता राहीलेला आहे,म्हणून आज महत्वाच्या पदापर्यंत पोहोचला.या ‘सिंहासनावर’ बसणे कठीण काम असून इतकं सहज नाही आहे.आपले ज्येष्ठ अर्जुनदास कुकरेजा,प्रभाकरराव दटके आदी सन्यस्थ पदाधिका-यांनी पक्षाला जनाधार मिळवून देण्यासाठी अपार कष्ट घेतले आहे.पूर्व नागपूरात तर भाजप म्हटलं की लोकं गोटे मारायला धावायचे,तुटून पडायचे.मात्र,दामोदर वैरागडे,प्रभाकर शेंडे आदी समर्पित कार्यकर्त्यांनी पक्ष घराघरापर्यंत पोहोचवला,माघार घेतली नाही,लोकांच्या कृतीने डगमगले नाही.
याप्रसंगी कष्णा खोपडे यांनी छोटू भैया धाक्रस यांची एक आठवण सांगत,मी जेव्हा पहील्यांदा नगरसेवक झालो तेव्हा धाक्रस यांनी मला कळवले मी उद्या सकाळी ७ वाजता घरी चहा घ्यायला येणार आहे.तेव्हा माझी सवय सकाळी साढे आठ नंतरच उठण्याची होती.सात वाजायला ५ मिनिटे कमी असताना दारावरची बेल वाजली,खिडकीतून बघितले तर छोटू भैया होते.तसाच धावत खाली आलो.मला त्यांनी दुस-या दिवशी घरी बोलवालं.माझ्याकडे ५० पत्रके दिली वाटायला,त्यातील ३० जणांचे पत्ते दिले आणि २० नवीन लोकांना वाटून येण्याची सूचना केली.ती पत्रके मी स्वत: जबाबदारीने पोहोचवली आहे की नाही,याची ते खात्री करुन घेत असे.
आजचा काळ १०० दिले तर ५०० वाटले असे सांगतात.तो काळ मुरमुरे-फूटाणे खाऊन काम करण्याचा होता.आता जमीन-आसमानचा फरक झालेला जाणवतो.आता मनपात १०८ नगरसेवक,६ आमदार,खासदार व या मंचावर जेवढे पदाधिकारी बसले आहेत त्यांना त्या पदांवर बसवण्याचे कार्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.त्यामुळे नवनियुक्त शहराध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष यांनी कधीही ‘नॉट रिचेबल’राहू नये व आपला कॉल डायव्हर्ट मोडवर ठेऊ नये.कार्यकर्त्यांसाठी २४ बाय ७ उपलब्ध रहा,अशी सूचना करीत,कार्यकर्त्यांना अपेक्षा असते.भाजपचा कार्यकर्ता आपले काम करुन देईल,हा जनतेला देखील विश्वास असतो.वरतून टपकलेला मी तरी माझ्या कारकीर्दीत पदाधिकारी झालेला भाजप पक्षात बघितला नाही,असे ते म्हणाले.
प्रवीण दटके याचे उत्तम उदाहरण आहे.प्रवीणची काम करण्याची पद्धत ही तर मेट्रो चालविणा-यासारखी सुपरफास्ट आहे.कार्यकर्त्यांकडून प्रवीणनी उत्तम काम करुन घेतले.यासाठी अनेकवेळा कार्यकर्त्यांना वाईट वाटले असेल मात्र,नेत्यांच्या आदेशांचे पालन करुन घेणे गरजेचेच होते,असे खोपडे म्हणाले.आता बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात किमान पूर्व नागपूरात २ लाख मतदार जोडणार असून आगामी निवडणूकीत पूर्व नागपूरातून २ लाख मतांची लीड राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.सूर्य हा पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो,अशी कोटी देखील त्यांनी याप्रसंगी केली.
याप्रसंगी बोलताना आमदार विकास कुंभारे यांनी देखील आपला पूर्वानुभव सांगताना १९९७ साली नगरसेवक असताना गडकरी यांनी विधानसभा लढण्याची ऑफर दिली होती.एका वार्डाचा अपक्ष नगरसेवक असताना व पूर्व नागपूर मतदारसंघाचा कोणताही अंदाज नसताना,मी ती नाकारली होती.यानंतर पुन्हा १९९९ मध्ये गडकरी यांनी पूर्व नागपूरातून निवडणूक लढण्याची ऑफर दिली.यावेळी मी ती स्वीकारली.पूर्व नागपूरात पक्षाचे कोण-कोण पदाधिकारी आहेत हे देखील तेव्हा माहिती नव्हते.एका पदाधिकारी यांच्याकडे निवडणूकीची बैठक होती.मी बैठकीला हजर राहीलो तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी मला बघितले देखील नव्हते,तरी देखील ते प्रचारकार्यात गुंतले होते,याचे कारण पक्षाचा आदेश.मला न बघता,ओळखताही ते पक्षाचे काम करत होते.मला दुस-या पक्षातील कामाचा अनुभव नाही त्यामुळे दूस-या पक्षातील पद्धत मला माहिती नाही,असे ते म्हणाले.यावेळी बंटी कुकडे यांना सल्ला देत,अनेक कार्यकर्ते हे कामासाठी भेटतात,त्यातील काहींची कामे होतात,अनेकांची होत ही नाहीत.आमच्याकडून काम नाही झाले तर ते शहराध्यक्षांकडे जातात.बंटी कुकडे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करावा असे सांगून बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत १२० नगरसेवक निवडून आणण्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.
याप्रसंगी बोलताना,भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी बंटी कुकडे यांचा फोन आला छोट्या भावाला अर्शिवाद देण्यासाठी या,त्यांचा हक्क आहे मला तसे सांगण्याचा त्यामुळे आलो,असे ते म्हणाले.बंटी हा तडफदार कार्यकर्ता आहे मात्र आपल्या भाषणात त्यांनी जी ‘गीता‘ऐकवली त्यामुळे त्यांनी ‘भागवताचार्य’होऊ नये,अशी कोटी कोहळे यांनी केली.त्याच्या नेतृत्वात १२० नगरसेवक,६ आमदार आणि एक खासदार मतदारसंघ आपण जिंकणारच.बंटीच्या मागे संपूर्ण ताकद उभी राहील.मी जेव्हा शहराध्यक्ष झालो तेव्हा पक्षात अनेक ज्येष्ठ नेते होते.आपल्या पक्षात वय बघत नसून लहानांना सांभाळून घेण्याची पद्धत असून हीच पद्धत संघनात्मक शक्ती वाढवत असल्याचे ते म्हणाले.कुंभारे यांनी केलेली कार्यकर्त्यांना समजावण्याची सूचना आवर्जून बंटी याने पाळावी.खोपडे आपल्या भाषणात म्हणाले,कोहळे यांनी दक्षीण नागपूरातून सरळ ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी कशी उडी घेतली,काेणाला कळले ही नाही.भगवान राव यांच्यानंतर मीच शहराध्यक्ष व नंतर जिल्हाध्यक्ष झालो.जो शहराध्यक्ष असतो व नंतर जिल्हाध्यक्ष बनतो त्यानंतर तो काय होतो?हे समजून घ्या,अशी कोटी याप्रसंगी कोहळे यांनी केली.‘नसीब से ज्यादा व समय के पहले कुछ नही मिलता’त्यांच्या या वाक्यावर सभागृहात टाळ्यांचा जोरदार गजर झाला.पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली,मला विश्वास आहे ती मी सार्थक करणार.मी शहराध्यक्ष होतो तेव्हा भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते आता बंटीच्या नेतृत्वात १२० नगरसेवक निवडून येतील याची खात्री आहे.आपले नेते नितीन गडकरी,देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचे आदेश कटाक्षाने पाळत रहा,बंटी यांनी मनात ठरवलेलं यश त्याला मिळो,अशी सदिच्छा याप्रसंगी कोहळे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना,संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर म्हणाले,की तळागाळातल्या कार्यकर्त्याला भाजपमध्ये मोठी जबाबदारी मिळते म्हणूनच आपला पक्ष ‘पार्टी विथ डिफरेन्स’ आहे.आपला पक्ष इतर पक्षापेक्षा वेगळा आहे.अश्या कार्यकर्त्यांमुळेच आपला पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचला.आता आपल्या समोर तीन मोठ्या निवडणूका आहेत.सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणूका होऊ शकतात.वर्षभरात लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका आहेत.दटके यांनी कामाची मोठी रेष ओढली आहे.बंटी कुकडेंनी त्याहून आणखी मोठी रेष आेढावी.कोहळे व कुकडे यांना जे सिंहासन मिळाले आहे ते विक्रमादित्याचे सिंहासन आहे.त्या सिंहासनावर जो बसतो तो योग्य कामच करतो,अयोग्य काम करत नाही.गंगाधर फडणवीस,प्रभाकरराव दटके यांच्यानंतर गिरीश व्यास,अनिल सोले,प्रवीण दटके यांनी या परंपरेचं निर्वाहण केलं.आता कोहळे,कुकडे यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागात यश संपादन करु,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सूत्र संचालन संजय बंगाले यांनी केले.याप्रसंगी मंचावर माजी आमदार अनिल सोले,प्रदेश प्रभारी चैनसुख संचेती,संजय भेंडे,माजी आमदार गिरीश व्यास,माजी महापौर अर्चना डेहनकर,विरेंद्र कुकरेजा,संदीप जाधव आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा