निसर्गप्रेमी लालसिंग ठाकूर यांनी फूलवली गच्चीवरच फळबाग
नागपूर,ता.२१ जुलै २०२३: नुकतेच टमाटरच्या भावाने एकशे एेंशी रुपये किलोचा भाव ओलांडला आणि सामान्यांच्या ताटातून ही जीवनावश्यक वस्तूच हद्दपार झाली. भाजीपाल्याचे दर हे निसर्गाच्या लहरीपासून तर दळवळणाची साधने,वाढत्या पेट्रोल,डिजेलचे दर इत्यादी अनेक बाबींवर अवलंबून असतात.महिन्याच्या तीस-एकतीसही दिवस कुटुंबियांच्या ताटात सकस,पौष्टिक आहार देणे हे आता सर्वसामान्यांच्या आटोक्या बाहेरची गोष्ट झाली असताना, हनुमान गल्ली येथील हॉटेल सनस्टारच्या गच्चीवर चक्क सेंद्रिय शेतीच, एका अवलिया निसर्गप्रेमीने फूलवली आहे.लालसिंग ठाकूर असे या अवलियाचे नाव आहे.
विशेष म्हणजे,या गच्चीवरील ही फळबाग पूर्णत:टाकाऊ वस्तूंमध्ये फूलली आहे.कुलरच्या खराब झालेल्या टाक्या,पॉलिथिन,प्लासटिकचे ड्रम,पोते इत्यादी साहित्यांमध्ये ही अख्खी फळबाग फूलवण्यात आली आहे.कूलरच्या टाकाऊ टाकीत तर एक पपीत्याचे हिरवेगार झाड डोलदारपणे उभे असून त्यावरील असंख्य पपीते लालसिंग यांच्या सेवासुश्रूषेची साक्ष देतात.
या सेंद्रिय शेती मधील ‘अडूसाचं‘ झाड याने करोना काळातली महाभयंकर त्रासदी नकळत डोळ्यासमोर उभी केली.अडूसाच्या पानांसोबत लवंग,काळे मिरे व अदरक घालून अनेकांनी त्याचा काढा पिऊनच करोनाच्या विषाणूला स्वत:पासून दूर ठेवण्यास यश मिळवले होते,असे लालसिंग सांगतात.या हॉटेलमधील संर्पूण स्टाफने करोना काळात दोन वर्षे अडूसाच्या झाडावरील पानांचा काढा घेतला.भारतातील अनेक आयुर्वेदिक कंपन्या या, आपल्या प्रोडक्टमध्ये अडूसाच्या पानांचा उपयोग करतात,हे विशेष.
याच्याच बाजूला असणारे ‘हरजोड’या झाडाची महत्तीही काही वेगळीच.हाड तुटल्यास याचा लेप लावल्याने सूज उतरविण्याची किमया या झाडाची पाने लीलया साधतात.वेदनेची तीव्रता ही कमी होते,अनेकदा हाड देखील काही काळाने याचा लेप सातत्याने लावल्यास जुळून जातात,असे लालसिंग सांगतात.
दोन हजार स्के.फूटच्या गच्चीवर आयुर्वेदिक झाडांसोबतच विविध प्रकारच्या पालेभाज्या व विविध प्रकारच्या शेंगा लक्ष वेधून घेतात. चवळीची पालेभाजी,ती देखील बाजारात मिळते तशी नसून मोठमोठ्या पानांची चवळी ही लज्जतदारच बनते.तुरई,कारले,भेंडी,वांगे, ते ही चार प्रकारची वांगी वेगवेगळ्या रंगाची व आकाराची लालसिंग यांच्या शेतीची शोभा आणखी वाढवतात.वाल,चवळीच्या शेंगा,काकडी,बरबटी,लौकी,कटवल इत्यादी संपूर्ण भाज्या या कोणत्याही प्रकारची रसायने न वापरता सेंद्रिय पद्धतीने उगवल्या गेल्या आहेत.
या भाज्यांच्या परिरासतून थोडं पुढे गेल्यास अगदी कोप-यात भाजी बाजारात कुठेही सहसा सापडत नाही ती धोप्याची पाने वा-यासोबत डूलताना आढळतात!बेसन लाऊन त्याची वडी करुन तळून खायला जाणारा हा पदार्थ घराघरातून जवळपास हद्दपारच झाला आहे.लालसिंग यांच्याकडे खास धोप्याची पाने मागायला येणारे ओळखीचे बरेच असतात.
चक्क सिमेंट कॉंक्रिटच्या गच्चीवर भाज्या आणि आयुर्वेदिक झाडांसोबतच संत्रा,लिंबू,पेरु,पपई इत्यादी फळांची बाग ही अतिशय सुंदर बहरलेली आढळते.यासोबतच फूलांची सुगंधी दरवळही लालसिंग यांच्या शेतीमध्ये दरवळतेय.अपराजिताची सुंदर पांढरी फूले जी भगवान शंकराच्या पिंंडीवर वाहीली जातात,लालसिंग यांच्या या फूलबागेत हमखास आढळतात.याशिवाय मोगरा,रातराणी,जासवंद,पारिजातक इत्यादी अनेक प्रकारची फूलबाग लालसिंग यांच्या सेंद्रिय शेतीत बहरली आहे.
भगवान विष्णूला अतिशय प्रिय असणारी तुळस,या तुळशीचेच अनेक प्रकार या ठिकाणी आढलतात जे वातावरणाला अाणखी जास्त सकारात्मक उर्जेने भारावून टाकतात.
थोडक्यात,सृजनातून निसर्गाचा आनंद घेणारा व स्वत:सिमेंट काँक्रिटच्या गच्चीवर सेंद्रिय निसर्ग फूलवणारा लालसिंग ठाकूरसारख्या अवलियांची,आज आपल्या शहरात आणखी जास्त गरज अाहे,असंच आता म्हणावं लागेल.
आजूबाजूच्या रिकाम्या गच्च्या बघून वाईट वाटतं-लालसिंग ठाकूर
हॉटेल सनस्टारच्या या सेंद्रिय शेतीची पेरणी झालेल्या गच्चीवरुन जेव्हा दूर-दूरपर्यंतच्या घरांवरच्या गच्चीवर माझी नजर जाते तेव्हा त्यांच्या रिकाम्या गच्च्या बघून खूप वाईट वाटतं.अनेक मोठ्या ईमारतीच्या छत हे या हॉटेलपेक्षाही मोठ्या आहेत मात्र तिथे ही फक्त कपडे वाळवणे किवा एखाद दूसरा मोगरा,गुलाबाची रोपे,या पलीकडे काहीही दिसत नाही.माझ्या शहराच्या सर्व इमारती ,सेंद्रिय शेतीने भारुन टाकण्याचा माझा मानस आहे,यासाठी मी नि:शुल्क त्यांना मार्गदर्शन करण्यास तयार आहे.रोपे कशी लावायची,वाढवायची त्यातून पुन्हा बियाणे कशी राखून ठेवायची,रसायनाच्या फव्वारणी ऐवजी सेंद्रिय पद्धतीने कशाप्रकारे फळ,फूल झाडांची निगा राखायची,या सर्वांचे प्रशिक्षण नि:शुल्क देण्यास तयार आहे.
विशेषत:शालेय जिवनातच अभ्यासक्रमात शेती हा विषय ठेवल्यास याचा खूप फायदा विद्यार्थी म्हणून घडताना व समाज व देश म्हणून प्रगती साधताना होऊ शकतो असं मला वाटतं.शालेय विद्यार्थ्यांकडून जास्त नाही फक्त १० रुपये घेतल्यास त्यांना रोपे उपलब्ध करुन शास्त्रशुद्धरित्या निसर्गाशी, नैसर्गिक तारतम्य शिकता येईल.भारतीय समाजात खरे शिक्षण वर्ग खोल्यांच्या चार भिंतीशिवाय, निसर्गाशी जवळीक साधून शिकणे गरजेचे आहे,असं माझं मत आहे.या मुळे विद्यार्थी जीवनापासूनच मुलांची जडणघडण,कृतीशील व कल्पक होण्यास मदत होईल.
मला ही अगदी लहानपणापासूनच झाडे,फूलबागेची गोडी लागली होती.प्रसंगी मी इतरांची मला आवडणारी रोपे चोरुन देखील आणायचो हे प्रामाणिकपणे मी कबूल करतो.आज मागे वळून बघतो तर ती आवड कधी छंदामध्ये आणि छंदातून जीवनाच्या ख-या आनंदात परिवर्तित झाली,हे कळले सुद्धा नाही.मला माझी आवड , सनस्टार हॉटेलचे मालक रुपसिंग राय यांच्यामुळे जोपासता आली,यासाठी मी त्यांचाही विशेष आभारी आहे.
नि:शुल्क मार्गदर्शनासाठी संपर्क करा-
लालसिंग ठाकूर-91 7620962264
………………………..

आमचे चॅनल subscribe करा