Homeनागपूर न्यूजफडणवीस हे नागपूर शहराचा कलंक!उद्धव ठाकरेंचा घणाघात

फडणवीस हे नागपूर शहराचा कलंक!उद्धव ठाकरेंचा घणाघात

राष्ट्रवादीसोबत युती कदापि करणार नाही सांगणारे फडणवीस राष्ट्रवादीसोबतच सत्तेत:उद्धव ठाकरे यांचा टोला

कालपर्यंत ज्यांना शिव्या देत होते तेच आता त्यांच्यासाठी विकासपुरुष!

आम्ही नाही फडणवीसांनी खूपसला पाठीत खंजिर: उद्धव ठाकरेंची टिका

नागपूर,ता.१० जुलै २०२३: राष्ट्रवादीसोबत युती होणे शक्यच नसल्याचे सांगून,आपाद,शाश्‍वत किवा कुठल्याही धर्मात भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवादीसोबत युती होणे शक्य नसल्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका भाषणात सांगितले होते मात्र आपला शब्द न पाळणारे देवेंद्र फडणवीस हे नागपूर शहराचे कलंक असल्याची घणाघाती टिका माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देशपांडे सभागृहात आज कार्यकर्ते व पदाधिका-यांच्या मेळाव्यात केली.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की मुंबईत मी कार्यकर्त्यांशी भेटत,बोलत असतो,मुंबईच्या बाहेर सगळेजण मातोश्रीवर येत असतात,मात्र,पावसाळ्यात जाहीर सभा न घेण्याचे ठरवले आहे.नागपूरात महाविकासआघाडीची एक वज्रमूठ सभा झाली आहे,त्यानंतर मुंबईत देखील आघाडीची सभा झाली.यानंतर महाविकासआघाडीच्या सभा थांबवल्या.का थांबवल्या तुम्हाला कल्पना आहे असे ते म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरेंनी याच वर्षी एप्रिल महिन्यातील ऐन रणरणत्या उन्हात मुंबई जवळील खारघर येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख केला.देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र पुरस्कार सोहळा पार पडला होता.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या सोहळ्यात सरकारी तिजोरीतून १३.८० कोटी रुपये खर्च करुन देखील श्री सेवकांसाठी पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली नव्हती.भारतीय जनता पक्षाने धर्माचा आधार घेत तो ‘इव्हेंट’साजरा केला होता अशी बोचरी टिका करीत ,रणरणत्या उन्हात होरपळून त्या घटनेत १५ च्या वर श्रीसदस्य साधकांचा मृत्यू झाला होता,याची आठवण करुन दिली. मंत्री,संत्री स्वत: भव्य वातानुकूलीन तंबूत बसले होते.स्टेजवर गारेगार होतं पण माता भगिनी हे तळपत्या उन्हात भाजून निघत होते अशी टिका त्यांनी केली.त्यांना पिण्यासाठी पाणी देखील मिळू शकले नाही.१५ बळी हे फक्त सत्तेच्या लोभापायी घेतले गेलेत अशी टिका करीत, मी इतका निर्दयी नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यामुळेच पावसाळ्यात मी सभा थांबवल्या व पदाधिका-यांना भेटण्याचा उपक्रम हाती घेतला.काल मी अमरावतीला होतो.विश्रामगृहात काही प्रमुख पदाधिकारी आले होते त्यांना मार्गदर्शन केले.अकोला येथे गेलो,त्या पूर्वी दिग्रसला पोहरादेवींचे दर्शन घ्यायला गेलो होतो मात्र तिथे एक छोटी सभाच झाली.लोक आता थांबलेत.वाट बघत आहेत.कर्नाटकामध्ये जे काही घडलं यानंतर ही जे काल-परवापर्यंत आमच्यासोबत बसले होते ते पलीकडे गेलेत आणि त्यांना अचानक साक्षात्कार झाला की जो काही विकास घडतो आहे तो ‘त्यांच्याचमुळे ’घडत आहे,असे सांगून, त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला टोला हाणला.

कालपर्यंत ते ज्यांना शिव्या देत होते आता अचानक विकासपुरुष झाले.हा त्यांचा स्वत:चा विकास होतो आहे,देशाचा कुठे विकास होत आहे?मलाही विश्‍वास बसला नाही मी अंबादास दानवेंना विचारलं,गहाण काय टाकलं?तर उत्तर मिळालं,गावठी कट्टा!कट्टा गहाण टाकल्या जाऊ शकतो?आणि त्याच्यावर पैसे मिळवल्या जाऊ शकतात!

माझ्या शेतक-यांना जर पैसे हवे असतील तर त्याला घर,जमीन,पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं आणि इकडे गावठी कट्ट्यावर पैसे देणारी औलाद या नागपूरच्या गृहमंत्र्यांच्या गावामध्ये आहे,अशी बोचरी टिका त्यांनी केली.गृहमंत्र्यांचा उल्लेख येताच भरगच्च भरलेल्या देशपांडे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

याला दुर्भाग्य म्हणायचे नाही तर काय?असा सवाल करीत,संताप येतो तो यासाठीच येतो.माझी खूर्ची काढून घेतली म्हणून नाही तर तुम्ही जी खूर्ची उबवताय त्यातून नासलेली,रक्त पिपासू ढेकणं तयार होत आहेत,याचा तुम्ही काही अंदात घेता आहेत की नाही?असा सवाल त्यांनी केला.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर ताशेरे ओढत,काय त्यांच्यावर बोलायचं?त्यांची हालत अशी विचित्र झाली आहे सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही.झालंय काही तरी नक्की पण सांगण्यासारखं नाही.अापले संत सांगतात,बोले तैसा चाले त्यांची वंदावे पाऊले मात्र आपले माननीय उपमुख्यमंत्री हे काय म्हणाले होते,याची क्लिपच तुम्हाला ऐकवतो,असे सांगून उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी फडणवीस यांच्या जुन्या भाषणाची एक क्लिप ऐकवली.

फडणवीस यांनी नुकतेच,मी पुन्हा येईन असे सांगितले होेते पण मी एकटा नाही आलो,दोन जणांना घेऊन आलो.पण ते दोन जण कोण आहेत?त्यांच्या विषयीची फडणवीस यांच्या भाषणाची एक क्लिपच ऐकवतो.

प्रस्तुत क्लिपमध्ये फडणवीस हे,राष्ट्रवादीशी युती होने शक्यच नसल्याचे सांगत आहेत.नाही,नाही,नाही,कदापि नाही.आपाद धर्मात नाही,शाश्‍वत धर्मात नाही,कुठल्याही धर्मात. नाही,नाही नाही.एकवेळ सत्तेशिवाय रिकामे राहू पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही.मला कोणी तरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का?मी त्यांना सांगितलं वेळ पडली तर अविवाहीत राहील पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही.नाही,नाही,नाही.

अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा!अश्‍या शब्दात त्यांनी फडणवीस यांची आलोचना केली.नाही,नाही,नाही म्हणजे,हो,हो,हो,असे त्यांचे म्हणने आहे.आता ते सांगत आहेत की उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खूपसला म्हणून आम्ही यांच्या बरोबर गेलो!पहीले उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर कोणी खूपसला?असा सवाल त्यांनी केला.

भाजपवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ”काल ज्याला भ्रष्ट म्हणायचे त्याच्या मागे सर्व तपास यंत्रणा लावायची. त्यांच्या कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं, ते तुमच्यासोबत आले की त्याला मंत्री करायचे. भाजपने आपले विचार पूर्णपणे संपवले आहेत. पक्ष फोडून पक्ष वाढवण्याची हे जात आहे. ही हिंदुत्वासोबत गद्दारी आहे”.

२०१४ ते २०१९ पर्यंत मी तुमच्यासोबत सत्तेत होतो ना?त्याही वेळेस मला काँग्रेस,राष्ट्रवादीकडून निरोप आले नसतील का?

जे आता आम्ही केलं,ते त्या वेळेला करायला हवं होतं पण नाही केलं.करायचं ते उघड करायचं.२०१४ साली शिवसेनेने युती नव्हती तोडली.आज ते सांगत आहेत की शिवसेनेने हिंदूत्व सोडलं,त्याही वेळेला आम्ही हिंदू होतो,आज ही आहोत आणि मरु त्याच्यानंतरही आम्ही हिंदूच राहू.पण २०१४ साली असं काय घडलं की तुम्ही आमच्यापासूनची युती तोडली?

मी तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो कारण निवडणूक अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनंतर संपणार होती.उमेदवारी निश्‍चित करीत होतो.मातोश्री नेहमीसारखी गजबजली होती.उमेदवार व कार्यकर्त्यांशी बोलत असताना सायंकाळी साढे सहा वाजता एकनाथ खडसेंचा फोन आला व आपलं काही जुळेल असं वाटत नसल्याचा निरोप त्यांनी मला दिला!

त्यांच्या या वाक्यांचा अर्थ विचारला असता,आमच्या लोकांची अशी ईच्छा आहे की युतीत निवडणूक लढायची नाही असे त्यांनी सांगितले.यावर मी बोललो की जे काही राहीले असेल तर आज रात्रभर,उद्या दिवसभर बसू आणि संपूर्वन टाकू वादग्रस्त मुद्दे.परवा दुपारपर्यंत वेळ आहे,पण ते म्हणाले नाही, आता युती शक्य नाही,आमचं ठरलं आहे,मग तेव्हा युती का तोडली?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

तेव्हा मी काँग्रेससोबत गेलो नव्हतो ना?मी तिथेच होतो,आज ही मी तिथेच आहे,गेलात तुम्ही,वार करणारी तुमची औलाद आहे,आमची नाही,अश्‍या शब्दात त्यांनी प्रहार केला.

भाजपतर्फे उद्धव ठाकरेंविरुद्ध तीव्र आंदोलन-

आज देशपांडे सभागृहात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नागपूरचा कलंक असा करताच त्यांच्याविरुद्ध भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.ठाकरे यांचे पोस्टर जाळून भाजप युवा मोर्चातर्फे तीव्र आंदाेलन करण्यात आले.उद्या मंगळवारी आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात सकाळी १० वाजता व्हेरायटी चौकात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे.फडणवीस यांच्या विरोधात असभ्य भाषा सहन केली जाणार नसल्याचा इशारा दटके यांनी दिला.

Latest बातम्या