Homeनागपूर न्यूजमी ज्येष्ठ असल्याने मला ही ’ऑफर’होती:अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

मी ज्येष्ठ असल्याने मला ही ’ऑफर’होती:अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट


राज्यात फक्त भाजपची सत्ता येणे शक्य नसल्यानेच फोडाफोडीचे राजकारण

राज्यातील ऐंशी टक्के पदाधिकारी ओरिजनल राष्ट्रवादीसोबत:अनिल देशमुखांचा दावा

अजित पवार परत आल्यास जयंत पाटील,आव्हाड पक्ष सोडण्यास तयार हा फार मोठा त्याग:अजित पवार गटाला टोला

देशाच्या समस्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपची फोडाफोडीची खेळी:देशमुखांचा आरोप

नागपूर,ता.९ जुलै २०२३: जुलैच्या २ तारखेला महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलं ती खेळी असून बेरोजगारी,महागाई,शेतक-यांचे प्रश्‍न,महिलांचे प्रश्‍न,ओबीसींच्या प्रश्‍नांवरुन देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रादेशिक पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे.राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ नेते पक्ष सोडून गेलेत,मी ज्येष्ठ असल्याने मला देखील ऑफर होती,असा गौप्यस्फोट एका प्रश्‍नाच्या उत्तरात, माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की राज्यातील ऐंशी टक्के जिल्हाध्यक्ष,शहराध्यक्ष,पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे आजच्या पक्ष कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत निष्पन्न झाले.फक्त गोंदिया,भंडारा जिल्हा सोडला तर संपूर्ण विदर्भात मोजके पदाधिकारी सोडले तर ८० टक्के पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचा दावा याप्रसंगी अनिल देशमुख यांनी केला.

भाजपला एकट्याच्या बळावर राज्यात पुन्हा सत्ता आणने शक्य नाही हे दिल्लीतील वरिष्ठांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरु केले.आधी शिवसेनेसोबत ही खेळी केली यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेत घेऊन पक्षात दुफळी माजवली,असा आरोप त्यांनी केला.राज्यातील जनतेला भाजपच्या या खेळीचा उबग आला असून महागाई,बेरोजगारी,ओबीसी आरक्षणासारख्या प्रश्‍नावरुन देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपद्वारे ही खेळी खेळल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

धनगर आरक्षणाचा दावा तर भाजपने आठ वर्षांपूर्वीच केला होता.आम्ही सत्तेत आलो तर पहील्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा करु,असे आश्‍वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते.सत्तेवर येऊन साढे सहा वर्षांचा काळखंड लोटला तरी धनगर आरक्षणाचा त्यांना विसर पडला आहे.नुकत्याच दहावी-बारावीच्या परिक्षा आटोपल्या.वसतीगृहांचा प्रश्‍न हा यक्ष प्रश्‍न झाला आहे.३६ जिल्ह्यात प्रत्येकी दोन असे ७२ वसतीगृह बांधू असे आश्‍वासन पाळले नाही व ओबीसी विद्यार्थ्यांची वसतीगृहांच्या अभावी ससेहोलपट होत असल्याची टिका त्यांनी केली.

एवढंच नव्हे तर जातीनिहाय जणगणना केंद्राने टाळली,केंद्र सरकार राजकीय पक्षांच्या मागणीची दखल घेत नाही,फक्त फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याचे ते म्हणाले.राज्याच्या निवडणूकीत जनताच आता त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही,असा दावा त्यांनी केला.
नाशिक येथील येवल्याला शरद पवार यांची पहीली सभा काल झाली.वीस हजारच्या वर जनसमुदाय उपस्थित होता.महाराष्ट्रात शिवसेनेचे उद्धव ठाकरे,काँग्रेसच्या सोनिया गांधी,राहूल गांधी,शरद पवार हे या पुढे फिरणार आहेत.भाजपने कश्‍याप्रकारचा विकास केला हे जनतेला सांगणार असल्याचे ते म्हणाले.

नागपूरातील गणेशपेठ येथील पक्ष कार्यालय कोणाच्या ताब्यात आहे?या प्रश्‍नावर बोलताना शरद पवार यांच्या कार्यकारिणीकडेच पक्ष कार्यालय असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांचे नातू व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका येत्या डिसेंबरमध्येच घेण्याचा घाट केंद्र सरकारने घेतला असल्याचा दावा केला आहे,याकडे अनिल देशमुखांचे लक्ष वेधले असता,निवडणूका कधीही लागू शकतात,असे उत्तर दिले.

राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते पक्ष सोडून गेले यासाठी फक्त भाजपला दोष देऊन कसे चालेल,यात राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्यांचा दोष नाही का?या प्रश्‍नावर बोलताना,त्यांच्या जाण्याने दु:खं तर निश्‍चितच झाले मात्र कोणत्या कारणाने गेले हे माहिती नसल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली.

शरद पवार यांच्या कार्यशैलीवर ते नाराज होते याशिवाय शरद पवार यांचे वय झालेे असतानाही ते अध्यक्ष पद सोडण्यास तयार नव्हते,याकडे लक्ष वेधले असता, वयाच्या ८२ व्या वर्षी देखील ते १८ ते २० तास काम करीत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.सुप्रिया सुळे यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे ८७ वर्षांचे आहेत.अमिताभ बच्चन,फारुख अबदुल्ला,रतन टाटा यांनाही वयाची मर्यादा लागू होत नाही,वयापेक्षा ईच्छाशक्ती असण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

‘शेर कभी बुढा नही होता और साहब तो बब्बर शेर है‘अशी पुश्‍ती त्यांनी जोडल.

विदर्भाचे नेतृत्व आता तुमच्याकडे आले का,असे विचारले असता आज रस्त्यावरची लढाई महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष पद मिळणार का?यावर बोलताना आज जयंत पाटील हेच पक्षाचं काम करीत असल्याचे ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी आव्हान केले आहे की शरद पवारांना सोडून गेलेले परत अाले, तर मी आणि जयंत पाटील हे राजकारण सोडून देतील,याकडे लक्ष वेधले असता,हा त्यांचा किती मोठा त्याग आहे असे सांगून,आमच्याकडून तुम्हाला काही त्रास असेल तर आम्हीच पक्ष सोडून जातो,असे आव्हाड सांगत असल्याचे देशमुख म्हणाले.

बदललेल्या राजकीय समीकरणातून सलील देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी आता तरी मिळणार का?या प्रश्‍नावर अनिल देशमुख यांनी पत्र परिषदच गुंडळली.

Latest बातम्या