Homeनागपूर न्यूजनेत्यांच्या खेळीने भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज

नेत्यांच्या खेळीने भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज

अजित पवारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उपमुख्यमंत्री का केले नाही?कार्यकर्त्यांचा मनातील सवाल

गडकरींचं एक ही भाष्य नाही!कार्यकर्ते अस्वस्थ

आभा पांडे अजित पवारांच्या बैठकीत

प्रफूल्ल पटेल जिथे, तिथे प्रशांत पवार

अनिल अहीरकर राहणार दोन्ही पवारांच्या बैठकीत उपस्थित:निर्णय ५ जुलै नंतरच घेणार

नागपूर,ता.३ जुलै २०२३: शिंदे-फडणवीस सरकारचा वर्षपूर्तीचा सोहळा उत्साहात साजरा केल्यानंतर व आगामी निवडणूकींच्या कामाला लागण्याच्या तयारीत असणा-या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना रविवारच्या सत्तानाट्यानंतर जबरदस्त धक्का बसला असून,त्यांच्या युतीत चक्क राष्ट्रवादीसारखा पक्ष सहभागी झाल्याचे व उपमुख्यमंत्री पद व एक दोन नव्हे तर राष्ट्रवादीच्या अजित पवारांसह ९ मंत्र्यांचा शपथ विधी पार पडल्यानंतरही ते अद्याप संभ्रमात असल्याचे दिसून पडतंय.

शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजप कार्यकर्त्यांची वैचारिक आणि भावनिक बांधिलकी जुळली होती मात्र ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या निर्मितीपासून गेल्या पंचवीस वर्षात सातत्याने भाजप,संघावर प्रहार केला यांनतर गेल्या ९ वर्षात मोदी,अमित शहा यांच्यासह फडणवीसच नव्हे तर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर देखील शेलक्या शब्दात जुमले कसले,त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन बसण्याची वेळ यावी,ही कल्पनाच त्यांना वारंवार अस्वस्थ करीत असल्याचे दिसून पडतंय.

शीर्षस्थ नेतृत्वाच्या पातळीवर कितीही महाराष्ट्राच्या विकासासाठी ट्रिपल इंजिनचे ढोल बडवले जात असले तरी जमीनीस्तरावर ही दिलजमाई किमान विचारधारेच्या पातळीवर भाजप तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पचनी पडण्यासारखी नाहीच.

उघडपणे कोणीही बोलण्यास तयार नसले तरी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आतल्या आत खदखदत आहे.त्यांच्या डोळ्यासमोर येणा-या लोकसभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तरळत आहेत.आधीच नागपूरातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी दोन भाजपने गमावल्या आहेत.आता राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या गटातील आभा पांडे यांच्यासाठी पूर्वची जागा सोडण्यास सांगितले व दक्ष्णेची जागा शिंदे गटासाठी सोडल्यास भाजपचा कार्यकर्ता त्यांच्यासाठी निवडणूक प्रचारास कसा उतरणार आहे?हा सवाल त्यांना छळत आहे.

जी परिस्थिती राज्याच्या उपराजधानीची तीच संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.सत्तेत असणारे तीनही मोठे पक्ष हे जागा वाटपच्या टेबलवर बसून कशाप्रकारे वाटाघाटी करणार आहेत?हे भविष्यवेधी चित्र त्यांना छळत आहे.त्यामुळेच पक्षश्रेष्ठींना अजित पवार यांच्या मराठा‘पॉवर’ची इतकीच गरज लोकसभा व विधानसभेसाठी हवी होती तर त्यांच्यासह सर्व मंत्र्यांना आधी पक्षात घ्यायला हवे होते,त्याचे आम्ही स्वागतच केले असते,अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.

कार्यकर्त्यांना अंधरात ठेऊन या दोन्ही पक्षांनी जी राजकीय खेळी खेळली ती अनेकांच्या पचनी पडली नाही.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या खेळीपासून अनभिज्ञ होते हे कोणीही मानायला तयार नाही.आज देखील राष्ट्रवादीत वरिष्ठ पातळीवर ‘तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो’चा खेळ सुरु होता तो उबग आणनारा होता.

काल सकाळी ९ वाजता शरद पवार यांच्या घरी सर्व आमदारांची बैठक झाली.या बैठकीत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.यानंतर त्या अर्ध्या तासांसाठी बाहेर पडल्या.पुन्हा बैठकीत सहभागी झाल्या.यानंतर बैठकीतील सर्व आमदार सरळ राजभवनात पोहोचतात!
आणि राजभवनात शपथविधीची संपूर्ण तयारी ही अगदी काही तासात होते?

सर्वात महत्वाचे म्हणजे अजित पवार यांनी शुक्रवारीच विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आणि रविवारपर्यंत माध्यमकर्मीना याचा सुगावा ही लागला नाही!रविवार दूपारपर्यंत पत्रकार हे झोपले होते का?असा सवाल आता माध्यमकर्मींनाच विचारला जात आहे.विशेष म्हणजे शपथविधीसाठी रविवारी देखील मंत्रालये ही जागी होती का?शपथविधीसाठी एवढे प्रवेशपत्र अवघ्या काही तासात तयार होत असतात का?

शिंदेंसोबत जाने हे भाजपच्या कार्यकर्त्यांना जेवढे सुखद होते तितके राष्ट्रवादीसारख्या भिन्न व सर्वस्वी विरोधी विचारधारेच्या राजकीय पक्षासोबत सत्तेतील भागीदारी, हे भाजपच्या कार्यकर्त्यांना अजिबात रुचले नसल्याची दबकी चर्चा आहे.अमोल मिटकरी यांच्याविषयी भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच रोष असल्याचे आढळून येतोय.हिंदू धर्मातील कन्यादान या संस्काराविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन केलेली टिका व अनेक प्रसंगात मिटकरी यांनी हिंदूत्वाविषयीच्या भावना चांगल्याच दुखावल्या आहेत.त्यांच्याच प्रचाराची वेळ भाजप कार्यकर्त्यांवर आल्यास त्या प्रसंगाला सामोरे जाण्याच्या मनस्थितीत भाजप कार्यकर्ता सध्या तरी दिसून पडत नाही.

देशपातळीवर पक्षाला जरी लोकसभेत महाराष्ट्रासारख्या राज्यातील ४८ जागांपैकी अधिकाधिक जागा मिळवायचा असल्या व यासाठीच ह बेमेल सत्तासहभाग झाला असला तरी मनपाच्या निवडणूकीत चारचा प्रभाग असल्यास त्यात राष्ट्रवादी व शिंदे गटाचा वाटा असल्यास भाजपचा कार्यकर्ता खरंच त्यांना निवडून देणार आहे का?हा विचार पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना करने गरजेचे असल्याची चर्चा ही ऐकू आली.

महत्वाचे म्हणजे एवढे मोठे महानाट्य काल रविवारी राज्यात घडले असतानाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे एक ही भाष्य या संपूर्ण घडामोडीवर समोर आले नाही.त्यांचे ‘मौन’भविष्यातील वादळाची दिशा सूचित करीत असल्याचीही चर्चा आहे.
हे सत्तानाट्य सहजासहजी व त्वरित घडले नाही हे गडकरींसह भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील चांगल्याने माहीती आहे.महाविकासआघाडीची सरकार पडण्याची तयारी जवळपास चार महिने चालली होती.इतक्या लवकर राष्ट्रवादीत फूट पडू शकत नाही.पवार यांच्या सहमतीतूनच हे सत्तेतील हा सहभाग घडला आहे,यावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्‍वास आहे.मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील हेच अधोरेखित केले आहे.

या सर्व महानाट्यात जयंत पाटील, अनिल देशमुख व जितेंद्र आव्हाड यांची चांगलीच राजकीय अडचणझाल्याचे दिसून पडतंय.शरद पवार यांच्या राजीनामानाट्यानंतर ढसाढसा रडणारे जयंत पाटील यांच्यावर खरोखर रडण्याची वेळ फडणवीसांनी आणली .आव्हाडांची झालेली दशा आज माध्यमांसमोर दिसतच होती तर अनिल देशमुख गृहमंत्री पदी असताना फडणवीस यांच्या विरोधात तथाकथित कटकारस्थानातून व १०० कोटींच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना भाजपमध्ये घेणे शक्यच नव्हते,त्यामुळे त्यांना शरद पवार यांच्याच छत्रछायेखाली राहण्याशिवाय तरणोपाय नाहीच.तीच अवस्था एकनाथ खडसेंची देखील झाली आहे.राजकारणाच्या सारीपाटावर अवघ्या एकच वर्षा पूर्वी मंत्री म्हणून वावरणारे हे दिग्गज यांचे राजकीय भविष्यच फडणवीसांच्या केवळ एका चालीमुळे संकटात सापडले.

नागपूर महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेविका आभा पांडे या पूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या.स्थायी समितीच्या अध्यक्ष देखील राहील्या.मात्र त्यांचे कर्तृत्व काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणात अनेकांना डोईजड झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागली आणि भरघोस मतांनी त्यांच्या मतदारांनी त्यांना निवडून ही दिले.यानंतर मात्र ‘नाही कोणाशी वादावादी आता आम्ही राष्ट्रवादी’म्हणत राष्ट्रवादी पक्षात गेल्या.त्यांच्या पदार्पण सोहळ्यात अजित पवार व जयंत पाटील हेच मुख्य पाहूणे होते.त्यांना राष्ट्रवादीत आणण्याचे श्रेय अनिल देशमुख आणि अनिल अहीरकर यांचे होते. अनिल देशमुख यांना यानंतर ईडीद्वारे अटक झाली .आभा पांडे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात त्यांनी करोना झाल्याने रुग्णालयातून शुभेच्छा प्रदान केल्या होत्या.पक्ष प्रवेश सोहळ्यात आभा पांडे यांनी भाजपच्या मनपातील गेल्या १२-२३ वर्षाच्या कारभारावर सडकून टिका केली होती.मनपाच्या एका शाळेत विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी पाच शौचालयांच्या बांधकामाचे बिल लाटण्यात आले.प्रत्यक्ष पाहणी केल्यावर त्यातील दोन शौचालय गायब होती,असा घणाघात आभा पांडे यांनी केला व भाजपच्या भ्रष्टाचारचे अनेक किस्से याप्रसंगी उपस्थितांसमोर सांगितले.

(छायाचित्र: आभा पांडे यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाच्या वेळी भाषण करताना अजित पवार)

अजित पवार यांनी देखील जो भाजप गरीब विद्यार्थ्यांचे दोन दोन संडास चोरतात ते देशात काय गजहब करीत असतील,अशी टिका करीत अश्‍यांना घरी बसवण्याचे आव्हान त्याप्रसंगी केले होते.आज तेच अजित पवार हे भाजपसारख्या पक्षासोबत सत्तेत सहभागी झालेत आणि आभा पांडे हे अजित पवार यांच्या बैठकांमध्ये सध्या मुंबईत सहभाग घेत आहे.‘सत्ताधीश’ने आभा पांडे यांच्याशी संवाद साधल्यानंतर मी दादांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.ते माझे नेते आहेत आणि ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी असणार आहे,असे त्यांनी सांगितले.काल रविवारी मतदारसंघात मोठा कार्यक्रम असल्याने मोबाईल सायलेंट मोडवर होता.मुंबईवरुन अनेक फोन आलेत.कार्यक्रम संपल्यानंतर कळले दादांचा शपथविधी आहे,तातडीने या असा निरोप मिळाला.मात्र,नागपूर मुंबई एक ही विमानसेवा उपलब्ध नव्हती त्यामुळे तातडीने पुणे गाठले व तिथून मुंबईला पोहाचलो असल्याचे त्या म्हणाल्या.परवा ५ जुलै रोजी होणा-या बैठकीनंतर नागपूरला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूरातील राष्ट्रवादीचे दुसरे शिलेदार प्रशांत पवार सध्या बद्रीनाथ येथे आहे.मात्र,‘सत्ताधीश’ने त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जिथे प्रफूूल्ल पटेल तिथे प्रशांत पवार असणार आहे,असे त्यांनी सांगितले.सरकारमध्ये सहभागी होऊन अजित पवार यांनी राज्याला नवीन दिशा दाखवली असल्याचे ते म्हणाले.

महत्वाचे म्हणजे प्रशांत पवार यांच्या बजाज नगर येथील कार्यालयात राष्ट्रवादीच्या सर्वच मोठ्या नेत्यांचे जवळपास साढे चार लाखांचे आकर्षक फलक लागले आहे.आता त्या फलकावरील सुप्रिया सुळे,जयंत पाटील,अनिल देशमुख,बाबा गुजर,दुनेश्‍वर पेठे आदींच्या छायाचित्रांचे काय करणार?याचे उत्तर येणारा काळच देईल मात्र उद्या नागपूर शहरात सर्वदूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर मात्र त्यांच्यातर्फे लागणार आहेत असे त्यांनी सांगितले.

शहरातील राष्ट्रवादीचे आणखी एक अर्ध्यव्यू पक्षाचे उपाध्यक्ष अनिल अहीरकर यांच्याशी संवाद साधला असता ते देखील मुंबईतच असल्याचे कळाले.परवा ५ जुलै रोजी शरद पवार तसेच अजित पवार या दोघांच्याही बैठकीत ते सहभागी होणार आहेत.त्या बैठकी नंतरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी कळवले.

पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.

 

 

थोडक्यात,सत्तेचे हे महानाट्य तर २०१९ पासूनच सुरु झालं.सत्तेसाठी आपापल्या विचारसरणीला स्वार्थाच्या खुंटीवर टांगून राज्यातील चारही प्रमुख पक्षांनी सत्ता भोगली मात्र,या नाटकाचा पडदा आता मतदारच पाडतील आणि टाळ्या वाजवतील अशी बोचरी खंत ही ऐकू येत आहे.

……………………………….

 

 

Latest बातम्या