प्रस्तावित १३२० युनिटच्या थर्मल पॉवरला करणार पूरजोर विरोध:प्रसंगी न्यायालयात दाद मागू:पर्यावरणवाद्यांची एकजूट
३० लाख लोखसंख्येच्या शहरात साढे सात हजार मेगावॅटचा पॉवर प्लांट कुठेही नाही मग नागपूरच का?
विदर्भाचे तापमान आधीच ४६ अंश पल्ल्याड,आणखी किती वाढवणार तापमान?पर्यावरणवाद्यांचा फडणवीस,बावणकुळेंना प्रश्न
सत्ताबदल होताच थंड बस्त्यात गेलेला निर्णय लागू कोणाच्या हितासाठी करताय?पर्यावरणवाद्यांचा रोखठोक सवाल
पाण्याचे माजणार भयंकर दूर्भिक्ष:सरकार बदलताच नागपूरकरांना विष पाजण्याची शिंदे-फडणवीस सरकारची तयारी!पर्यावरणवाद्यांचा थेट आरोप
वैदर्भिय वापरतात फक्त १७ टक्के वीज:७३ टक्के वीज पश्चिम महाराष्ट्र वापरताे मात्र पश्चिम महाराष्ट्रात एक ही थर्मल पॉवर प्लान्ट का नाही?वीज त्यांना, पाणी आणि हवेचे प्रदूषण वैदर्भियांच्या वाट्याला:उपमुख्यमंत्री व माजी उर्जामंत्र्यांना हे पटतंय का?पर्यावरणवाद्यांचा परखड सवाल
आताच काेराडीच्या राखेने हजारो हेक्टर शेती उधवस्त केली:नागपूरकरांचे पिण्याचे पाणीही राखमिश्रीत सत्ताधा-यांना का करायची आहे?
राखेसाठी करणार योग्य प्लान्टचा महाजनकोचा दावा निव्वळ फसवणूक:पर्यावरणवाद्यांचा आरोप:आताच्या दहा हजार टन राखेच्या साठ्याचा आधी निचरा करा:पर्यावरणवाद्यांचे आव्हान
महाजनकोची जन-सुनावणी कोराडी पॉवर प्लॅन्ट येथे २९ मे रोजी भर दूपारी १२.३० वाजता!महाजनकोला हवे आहेत खारघरसारखे बळी!पर्यावरणवाद्यांचा संताप
जिल्हाधिकारी इटनकर यांनी वारंवार दिलेल्या निवेदनाला दाखवली केराची टोपली!
दीड महिना जन-सुनावणी पुढे ढकलण्याची केली मागणी:प्रस्तावित प्रकल्प सत्तेच्या बळावर लादल्यास न्यायालयात मागणार दाद:पर्यावरणवाद्यांचा इशारा
नागपूर,ता.१९ मे २०२३: महाजनकोने नुकतेच कोराडी थर्मल पॉवर प्लांट येथील सध्याच्या २०० मेगावॉट्सच्या युनिट क्रमांक ५ च्या जागी ६६० मेगावॉट्सचे दोन युनिट्स म्हणजे एकूण १३२० मेगावॉट्चे यूनिट सुरु करण्याचा प्रस्ताव सादर केला असून, तो मान्य झाल्यास ऑरेंज सिटीची ओळख जगाच्या पाठीवर लवकरच ‘कॅन्सर सिटी’ म्हणून होईल,असा दावा शहरातील पर्यावरणवाद्यांनी मिळून स्थापित केलेल्या ‘नागपूर-कोराडी क्लाईमेट क्राईसेस‘या ंसंस्थेच्या पदाधिका-यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
याप्रसंगी त्यांनी आधीच कोराडीच्या विद्युत निर्मितीची क्षमता ही लोकसंख्येच्या मानाने अत्यधिक असल्याचे सांगून, दोन्ही विद्यमान पॉवर प्लान्टमध्ये सध्या २६०० आणि २०० मेगावॉट वीज निर्मिती होत असल्याचे सांगितले. पुन्हा दोन्ही युनिट्समध्ये ६६० मेगावॉट्स वीज निर्मिती करने म्हणजे एकूण १३२० चा नवीन प्लान्ट हा अत्यधिक प्रदूषित राहणार असून, नागपूर शहर हे लवकरच तापमानाच्या आणि प्रदुषणाच्या बाबतीत चंद्रपूरच्याही पुढे जाईल व घरोघरी कॅन्सरसह विविध आजारांचे रुग्ण दिसतील,इतकी भयावह परिस्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता नव्हे तर ‘सत्यता’असल्याचे पर्यावरणवाद्यांच्या या संस्थेच्या पदाधिका-यांनी प्रतिपादीत केले.
विशेष म्हणजे हा प्रस्ताव २०१९ मध्येच तत्कालीन सरकारकडून आणण्यात आला होता,त्याच वेळी या प्रकल्पाला पूरजोर विरोध पर्यावरणवाद्यांनी केला.पुढे महाविकासआघाडीची सरकार स्थापित झाली.त्यांच्यापर्यंत या प्रकल्पांमुळे विदर्भावर होणा-या गंभीर पर्यावरणीय प्रदुषणाचा मुद्दा गेला,तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तो मुद्दा मान्य केला व हा प्रस्ताव रद्द करण्यात आला मात्र गेल्या वर्षी सत्ता बदल होताच,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी पुन्हा एकदा हा प्रस्ताव ‘राखेतून’उकरुन काढला असा ठपका ठेवीत,महाजनकोच्या प्रस्तावावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दोन लोकप्रिय वृत्तपत्रात जाहीरात देऊन या प्रस्तावाविषयी जनमत मागवले असल्याचे त्यांनी सांगितले.
आधीच विदर्भाचे तापमान मे महिन्यात ४६ अंश पल्लयाड असताना, ही जनसुनावणी कोराडी पॉवर प्लान्ट येथे भर दूपारी १२.३० वाजता ठेवण्यामागे काय औचित्य आहे?असा सवाल त्यांनी केला.प्रदुषण मंडळ व महाजनकोला नागरिकांनी या जनसुनावणीत सहभाग घ्यावा,असे वाटत नसल्यानेच व पर्यावरणीय मंजूरी कोणत्याही अडथळ्यांशिवाय मंजूर करण्यासाठीच, ही रणरणत्या उन्हाची वेळ ठेवण्यात आली,असा संताप व्यक्त करुन, जानेवरी महीन्यातील रणरणत्या उन्हात खारघर येथे जी दूर्घटना घडली,त्याचीच पुनरावृत्ती कोराडीत व्हावी अशी प्रदुषण मंडळाची व महाजनकोची मंशा आहे का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कारण,या जनसुनावणीला विदर्भातून हजारो लोकांची उपस्थिती राहणार असल्याचे पर्यावरणवाद्यांनी दावा केला.अामची पूर्ण कागदोपत्री तयारी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे अचानक या प्रकल्पांचे ‘समर्थक’ देखील निर्माण झाले असून, हा प्रकल्प विदर्भाच्या विकासासाठी किती उपयोगी आहे,हे ठासविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे मात्र ‘नागपूर-कोराडी क्लाईमेट क्राईसेस’संस्था ही जनजागृती करुन या प्रस्तावाचा पूरजोर विरोध करणार असल्याचा इशारा याप्रसंगी पर्यावरणवाद्यांनी दिला.
महत्वाचे म्हणजे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे स्वत:चे कुटूंब काेराडीसारख्या ठिकाणी आधीच इतक्या प्रदुषित शहरात राहत असताना, या प्रदुषणात त्यांना हजार पटीने वाढ करणारे दोन्ही प्रकल्प का हवे आहेत?हा विषय राजकीय किवा कोणत्याही जाती,धर्माशी संबंधित नसून प्रदुषणाच्या विषारी विळख्यात सर्वच गरीब-श्रीमंत,शिक्षीत-अशिक्ष्त सापडणार आहेत,त्यामुळे बावणकुळे यांनी किमान राज्याचा नव्हे तर त्यांच्या कुटूंबियांचा तरी विचार करावा,असे मत पर्यावरणवाद्यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
कोराडी येथील आधीच दोन्ही कोळश्यावर चालणा-या थर्मल पॉवर प्लान्ट्समुळे कोलार नदी अत्यधिक प्रदूषित झाली असून तेच प्रदूषित पाणी कन्हान नदीमध्ये मिसळतंय,कन्हान नदी ही अर्धे नागपूर शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा करते,यात आणखी वाढ होऊन याच दोन्ही संचामध्ये १३२० मेगावॉट वीजेची निर्मिती झाल्यास किती हजार टन राख निर्माण होईल?ती राख अखेर कशी नष्ट करणार आहेत?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
संपूर्ण जगात कुठेही ३० लाख लोकसंख्या असणा-या शहरात ७ हजार २४० मेगावॉट वीज निर्मिचा प्रकल्प नाही मग नागपूर शहरातील लोकसंख्येने का कर्करोगासह ,अस्थमा,दमा,त्वचा रोग,डोळ्यांचा आजार इत्यादी रोगांना निमंत्रण देणा-या प्रकल्पांचे प्रदूषण सहन करावे?विशेष म्हणजे कोराडी व चंद्रपूरमधून जेवढी वीज निर्मिती होते त्यातील ७३ टक्के वीज ही पुणे,ठाणे,नाशिकसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना व लोकसंख्येला पुरविली जाते.पश्चिम महाराष्ट्रात वीज निर्मिती करणारे एक ही थर्मल पॉवर प्लान्ट नाहीत,कोराडी व विदर्भाचे प्रदूषण वाढवण्या ऐवजी उपमुख्यमंत्री हा प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्रात का घेऊन जात नाही?असा रोखठोक सवाल करीत, निदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यात हा प्रकल्प घेऊन जावे व ठाण्याचा विकास साधावा,असा बोचरा सल्ला देखील पर्यावरणवाद्यांनी याप्रसंगी दिला.
आज सावनेरमध्ये फडणवीस यांनी या प्रकल्पाचे समर्थन करताना हा प्रकल्प प्रदूषण नाही करणार असे जाहीर न करता, कमी प्रदुषण करेल,अशी मखलाशी त्यांनी जोडली असून, उपमुख्यमंत्र्यांची ही निव्वळ धूळफेक असल्याची टिका एका प्रश्नावर बोलताना पर्यावरणवाद्यांनी केली.आज हा १३२० मेगावॉट वीज निर्मितीचा प्रस्ताव हा महाजनकोचा जरी असला तरी कार्यान्वित झाल्यानंतर अदानीसारख्या खासगी उद्योगपतीच्या घश्यात जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही,अशी शंका देखील याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.अदानी व टाटा मिळून मुंबईसाठी जवळपास ८०० मेगावॉट वीज निर्मिती करतात मात्र काेराडी येथील एकाच प्रकल्पात महाजनकोला तब्बल १३२० मेगावॉट वीज निर्मित करायची आहे,यावरुन या सरकारच्या मनातील हेतू स्पष्ट होतो,असा आरोप करण्यात आला.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना देखील या संदर्भात निवेदन दिले,त्यांनी देखील हा प्रकल्प कोराडीत नको,हे मान्य केले मात्र पारशिवनीत घेऊन जा,असे पत्र दिले.पारशिवनीत या प्रकल्पामुळे प्रदुषण होणार नाही का?त्या ठिकाणी पेंच नदी वाहते,अर्धे नागपूर शहर हे पेंचच्या पाण्यावर निर्भर आहे,या प्रकल्पामुळे पेंच नदी ही राखमिश्रीत होणार नाही का?असा सवाल करीत ,तेथील वनसंपदा नष्ट करणारा हा प्रकल्प विदर्भात कुठेही न उभारता पश्चिम महाराष्ट्रात घेऊन जाण्याची मागणी पर्यावरणवाद्यांनी केली.
आज भुसावळ,नाशिक इत्यादी ठिकाणचे प्रत्येकी एक यूनिट बंद होत आहे.ती तूट भरुन काढण्यासाठी कोराडीवर हा जीवघेणा भार थोपवला जात आहे.संपूर्ण जग हे औष्णिक ऊर्जा निर्माण न करता सौर व पवन ऊर्जेकडे वळले असताना,भारत सरकारने देखील ४०००० मेगा वॉट सौर उर्जेचे लक्ष्य ठरवले आहे.२०२५ पर्यंत सर्व कृषि पंप सौर उर्जेवर आणण्याचे ठरविले असताना अशा परिस्थितीत सौर उर्जेचा प्रकल्प न राबविता प्रचंड प्रदुषण करणा-या औष्णिक उर्जेच्या नवीन प्रकल्पांची घोषणा करने या मागे कोणते ‘आर्थिक’ गौडबंगाल आहे?असा प्रश्न पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला.या मागेे निवडणूकीचे अर्थगणित तर नाही ना?असा बोचरा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला!
देशात सुमारे ४०,००० मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प बंद पडले आहेत.नागपूर जिल्ह्यात रिलायंस बुटीबोरी,अभिजीत एनर्जी मिहान व आयडियल एनर्जी प्रकल्प पावर डिमांड नसल्यामुळे बंद आहेत,याशिवाय राज्यातील शेकडो मेगावॉट्सचे खासगी प्रकल्पसुद्धा बंद अवस्थेत आहे.सरकारला हे प्रकल्प पुढाकार घेऊन सुरु करण्यापेक्षा,नवीन प्रकल्प सुरु करण्यात का रस आहे?याचा खुलासा करण्याची गरज याप्रसंगी त्यांनी प्रतिपादीत केली.
कोराडीला नवीन औष्णिक विद्यूत केंद्र तयार झाल्यास पाण्याची गरज वाढणार आहे.या प्रकल्पामुळे नागपूरात पाण्याचे भयंकर दूर्भिक्ष वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतातील सर्वात जास्त ज्या १० जिल्ह्यांमध्ये प्रचंड तापमान वाढणार आहेत त्यातील ७ जिल्हे हे एकट्या विदर्भातले आहेत!त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्राच्या लाभासाठी वैदर्भियांचा जीव आणखी धोक्यात घालणा-या या प्रकल्पाचा प्रस्ताव सरकारने तात्काळ रद्द करावा,अशी मागणी त्यांनी केली.पश्चिम महाराष्ट्राला वीज पुरवठा करण्यासाठी हाई टेंशन ट्रान्समिशन टॉवर व लाईन्स यामध्ये विदर्भातील आधीच शेतक-यांची हजारो एकर सुपीक जमीन वाया गेली असल्याचे ते म्हणाले.
वैदर्भिय शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या याचे कारण पूर्वी विदर्भातील सिंचन प्रकल्पामधून शेतीसाठी राखीव असणा-या पाण्याचा प्राधान्यक्रम बदलून उद्योगांसाठी करण्यात आले,आता वीज निर्मितीसाठी शहरांसाठी राखीव असणा-या पाण्याचा देखील उपयोग केला जाणार आहे.औष्णिक विद्युत प्रकल्पामधून बाहेर टाकल्या जाणा-या घटकांमध्ये NOx(श्वसनाशी संबंधित विकार होण्यास कारणीभूत)SO2(ब्रांको कॉट्रीक्शनसाठी कारणीभूत),मर्क्यरी,किरणोत्सर्ग व हवा प्रदूषित करणारे पीएम.२.५ व पीएम १० हे बारीक कण असतात,जे मानवाच्या फूफ्फूसांमध्ये प्रवेश करुन मनुष्याच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरतात.लेॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार पीएम.२.५ च्या प्रदूषणामुळे भारतामध्ये २०१९ मध्ये ९ लाखांपेक्षा जास्त लोकांचा अकाली मृत्यू झाला.केंद्रिय प्रदूषण मंत्रालयाने २०१० मध्ये कोराडी येथील विद्युत निर्मिती केंद्रात सल्फर डाई ऑक्साईडचे प्रदुषण कमी करणारी यंत्रणा(एफजीडी) लावण्याची अट घातली होती,ती सुद्धा आतापर्यत पूर्ण करण्यात आलेली नाही.
तरी देखील नव्याने १३२० मेगावॉटचे प्रकल्प सुरु करुन आणखी भयंकर प्रदुषण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार सज्ज झाली आहे.या सर्व बाबींचा विचार करुन हा प्रकल्प विदर्भासाठी योग्य नसल्याने ,प्रस्तावित औष्णिक उर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी याप्रसंगी पर्यावरणवाद्यांनी केली.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मागणी मान्य न केल्यास या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल,असा इशारा देखील त्यांनी दिला.
याप्रसंगी विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष ॲड.मुकेश समर्थ,सचिव दिनेश नायडू,विदर्भ इनवॉरमेंटल एक्शन ग्रूपचे अध्यक्ष आर.बी.गोयनका,समन्वयक सुधीर पालीवाल,किसान मंचचे समन्वयक प्रताप गोस्वामी,ग्रीन व्हिजिलचे कौस्तूभ चॅटर्जी,महाविदर्भ जनजागरण समितीचे समन्वयक नितीन रोंघे,नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रिय महासचिव अहमद कादर,लीव्हरेज ग्रील को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग संघाचे सचिव राजेश मंत्री,कास्तकारी जनआंदोलनाचे अध्यक्ष विलास भोंगाडे,ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे,सृष्टि पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष संजय देशपांडे,राष्ट्रीय किसान समन्वय समितीचे संयोजक विवेकानंद मायने आदी उपस्थित होते.
………………………………

आमचे चॅनल subscribe करा