Homeनागपूर न्यूजसरसंघचालकांनी दिली फडणवीस यांना ‘शाबासकीची’थाप

सरसंघचालकांनी दिली फडणवीस यांना ‘शाबासकीची’थाप

नॅशनल कॅन्सर इन्सिटिट्यूटचा लोकापर्ण सोहळा

वैयक्तिक दु:खातून सार्वजनिक दु:खाच्या जाणीवेकडे जाणे आवश्‍यक:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईच्या टाटा कॅन्सर इन्सिटिट्यूटच्या दर्जाचे रुग्णालय:गडकरींचीही कौतूकाची थाप

रुग्णालय उभारणी मागे फक्त संघाची प्रेरणा:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी

क्षणचित्रे

नागपूर,ता.२७ एप्रिल २०२३: अद्यावत यंत्रणांनी सज्ज असे कर्करोग रुग्णालय साकार करण्याचा हा फार कठीण संकल्प होता मात्र रुग्णालय,स्वप्न बघणे आणि ते पूर्ण करने यात फार मोठे अंतर आहे,हा प्रकल्प बघितल्यानंतर ज्यांनी हे रुग्णालय साकारण्याचा संकल्प केला तो अगदी मनातल्या भावनेपासून केल्याची जाणीव झाली त्यामुळे या प्रकल्पासाठी फक्त आर्शिवाद नव्हे तर मी शाबासकी देतो,अश्‍या शब्दात सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले.ते आज समृद्धी महामार्गाच्या झिरो माईल शेजारी जामठा परिसरात स्थित राष्ट्रीय कॅन्सर इन्सिटिट्यूटच्या लोकापर्ण सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, नॅशनल कॅंसर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, माजी खासदार तथा उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर आदी मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सरसंघचालक माेहनजी भागवत म्हणाले,की स्वयंसेवक चांगले काम करतात तेव्हा चांगल वाटत असतं.शरद यादव हे नागरी उड्डयण मंत्री असताना झालेल्या विमान दुर्घटनेत स्वयंसेवकांनी केलेले सेवा कार्य हे अतुलनीय होते.शरद यादव यांनी तेथील बचाव कार्य करणा-या अधिका-यांना,स्वयंसेवक जे करीत आहेत त्यांना ते काम करु द्या,त्यांच्यामुळे अपघातग्रस्त विमानाचे अवशेष व ब्लॅक बॉक्स लवकर मिळतील,असा विश्‍वास व्यक्त केला होता,मी त्यावेळी तिथेच होतो,स्वयंसेवकांचे कौतूक ऐकून त्यावेळी मला जो आनंद झाला होता तोच अनुभव मला आज येत आहे.

फडणवीस म्हणाले तसे या प्रकल्पाच्या मागे संघाची प्रेरणा उभी आहे मात्र काम करणारे जेव्हा ‘संघ’ होऊन काम करतात तेव्हा आपोआपच संघ उभा रहात असतो. डॉ. आबाजी थत्ते यांच्या नावाशी व लोकोत्तर कार्याशी जुडलेली ही संस्था कँसरग्रस्तांना मोठा दिलासा देणार असल्याचे ते म्हणाले.त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परियच क्रियेमध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे.ते प्रचारक होते.संपूर्ण भारतात त्यांनी भ्रमंती करुन अकृत्रिम स्नेह निर्माण केला होता.आत्मीयता व जिव्हाळा,सर्वांची काळजी वाहणे हा त्यांचा स्वभावगुण होता,हे रुग्णालय त्या स्वभावगुणांची अनुभूती करुन देत असल्याचे भागवत म्हणाले.

हे रुग्णालय सुरु होऊन अधिक काळ झाला नाही मात्र या रुग्णालयाचा सेवाभाव मला माझ्या एका दौ-यानिमित्त घडला.एक मुस्लिम भगिनी माझे भोजन होईपर्यंत भेटण्यास थांबली होती,फक्त हे सांगायला की तिच्या मुलीवर उपचार तिने या रुग्णालयात केले होते.तिला या ठिकाणी मिळालेले धैर्य,स्नेह तिने सांगितले.न विचारताच लोकं या रुग्णालयाची प्रसिद्धी करतात.आबाजी थत्ते या नावासोबतच या वास्तूला आपुलकीच्या स्वभावाचा वारसा लाभला असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्करोग हा विचित्र आजार आहे,फक्त रुग्णालाच नव्हे तर रुग्णाच्या संपूर्ण कुटुंबालाच हा रोग मानसिकरित्या प्रभावित करतो.त्यांना जास्त धीराची गरज असते.त्यामुळेच सर्वात उत्तम सेवा या रुग्णालयात रुग्णांना मिळायला हवी.खर्च खूप आहेत मात्र उत्कृष्टतेपेक्षा काही पण कमी स्वीकारता येणार नाही.हे काम चमू म्हणूनच करता येणार आहे.सहयोगातून सहयोगितांना उभे राहणे गरजेचे आहे.याच भावनेतून पुढे चालत रहावे लागणार आहे.चालत राहणे हीच मूलभूत गरज असल्याचे ते म्हणाले.

आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजा फक्त शासन व प्रशासानाची जवाबदारी नसून या एनसीआरसारखे आणखी प्रकल्प समाजानेच उभारले पाहीजे,असे आवाहन त्यांनी केले.वास्तू,उपचार,सगळ्यांचा सहयोग,खूप परिक्षा,खूप धैर्य,खूप धाडस,उत्तम टीमवर्कनेच परिणामपर्यंत ही वास्तू घेऊन आलेत.प्रेरणेशी प्रामाणिक राहून सर्वोकृष्ट सेवा रुग्णांना दिली जात आहे.आता अनेक गोष्टी आपल्यालाही करायची आहे.लोकांसोबतच ही आता अापल्या सगळ्यांची जवाबदारी आहे.कमी खर्चात या रुग्णालयात सेवा दिली जात आहे.ज्यांची क्षमता नाही ते नि:शुल्क सेवा घेत आहेत,त्यांच्या सेवेसाठी समाजाने पुढे येऊन दान करावे कारण हे चालत राहीले पाहिजे,याला पुढे आपले हात लागत राहीले पाहिले,ज्यांना शक्य आहे त्यांनी धन द्यावे ज्यांना शक्य आहे त्यांनी सेवेसाठी वेळ द्यावा.
काही लोकांच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभा राहीला,सगळ्यांनी सहकार्य केले तर संकटांचा पूर्णत: प्रतिकार करु शकू,सतत संघर्ष करु तर नक्कीच विजयी होऊ असे सांगून त्यांनी या प्रकल्पाला सहकार्य करणा-याचे आभार मानले.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,की समाजाला नितांत ज्याची गरज आहे अश्‍या प्रकल्पाचे आज लोकार्पण झाले.या अप्रतिम उभारणीमध्ये ज्यांची संकल्पना,कष्ट,परिश्रम लाभले व ही भव्य दिव्य वास्तू उभी झाली त्या फडणवीसांचे मी अभिनंदन करतो.सरसंघचालक हे उर्जास्थान,प्रेरणास्थान असून चांगले काम करण्याला पाठीशी पाठबळ लागत असतं.ज्यांच्या मागे सरसंघचालकांचे पाठबळ आहे,ते प्रकल्प उभे राहत असतात.

आरोग्य व्यवस्था ही आजच्या परिस्थितीत मोठे आव्हान आहे.आज हवामान बदल,उष्माघात सारखी आव्हाने तर आहेतच मात्र कर्करोग हे सगळ्यांपेक्षा अधिक धोकादायक आणि आव्हानात्मक आहे,काळजीचा विषय आहे.करोना महामारीच्या काळात आपण सर्वांनी याचा अनुभव घेतलाच आहे.कर्करोग हा तर मानवी शरिरात दबा धरुन बसलेला असतो.जोरकसपणे हल्ला करतो अचानकपणे.बराच उशिर झाला तर आयुष्यच संपवतो,ही वस्तूस्थिती आहे.

फडणवीस यांचे वडील,जोगळेकर यांच्या पत्नी तर माझी आई देखील याच रोगामुळे मृत्यू पावली.वेदनादायी आठवणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात मात्र,वैयक्तिक दु:खातून सार्वजनिक दु:खाच्या जाणीवेकडे जाणे हे लोकप्रतिनिधीला आवश्‍यक असतं.मुंबईत टाटा कॅन्सर रुग्णालयात कायमच फार मोठी गर्दी असते,त्यामुळे नागपूरात अश्‍या एका कॅन्सर रुग्णालयाची गरजच होती.

फडणवीस हे दृढ निश्‍चयी व आपले स्वप्न प्रत्यक्षात आणणारी व्यक्तीमत्व आहे.त्यांचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे.हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब समृद्धी महामार्गाची संकल्पना फडणवीस यांचीच आहे.नागपूर ते मुंबई ७०० किलोमीटर अंतर कापायचं होतं.त्यांनी जे प्रयत्न केले,परिश्रम घेतले त्यामुळे आज शिर्डीपर्यंत हा महामार्ग तयार झाला आहे,प्रत्यक्षात त्यांनी या महामार्गासाठी केलेल्या प्रयत्नांचा मीच साक्षीदार आहे.समृद्धी महामार्ग व ही वास्तू फडणवीस यांच्या दृढ निश्‍चयाची साक्ष देते. गेली दहा वर्षे त्यांनी या संस्थेसाठी अविरत मेहनत घेतली.फक्त संकल्पना व निश्‍चयापुरती ते मर्यादित राहीले नाहीत.२०१७ मध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते पहील्या टप्प्याचे लोकापर्ण केले.आतापर्यंत साढे सहा लाख रुग्णांनी उपचार घेतले.७८ हजार रुग्णांनी तपासणी करुन घेतली.अद्यावत यंत्रणांनी जागतिक दर्जाचं हे कॅन्सर रुग्णालय उभारल्या गेले आहे.

एकूण ६० एकर जागेवर उभारलेल्या भव्य वास्तूत आल्याबरोबरच रुग्ण हा निम्मा अर्धा बरा झाल्याशिवाय राहत नसेल.आता तर रुग्णासोबतच्या नातेवाईकांना राहण्यासाठी या ठिकाणी मोफत धर्मशाळेची देखील सोय केली जात आहे.सर्वसामान्यांना हे रुग्णालय म्हणजे फार मोठा दिलासा देणारेच नसून हे तर एकप्रकारचे ‘आरोग्य मंदिर’असल्याचे कौतूकाचे उद् गार मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी काढले.

फडणवीस यांची जिद्द व ध्यासापासून प्रेरणा घेऊन समाजात असे अनेक आरोग्य मंदिर उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.आमदार,लोकप्रतिनिधींनी या वास्तूला भेट देऊन प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात फार मोठी प्रतिक्षा यादी असते.त्यांचा भार हलका करण्यासाठी आता ठाण्यात देखील अशाच स्वरुपाचे अद्यावत यंत्रणांनीयुक्त असेच एक भव्य दिव्य कॅन्सर रुग्णालय उभारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

देशात उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.दरवर्षी तीस ते चाळीस टक्के कर्करुग्णांचा मृत्यू होत असतो.या वास्तूचा आता कर्करुग्णांना फायदा होईल.अश्‍या रुग्णालयाची खरी गरज होती.शासन म्हणून आणखी या रुग्णालयासाठी जे जे काही करता येईल,ते शासन नक्कीच करेल.हजारो लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे असे सांगून कर्करुग्ण,नातेवाईक यांना फार मोठा दिलासा देणारा हे वरदान असल्याचे ते म्हणाले.हे ऐतिहासिक असे काम झाले असून येथील आरोग्य दूत,परिचारिका देवदूतांना मी शुभेच्छा देतो,अशी वेळ कोणावरही येऊ नये अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले,की विदर्भात कोणालाही कर्क रोग झाल्यास पूर्वी मुंबईचे टाटा कॅन्सर रुग्णालय गाठावे लागत होते.मुंबईत टाटांच्या कॅन्सर रुग्णालयात ज्या अद्यावत सुविधा व यंत्रणा उभारल्या आहेत अगदी त्याच दर्जाचं हे रुग्णालय उभारलं गेले असून जागतिक दर्जाचं हे रुग्णालय असल्याची कौतूकाची थाप याप्रसंगी गडकरी यांनी फडणवीस व त्यांच्या चमूला दिली.शैलेश जोगळेकर व फडणवीस यांचा या रुग्णालयाशी भावनात्मक संबंध असल्याचे गडकरी म्हणाले.

फडणवीस यांचे वडील आमदार गंगाधर फडणवीस तसेच जोगळेकर यांच्या पत्नीचे निधन कर्करोगामुळे झाले.अनेक कार्यकर्त्यांचा मी कर्करोगामुळे मृत्यू झाला असल्याचे जवळून बघितले.अमेरिकेत कर्क रुग्णांच्या मृत्यूमध्ये ३३ टक्के घट झाली आहे मात्र दुसरीकडे भारतात कर्क रोगामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.या ठिकाणी लहान मुलांचा विभाग देखील बघितला.गोंदियातील ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेला लहान मुलगा बघितला.मी जेव्हा टाटांच्या रुग्णालयात गेलो तेव्हा तेथील कर्करोग झालेली लहान मुले ही बागेत खेळत होती,हातात बिस्कीट घेऊन खात होती.मला ते बघून आनंद झाला होता.माझी पुतणी जिला मी मुलीसारखीच मानत होतो तिचा एका महिन्यापूर्वी कर्करोगामुळे मृत्यू झाला.हा अनुभव फारच वेदनादायी असतो.कर्करोगावर कमी खर्चात उपचार होने ही काळाची गरजच असल्याचे ते म्हणाले.

नागपूर,भंडारा,गडचिरोली,गोंदिया यासारख्या पूर्व विदर्भातून फार मोठ्या प्रमाणात सिकलसेल,थॅलिसिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात.गरीब माणसे ही उपचारावर खर्च करु शकत नाही त्यामुळेच या संस्थेत मोठ्या प्रमाणात अश्‍या रोगावर संशोधन झाले पाहिजे.अमेरिकेत ३३ टक्के रुग्णांचा मृत्यू थांबू शकतो तर आपणही कॅसरमुक्त भारत बनविण्याचा प्रयत्न का करु शकत नाही, असे सांगून ही संस्था एक फार मोठी उपलब्धी असून, आम्हाला शिक्षण,आरोग्य सेवेचा संकल्प केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.समृद्धी महामार्ग व हे कॅन्सर रुग्णालय फार मोठी भेट असून विदर्भ,मध्य प्रदेश,छत्तीसगढ येथील रुग्णांना ही अप्रतिम भेट अाहे, या संस्थेला अनेकांच्या सहकार्याचे हात मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजचा दिवस फार विशिष्ट असल्याचे म्हणाले.२५-३० वर्षांपूर्वी मी एक स्वप्न बघितले होते.नागपूरात मध्य भारतातील सर्वोकृष्ट अशी एक कॅन्सर संस्था असावी.ज्याप्रकारे मुंबईत टाटांचे कॅन्सर रुग्णालय आहे, जिथे देशभरातून रुग्ण येऊन सेवा घेतात त्याच टाटा यांच्या मार्गदर्शनात या वास्तूचे निर्माण व्हावे,अशी माझी ईच्छा होती,यामुळे टाटा रुग्णालयांवरचा भार थोडा कमी होण्यास मदत होईल,अशी त्या मागील भावना होती,असे ते म्हणाले.

यासाठी शैलेश जोगळेकर यांनी अगदी पहिल्या दिवसापासून हा भार उचलला.दिवस रात्र, चोवीस तास त्यांनी परिश्रम घेतले.खूप चांगल्या पद्धतीने ही वास्तू त्यांनी साकारली.माझे वडील जेव्हा कर्करोगाने मृत्यू पावले त्यावेळी मी फार लहान होतो.मी टाटा कॅन्सर रुग्णालयावरील भार बघितला होता.शैलेश जोगळेकरांची पत्नी या देखील कर्करोगानेच मृत्यू पावल्या.विलास फडणवीस यांच्या मार्गदर्शनात, संघाच्या प्रेरणेने एक चमू तयार झाली.आमच्या दोघांचे स्वप्न संपूर्ण चमूचे स्वप्न झाले.

सरसंघचालक मोहनजी भागवत,भैय्याजी जोशी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.सुनील देशपांडे यांनीही मोलाची मदत केली.ही वास्तू उभारण्यात फक्त संघाची प्रेरणा असल्याचे फडणवीस म्हणाले.ही वास्तू सर्वांनी मिळून तयार करावी,रुग्णांची सेवा घडावी,वैशिष्ठपूर्ण वार्ड असावेत,गरीबांना मोफत औषधोपचार मिळावा,हे सर्व साध्य करता आले.विशेष म्हणजे या ठिकाणी सशुल्क आणि नि:शुल्क असा उपचार होतो मात्र नि:शुल्क उपचार घेणा-या रुग्णांसाठी देखील अद्यावत यंत्रणा,तेच वार्ड,तीच डॉक्टर्सची चमू उपचार करते,सुविधा मिळतात जे सशुल्क उपचार घेणा-या रुग्णांना मिळत असते.या ठिकाणी गरीब-श्रीमंत असा भेद केला जात नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कर्करोग हा फार प्रदीर्घ असणारा आजार आहे.तो लवकर बरा होत नाही.त्यामुळे या रोगावरील उपचारावर खर्च देखील अधिक होत असतो.या संस्थेत त्यामुळेच कमी खर्चात उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो.या संस्थेत पहील्यांदाज मध्य भारतातील कर्करोगावर उपचार करणा-या बालरोग विभागाची सुरवात करण्यात आली.हा विभाग पूर्णपणे बालकांवर नि:शुल्क उपचार करतो.परमेश्‍वराच्या आर्शिवादाने ते लवकर बरे होतात आणि पुढील ५०-६० वर्षांचे आयुष्य घेऊन जातात.यासाठी केंद्र सरकारच्या पीएसयूची देखील मदत लाभली.

मात्र,अद्यापही मी संतुष्ट नाही.जगातील अत्याधुनिक उपचार येथे गरीब रुग्णांना मिळाले पाहिजे.आज मध्य भारतासह दक्षीण भारतीय रुग्णही या संस्थेत उपचार घेत आहे.याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोठी धर्मशाळा या ठिकाणी उभारली जात आहे.याशिवाय दोन आणखी केंद्रे उभारली जाणार आहे.पीएमटी,रक्तसंबधी व्याधी,थॅलिसिमिया,सिकलसेलवरील उपचारासाठी ही केंद्र काम करणार आहे.डॉ.आनंद पाठक सांगतात ‘हे कॅन्सरवरील संशोधन केंद्र असल्याने या ठिकाणी संशोधन झालेच पाहिजे’त्यामुळेच संशोधनाशिवाय कॅन्सरवरील नवे शोध लागूच शकणार नाही.या ठिकाणी उपचार आणि संशोधन दोन्ही साध्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संशोधनातून नवे उपचार देण्याचा आम्ही प्रयत्न करु.हा सेवेसाठीचा प्रकल्प आहे,नफा कमविण्यासाठी नाही,असे फडणवीस म्हणाले.समर्पित भावनेनेच अनुसंधान घडत असतं.याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी अधिवक्ता ॲड.सुनील मनोहर यांचे आभार मानत ,त्यांनी देखील या प्रकल्पासाठी आपला मोलाचा वेळ दिला असल्याचे फडणवीस म्हणाले.२०१५ मध्ये जेव्हा त्यांच्याकडे ही बागडोर सोपवली तेव्हा शंका मनात होती ते या संस्थेसाठी वेळ देऊ शकतील की नाही?पण त्यांनी वेळ दिला.ही व्यवस्था गरीबांसाठी उभारलेली व्यवस्था असल्याचे फडणवीस म्हणाले.परमेश्‍वराकडे हीच प्रार्थना आहे येथे उपचार घेण्याची वेळ कोणावरही येऊ नये,या पुढे ही खूप चांगले,आणखी चांगले,आणखीनच चांगले करत राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

सूत्र संचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महासचिव शैलेश जोगळेकर यांनी केले.
……………

क्षणचित्रे-
-जोगळेकर यांनी सूत्र संचालन करताना काल रात्री फोनवर बोलतानाच्या फडणवीस यांच्या भावना विशद केल्या, की जोपर्यंत गडकरी यांच्याकडून चांगले काम झाले असल्याचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत काम चांगले झाले असल्याचे मी मानू शकत नाही,त्यांच्या या वाक्यावर भागवतासंह गडकरी यांच्या चेह-यावर देखील उस्फूर्त हास्य फूलले

-परिणामी गडकरी यांनी आपल्या भाषणात काम चांगलेच नव्हे तर जागतिक दर्जाचे झाले असल्याचे प्रमाणपत्र फडणवीसांना दिले,यामुळे मंचावरील पाहूणे चांगलेच सुखावले

-देशाचे राजकारण ढवळून काढणारे सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची या सोहळ्याला लाभलेली उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावून गेली.अद्याप या संस्थेत आणखी दोन संशोधन केंद्रे तसेच धर्मशाळा बांधण्याचे काम शिल्लक असल्याने अदानी यांचे आर्थिक पाठबळ गृहीत धरल्या जात होते

-देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा लोकापर्ण सोहळा पार पडणार होता मात्र काल रात्रीच अचानक त्यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती नागपूरात येऊन धडकली.नुकतेच दंतेवाडा येथील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात ११ जवान शहीद झाले याशिवाय पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या मृत्यूमुळे त्यांचा नागपूर दौरा टळल्याचे बोलले जात आहे

-गृहमंत्रीच उपस्थित नसल्याने पोलिस विभागावरील ताण हा कमी झाल्याचे दिसून पडत होता

-मंचावर येण्यापूर्वी प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते वास्तूचे लोकापर्ण झाले.यावेळी संपूर्ण वास्तूतील विविध विभाग,बालरोग विभाग इत्यादीची पाहणी पाहूण्यांनी केली

-या वास्तूत दोन मजले खाली तर ७ मजले वर अशी रुग्णालयाची बांधणी झाली असून ,एकूण १० मजली अप्रतिम वास्तू उभारली गेली आहे

-या वास्तूची पूजा १६ ऑगस्ट २०१२ रोजी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना झाली,तेव्हापासून भूमिपूजन,शिलान्यास,प्रत्यक्ष बांधकामाला झालेली सुरवात,बांधकामात मजुरांची कष्टकरी बोटे,अपरंपार परिश्रम,अतिशय अवजड बांधकाम साहित्यांची प्रत्येक मजल्यावरची बांधणी,स्टीलच्या अवजड साहित्यांची जुळवाजुळव,रतन टाटा यांच्या हस्ते पहील्या टप्प्याचे झालेले अनावरण,टाटांचे भाषण,स्वत: कर्करोगाच्या वेदना भोगलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या उपस्थितीत झालेला सोहळा, याची चित्तवेधक क्षणचित्रे एलईडीवर सादर करण्यात आली

-एका सपाट असणा-या जमीनीवर अतिशय परिणामकारक वास्तूची बांधणी,हजारो कष्टकरी मजुरांच्या कष्टांची साक्ष देणारे होते.कोणतीही वास्तू बांधल्यानंतर फार आकर्षक भासते मात्र बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर हजारो माणसांचे किती अविरत परिश्रम असतात,याची जाणीव एलईडीवर अतिशय प्रभावीपणे चित्रफिते बघताना उपस्थितांना जाणवत होती,परिणामी मान्यवरांच्या भाषणात कौतुकांचा वर्षाव स्वाभाविक उमटला

-ही चित्रफित बघताना सरसंघचालक,मुख्यमंत्री व गडकरी यांच्या चेह-यावरील कौतुकाचा भाव अनेकांनी अचूक टिपला

-मान्यवरांचे स्वागत भगवान धन्वतंरीची मूर्ती व शाल,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले मात्र सुरवातीला सूत्र संचालन करणारी निवेदिका ही वारंवार ‘धन्वतंरी जी की मूर्ती देकर मान्यवर का स्वागत करेंगे’असे उद् गार काढत होती,वास्तवतेत धन्वंतरी हे मनुष्य नसून भगवंत असल्याने, त्यांच्यासाठी ’जी’शब्दाचा उच्चार चांगलाच खटकणारा होता,निवेदिकेने सरळ सरळ भगवान धन्वतंरी इनकी मूर्ती देकर स्वागत करेंगे,असे उच्चार करायला हवे होते

-राज्याचे माहिती आयुक्त राहूल पांडे यांना देखील अगदी समोरच्या पंक्तीत अति विशिष्ट व्यक्तींच्या पंक्तीत स्थान मिळाले नाही तर त्यांना देखील मंचापासून खूपच लांब असणा-या विशिष्ट व्यक्तींच्या आसनस्थानी बसलले बघून अनेकांना आश्‍चर्य वाटले

-जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर हे संपूर्ण वेळ मुख्य मंडपाच्या प्रवेश द्वाराजवळच उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेत होते,त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात बसण्याची देखील तसदी घेतली नाही,हे बघून त्यांच्याविषयीचा आदर उपस्थितांमध्ये दूणावल्याची जाणीव होत होती

-मुख्य कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी एलईडीवर या संस्थेच्या डॉ.आनंद पाठक यांच्यासारख्या नामांकित डॉक्टर्स चमूने इंग्रजीत आपापले मनोगत व्यक्त केले,तेच जर हिंदी किवा मराठीमध्ये असते तर भरगच्च भरलेल्या सभामंडपातील जनसामान्यांना ते चांगल्याने कळले असते,असे बोल ऐकू आले

-कार्यक्रमानंतर खास ‘गुजराती’आस्वादाचे भोजन अनेक ‘मराठी‘ माणसांना पचनी पडले नाही,प्रत्येक पदार्थात वाजवीपेक्षा जास्त गोडवा असल्याने पदार्थात साखर की साखरेत पदार्थ,अशी मिश्‍किली ऐकू आली.देशाचे गृहमंत्री जरी गुजराती असले तरी भोजनाचा आस्वाद घेणारे बहूतांश हे मराठीच होते,याचा विसर आयोजकांना पडला, त्यामुळे गुजराती भोजनासोबतच मराठी भोजनाचा मेन्यू देखील ठेवायला हवा हवा,अशी खंत व्यक्त होत होती.

-राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली
……………………..

Latest बातम्या