Homeनागपूर न्यूजखासगी शिकवणी वर्ग व शिक्षणाधिकारी यांचे साटेलोटे:प्रशांत पवार यांचा गंभीर आरोप

खासगी शिकवणी वर्ग व शिक्षणाधिकारी यांचे साटेलोटे:प्रशांत पवार यांचा गंभीर आरोप


महाविद्यालयात ७० टक्के विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गांमुळे अनुपस्थित

शिकवणी वर्गाचे लाखो रुपये शुल्क भरु न शकणा-या गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची यामुळे संपतेय जिद्द

उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात ‘प्रभारी’शिक्षणाधिकारी!शिक्षणाचे गांर्भीय फडणवीसांना नाही!

नागपूर,ता.२४ एप्रिल २०२३: महाराष्ट्राच्या उपराजधानीत शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्ट काराभाराची बजबजपुरी माजली अाहे. दहावी व बारावी वर्गाच्या शिकवणी वर्गांशी शिक्षणाधिकारी काटोलकर यांचे साटेलोटे असून, खासगी शिकवणी वर्गाचे लाखो रुपये शुल्क भरु न शकणा-या हजारो गरीब विद्यार्थ्यांचे या मुळे नुकसान होत असून त्यांची शिकण्याची जिद्द संपत असल्याचा आरोप ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रशांत पवार यांनी आज पत्र परिषदेत केला.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की या खासगी शिकवणी वर्गाचे संचालक लाखो रुपयांच्या जाहीराती प्रसिद्ध करतात व विद्यार्थ्यांना आकृष्ट करतात.मात्र,अश्‍या खासगी शिकवणी वर्गात शिकविणारे शिक्षक हे प्रशिक्षीत नसतात तसेच अनेकांची तर शैक्षणिक पात्रता देखील नसते.तरी देखील शिक्षणाधिकारी हे कधीही भरारी पथकाच्या माध्यमातून धाड घालताना व त्यांचे पितळ उघडे पाडताना दिसत नाहीत.उलट,‘माहिती-माहिती’चा खेळ करुन ’आज आम्ही तपासणीसाठी येणार’असल्याचे महाविद्यालयांना आधीच कळविले जाते,त्यामुळे त्या दिवशी महाविद्यालयातील विद्यार्थी हे खासगी शिकवणी वर्गाला न जाता,महाविद्यालयाच्या वर्गातच बसतात व वर्गातील उपस्थितीचा कोरम पूर्ण असल्याचे भासवले जाते.

या संपूर्ण भ्रष्टचाराच्या खेळात मात्र समाजातील गरीब,गरजू विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होतं, कारण वर्गात एवढ्या कमी संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिक्षक देखील शिकवित नाही!

एकीकडे नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांला वर्गात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असते.याशिवाय त्याला परिक्षेला बसता येत नाही,दुसरीकडे मात्र अनेक महाविद्यालयातील दहावी,बारावीच्या वर्गातील विद्यार्थी हे महाविद्यालयांसोबत टॉप-अप झालेल्या शिकवणी वर्गात उपस्थित असतात,ऐन महाविद्यालयीन वेळेत खासगी वर्गात बसणारे विद्यार्थी हे कोण असतात?एकाच वेळी हजारो विद्यार्थी महाविद्यालयातील वर्ग तसेच खासगी शिकवणी वर्गात कसे बसू शकतात?७५ टक्के वर्गातील उपस्थितीचा काेरम ते कसा पूर्ण करतात?असा सवाल याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केला.

एवढंच नव्हे तर जे विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गात प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकलच्या वीस गुणांपैकी अधिकाधिक गुण दिले जातात,हा प्रकार म्हणजे गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अन्याय करणारा प्रकार असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.

नागपूर शहरात हजारो खासगी व सरकारी,अनुदानित व विना अनुदानित शाळा,महाविद्यालये आहेत.या महाविद्यालयात शिक्षक,प्राध्यापक देखील आहेत जे नियमित शासनाकडून व पालकवर्गाद्वारे गलेलठ्ठ पगार घेतात.असे असतानाही पगार घेणारे असे शिक्षक व प्राध्यापक त्यांच्या महाविद्यालयात प्रवेश घेणा-या गरीब विद्यार्थ्यांना का शिकवत नाही?त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थी हे खासगी शिकवणी वर्गात का शिकतात?वर्ष भर अश्‍या महाविद्यालयातील शिक्षक व प्राध्यापक हे रिकामेच बसले असतात व फूकटचा पगार घेतात,असा आरोप करीत, दहावी व बारावीचे वर्ष हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याच्या जीवनातील अतिशय महत्वाचे वर्ष असून, शिक्षण क्षेत्रातील अश्‍या भ्रष्ट कारभारामुळेच हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिल्याचे अनेक अहवाल अनेक खासगी स्वयंसेवी संस्थानाने प्रसिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले.

आपले शिक्षणाधिकारी हे शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या हजेरीची तपासणी करीत नसल्यामुळेच तसेच सरसकटपणे अनेक शाळा व महाविद्यालयांनी खासगी शिकवणी वर्गांसोबत टॉप-अप केल्यामुळे, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गात पाठविण्याची संधीच शिक्षण विभागाने उपलब्ध करुन दिली आहे का?असा जळजळीत सवाल पवार यांनी याप्रसंगी केला.

‘जय जवान जय किसान’संघटना गरीब विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे ‘लाईव्ह फेसबुक’प्रसारण करणार आहे.ज्या ज्या शाळेत व महाविद्यालयात वेळापत्रकानुसार वर्ग भरत नाही,महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी दररोज विद्यापीठाच्या नियमानुसार वर्गात बसत नाहीत,त्या रिकाम्या वर्गांचे लाईव्ह प्रसारण करुन शिक्षण मंत्री दिपक केसरकर व शासनाचे लक्ष वेधण्याचे कार्य करु,असा इशारा त्यांनी दिला.

शिक्षणाधिकारी काटोलकर यांनी दहावी,बारावीच्या गरीब विद्यार्थ्यांनी कुठे शिक्षण घ्यायचे?कसे ज्ञान अर्जित करायचे?याचे उत्तर द्यावे तसेच ज्या शाळा व महाविद्यालयांमध्ये दहावी व बारावीचे नियमित वर्गच भरत नसतील, त्या शाळा व महाविद्यालयांनी, वर्गात उपस्थित असूनही ज्ञानाला पारखे होणा-या गरीब विद्यार्थ्यांचे खासगी शिकवणी वर्गाचे शुल्क भरावे,अन्यथा अश्‍या शाळा व महाविद्यालयांच्या विरोधात ‘जय जवान जय किसान’संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही याप्रसंगी प्रशांत पवार यांनी दिला.

एकीकडे नागपूर शहराचे आमदार देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहीले आहेत तसेच ते विद्यमान उपमुख्यमंत्री देखील आहेत.राज्यात त्यांचीच सत्ता असून देखील त्यांच्याच नागपूर जिल्ह्यात ‘कायम ’शिक्षणाधिकारीचे पद भरले गेले नसून ‘प्रभारी‘म्हणून काटोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यावरुन राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आपल्याच नागपूर शहरात व नागपूर जिल्ह्यात गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याविषयी किती काळजी आहे? हे सिद्ध होतं,अशी बोचरी टिका करुन, काटोलकर यांच्याविषयी आमच्या संघटनेला अनेक गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असून,शासनाने त्यांची त्वरित उचलबांगडी करुन कायम पदावरील शिक्षणाधिकारी नेमावा,अशी मागणी त्यांनी केली.

या पार्श्वभूमीवर ‘सत्ताधीश’ने प्रभारी शिक्षणाधिकारी काटोलकर यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी कुठल्याही आरोपाविषयी ’नो कमेंट्स’म्हणून फोन ठेऊन दिला.

पत्र परिषदेला ‘जय जवान जय किसान’संघटनेचे सचिव अरुण वनकर,माजी नगरसेवक राजेश माटे,मिलिंद महादेवकर,रविंद्र इटकेलवार आदी उपस्थित होते.
…………………..

Latest बातम्या