
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १ फेब्रुवरी २०२३: नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी परवा सोमवारी मतदान पाड पडले,उद्या गुरुवार दिनांक २ फेब्रुवरी रोजी या निवडणूकीचा निकाल देखील लागेल मात्र ही निवडणूक घोषित झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा झाली ती १ डिसेंबर २०२० रोजी पार पडलेल्या पदवीधर निवडणूकीचीच!या मागे कारण म्हणजे या ही वेळी प्रमुख लढत भाजप तसेच आघाडीच्या उमेदवारांमध्येच रंगली.पदवीधर प्रमाणेच आघाडीचे प्रमुख शिलेदार आ.सुनील केदार,आ.अभिजित वंजारी,आ.विकास ठाकरे,ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे,अतुल लोंढे,किशोर गजभिये आदी नेत्यांनी आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांच्यासाठी संपूर्ण सहा ही जिल्हे पिंजून काढले तर भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांच्या निवडणूकीची धुरा आ.मोहन मतेंवर साेपविण्यात आली होती.मतेंना यश-अपयशाच्या मताधिक्य किवा मजविभाजनामध्ये कितपत शिक्षकांचा ‘कौल’ मिळाला हे उद्याच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईलच मात्र आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पदवीधराची पुर्नरावृत्ती घडत असल्याचा दावा केला आहे.
परिणामी पदवीधरमध्ये नेमके काय घडले होते?याचा आढावा ‘फ्लॅश बॅक’मध्ये खास आपल्या वाचकांसाठी ‘सत्ताधीश’ने घेतला.
भारतीय जनता पक्षाचा विचार केला असता पदवीधरसाठी तत्कालीन विद्यमान आमदार प्रा.अनिल सोले यांचीच दावेदारी मजबूत मानल्या जात होती.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी सहा महिन्यापूर्वीच सोले यांना ’कामाला लागा’असा सूचक संदेश दिला होता.त्यामुळे सोले यांनी तशी तयारी देखील केली होती मात्र ऐन वेळी तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी महापौर संदीप जोशींची उमेदवारी दिल्लीश्वरांकडून खेचून आणली.यामुळे त्याही वेळी इच्छूक असणारे विद्यमान सहकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांची दावेदारी मागे पडली.गिरीश देखमुख यांनी देखील प्रयत्न केले होते.
भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असतानाच ७ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने ॲड.अभिजित वंजारींचे नाव अधिकृतरित्या घोषित केले.मतदानाची तारीख १ डिसेंबर होती.नामांकन भरण्याची वेळ जवळ येऊन ठेपली असताना देखील भाजपकडून आपल्याच गडात उमेदवार घोषित करण्यास बराच काळ घेण्यात आला होता.जोशी आणि सोले यांच्यातील लढाई ही गडकरी विरुद्ध फडणवीस अशीच सर्व माध्यमात रंगली होती.वंजारी यांनी १० नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे नागपूरात आर्वजून उपस्थित होते,यामुळे कार्यकर्त्यांना एकीचा संदेश देण्यात हा पक्ष यशस्वी झाला होता.

ऐन करोनाच्या काळात या निवडणूकीत नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,वर्धा,गडचिरोली हे सहा ही जिल्हे मिळून एकूण ६४ टक्के मतदान झाले होते.२ लाख ६ हजार मतदारांपैकी १ लाख ३३ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.नागपूर विभागीय मतदारसंघातील ही निवडणूक उपराजधानी नागपूर भोवतीच फिरत असे.मात्र,पदवीधरच्या निवडणूकीत त्यावेळी ग्रामीण भागातील मतदान मोठ्या प्रमाणात झाले होते.नागपूर जिल्ह्यात ६२,७१४ इतके मतदान झाले तर उर्वरित ५ जिल्ह्यात ७०,७१४ इतके मतदान झाले होते.या निवडणूकीत शहरावर भाजपने तर ग्रामीणवर काँग्रेसने लक्ष ठेवले होते.
या निवडणूकीत विदर्भवाद्यांकडून महाविदर्भ जनजागरणचे संयोजक नितीन रोंघे मैदानात उतरले होते.विदर्भ माझा,विदर्भ राज्य आघाडी,बळीराजा पार्टी,राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी,केंद्रिय जनविकास पार्टी समर्थित विदर्भवादी उमेदवार रोघें यांच्या उमेदवारीमुळे या निवडणूकीत रंगत वाढली होती.प्रस्थापित राजकीय पक्षांकडून विदर्भाच्या वेगळ्या राज्याबद्दल काहीच बोलले जात नाही.भाजपने तर वेगळ्या विदर्भाचा वचननामा लेखी दिला असतानाही व वेगळ्या विदर्भाच्या मुद्दावर जनतेची मते मिळवून देखील, वैदर्भीयांची फसवणूक केल्याचा मुद्दा रोंघे यांनी उचलत, विदर्भातील रोजगाराचा प्रश्न,वीज प्रकल्पांमुळे विदर्भाचे धोक्यात आलेले पर्यावरण,विदर्भावर विकास निधीबाबत केला गेलेला व होणारा अन्याय इत्यादी अश्या मुद्दांवर निवडणूक लढली.
तर वंजारी यांचे तर मिशनच ‘परिवर्तन’हे होते.‘पदवीधर के सन्मान में,अभिजित वंजारी मैदान में‘हे त्यांच्या निवडणूकीचे स्लोगन असून आघाडी सरकारमधील उर्जामंत्री नितीन राऊत,पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार,मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार,गृहमंत्री अनिल देशमुख,विधान सभा अध्यक्ष नाना पटोले,राष्ट्रवादीचे नेते प्रफूल्ल पटेल यांनी ग्रामीण तसेच शहरी भागात त्यांच्या प्रचाराचा धुराळा उडवला होता.नियोजित बैठका,एकत्रित नियोजन,अचूक रणनीती आणि आघाडीची एकजूट,वज्रमूठ हे या निवडणूकीत वंजारी यांच्या यशाचे गमक बनले होते.वंजारी यांनी दोन वर्षांपूर्वीपासूनच पदवीधरची निवडणूक डोळ्या समोर ठेऊन विदर्भाच्या सहा ही जिल्ह्यात पदवीधरांपर्यंत पोहोचण्याला सुरवात केली होती तर भाजपने मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघे काही दिवस आधी संदीप जोशींची उमेदवारी जाहीर केली.
एवढ्या कमी वेळात जोशींना विदर्भातील सहा जिल्ह्यांच्या मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्यासाठी योग्य तसा वेळच मिळाला नाही,हे देखील एक कारण त्यांच्या पराभवा मागे असल्याचे बोलले गेले.
विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या काळात पदवीधरची निवडणूक तडकाफडकी जाहीर करण्यात आली.निवडणूक आयोगाच्या या अतिशय घाईगर्दीवर तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत,आयोगाच्या घाईमुळे अनेक पदवीधरांना मतदानापासून वंचित राहावे लागले,मतदार यादीत सुधारणा करणे तसेच मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असल्याचे ताशेरे देखील फडणवीस यांनी ओढले होते.
या ही निवडणूकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता.तत्कालीन शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी एकूण चार उमेदवारांची ईच्छा निवडणूक लढण्याची असल्याचे सांगितले होते.अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याने नागपूरमध्ये दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता.काँग्रेस विदर्भात दुय्यम स्थान देते.निवडणूकीत साधी विचारणा ही करत नाही.तुमची ताकदच काय?असे उत्तर दिले जाते.साधा सन्मानसुद्धा दिला जात नाही.विदर्भात आमची ताकत नसेल असे काँग्रेसला वाटत असेल तर आम्हाला लढू द्या,घाबरता कशाला?निवडणूकीच्या निमित्ताने किमान चार घरांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार जातील,घड्याळ चिन्ह पोहोचेल,कोणाला पाडणे आणि विरोधकांना मदत करणे आमचा उद्देश्य नसून,आम्हाला आमची ताकद आजमावयाची असल्याचे अहिरकर म्हणाले होते.कदाचित पदवीधरमध्ये जे शक्य झाले नाही ते साध्य करण्यासाठीच यावेळी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांनी बंडखोरी करुन निवडणूक लढल्याचेही आता बोलले जात आहे.
पदवीधरची निवडणूक संदीप जोशी बनाम अभिजित वंजारी यांच्या ऐवजी गडकरी विरुद्ध फडणवीस अशीच रंगली होती.प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडकरी हे काहीश्या नाराजीनेच जोशी यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.विरोधकांची एकजुटता बघून ही निवडणूक आता केवळ संदीप जोशी यांची नसून भाजपच्या अस्तिमेची असल्याने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे ‘ऑन लाईन’ आवाहन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले होते.१ डिसेंबर रोजी मतदान होते.हे आवाहन गडकरींनी २६ नोव्हेंबर रोजी केले!
संदीप जोशी हाडाचे कार्यकर्ते आहेत,त्यांच्यात उत्तम संघटन कौशल्य आहे.खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयन असो,स्थायी समिती सभापती असो की महापौर असो,त्यांनी प्रत्येक जबाबदारी चपखलपणे सांभाळली.त्यांच्या सामाजिक कार्याची व्याप्ती मोठी आहे.त्यांच्यासारखा उमेदवार निवडून येणे ही मतदारसंघाची गरज आहे.संदीप जोशी यांनी निवडून येण्यासाठी ही निवडणूक प्रत्येकाने प्रतिष्ठेची बनवावी.हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहीला आहे.या मतदारसंघावर भाजपच्या विचारांचा पगडा आहे.तो कायम राखण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जाेमाने कामाला लागायला हवे.सुमारे १०० ते १५० मतदारांशी प्रत्यक्ष तर सुमारे २५० मतदारांशी फोनद्वारे संवाद साधावा.पहिल्या पसंतीचे मत देताना गफलत होऊ नये म्हणून ‘मॅन टू मॅन’आणि ‘हार्ट टू हार्ट’संपर्क साधण्याचे आवाहन गडकरी यांनी केले होते.
मात्र,या निवडणूकीत विजयी झाल्यानंतर ‘माझ्या विजयात भाजपचा हात मोठा’ असल्याचे सूचक विधान स्वत:वंजारी यांनीच केल्याने जोशी यांच्या पराभवा मागील या ‘दूस-या’ ही कारणाची बरीच चर्चा झाली होती.
पदवीधराच्या रिंगणात तेव्हा १९ उमेदवार भाग्य अजमावित होते.यात भाजपचे संदीप जोशी यांच्यासह आघाडीचे ॲड.अभिजित वंजारी,रिपाईचे राजेंद्रकुमार चौधरी,वंचितचे राहूल वानखेडे,महाविदर्भ जनजागरणचे नितीन रोंघे,इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टीच्या ॲड.सुनिता पाटील,अपक्ष-अतुलकुमार खोब्रागडे,अमित मेश्राम,प्रशांत डेकाटे,‘खदखद’फेम मास्तर नीतेश कराळे,डॉ.प्रकाश रामटेके,बबन उर्फ अजय तायवाडे,ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार,सीए.राजेंद्र भुतडा,प्रा.डॉ.विनोद राऊत,ॲड.वीरेंद्र कुमार जयस्वाल,शरद जीवतोडे,प्रा.संगीता बडे तसेच संजय नासरे यांचा समावेश होता.
याच दरम्यान महापालिकेतील अधिकारी,कर्मचा-यांना महाविकास आघाडी सरकारने पदवीधर मतदार संघातील विजयाचे मोठे गिफ्ट ही दिले.तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनेमनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांना लिहलेल्या पत्रात १ सप्टेंबर २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दिले होते.
पदवीधरचा निकाल-
मानकापूर येथील क्रीडा संकुलात एकूण २८ टेबलवर मतमोजणी झाली होती.२८ हजार मतांची एक फेरी राहीली होती.पाच फे-यांमध्ये निकाल लागेल अशी अपेक्षा होती.दुपारी १ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होऊन रात्री उशिरापर्यंत चालेल हे गृहीतच धरण्यात आले होते.पहिला कल दुपारी साढे तीन वाजता येईल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
१ डिसेंबर रोजी ३२२ मतदान केंद्रांवर घेण्यात आलेल्या मतदानात १ लाख ३२ हजार ९२३ मतदारांनी सहभाग नोंदवला होता.६४.३८ टक्के मतदान झाले होते.कोणत्या मतदान केंद्रांवर किती मते मिळाली,हे उघड होऊ नये,यासाठी सुरवातीला मतपत्रिका एका मोठ्या बॉक्समध्ये टाकण्यात आल्या.त्यानंतर त्या एकमेकात मिसळण्यात आल्या.२५-२५ अशा मतपत्रिकेचे गठ्ठे तयार करण्यात आले.यासाठी १२ फे-या झाल्यावर दुपारी २ वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडून यानंतर प्रत्यक्ष् मतमाजेणीला सुरवात झाली.१ हजार मतपत्रिका प्रत्येक टेबलवर ठेवण्यात आल्या.
मतमोजणी करताना अवैध मतदान बाजूला काढून एकूण वैध मतांस दोन ने भागाकार दिला जातो.आलेल्या उत्तरात एका अंकाची भर घालून कोटा ठरवला जातो.निर्धारित कोटा जो उमेदवार पहिल्या पसंतीची मते मिळवून पूर्ण करतो,त्याला विजयी घोषित केले जाते.पहिल्या पसंदीच्या मतांमध्ये कोटा पूर्ण झाला नाही तर ज्याला पहिल्या पसंतीची सर्वात कमी मते मिळाली त्या उमेदवाराला बाद ठरवून त्याच्या मतपत्रिकेत मतदाराने दुसरा पसंतीक्रम ज्या उमेदवाराला दिला,त्याच्या मतांत हे मत मिळविले जातात,अशी प्रक्रिया कोटा पूर्ण होईपर्यंत अथवा दोनच उमेदवार मैदानात शिल्लक राहीपर्यंत सुरु असते.दुस-या,तिस-या पसंतीची मते मिळवून देखील कुणी कोटा पूर्ण करु शकला नाही तर सर्वाधिक मते घेणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो.
भारतीय जनता पक्षाचा अभेद्य गड म्हणून ओळखला जाणा-या नागपूर विभागातील पदवीधर मतदासंघातील या निवडणूकीत पहील्या फेरीपासूनच अभिजित वंजारी यांनी जोरदार मुसंडी मारली होती.तिस-या फेरी अखेर वंजारी यांनी आठ हजार मतांची आघाडी घेतली होती.रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरुच होती.
सायंकाळी ६ वाजता पहिल्या फेरीत मोजलेल्या २८ हजार मतांचे कल हाती आले होते.त्यात २,२३४ मत अवैध होते!वंजारी यांना १२ हजार ६१७ तर संदीप जोशी यांना ७ हजार ७६७ मते मिळाली होती.वंजारी यांना मिळालेली मोठी आघाडी हा भाजपसाठी मोठा धक्का होता.पहील्या फेरीपासूनच भाजपचा पराभव दृष्टिक्षेपात आला होता.
दुस-या फेरीत वंजारी यांना ११ हजार ४५७ तर जोशी यांना ९ हजार ८५ मते मिळाली.दुस-या फेरीच्या अखेर वंजारींनी ७ हजार २६२ मजांची लीड घेतली होती.तिस-या फेरीत ही वंजारींनी लीड घेतली त्याच वेळी अपक्ष अतुल खोब्रागडे यांना ३,६४४ तर नितेश कराळे यांना २,९९९ तर विदर्भवादी रोंघे यांना २२८ मते मिळाली होती.चवथ्या फेरीत वंजारी यांना ४७,३७१ तर जोशी यांना ३४,६६४ मते मिळाली.
विजयाची घोषणा व्हायला दूसरा दिवस म्हणजे ५ डिसेंबर उजाडावा लागला.३२ तास चाललेल्या मजमोजणीत अखेर वंजारी विजयी घोषित झाले.वंजारी यांना ६१ हजार ७०१ तर जोशी यांना ४२ हजार ७९१ मते मिळाली होती.वंजारी यांनी १८ हजार ९१० मतांनी विजयश्री खेचून आणली होती.
ही मतमोजणी ५ फे-यांमध्ये झाली.मध्य रात्री पहिल्या चार फे-यांमध्ये एकाही उमेदवाराला ६० हजार २४७ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही.त्यामुळे बाद फेरीच्या मोजणीस सुरवात झाली. ५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ती लांबली.मात्र,पहिल्या फेरीपासून वंजारी यांनी घेतलेली आघाडी जोशी यांना भेदता आली नाही.बाद फेरीत वंजारी ६१ हजारावर जाताच त्यांना विजयी घोषित करण्यात आले.विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी वंजारी यांना प्रमाणपत्र प्रदान केले.त्याप्रसंगी मंत्री सुनील केदार,सेनेचे कृपाल तुमाने,काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे,माजी मंत्री राजेंद्र मुळक, नाना गावंडे,राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी यांनीही विजयाच्या जल्लोषात सहभाग नोंदवला.
या निवडणूकीचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे या निवडणूकीत एकूण ७ हजार २२८ मते अवैध ठरली!
एरवी निवडणूकीत अतिशय सुक्ष्म स्तरावर नियोजन करणा-या भाजपने या निवडणूकीत मत विभाजनाचा विचारच केला नव्हता.बसपाने या निवडणूकीत उमेदवार उभा केला नसल्याने आंबेडकरी मतांचे विभाजन झाले नाही.या पूर्वीच्या निवडणूकीत बसपाच्या उमेदवारांनी २० हजारांच्या वर मते घेतली होती,हे विशेष!वंजारी व जोशी यांच्यातील विजयाच्या मतांमधील फरक देखील जवळपास तेवढाच आहे.या पूर्वीच्या निवडणूकीत बसपाचे उमेदवार किशाेर गजभिये यांनी १९ हजार मते घेतली होती.पदवीधरमध्ये बसपाचा उमेदवार नसल्याने ती मते वंजारी यांच्या पारड्यात गेल्याचे सांगितले जात होते.
या पराभवानंतर जोशी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ‘असफलता एक चुनौती है,कोशिश करनेवाले की कभी हार नही होती…’असे सांगत त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेणा-या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले हाेते.
वंजारी यांनी,दीड वर्ष पूर्वीपासूनच पदवीधरांमध्ये सुरु केलेले काम,अधिकाधिक मतदार नोंदणी आणि महाविकासआघाडीच्या एकजुटीने विजय मिळाला असल्याची प्रतिक्रिया दिली.माझ्या नावातच ‘जीत’असल्यामुळे मी पराभूत होणारच नव्हतो,अशी प्रतिक्रिया विजयानंतर वंजारी यांनी दिली होती.
वंजारी यांच्या विजयात महाआघाडीचे पाठबळ,आघाडीचे सर्वच नेते सक्रिय असणे,दोन वर्षांपासून केलेली पूर्वतयारी,वंजारी यांचे निर्विवाद व्यक्तिमत्व या जमेच्या बाजू ठरल्या तर जोशी यांच्या पराभवात अनिल सोले यांना डावलल्या जाणे,भाजपमधील अंतर्गत धुसफूस,मतविभाजनात आलेले अपयश तसेच जोशी हे ‘जोशी’ असल्यामुळे ओबीसींची नाराजी भोवली,असा प्रचार केला गेला असला तरी जोशींना ४१ हजार ५४० मते मिळाली होती.त्यामुळे जातीय समीकरण जुळून आले होते,ओबीसी नाराज होते असे दिसून पडले नाही.किमान भाजपसोबत असलेल्या ओबीसींची मते जोशी यांना मिळालेली दिसली.
सर्वात महत्वाचे म्हणजे पदवीधर मधील पराभवाची कारणे १५ दिवसांत सांगणार,अशी घोषणाच जाेशी यांनी केली होती!ती कारणे तीन वर्ष उलटून गेली तरी अद्याप समोर आली नाही.भाजप आता एका विशिष्ट वर्गाचा जुना पक्ष राहिला नाही.दीनदलित,ओबीसंींची मते घेणारा पक्ष आहे.त्यामुळेच ४२ हजार मते मिळवू शकलो.पराभवाबाबत अद्याप विचार केला नाही.परंतु, येत्या १५ दिवसांत पराभवाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करुन प्रसारमाध्यमांपुढे सांगणार असल्याचे जोशी म्हणाले होते!यानंतर मात्र त्यांना करोना झाला होता.
वंजारी यांच्या या यशाने २०१४ चे अपयश धुवून निघाले होते.२०१४ मधील पदवीधरच्या निवडणूकीत भाजपच्या अनिल सोले यांनी ५२ हजार ४८५ मते मिळवली होती तर प्रा.बबनराव तायवाडे यांना २१ हजार २२६ चा पल्ला गाठता आला होता.बसपाच्या किशाेर गजभिये यांनी १९ हजार ४५५ मते मिळवली होती.त्या निवडणूकीत २ लाख ८७ हजार ११८ पदवीधर मतदार होते.
पदवीधरमध्ये बसपाचा उमेदवार नसल्याचा फटका जोशींना बसला.यावेळी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत बसपाचा उमेदवार आहे.परिणामी ते किती मत खेचण्यात यशस्वी होतात यावरच या ही निवडणूकीत भाजपचे यश अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.याशिवाय अपक्ष सतीश इटकेलवार,शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्याही मतांचा परिणाम आघाडीच्या अडबाले यांच्या मतांवर परिणाम करणार ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
जाता जाता-
पदवीधरसाठी जोशी यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल सोले यांच्या नावावर सोशल मिडीयावर बनावट पोस्ट टाकून व्हायरल केल्या जात असल्याची तक्रार भाजपच्यावतीने सायबर सेलकडे नोंदवण्यात आली होती.याचा तातडीने छडा लावून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.या पोस्टमध्ये जोशी यांचा पराभव करण्याचे आव्हान करण्यात आले होते!
आघाडीला आपला पराभव दिसत असल्यानेच हे कृत्य सोले यांच्या नावाने बनावट पोस्ट टाकून मतदारांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिका-यांनी केला होता.
सोले यांच्या नावाने बनावट फेसबूक खाते उघडण्यात आले असून पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत,असा आरोप भाजपने केला होता.सोले हे उमेदवारी न मिळाल्याने नाराज नाहीत.जोशी यांचा प्रचार सोलेच आतापर्यंत करत आहेत.सोले यांनी अनेक सभा घेतल्या.त्यामुळे आघाडीचा उमेदवार निराश झाले आहेत.
पराभव दिसल असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची खटपट सुरु आहे.काही अति उत्साही कार्यकर्ते त्या पोस्ट अधिकाधिक व्हायरल करीत आहेत.सायबर सेलने या तक्रारीची नोंद घेतली असून लवकरच बनावट फेसबुक अकाऊंट तयार करणा-या व मतदारांची दिशाभूल करणारी पोस्ट व्हायरल करणा-याला अटक केली जाईल,असा दावा करण्यात आला होता.
मात्र,या घटनेला तीन वर्षांचा काळखंड उलटल्यावरही, जोशी यांच्या पराभवासाठी इतका ‘तांत्रिकी’खटाटोप करणारा नेमका ’तो’कोण?याचा उलगडा ना भाजपने केला ना सायबर सेलच्या पोलिसांनी!

आमचे चॅनल subscribe करा