Homeनागपूर न्यूजनागपूरात माझा दाभोलकर होण्याची मला भीती नाही!श्‍याम मानव

नागपूरात माझा दाभोलकर होण्याची मला भीती नाही!श्‍याम मानव


श्‍याम मानव यांच्या सभेत गोंधळ!

प्रश्‍न श्रद्धेचा की अंधश्रद्धेचा?

रामकथेला विरोध नाही तर दरबार भरवण्याला विरोध:श्‍याम मानव

धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात विकृत मानसिकतेचे हिंदू करतात आहेत कट कारस्थान:विश्‍व हिंदू परिषदेची भूमिका

शुक्रवार दिनांक २० जानेवरी रोजी दुपारी २.३० वाजता संविधान चौकात आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्रातील दाभोलकर,कलबुर्गीं हत्याकांडच्या घटना नागपूरकरांच्या मनात ताज्या

नागपूर,ता.१८ जानेवरी २०२३:उपराजधानीत सध्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा जोरदार वाद सुरु असून याची सुरवात भारतीय जनता पक्षाचे दक्ष्ण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी ५ जानेवारी ते १३ जानेवरी पर्यंत नागपूरातील रेशिम बाग मैदानात, बागेश्‍वर धाम जिल्हा छत्तरपूर,मध्य प्रदेश येथील धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या रामकथा प्रवचनाच्या आयोजना नंतर सुरु झाली.दररोज दुपारी १ वाजतापासून रामकथेला हे महाराज सुरवात करीत होते मात्र त्यापूर्वी दररोज सकाळी ९ वाजता ते आयोजनस्थळी ‘दिव्य दरबार’भरवत होते.या दरबारात ते भक्तांसमोर चमत्कारिक दावे करीत असल्याचे अनेक व्हिडीयो व्हायरल झाले.अवघ्या २६ वर्षीय धीरेंद्र कृष्ण महाराजांचे हे वर्तन महाराष्ट्र राज्यात लागू झालेल्या जादुटोणा विरोधी कायद्याचे सर्रास उल्लंघन असल्याचे सांगून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा.श्‍याम मानव यांनी या महाराजांविरुद्ध सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे)रोशन पंडित यांच्याकडे जादूटोणा विरोधी कायदा २०१३ व ड्रग अँड मॅजिक रेमेडित ॲक्ट-१९५४ या दोन्ही कायद्याअन्वये तक्रार नोंदवली.

महाराजांचे रामकथेचे आयोजन हे कार्यक्रम पत्रिकेनुसार १३ जानेवरीपर्यंत होते मात्र ८ जानेवरी रोजी प्रा.श्‍याम मानव यांनी रितसर तक्रार नोंदवताच महाराजांनी ११ जानेवरीलाच आपला गाशा गुंडाळला व शहर सोडले.जादूटोणा विरोधी कायद्यासाठी समन्वयक दक्षता अधिकारी म्हणून शासनाने सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे)यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.घडू पाहणारा गुन्हा प्रतिबंधित करण्याचा,थांबवण्याचा आणि झालेल्या गुन्ह्याची तक्रार दाखल करुन आवश्‍यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी दक्षता अधिका-यांकडे असते व कायद्याने त्यांना कारवाई करनेही बंंधनकारक असते.परिणामी,कायद्यानुसार कारवाई होणार या भीतीने महाराजांनी पळ काढला असा अ.भा.अंनिसच्या पदाधिका-यांचा दावा आहे.

धीरेंद्र कृष्ण यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलनाचा मार्ग पत्करण्याचा निर्धार अंनिसने केला असल्याने त्याचाच एक भाग म्हणून आज बुधवार दिनांक १८ जानेवरी रोजी रेशिम बाग येथील सुरेश भट सभागृहात श्‍याम मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.रात्री ९ वाजता त्यांचे व्याख्यान संपले.तत्पूर्वी दहा मिनिटांआधी त्यांनी आपले व्याख्यान संपविणार असल्याचे सभागृहात सांगितले.यावर प्रश्‍न उत्तर होणार नसल्याचे जाहीर झाले.व्याख्यान संपताच मंचावर गोंगाट झाला.काही तरुणांनी श्‍याम मानव यांना काही प्रश्‍न करायचे असल्याचे सांगितले.

यावर श्‍याम मानव यांनी त्यांना परवा शुक्रवार दिनांक २० जानेवरी रोजी दुपारी ३ वाजताचा वेळ दिला मात्र ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.आम्ही तुम्हला ९ वाजेपर्यंत ऐकले आता तुम्हाला आमचे ऐकून घ्यावे लागेल असा सूर गोंधळ घालणा-यांनी लावला.यावर पोलिसांनी १४९ ची नोटीस बजावली असून ९ वाजता कार्यक्रम संपविण्याची सूचना केली असल्याचे श्‍याम मानव यांनी त्यांना सांगितले.श्‍याम मानव यांनी त्यांना शुक्रवारी भेटण्याची वेळ देखील निश्‍चित करुन दिली मात्र त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली.

श्‍याम मानव हे फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांवरच का बोट ठेवतात?असा देखील त्यांचा आक्षेप होता,यावर खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना,मी माझ्या व्याख्यानात ईसाई पादरी तसेच मुस्लिम मौलवींची देखील उदाहरणे दिली असल्याचे त्यांनी सांगितले.मला माझं घर साफ करायचं आहे,गोंधळ घालणा-यांनी दोन तास माझे व्याख्यान तरी ऐकले की नाही यात मला शंका आहे,त्यांनी वेळ मागितली ती मी त्यांना दिली.मला पोलिसांच्या सूचना ऐकणे बंधनकारक आहे,असे ते म्हणाले.

या आणि अश्‍याच आरोपांमुळे पुरोगामी महाराष्ट्रात २० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकरांची पुण्यात हत्या करण्यात आली.या नंतर कलबुर्गी हत्याकांड गाजले.तुमचा देखील दाभोलकर होईल अशी भीती वाटत नाही का?या प्रश्‍नावर बोलताना,मला वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे,खरं सांगायचं तर ही सुरक्षा आहे त्यामुळेच मी जिवंत आहे,असे मार्मिक विधान ही त्यांनी केले.नागपूरात माझा नरेंद्र दाभोलकर  होण्याची मला भीती नाही,मला माझ्या कामातील जोखिम माहिती असून ही मी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत राहणार असा निर्धार ही त्यांनी व्यक्त केला.

नागपूरच्या टिळक पत्रकार भवनात अंनिसने प्रा.श्‍याम मानव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच ९ जानेवरी व १२ जानेवरी रोजी पत्रकार परिषद घेतली होती.‘दिव्यशक्ती’असल्याचा दावा करणारा २६ वर्षीय तरुण धीरेंद्र कृष्ण महाराज यांना अंनिसने ३० लाख रुपयांच्या पारितोषिकाचे आव्हान दिले होते.मात्र हे आव्हान न स्वीकारताच महाराजांनी नागपूरातून पळ काढला.

१० जानेवरी २०२३ रोजी श्‍याम मानव यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली होती व धीरेंद्र महाराज यांनी त्यांच्या दिव्य चमत्कारिक दाव्यांची जी बरसात शेकडो भक्तांसमोर रेशिम बागेत केली ,ती कशी जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा ठरते,याची सविस्तर माहीती देत, तात्काळ महाराजांना नागपूर सोडून जाण्यापूर्वीच अटक करुन कायद्याची अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

या दिव्य दरबारात महाराजांनी ७ व ८ जानेवरीला भक्तांसोबत केलेल्या चमत्कारिक व अविश्‍वसनीय दाव्यांची चित्रफितच त्यांनी पुरावा म्हणून सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे)रोशन पंडित यांच्याकडे सोपवली.या चित्रफितीमध्ये धीरेंद्र कृष्ण यांनी काही पुरुष आणि महिला भक्तांचे नाव,वडीलांचे नाव दिव्यशक्तीने आपोआप ओळखल्याचा दावा केला आहे.नागपूरातील या दिव्य दरबाराचे व्हीडीयोज यूट्यूबवर ‘बागेश्‍वर धाम सरकार का दिव्य दरबार जानेवरी २०१३ सुबह ९ बजे से’या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेत.या दिव्य दरबारात धीरेंद्र कृष्ण यांनी ‘भूत बाधा की सवारी आती है,उपद्रव किया गया है,गंदी तांत्रिक क्रिया है‘,तबीयत ठिक नही रहती,तात्काळ मृत्यू,अभी तक घर में ५ मृत्यू हुई है,पितृदोष के कारण….!‘आपके पिता का नाम शंकरलाल है,माईक से बोले या सच नही है तो हम तुम्हारे सारे कांड खोल देंगे’असे एका भक्ताला धमकीवजा बोलतानाचा व्हिडीयो देखील पुरावा म्हणून प्रा.श्‍याम मानव यांनी रोशन पंडितांना सोपवला.या महाराजांकडे कोणत्याही शाखेची डॉक्टरची पदवी नसताना ते भक्तांचे रोग कसे ओळखतात?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

नागपुरात झालेल्या धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या दिव्य दरबारात प्रश्न विचारून महाराजांकडून त्याबद्दल उत्तर मिळवण्यासाठी आणि भविष्य जाणून घेण्यासाठी १ हजार रुपये प्रत्येक व्यक्तीकडून घेतले जात असल्याचा आरोप अंनिसकडून करण्यात आलाय. १ हजार रूपये देण्यासाठी लोकांना बँक अकाऊंट देखील देण्यात आले होते असा आरोप अंनिसने केलाय. त्यामुळे हे कृत्य जादू टोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन असल्याने धीरेंद्र कृष्ण महाराज विरोधात गुन्हा दाखल होण्यासाठी पुरेसे आहे. याच पुराव्यांच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अंनिसने केली आहे.

नागपूरमधील दिव्य दरबाराच्या माध्यमातून धीरेंद्र कृष्ण महाराज काही भाविकांच्या घरी कुठे काय ठेवले आहे हे दिव्य शक्तीद्वारे सांगायचे. या द्वारे ते दिव्य शक्तीच्या माध्यमातून भाविकांच्या घरी पाहू शकतात असा दावा करायचे. परंतु, असा दावा करणे हे जादू टोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. याचे सर्व पुरावे नागपूर पोलिसांना देण्यात आले आहेत तरी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप अंनिसने केलाय.

एका जाहीरातीत हनुमान यंत्राने रोग बरा करण्याचा दावा करण्यात आला होता,यावर गुन्हा दाखल झाला व औरंगाबाद खंडपीठाने देखील या संदर्भात पोलिसांवर कठोर ताशेरे आढेले होते.कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर हा जास्त गंभीर मुद्दा असल्याचे आपल्या पत्र परिषदेत श्‍याम मानव यांनी सांगितले.

नागपूरातील यशवंत स्टेडियममध्ये पायलट बाबाला देखील काही वर्षांपूर्वी अंनिसने असेच आव्हान दिले होते.दहा बाय तीनच्या खड्ड्यात ७२ तास श्‍वास रोखून जमीनीत जिवंत राहत असल्याचा दावा या पायलट बाबाने केला होता.अंनिसने संपूर्ण तयारी केली मात्र सकाळी १० वाजता हा पायलट बाबा यशवंत स्टेडियमध्ये पोहाचलाच नाही.गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नाव नोंदवलेल्या शंकुतलादेवी यांना देखील अंनिसने आव्हान दिले होते,त्या मानव संगणक असल्याचा दावा करीत असून ज्योतिषशास्त्राविषयी त्यांनी देखील चमत्कारिक दावे केले होते.त्यांना देखील पळवून लावण्यासाठी दिल्लीपर्यंत फोनाफोनी झाली होती.नागपूरातील पोलिस विभागातर्फे त्यांना सुखरुप विमानतळापर्यंत सोडण्यात आले होते!असे श्‍याम मानव म्हणाले.चेहरा वाचणारे खानझोडे बाबा यांना देखील अंनिसने विदर्भ साहित्य संघात चित्पावन ब्राम्हण संघातर्फे आयोजित एका कार्यक्रमात पोहोचून आव्हान दिले होते.त्यांनी देखील कार्यक्रमातून पळ काढला.अश्‍या अनेक घटना आहेत त्यामुळेच नागपूर शहराचे नाव हे ‘पोलखोल’शहर झाले असल्याचे श्‍याम मानव म्हणाले.

मात्र,त्या वेळी महाराष्ट्रात जादुटोना विरोधी कायदा लागू झाला नव्हता त्यामुळे अश्‍या अंधश्रद्धा पसरविणा-या भोंदू बाबा-बायांना पळून जाण्यासाठी वाव मिळत होता.आता मात्र पोलिसांना गुन्हा दाखल करावाच लागेल,औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाने मोठी आशा निर्माण केली असल्याचे ते म्हणाले होते.पहीले शासनाने धीरेंद्र कृष्ण यांच्या विरोधात कायदेशीर कृती करावी,नसल्यास आंदोलनाचा मार्ग पत्करला जाईल यानंतर न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी उघडे अाहेत,असा इशारा देखील या पत्र परिषदेत श्‍याम मानव यांनी दिला होता.

काय दिले होते अंनिसने दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान?

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे धीरेंद्र कृष्ण यांना आपोआप कोणाचेही नाव,वय,मोबाईल नंबर ओळखून दाखवा,शेजारच्या खोली मधील दहा वस्तू ओळखून दाखवा व दिव्यशक्तीचा जो दावा धीरेंद्र कृष्ण यांनी चित्रफितीत केला आहे त्या दाव्यानुसार दिव्यशक्ती असल्याचे सिद्ध करुन दाखविल्यास ३० लाख रुपयांचे पारितोषिक जिंका असे आव्हान ९ जानेवरी रोजी टिळक पत्रकार भवनात घेतलेल्या पत्र परिषदेतून धीरेंद्र कृष्ण यांना करण्यात आले होते.

धीरेंद्र कृष्ण नागपूरातून पळ काढण्या पूर्वीच त्यांना अटक करण्याची मागणीही अंनिसने केली होती मात्र रोशन पंडित यांनी या प्रकरणाचा अभ्यास करीत असल्याचे श्‍याम मानव यांना सांगितले मध्य प्रदेशातून त्यांना अटक करुन नागपूरात आणने हे पोलिसांसाठी देखील अवघड ठरेल असेही श्‍याम मानव यांनी पोलिसांना सांगितले होते मात्र तेच घडले.

धीरेंद्र कृष्ण काहीतरी निमित्त करुन ११ जानेवरी रोजी सायंकाळी उर्वरित २ दिवसांचा कार्यक्रम अर्धवट टाकून नागपूर सोडून जाणार आहेत याची पूर्वकल्पना रोशन पंडित व अमितेश कुमार यांना देऊन देखील कोणतीच कारवाई झाली नाही आणि अंनिसचे ३० लाखांचे आव्हान न स्वीकारताच महाराजांनी नागपूरातून पलायन केल्याची घटना घडली.त्यांचा अख्खा दिव्य दरबारच कायद्याचे उल्लंघन करणारा होता असा श्‍याम मानव यांचा दावा आहे.

आता या महाराजांनी पोलिस कारवाईच्या भीतीतून पळ काढला की कुणीतरी पळवले? अशी चर्चा जनतेत राहणार असल्याचा दावा ही केला गेला.विशेष म्हणजे भाजपचे आमदार मोहन मते यांनी आयोजित केलेल्या मध्यप्रदेशच्या धीरेंद्र कृष्ण यांच्या रामकथेत सहभागी होऊन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अार्शिवाद घेतल्याचे वृत्त सर्व प्रसार-प्रचार माध्यमांनी ठलकपणे प्रसिद्ध केले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत:कायद्याचे पदवीधर आहेत.त्यांना जादुटोणा विरोधी कायद्याची देखील सखोल जाण आहे कारण हा कायदा तयार करण्यात व तो महाराष्ट्रात लागू करण्यात त्यांचा देखील सक्रिय सहभाग असल्याचे श्‍याम मानव यांनी सांगितले.कदाचित ते रामकथेच्या नावावर आयोजनस्थळी गेले असावेत व ते ज्यावेळी गेले ती वेळ रामकथेचीच होती,अंनिसचा रामकथा किवा धार्मिक आयोजनाला विरोध नाहीच मात्र, धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालणे हा कायद्याने गुन्हा असल्यानेच धीरेंद्र कृष्ण यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे व ती होईपर्यंत अंनिस वेगवेगळ्या मार्गाने हे आंदोलन सुरुच ठेवेल असा इशारा देखील श्‍याम मानव यांनी दिला आहे.

या कायद्यानुसार अश्‍या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आयोजक यांच्यावर देखील कारवाई होत असते.अश्‍या दिव्य दरबारांचे आयोजन करणा-या भाजपचे आमदार यांना या कायद्याची माहिती नव्हती का?किवा याविषयी ते अज्ञानी होते?मात्र,या कायद्यानुसार अंधश्रद्धा वाढवणारी कृती गृहीत धरली जाते,अज्ञान नाही,असा सूचक इशारा देखील श्‍याम मानव यांनी दिला आहे.

याच आंदोलनाची पुढची पायरी म्हणजे रेशिम बाग येथील सुरेश भट सभागृहात श्‍याम मानव यांचे धीरेंद्र कृष्ण यांच्या विषयीचे आजचे हे व्याख्यान होते.

मात्र,आज सभागृहात व्याखानानंतर हेतुपुरस्सर गोंधळ घालण्यात आला. मात्र हे हिंदूत्ववादी तरुण होते की महाराजांचे शिष्यवृंद याबाबत मात्र तर्कविर्तकांना उधाण आले आहे.श्‍याम मानव यांच्यासोबत प्रश्‍नाेत्तर करण्यास मज्जाव करण्यात आल्याने त्यांनी सभागृहातच ’जय श्री राम’चे नारे लावले.पोलिसांनी त्यांना सभागृहाच्या बाहेर काढले.त्याच वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी संत गाडगे महाराज,संत तुकडोजी महाराजांच्या जयजयकाराचे नारे लावले.

विशेष म्हणजे विश्‍व हिंदू परिषदेतर्फे शुक्रवार दिनांक २० जानेवरी रोजी दुपारी २.३० वाजता संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.बागेश्‍वर धाम पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात काही विकृत मानसिकतेच्या हिंदू विरोधी लोकांनी महाराजांची छवि धुमिल करण्याचा प्रयत्न चालविला आहे.यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या असून विश्‍व हिंदू परिषद धर्मप्रसार नागपूर शाखेतर्फे हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रक त्यांनी प्रसार प्रचार माध्यमांना पाठवले आहे.

एकीकडे जेव्हा महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात जादुटोना विरोधी कायदा हा संमत झाला आहे.या कायद्याच्या अंमलबजावणीची कठोर तरतूदच करण्यात आली आहे अश्‍यावेळी मध्यप्रदेशमधून एखादे महाराज उपराजधानीत येऊन दिव्यशक्तींचा चमत्कार दाखविण्याचा दावा करीत असतील व त्यांच्या या दाव्याला अंनिस विरोध करीत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करीत असेल तर यात हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचा प्रश्‍न, हा श्रद्धेचा की अंधश्रद्धेचा?याचा विचार आता सुज्ञ नागपूरकरांनी किंबहूना हिंदू धर्मियांनीच करावा,असे या शहरातील अनेक बुद्धिजीवींचे मत आहे.

Latest बातम्या