Homeनागपूर न्यूजधक्कादायक!नागपूर विवाह नोंदणी कोर्टापर्यंत हिंदू-मुस्लिम धर्माचे गडद सावट

धक्कादायक!नागपूर विवाह नोंदणी कोर्टापर्यंत हिंदू-मुस्लिम धर्माचे गडद सावट

संविधानाची पायमल्ली करत हिंदू-मुस्लिम जोडप्याला भीती दाखवून परत पाठवण्याचा सुरु आहे असंवैधानिक कारभार!

दाखवली जाते बजरंग दल-मदरश्‍यांची भीती!

मुंबईतून आलेला तरुण निराश परतला

जोडप्याला दिवसभर तातकळत ठेऊन क्लार्कने शेवटपर्यंत नोटीस काढलीच नाही!

महिला वकीलांवर आणले दडपण, मुलीसोबत बोलल्याशिवाय रजिस्ट्रारसमोर नोटीस ठेवणार नाही!

कोणत्या कार्यासाठी पदावर बसलेत कोणते कार्य पार पाडत आहे?तरुणाचा आर्त प्रश्‍न

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ११ जानेवारी २०२३: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली.देश आज स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे.देशाला लाभलेली राज्यघटना ही सर्व अंगाने समतोल,इहवादी,स्वतंत्र,समतावादी आणि आधुनिक असताना देखील ‘धर्म’ही बाब मात्र सामाजिक जिवनापूरती न राहता ‘राजकारणाशी’निगडीत होते तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संसदेमधील भाषणाचे ते वाक्य आठवतात ’घटना निर्दोष आहे यात वाद नाही मात्र घटना राबविणारे यांच्यावर या राज्यघटनेचे यश-अपयश निर्भर राहणार आहे’.काल मंगळवार (ता.१०)रोजी नागपूर सत्र न्यायालयाच्या परिसरात असणा-या विवाह नोंदणीच्या कार्यालयात बाबासाहेबांचे शब्द खरे ठरवणारी अशीच एक घटना घडली आणि घटनेचे रक्षण करण्याचे कार्य ज्या न्याय व्यवस्थेवर सोपविण्यात आले,त्या न्याय व्यवस्थेतील एका कारकूनानेच त्याला सुरंग लावण्याचे काम केल्याची दूर्देवी घटना उघडकीस आली आहे.

‘प्रेम’हा एक असा शब्द आहे जो अलौकिक मानला जातो.प्रेम ही भावना पारलौकिकतेशीच निगडीत असते.प्रेम ही भावना जबरदस्तीने मनामध्ये निर्माण करता येत नाही,ती एक अनुभती असते जी जिवंत संवेदनशील मनांना आनंदात भिजवून जात असते.दोन प्रेम करणा-यांना सदैव एक दुस-याचा सहवास हवाहवासा वाटत असतो,माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे व फक्त एकदाच भरभरुन आयुष्य जगण्यासाठी मिळत असल्याने,दोन प्रेम करणा-या जिवांना हे आयुष्य कोणत्याही धर्म,पंथ,जात,भाषा,प्रांत या पलीकडे एकमेकासोबत संसाररुपी भवसागरात घालवण्याची ईच्छा व अपेक्षा असते.

या देशाचा संविधान मुलीला वयाची १८ वर्ष तर मुलाला वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ‘सज्ञान ’ या श्रेणीत वर्ग करुन एकमेकांसोबत विवाह करुन सहजीवनाची कायदेशीर परवानगी बहाल करतो.असाच एक ‘हिंदू’प्रेमवीर परवा सोमवारी तातडीने मुंबईतील ठाण्यातून नागपूरला येण्यासाठी रेल्वेत बसला.येताना त्याच्या मनात अनेक भावना दाटून आल्या असतील.वडीलांच्या अपघातानंतर बाबा घरीच असतात.लहान भाऊ आणि आईची जबाबदारी देखील त्याच्यावरच आहे.

सध्या त्याला एका खासगी कंपनीत १७ हजार रुपये पगार मिळत आहे.त्याची अभियांत्रिकी पदवीची परिक्षा पूर्ण होताच त्याला ३० हजारांची नोकरी मिळणार आहे.मात्र,जिच्यावर त्याचे प्रेम आहे ती ’मुस्लिम’धर्मिय आहे.ती एम.एस.सी या पदव्यूत्तर शाखेची विद्यार्थिनी असून तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरु झाली आहे.तिचा भाऊ पुण्याला खासगी कंपनीत मोठ्या पदावर असून आई वडील देखील सुशिक्ष्त आहेत.

घरी लग्नाची बोलणी सुरु असल्याने या जोडप्यानी नागपूरातील विवाह नोंदणी केंद्रात रजिस्ट्रार समोर विवाह करण्याचे ठरवले.एक महिना ही नोटीस त्या ठिकाणी लागत असते यानंतर पुन्हा त्यांना रजिस्ट्रारसमोर हजर राहून आपल्या विवाहावर कायदेशीर शिक्कामोर्तब करणे भाग असते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आता सर्व प्रक्रिया ऑन लाईन करण्यात आली आहे.त्यामुळे या जोडप्याने देखील संपूर्ण माहिती ऑन लाईन सादर केली.त्यांचा अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याबाबत नोटीस काढली जाते व ती रजिस्ट्रारसमोर ठेवली जाते.या घटनेत त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले होते,ओके झाले होते पण नोटीस काढून ती रजिस्ट्रारसमोर ठेवण्यासाठी येथील क्लार्कने सायंकाळचे ४ वाजवले.

मुंबईहून आलेला तो प्रियकर व आपले आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याचा निर्णय घेणा-या त्या प्रेयसीच्या अर्जाची नोटीस तेथील क्लार्कने शेवटपर्यंत काढलीच नाही.हा विवाह लावण्यासाठी वकीलपत्र घेणा-या महिला वकीलांनी वारंवार तेथील क्लार्कला विचारणा केली मात्र या क्लार्कने ’मी मुलीसोबत बोलल्याशिवाय नोटीस काढणार नाही’असे महिला वकीलांनाच सुनावले.

वास्तवतेत सज्ञान असणा-या या मुलीसोबत बोलण्याचा या क्लार्कचा काय हेतू होता?घटनेच्या कोणत्या कलमाखाली त्याला हा अधिकार बहाल झाला होता? किंबहूना महिला वकीलांना,मुलीसोबत बोलल्याशिवाय मी नोटीस काढणारच नाही,असे ठणकावण्यामागे या क्लार्कचा काय उद्देश्‍य होता,हे नंतर या महिला वकीलांच्या लक्षात आले.

त्या मुलीला या क्लार्कने घाबरवले,तू मुस्लिम हा हिंदू आहे ,तू जर आता रितसर नोंदणी केली व बाहेर नोटीस लागली तर एका तासात तुझ्या घरी मदरसेवाले पोहोचतील व तुझ्या कुटुंबियांना अपमानित व्हावे लागेल,ते कुटूंबियांसोबत कसेही वागू शकतात,याशिवाय मुलगा हिंदू असल्याने बजरंगदलवाले वेगळा धिंगाणा घालतील!तुम्हाला वाटत असेल तर मी नोटीस काढतो मात्र हिंदू-मुस्लिम तंट्याला तुम्हीच जबाबदार राहाल!ही गोष्ट एक तासही लपून राहणार नाही,अश्‍या विवाहांवर दोन्ही बाजूंनी पाळत ठेवली जाते,तू तुझ्या कुटूंबियांचा विचार करुन घे!
आतापर्यंत ठामपणे निर्धार करुन विवाह या पवित्र बंधनात अडकण्याचे स्वप्न बघणा-या त्या तरुणीचे हे सर्व ऐकून अवसान गळाले!ती प्रचंड घाबरली,एक महिन्याने विवाहाची कायदेशीर नोंदणी झाल्यावर ती स्वत:प्रियकराला आपल्या सुशिक्ष्त आईवडीलांसोबत भेटवणार होती मात्र तिचं वैवाहिक आयुष्य सुरक्ष्त झाल्यानंतर,इथं तर भलतंच घडलं!

धार्मिक स्वातंत्र्य,लोकशाही,कल्याणकारी राज्य,मार्गदर्शक तत्वे,समतेचा अधिकार,घटनेतील ही सर्व मूल्ये फक्त एका ‘धर्म’या भावनेखाली क्षणात चिरडल्या गेली.लोकशाही असणा-या या देशात हिंदू-मुस्लिम मुल-मुली हे सोबत आपल्या मनासारखे, आयुष्य जगू शकत नाही,हे धगधगते वास्तव या उच्चविद्याभूषित तरुणीला उमजले.आज रजिस्ट्रारसमोर नोटीस ठेवताच मदरसेवाले तसेच बजरंगदलवाले घरी एका तासात पोहोचतील,हे ऐकूनच ती भावनिकरित्या कोलमडून पडली.

हजारो किलोमीटर दूरुन विवाहाच्या नोंदणीसाठी आलेला प्रियकर हा तरी देखील आपल्या निर्णयावर ठामच होता,महिला वकीलांनी देखील असे अनेक विवाह आतापर्यंत नागपूर शहरात झाले आहेत व ती जोडपी सुखी व आनंदी असल्याचे तरुणीला सांगितले मात्र रजिस्ट्रारसमोर जाण्यास तरुणीने नकार दिला.
अशीच एक घटना चार महिन्यापूर्वी याच रजिस्ट्रार ऑफिस समोर घडली होती.तो देखील हिंदू-मुस्लिम विवाहच होता.सात महिन्यांपूर्वी देखील असाच एक विवाह झाला आहे.त्या ही घटनेत बजरंग दलाने राडा केला असल्याचे या तरुणाच्या महिला वकीलांनी खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.मात्र ताे विवाह ते थांबवू शकले नाहीत कारण त्या घटनेत मुलगी शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम होती.

या घटनेत मात्र महिला वकीलांनी तरुणीला जास्त आग्रह केला नाही कारण पुढे हे प्रकरण चिघळल्यास आम्हीच दबाव आणला असल्याचा आरोप केला जाईल,असे होऊ नये म्हणून आम्ही त्यांचा निर्णय या दोन्ही सज्ञान जोडप्यावर सोपविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र,दररोज या विवाह नोंदणी केंद्रात वीस ते पंचवीस विवाह लावले जातात,यात अनेक आंतरजातीय असतात,हिंदू-बौद्ध असतात,हिंदू-ईसाई देखील असतात यावर कधीही तो क्लर्क कोणाला थांबवत नाही,जिथे हिंदू-मुस्लिम विवाहासाठी अर्ज येतात,त्यातही मुलगी ही मुस्लिम धर्मिय असली तर जणू ‘इस्लाम खतरे में‘यासारखी भूमिका हा क्लार्क घेताना दिसतो,अशी नाराजी या महिला वकीलांनी व्यक्त केली.

सध्या २१ सावे शतक सुरु आहे.या शतकाचेही तिसरे दशक सुरु आहे मात्र भारतात,भारतीय मानसिकतेत आम्ही आजही हिंदू-मुस्लिम हा धार्मिक कट्टरवाद कवटाळून बसलो असल्यानेच, हजारो किलोमीटर वरुन खूप आशेने आपल्या प्रेमासाठी धाव घेणा-या एका तरुणाला मात्र काल सांयकाळच्या रेल्वेने ठाण्याला परत जावे लागले.या गोष्टीचा त्याला मानसिक धक्का बसला आहे.मी मुस्लिम का नाही किवा ती हिंदू का नाही?असा आर्त प्रश्‍न त्याने ‘सत्ताधीश’ला केला.

तू हिंदू आहेस,तुझ्या प्रेयसीचा भाऊ जरी सुशिक्षत व चांगल्या पदाच्या नोकरीवर असला तरी तो कट्टर धार्मिक असल्याचे तुझी प्रेयसीच सांगते,विवाह झाल्यानंतर तुला तुझ्या जिवाची भीती नाही वाटत का?तुझ्यावर आई,वडील व लहान भावाची जबाबदारी आहे,यावर बोलताना,त्यामुळेच तर लीगली विवाह करणार होतो,एकदा विवाह झाला तर कोणत्याही जाती,धर्माची माणसे असाेत ते आपल्या मुलांसाठी नंतर अश्‍या विवाहाला मान्यता देतात,त्यांच्या मुलीला मी जिवापाड जपले असते,सुखी ठेवले असते,असे भाबडे उत्तर हा तरुण देतो.

आजच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील मुस्लिमांना उद्देशून एक विधान केले.‘देशात मुस्लिमांना घाबरण्याचे काहीच कारण नाही,देशावर त्यांचाही बरोबरीचा वाटा आहे फक्त धार्मिक श्रेष्ठतेचा भाव हा चुकीचा आहे,आम्ही इतकी शतके या देशावर शासन केले त्यामुळे पुन्हा या देशावर आमची सत्ता आणू,हा भाव चुकीचा असल्याचे ते म्हणाले.यावर लगेच ओवेसी,दिग्दविजय सिंग,जयराम रमेश यांचेही राजकीय ‘बयाण’आलेत.हिंदू-मुस्लिम धार्मिक द्वेषावर ‘आपापली’ राजकीय पोळी शेकताना देशातील एक अख्खी पिढीच होरपळून निघतेय,याचे भान देखील त्यांना राहत नाही.

या पिढीला हिंदू-मुस्लिम वादामध्ये काही एक रस नाही.ओळखी,प्रेम,लग्न,सहजीवन ही नैसर्गिक गरज धर्मामध्ये बंदिस्त केल्या जाऊ शकत नाही.स्वत: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जात घालवण्यासाठी आंतरजातीय विवाह हा एकमेव पर्याय सांगितला होता.ही पिढी तो प्रयत्न ही करत असते मात्र कुटूंब आणि समाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहण्या ऐवजी आम्ही त्यांच्या नैसर्गिक जगण्यामध्ये, जाती आणि धर्म,भाषेच्या बलदंड भिंती उभारण्यातच धन्यता मानतो.

आंतरजातीय विवाहाला संघाचा विरोध नाही,असे देखील भागवत सांगतात,हा स्त्री-पुरुषातील परस्पर संमतीचा विषय आहे असे ते ‘भारताचे भविष्य-संघाचा दृष्टिकोण’ या विषयावर बोलताना सांगतात.भारतात राहणारा प्रत्येक जण हा हिंदूच आहे,ओळख व राष्ट्रीयत्वाच्या दृष्टिनेही ते हिंदूच आहे असे ही ते सांगतात.दुसरीकडे हिंदू-मुस्लिमांचा डीएनए एकच असून भागवत हे राष्ट्रपिता असल्याचे अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इल्यासी सांगतात,तरीही मग आधुनिक शतकातील आधुनिक दशकातील या पिढीच्या वाट्याला हिंदू-मुस्लिम भेदातून असे भाेग,इतकी दहशत का यावी?

राज्यघटनेने दिलेल्या मौलिक अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे निदान त्यांनी तरी हिंदू-मुस्लिम या वादात न पडता आपले संवैधानिक जबाबदा-या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात,अशी अपेक्षा या घटनेनंतर वकील वर्तुळात आता चर्चिली जात आहे.

Latest बातम्या