Homeनागपूर न्यूजव्हायोलिनचे सूर अनंतात विलीन

व्हायोलिनचे सूर अनंतात विलीन

पंडीत प्रभाकर धाकडे गुरुजी यांचे देहवासन

संगीत विश्‍व स्तबध

शास्त्रीय तर शिकून घेऊ पण ‘गायकी’ कोण शिकवणार:विद्यार्थ्यांचा टाहो

नागपूर,ता. ७ जानेवारी २०२३: ‘सुरमणी’या उपाधीने गौरविण्यात आलेले नागपूरचे लाडके गुरुजी पंडीत प्रभाकर धाकडे गुरुजी यांचे आज शनिवार दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता देहवासन झाले.ही बातमी माहिती होताच नागपूरच्या संगीत विश्‍वात दु:खाची तीव्र लाट उसळली.

गुरुजींना याच महिन्यात १ तारखेला गड्ढी गोदाम सदर येथील व्हिम्स रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते.त्यांना फूफ्फूसाचे संक्रमण झाले होते.याशिवाय त्यांना मूत्रपिंड व यकृताचा देखील संसर्ग झाला होता.गुरुजी यांना मधुमेह देखील होता.त्यांच्या ह्दयात ब्लॉकेज होते,त्यांची फार पूर्वी बायपास शस्त्रक्रिया देखील झाली होती.

१ तारखेला त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हीम्स रुग्णालयात भर्ती करण्यात आले.ह्दयावरील उपचार पूर्ण झाल्याने यकृत,मूत्रपिंड व फूफ्फूसांच्या संक्रमणावर उपचारासाठी त्यांना आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वर्धा रोड वरील स्वास्थम या दुस-या रुग्णालयात घेऊन जात असताना,रुग्णवाहीकेतच अवघ्या पाचच मिनिटात त्यांना ह्दयघाताचा झटका आला व यातच त्यांची प्राण ज्योत मालवली.

गुरुजींच्या देहवासनाचे वृत्त पसरताच नागपूरातील अवघे संगीत विश्‍व स्तब्ध झाले!गुरुजींच्या सुरेल व्हायोलिनचे सूर नेहमीसाठी शांत झालेत.धाकडे गुरुजी यांची पाच दशकांहून अधिक काळातील संगीताची साधना होती.आजवर हजारो सुरेल विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले आहे.संगीताचे सखोल ज्ञान गुरुजींना वेगळीच उंची प्रदान करुन जात होते.
नागपूरात अनेक शास्त्रीय गायन शिकवणारी विद्यालये आहेत मात्र गुरुजींकडे जाणारा शिष्य हा खरी ‘गायकी’.आत्मसात करुनच बाहेर पडत असे.त्यांच्या शेकडो शिष्यांनी आकाशवाणीसोबतच देश-विदेशात गुरुजींच्या नावाला नावलौकिक प्राप्त करुन दिला.आपल्या अनेक विद्यार्थ्यांवर गुरुजींची विशेष माया होती.कोणत्या विद्यार्थ्यांच्या गळ्यातून नेमके काय साधता येईल,याचे अचूक ज्ञान गुरुजींना होते.

पार्श्वगायक सुरेश वाडकर हे नागपूरात एका खासगी कार्यक्रमात आले असता महाल येथील चिटणवीस स्टेडियममध्ये त्यांनी धाकडे गुरुजींसाठी विशेष गौरवोद्गार काढले होते.गुरुजी हे नागपूरातील संगीत विश्‍वातील अमूल्य धरोहर असल्याचे सांगून नागपूरातील विद्यार्थी हे फार भाग्यवान आहेत त्यांना धाकडे गुरुजींचा सहवास लाभतो,असे वाडकर म्हणाले होते.

गायकी शिकायला नागपूरकरांनी माझ्याकडे मुंबईत येण्या ऐवजी धाकडे गुरुजींकडे गायनाचे धडे गिरवावे,असाही वाडकर यांनी भरगच्च स्टेडियममध्येच सल्ला दिला होता.

गुरुजी हे नागपूरातील एक अद्वितीय भूषण होते.मुंबईच्या संगीत क्षेत्रात कवि सुरेश भट यांच्या नावाने ज्याप्रकारे नागपूर शहर ओळखला जातो त्याच प्रमाणे नागपूर म्हणजे धाकडे गुरुजींचे शहर,अशी ओळख मुंबईच्या संगीत जगतात आहे.गुरुजी आकाशवाणी चे अर्ध्व्यू राहीले आहेत.

जुन्या गाण्यांचे सूर गुरुजी जितक्या अलगदपणे व्हायोलिनवर छेडत असत त्याला तोड नाहीच.‘इक प्यार का नगमा है’‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही’नैना बरसे रिमझिम रिमझिम’अशी शेकडो अवीट गोडीची गाणी गुरुजींच्या मधाळ,रसाळ,सुरेलपणे छेडल्या जाणा-या सूरांची जणू दास्य होत असत.

गुरुजी अंध होते मात्र आत्म्याच्या चक्षूने ते संगीत जगतात आकंठ जगाला बुडवित असत.त्यांची साधना व्हायोलिन होती,त्यांचा श्‍वास व्हायोलिन होता.अवघड बंदिशींना देखील ते सहज आपल्या बोटांवर फिरवित असत.
नागपूरातील असा एक ही महोत्सव नाही ज्यात गुरुजींचा सहभाग नसे.अगदी नागपूर महोत्सव ते कीर्तन महोत्सव यासोबतच अलीकडील खासदार सांस्कृतिक महोत्सव,प्रत्येक महोत्सवात गुरुजींचे व्हायोलिन, श्रोत्यांनी ऐकले नाही असा श्रोता सापडणे विरळाच म्हणावा लागेल.गुरुजी हे नागपूरातील संगीत क्षेत्रातील देदिप्यमान नक्षत्र होते.गुरुजींना वगळून नागपूरातील संगीत जगताची कल्पना ही केली जाऊ शकत नाही.

अश्‍या महान गुरुजींची व्हायोलिन आज त्यांच्या घरातील कक्षात कायमची ‘मौन’ झाली ,ही कल्पनाच नागपूरातील गुरुजींवर नितांत प्रेम करणा-या श्रोत्यांना आणि कलावंतांना करवत नाही.

गुरुजी आणि त्यांचे भास्कर संगीत विद्यालय-
इंदिरानगर १० नंबरचा पूल,नागपूर महानगरपालिकेची शाळा,हा पत्ता आहे ‘भास्कर संगीत विद्यालयाचा’बालाजीपंत धाकडे यांनी १९६६ साली या गायन शाळेची सुरवात केली.पुढे सुरमणी पं.प्रभाकर धाकडे या त्यांच्या मुलाने शास्त्रीय गायनाची धुरा सांभाळली.भास्कर हे गुरुजींचे थोरले बंधू.ते उत्तम तबला वादक होते मात्र मुंबईला असताना त्यांचे अपघाती निधन झाले.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गायन शाळेचे नाव ‘भास्कर संगीत विद्यालय’ ठेवण्यात आले.त्याकाळी या शाळेचे विद्यार्थी सप्रे किंवा बुटी संगीत विद्यालयात परिक्षेला बसायचे,नंतर मात्र प्रभाकर देशकर यांच्या प्रयत्नातून या शाळेला मिरज येथील गंधर्व संगीत महाविद्यालयाची मान्यता मिळाली.

पं.प्रभाकर धाकडे यांचे पहीले गुरु स्वत: त्यांचे वडील होते.९ वर्षांचे असताना वडीलांनी धाकडे गुरुजींना अंध विद्यालयात शिकण्यास पाठवले.तेथेही गुरुजी अंध मुलांच्या ऑकेस्ट्रामध्ये फिमेल आवाजात गायचे.‘पारसमणी’चं ‘हसता हूआ नुरानी चेहरा’ आणि ‘बार बार तोहे क्या समझाये पायल की झंकार’,ही युगल गीते ते एकटे गात असत.
१९६५ साली विशारद झाल्यानंतर त्यांना शाळा सोडावी लागली कारण त्याकाळी अंध विद्यालयात फक्त सहा वर्षेच शिकण्याची परवानगी असे.१९६६ मध्ये एस.सी.एस गर्ल्स शाळेत ते संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले.पंडित जगदीशप्रसाद यांच्या गायनाने ते एकदा अत्यंत प्रभावित झाले आणि ते कुठे राहतात याची शोध मोहिम सुरु केली.१९६८ साली गंडाबंधन करुन त्यांच्याकडे संगीत शिकण्यास प्रारंभ केला.

या शिवाय बनारसचे पं.गोपालकृष्णन आणि एम.राजन यांच्या व्हायोलिन वादनाने त्यांना अत्यंत प्रभवित केले.गायकी अंगाने वाजवणारे ते अत्यंत दूर्मिळ कलावंत होते.धाकडे गुरुजी मनाच्या चक्षूंनी त्यांना ऐकून व्हायोलिन शिकत गेले.शाळेत शिक्षण घेत असतानाच मुलांसाठी गाणी देखील संगीतबद्ध करु लागले.पुढे जाऊन बुद्ध गीते रचण्याचा पायंडा येथेच पडला.नागपूर शहरातील त्यांचे शेकडाे शिष्य गुरुजींनी संगीतबद्ध केलेली शेकडो बुद्ध गीते गात असतात.

गुरुजींनी संगीतबद्ध केलेल्या चालींवर शंकर महादेवन,हरीहरन,अनुराधा पौडवाल,कविता कृष्णमूर्ती,सुरेश वाडकर यांच्या सारख्या दिग्गज पार्श्वगायकांनी बुद्ध गीते व गजलांचे गायन केले आहे.‘भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहेस’ ही त्यांची कॅसेट अत्यंत लोकप्रिय झाली.

२००९ साली धाकडे गुरुजी आकाशवाणीतून निवृत्त झाले.मात्र,शास्त्रीय असो किंवा सुगम संगीत फक्त संगीताप्रतीच ते पूर्णपणे समर्पित राहीले.१९८३ मध्ये त्यांना सूरसिंगार मुंबईतर्फे ‘सूरमणी’ही उपाधी प्राप्त झाली.त्याच वर्षी जापान येथे झालेल्या दिव्यांगांच्या संमेलनात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

पुन्हा १९९० साली त्यांना ही संधी दुस-यांदा मिळाली.स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणा-या गुरुजींच्या थोरल्या मुलाने मिलिंद धाकडे याने देखील मुंबईत चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून नावलौकिक कमावला.‘वळू’,‘विहीर’‘देऊळ’ तसेच’आजचा दिवस माझा’ या चित्रपटांना मंगेश धाकडे याने संगीत दिले आहे.

भास्कर संगीत विद्यालयाला नागपूरातील सुप्रसिद्ध ज्येठ गायिका छाया वानखेडे,लोकप्रिय गायिका आकांक्षा नगरकर,प्रा.अहिंसा तिरपुडे,प्रा.अनिल खोब्रागडे,हेमलता पोपटकर आदी यशस्वी शिष्यांची परंपरा लाभली आहे.

दोनच महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात दिवाळीत गुरुजींनी आकांक्षा नगरकर रचित ‘निर्मला आई तुला चढवितो महालक्ष्मीचा साज ,संगीताच्या सुर ताला सवे दिपोस्तव करू आज’या गीताला स्वरसाज चढवला होता.

गुरुजींना त्यांचे शेकडाे शिष्यवृंद रुग्णालयात आयसीयूमध्येही भेटण्यास गेेले होते.त्याच वेळी धाकडे गुरुजींची प्रकृती ही क्षीण वाटत असली तरी ते लवकरच बरे होऊन घरी परततील अशी आशा होती,रुग्णालयातूनच ते कायमचे दूरवर निघून जातील याची कल्पना देखील केली नव्हती,असे कातर स्वरात ज्येष्ठ गायिका छाया वानखेडे यांनी ‘सत्ताधीश’ला सांगितले.

गुरुजींच्या शिष्य वर्गाकडून दरवर्षी नियमितपणे गुरुपौर्णिमेला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते आणि शिष्यवर्ग त्यांच्या दर्शनासाठी व आशिर्वाद घेण्यासाठी दूरवरून येत होता.

गुरुजींच्या मागे त्यांच्या पत्नी उर्मिला,मुले मंगेश,कौशिक व विशाल,सून व नातू आहेत.मंगेश हा मुंबईहून नागपूरला येण्यास निघाला असून उद्या गुरुजी यांचा अंत्यसंस्कार झिंगाबाई टाकलीच्या घाटावर होण्याची शक्यता त्यांच्या कुटूंबियांनी वर्तवली.

Latest बातम्या